महिला विशेष
भारतीय महिला ही केवळ चूल व मूल यामध्ये रमलेली अबला नसून ती जागतिक क्रीडा क्षेत्रातही आपल्या देशाची प्रतिमा उंचावत असते हेच अनेक भारतीय खेळाडूंनी सिद्ध केले आहे.
भारतीय महिलांनी क्रीडा क्षेत्रातही आपल्या देशाचा नावलौकिक उंचावला आहे. सुपरमॉम म्हणून ख्याती मिळविलेली बॉक्सर एम.सी.मेरी कोम, बॅडमिंटनची सुपरस्टार सायना नेहवाल, सौंदर्यवती टेनिसपटू सानिया मिर्झा यांच्यासारख्या खेळाडू भारतीय खेळाडूंसाठी प्रेरणास्थान आहेत.
प्रगत देशांच्या तुलनेत भारतात क्रीडा क्षेत्रात अनेक वर्षे अनास्थाच दिसून आली आहे. भारतीय खेळाडू आंतरराष्ट्रीय स्तरावरील क्रीडा स्पर्धामध्ये अव्वल यश मिळविण्यासाठी आवश्यक असणाऱ्या शारीरिक व मानसिक तंदुरुस्तीत खूपच मागे पडतात. हा विचार केला तर भारतीय महिला खूपच अव्वल यशापासून दूर आहेत असेच दिसून येत आहे. भारतीय स्त्री म्हणजे चूल व मूल यामध्ये अडकलेली महिला आहे असाच सर्वसाधारण समज आहे. किंबहुना पुरुषप्रधान संस्कृतीत भारतीय महिला खेळाडू उपेक्षितच राहिल्या आहेत. त्यामुळेच की काय अपेक्षेइतकी उत्तुंग झेप भारतीय महिला खेळांडूंना जागतिक क्रीडा क्षेत्रात घेता आलेली नाही. असे असले तरी काही भारतीय महिलांनी पुरुष खेळाडूंइतकीच, काकणभर जास्त चांगली कामगिरी केली आहे.
भारतासाठी ऑलिम्पिक पदक हे वाळवंटातील मृगजळासारखेच असते याचा भारतीय खेळाडूंना अनेक वेळा प्रत्यय आला आहे. वैयक्तिक खेळात ऑलिम्पिक पदक ही भारतीय खेळाडूंसाठी स्वप्नवत ठरले आहे. ऑलिम्पिक पदकांचे दुर्भिक्ष असलेल्या भारतात करनाम मल्लेश्वरी या महिलेने वेटलिफ्टिंगसारख्या ताकदवान खेळात ऑलिम्पिक कांस्यपदक मिळवीत इतिहास घडविला. २००० च्या सिडनी ऑलिम्पिकमध्ये हे पदक जिंकणारी ती पहिली भारतीय महिला खेळाडू ठरली. भारतीय वेटलिफ्टर्स अनेक वेळा उत्तेजक औषधे सेवनप्रकरणी दोषी आढळले आहेत. भारतीय वेटलिफ्टिंग महासंघावरही मोठी दंडात्मक कारवाई झाली आहे. या पाश्र्वभूमीवर मल्लेश्वरी हिचे हे यश खरोखरीच कौतुकास्पद आहे.
बॉक्सिंग हा खेळ मुळातच पुरुष खेळाडूंचे प्राबल्य असलेला खेळ. अशा खेळात भारतीय महिला सहसा भाग घेत नाहीत. मात्र मेरी कोम हिने केवळ एकदा नव्हे तर पाच वेळा जागतिक विजेतेपद मिळवीत भारतीय महिलाही बॉक्सिंगमध्ये कारकीर्द करू शकतात हे दाखवून दिले आहे. त्यामधील दोन विश्वविजेतेपदे तिने दोन अपत्य झाल्यानंतर मिळविली आहेत. दोन मुलांची आई असलेल्या मेरी कोमने लंडन येथे २०१२ मध्ये ऑलिम्पिक कांस्यपदक मिळवीत सुपरमॉम म्हणून ख्याती मिळविली. मणिपूरमध्ये राहणाऱ्या या खेळाडूने ऑलिम्पिक पदकासाठी घरापासून कितीतरी महिने पुण्यात राहून अतिशय कठोर परिश्रम केले. आता तिसरे अपत्य झाल्यानंतर ती पुन्हा रिंगमध्ये उतरली आहे ते रिओ येथे २०१६ मध्ये होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेत पुन्हा पदक मिळविण्यासाठीच. विलक्षण जिद्द, कठोर व अविरत परिश्रम, जबरदस्त आत्मविश्वास याचा सुरेख समन्वय साधणारी मेरी कोम ही जगातील अनेक सुपरमॉम महिला खेळाडूंसाठी प्रेरणास्थान झाली आहे.
ऑलिम्पिक पदक मिळविण्यासाठी विलक्षण मेहनतीची गरज असते. याचा प्रत्यय घडवीत सायना नेहवाल हिने बॅडमिंटनमध्ये ऑलिम्पिक पदकाला गवसणी घातली. केवळ भारतीय नव्हे तर अनेक देशांमधील खेळाडूंसाठी ती आदर्श खेळाडू आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक स्पर्धा जिंकूनही तिचे पाय जमिनीवरच आहेत. तिने मिळविलेल्या उत्तुंग यशामुळे भारतीय बॅडमिंटन क्षेत्रात सायना इफेक्ट जाणवला आहे. या खेळात करिअर करता येते हा आत्मविश्वास तिने अन्य खेळाडूंप्रमाणेच पालकांमध्ये निर्माण केला. तिच्या सातत्यपूर्ण यशामुळे बॅडमिंटन खेळास मोठय़ा प्रमाणावर प्रायोजक मिळू लागले आहेत.
खेळाबरोबरच चांगले सौंदर्य असेल तर टेनिसमध्ये भरपूर आर्थिक प्राप्ती होऊ शकते हे सानिया मिर्झा हिने दाखवून दिले आहे. जागतिक स्तरावर सौंदर्यवती टेनिसपटू नावलौकिक मिळविलेल्या मारिया शारापोवा हिच्याइतकीच प्रसिद्धी सानियास लाभली आहे. मारिया हिच्याप्रमाणेच सानियालाही भरपूर आंतरराष्ट्रीय कंपन्यांनी आपले ब्रँड अ‍ॅम्बेसेडर केले आहे. सानिया हिने ग्रँड स्लॅम स्पर्धामध्ये दुहेरीत चांगले यश मिळविले आहे. एकेरीत तिच्या वाटय़ास फारसे यश मिळाले नसले तरी दुहेरीतही चमकदार कारकीर्द करता येते हे तिने दाखवून दिले आहे. अलीकडेच तिची आंतरराष्ट्रीय टेनिस प्रीमिअर लीगसाठी राफेल नदालच्या संघात निवड झाली आहे. तिची दुहेरीतील अव्वल यश मिळविण्याची क्षमता सिद्ध करणारी ही निवड आहे.
अंजू बॉबी जॉर्ज, पी.टी.उषा यांच्यासारख्या धावपटूंनी ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेतील अंतिम फेरीत धडक मारली आहे. अंजू हिने जागतिक मैदानी स्पर्धेत लांब उडीत कांस्यपदक मिळविले. जागतिक स्पर्धेत पदक मिळविणारी ती पहिली भारतीय धावपटू ठरली. ऑलिम्पिक स्पर्धेत दोन वेळा अंतिम फेरीत स्थान मिळूनही तिला पदकापर्यंत पोहोचता आले नाही. पी.टी.उषा हिला ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदकापासून केवळ एकशतांश सेकंदांनी वंचित व्हावे लागले. हे पदक तिला मिळविता आले नाही तरीही तिने आशियाई व अन्य आंतरराष्ट्रीय स्पर्धामध्ये पदकांची लयलूट करीत भारताची सुवर्णकन्या म्हणून नावलौकिक प्राप्त केला आहे. तिच्यापासून प्रेरणा घेत अनेक मुलींनी अ‍ॅथलेटिक्समध्ये कारकीर्द केली आहे आणि करीत आहेत.
सागरी जलतरण हा अतिशय धाडसी क्रीडाप्रकार समजला जातो. अनेक शर्यतींमध्ये राष्ट्रीय स्पर्धेत सुवर्णपदके जिंकणाऱ्या बुला चौधरी या भारतीय जलतरणपटूने जगातील सातही महासागरांमधील लांब अंतराच्या शर्यती पूर्ण करीत भारतीय जलपरी म्हणून ख्याती मिळविली आहे. सागरी जलतरणातही महिला चांगली कामगिरी करू शकतात हे तिने दाखवून दिले आहे.
अंजली भागवत, तेजस्विनी सावंत यांच्यासारख्या खेळाडूंनी नेमबाजीत जागतिक स्तरावर अनेक विक्रम केले आहेत. चार वेळा ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणारी अंजली ही नवोदित नेमबाजांसाठी प्रेरणास्थानच आहे. गेल्या सहा-सात वर्षांमध्ये नेमबाजीत कारकीर्द करू इच्छिणाऱ्या मुलींची संख्या वाढत चालली आहे. अभिनव बिंद्रा, गगन नारंग, विजयकुमार यांच्या पावलावर पाऊल ठेवीत ऑलिम्पिक पदकाला भारतीय महिला नेमबाज लवकरच गवसणी घालतील अशी अपेक्षा आहे.
मैदान व पाण्याप्रमाणेच हवेतील क्रीडा प्रकारातही भारतीय महिलांनी अतुलनीय कामगिरी केली आहे. शीतल महाजन या महाराष्ट्रीय महिला खेळाडूने पॅराजंपिंगमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर दिमाखदार कामगिरी केली आहे. अंटार्टिका व दोन्ही ध्रुवांवर पॅराजंपिंग करणारी ती पहिलीच भारतीय महिला आहे. माउंट एव्हरेस्ट हे फक्त भारतीय पुरुष गिर्यारोहकांसाठी नसून महिलाही गिर्यारोहणात उत्तुंग झेप घेऊ शकतात हे बचेंद्री पाल हिने सिद्ध केले आहे. तिने १९८४ मध्ये या सर्वोच्च शिखरावर पाऊल ठेवले. या शिखरावर यशस्वी चढाई करणारी ती पहिली भारतीय महिला गिर्यारोहक आहे. तिच्यापासून प्रेरणा घेत त्यानंतर अनेक भारतीय महिला गिर्यारोहकांनी हे शिखर सर केले आहेत.
कोनेरू हम्पी ही महिलांच्या बुद्धिबळात विश्वनाथन आनंदच मानली जाते. दोन वेळा तिने जागतिक अजिंक्यपदाच्या लढतीत स्थान मिळविले आहे. विश्वविजेतेपदाला गवसणी घालण्यात तिला अपयश आले असले तरीही अन्य भारतीय महिला खेळाडूंसाठी तिची कामगिरी प्रोत्साहनवर्धकच ठरली आहे.
दीपिका पल्लिकल (स्क्वॉश), डोला बॅनर्जी, दीपिकाकुमारी (तिरंदाजी), ज्योर्तिमयी सिकदर, शायनी अब्राहम, एम.डी.वलसम्मा, अश्विनी नचप्पा, कविता राऊत, प्रिजा श्रीधरन, कृष्णा पुनिया (अ‍ॅथलेटिक्स), मिताली राज , झुलान गोस्वामी, अंजुम चोप्रा (क्रिकेट), मधुमिता बिश्त, अपर्णा पोपट (बॅडमिंटन), रश्मी चक्रवर्ती (टेनिस), एस. विजयालक्ष्मी, द्रोणावली हरिका, तानिया सचदेव (बुद्धिबळ) आदी खेळाडूंनी भारतीय पुरुष खेळाडूंसारखेच उल्लेखनीय यश आंतरराष्ट्रीय स्तरावर मिळविले आहे. हम किसीसे कम नही हेच त्यांनी दाखवून दिले आहे.