आज होळी. यानिमित्तानं कुणाच्याही नावानं बोंब ठोकता येते. यंदा तर निवडणुकांचा सीझन असताना होळीचे रंग अधिकच गहिरे न झाले तरच नवल. पक्षोपक्षांचे नेते आणि कार्यकर्त्यांनी होळीअगोदरच परस्परांच्या नावानं राजकीय शिमगा सुरू केलेलाच आहे. त्यातलेच काही रंग.. खास आपल्या मातीतले.. तिरकस लोकधाटणीतले..
दोस्ताच्या लोकल श्रेष्ठीचं तिकिट वांद्यात पडलं आन् त्यांच्यासगट त्योबी अन्नेसेसरी बंडखोरीच्या उंबरठय़ावर हुभा ऱ्हायला. नेमक्या आशाच क्रिटिकल पोजीशनमंदी म्या त्याच्या घरी गेलो, तं ‘मैने उधार बेचा’चं टोटल नेपथ्य दोस्ताच्या बैठकीत पसरून ऱ्हायलं व्हतं. म्याबी लंबाचवडा पॉज घेत निपचित बसून ऱ्हायलो. दोनी बाजूनं आसाच पीनड्रॉप सायलेन्स गेल्यावर ‘थुतरीचं! आपची क्याप, डोक्याला ताप!’ आसं कायतरी पुटपुटत दोस्त ‘आप’वर यकदमच तुटून पडला. त्याच्या आशा आचानक हल्ल्यानं खरं तं म्या बावचळून गेलो; पन चुप्पी सोडली न्हाई. पाचपंचवीस फुल्या घालून सलग साताठ पॅरेग्राफ ओमीट केल्यावर त्यो पुरता दमून गेला. तरीबी म्या सायलेन्ट झोनमंदीच. मंग आपसूक माझ्याकडं बगून त्यो म्हन्ला,
‘बबऱ्या, सायेबांचं तिकीट कापलं गेलं फुकनीचं.’
‘काय म्हन्तो? पन आसं कसं कापलं दोस्ता?’
‘पार्टीला आता पॉप्युलर आमादमी हुभा करायचाय.’
‘काय म्हन्तो? मंग सायेब बंडखोरी करनार काय?’
‘तेबी तेवडं सोपं ऱ्हायलं न्हाय ना बबऱ्या.’
‘पन मंग सायेब काय करनार?’
‘स्सालं आता आन्नांचा पाठिंबा, न्हाय तं ‘आप’चं तिकिट- येवडाच ऑप्शन ऱ्हायलाय आमच्या सायबांपुडं.’
‘काय म्हन्तो? आपान्ना जमू देतीन?’
‘सायेब म्हन्तेत, ट्राय करायला काय हारकतै?’
‘दोस्ता, आशी सेटिंग लागू शकती? कायबी सांगतोहेस.’  
म्या यकदमच यक्साईट झाल्याचं बगून दोस्त जोशात आला. खोडरबरानं यखांदं चित्र पुसून टाकावं तसं त्यानं कपाळावरच्या आठय़ा पुसून टाकल्या, पायाची आढी उपसून काढली आन् माझ्याकडं बघून हसला. मंग म्हन्ला, ‘बबऱ्या, पॉलिटिक्समंदी सारे दरवाजे खुले ठिवावे लागत आस्तेत.’
‘म्हंजे तू आता सायेबांमागं तिकडंच जानार?’
‘लागलीच न्हाय. पक्षाची निष्ठा आस्ती ना.’
‘मंग करनार काय तू?’
‘पैल्यांदा पार्टीला यखांदा कोरा चेहरा बगून देनार.’
म्या त्याच्याकडं निस्ताच बगत ऱ्हायलो. तसं त्याच्यातला उत्साह आजूकच वाडला. त्यो म्हन्ला,
‘बबऱ्या, तुझ्या वळखीत हाये का यखांदा आमादमी.’
‘दोस्ता, माझ्या वळखीत सारे आमादमीच हायेत.’
‘तशे न्हाय बे, जरा अ‍ॅक्टिव्ह पायजेल.’
‘म्हंजे कसा?’
‘रेग्युलर आमादमी नगो, त्यो जरा फेमस पायजेल.’
‘फेमस? दोस्ता, आमादमी फेमस कसा आसंल?’
‘म्हंजे कसं बबऱ्या, की त्याला जरा सोशल अँगल पायजेल.. त्याला जरा पॉलिटिकल सेन्स पायजेल.. त्याला मीडिया मॅनेजमेंट कळालं पायजेल.. इकॉनॉमिकली जरा स्ट्राँग पायजेल..’
‘यवडं सगळं आसनाऱ्याला आमादमी म्हन्तात?’
‘बबऱ्या, आपन आमादमीची डेफिनेशन करायला न्हाई बसलेलो. आन् तुला सांगू का, म्या सांगितलेल्या ज्या गोष्टी हायेत- त्या साऱ्याच कॉमन मान्सांत आसतात; पन ज्याला त्या कॅश करता येतात, त्याला सांप्रत काळात आमादमी म्हन्तात.’
‘अच्छा, म्हंजे तुला प्रोफेशनल आमादमी पायजेल.’
‘हांगी आस्सं. पन विदाउट क्याप पायजेल.’
‘दोस्ता, आटी नगो. आन् विदाऊट टोपी कामून रे?’
‘बबऱ्या, टोपी मनात पायजेल. डोक्यावर आस्ली काय आन् नस्ली काय, त्यानं फरक पडत न्हाई. ज्यांचं टेम्परामेंट टोपीचं न्हाईचाय, त्यांना ती लैच बेंगरूळ दिसत आस्ती.’
‘पन तुमच्यातबी घालतातच की टोपी?’
‘बबऱ्या, आमची टोपी कोरी. त्यांच्या टोपीवर ल्हेलेलं ऱ्हातं.’
‘मंग त्यात काय प्रॉब्लेमै?’
‘त्यातच तर आरोगन्सी हाये बबऱ्या.’
‘म्हंजे? दोस्ता, हिथं आरोगन्सी कुठं आली?’
‘आरं, ल्हेलेली टोपी म्हंजे एज्युकेटेड आस्ल्याची घमेंडच की! शिकल्याचा यवडाबी माज बरा नसतो बबऱ्या.’
दोस्ताच्या लॉजिकवर म्या पुन्यांदा गपगार झालो. त्याची भाषा मला आवडली न्हाई; पन म्या त्याला खोडलं न्हाई. इमोशनल अ‍ॅटॅचमेन्ट जिथं आस्ती तिथं मान्सानं कवा कवा पडती बाजू जानूनबुजून घेतली पायजेल. जादा क्रॉस न्हाय केलं पायजेल. त्यो जर फस्ट्रेशनमंदी आसंन, तं उलटं त्याला आवडतीन आशेच प्रश्न इचारून त्याला बोलतं ठिवलं पायजेल. म्हनून म्या दोस्ताला इचारलं,
‘दोस्ता, खरंच आमादमीची गरजै पॉलिटिकल पाटर्य़ाना?’
‘बबऱ्या, जन्तेचा खेळ आस्तो. जन्तेच्या इंटरटेन्मेंटसाठी त्यो खेळायचा आस्तो. सांप्रतला त्यांची डिमांड आमादमीची हाये. आपनबी द्यायचा आमादमी. आलाच निवडून तं आपला, न्हाय आला तं आपयशी.’
‘त्यो नेमका सापडला तं पायजेल!’
‘बबऱ्या, आमादमी ही व्हर्चुअल कल्पना आस्ती. कॅरेक्टर नंतरच्याला येत आस्तं. आन् यवडय़ा इमिजिएट त्यो मानूस आमादमी हाये की न्हाई, हे कुनीच प्रुव्ह करू शकत नस्तं. आपनबी दावा करायचा न्हाई, गॅरंटी द्यायची न्हाई. टाईम मारून न्यायचा. बस्स! निवडून आल्यावर चट् सिस्टीम लागून जात आस्ती.’
‘बरं सोड.. दोस्ता, मला यक सांग, ह्य़ा आसल्या भंपक गोष्टीला तुमी आपोज न्हाई केला पार्टी लेव्हलवर?’
‘कामून?’
‘आरं, तुमचं दुकान बंद न्हाई का व्हनार?’
तसा दोस्त फिदीफिदी हास्ला. मंग त्यानं जर्दा काडली. मळली. लावली. यक पिचकारी मारली. नंतरच्याला माझ्या खांद्यावर हात ठिवीत त्यो म्हन्ला, ‘बबऱ्या, हॉटेली चालवायला देत न्हाई आपन? आपला धंदा चालला न्हाई की भाडय़ानं देत न्हाई जागा? गिऱ्हाईकाला आदत झाली की जागा पुन्यांदा खाली करून घेत न्हाई?’
‘दोस्ता, पार्टी कुठं आन् हॉटेली कुठं? त्यांच्यात कंपॅरिझन..?’
‘कसं आस्तंय बबऱ्या, दुकानं कंदीच कमी व्हत नस्तात. त्यात आणखीन भर पडत आस्ती. नवेकोरे दुकानं मार्केटमंदी अॅड व्हत आस्तात. नवे आस्ल्यानं त्यांच्या स्कीमा जबरा आस्तात. लोकायला त्या अॅट्रॅक्ट करतात. ती पब्लिकचीच डिमांड आस्ती. नंतरच्याला काई दुकानं टिकतात, काई बंद पडतात.’
‘दोस्ता, तुमी आशी भाषा न्हाई वापरू शकत ‘आप’च्या बाऱ्यात. तिथं इमानदारीचा मामला हाये.’
‘बबऱ्या, इमानदारीची जादाबी भमभम इरिटेटिंग आस्ती.’
‘म्हंजे?’
‘मान्सं आशा इमानदारीलाबी कंटाळून जातेत यखांद्यादिशी.’
‘ह्य़ो तुमचा आशावाद हाये?’
‘यका सेंटेन्सवरनं आमाला व्हिलनच्या रांगेमंदी बसवू नगोस बबऱ्या. मॅच्युअर्ड मान्सांनी करप्शनच्या बाऱ्यात यवडं उथळ बोलूने. ते रातीतून संपवन्याची भाषा करूने. करप्शन ही कंदीच डिमांड नस्ती; ती आपसूक येणारी गोष्ट आस्ती बबऱ्या. तिला यकच बाजू नस्ती. त्यो सोयीचा मामला आस्तो. जरा समजून घे. आन् मला सांग, भ्रष्टाचारामंदून झालेल्या सगळ्याच गोष्टी वाईट आस्तात काय? यखांदी तरी चांगली गोष्ट घडली आसंन?’
दोस्ताच्या ह्य़ाबी फिलॉसॉफीवर म्या क्रॉस केलं न्हाई. त्याच्याकडं निस्तंच बगत ऱ्हायलो. च्यायला, मत्सर ही गोष्ट लैच आवगड आस्ती. चांगल्या चांगल्या मान्सांनाबी ती बहेकून टाकती. नंतर दोस्त लाईन चेंज करीत म्हन्ला,  
‘बरं जावूंदे, हाये का तुझ्या बगन्यात आमादमी?’
‘तुमच्यात यवडा कॉन्फिडन्सै, तं मंग ‘आप’चाच फोडा की यखांदा. रेडीमेड इन्फ्रास्ट्रक्चर भेटंन ना तुमाला!’
‘तसं जमंना ना बबऱ्या. तुला सांगतो, तिकडं इठ्ठल बडव्यांच्या हातून सुटला; पन इकडं हायटेक बडव्यांनी हैदोस घातलाय. आमादमीचे जे काय गॉड हायेत, त्यांच्याभवती त्यांचंच जाळं हाये. त्यांना कसं मॅनेज करावं बबऱ्या? त्यांना आपली भाषाच समजत न्हाय, आन् आपल्याला त्यांचं स्टॅटिस्टीक समजत न्हाय. हाय का नाय बोंब!’
‘तुमाला त्यांचा मानूस फोडता येत न्हाई आन् तुमचे सायेब त्यांच्या तिकीटाकडे डोळे लावणार! आसं कसं दोस्ता?’
दोस्त पुन्यांदा हास्ला. त्यानं मंग मानूस फोडनं आन् तिकीट मिळवनं ह्य़ा दोन गोष्टी कशा आल्लग हायेत, आमादमी पार्टी  आन् निस्ता आमादमी ह्य़ा दोन गोष्टीत किती डिफरन्स हाये, हे मला समजावून सांगितलं. अॅजयुज्वल मला ते कायबी समजलं न्हाई. आमादमीच्या प्रॉमिनंट जाती आन् जाती-जातीतले प्रॉमिनंट आमादमी ह्य़ांची तोंडओळख करून देत त्यानं त्यांचे पॉलिटिकल अफेअर्स आन् त्यांच्या अॅम्बिशन्स आसाबी यक टॉपीक मला लगोलग शिकवून टाकला. मंग माझ्याबी आंगात आपसूक यक होतकरू स्टुडंट जन्माला आला. त्यानं माझी क्युऱ्यासिटी वाडवली. म्या चाचरत चाचरत त्याला इचारलं, ‘दोस्ता, स्सालं आमादमी डावा आस्तो की उजवा? तुमाला कोन्ता पायजेल?’
माझ्या प्रश्नावर त्यानं जरासाक पॉज घितला. नंतर शर्टाच्या बाह्य़ा वर केल्या. खिशातला चष्मा काडून डोळ्यावर चडवला. नंतर उतरवला. रूमालानं पुसून खिशात ठिवला. मंग म्हन्ला,
‘बबऱ्या, त्याचं कसं आस्तंय, आमादमीला सूर्याच्या तेजाचं लै अॅट्रॅक्शन आस्तं. त्यानं त्यो दीपून जात आस्तो. पन कवा कवा त्यो त्या तेजानं होरपळूनबी जात आस्तो. आशा टायमाला त्याला थंडगार सावली पायजेल आस्ती. ती डाव्या साईडला पडली हाये की उजव्या साईडला, ह्य़ाचा इचार करायला त्याला टाईम नस्तो. त्यो फकस्त झाड हुडकत आस्तो. बस्स! सांप्रतला त्यो सोताच झाड व्हायच्या प्रयत्नांत हाये, हीच त्याची गुस्ताखी!’
‘म्हंजे त्याचं सोताहा झाड व्हनं तुमाला खुपून ऱ्हायलंय?’
‘बबऱ्या, झाड आन् वाटसरू ह्य़ा गोष्टी कायम आल्लगच आस्तात. लोकशाहीमंदी आमादमी ऑलटाईम राजावजा याचकाच्याच भूमिकेमंदी आसावा लागतो. त्यो सत्तेत आला की त्याच्या स्वातंत्र्याची वाट लागत आस्ती.. त्याची घुसमट सुरू व्हत आस्ती. मंग त्याचा आमादमी ऱ्हातच न्हाई. सत्ता आन् आमादमी हे दोन टोक आस्तात. यक तं तुमी आमादमी व्हा, न्हाय तं सत्ताधारी. तुला सांगतो, सत्तेतून ज्या सावल्या दिसतात त्या कंदीच सावल्या नस्तात. त्यो निस्ता भास आस्तो. झाड व्हता व्हता पानं कंदी झडून जातीन ह्य़ाचाबी भरोसा नस्तो. राजकारन सोपी गोष्ट नस्ती.’
‘दोस्ता, जुनं इसर. आता आमादमीत शिस्त आलीहे.’
‘बबऱ्या, पुन्यांदा हुकलास तू. आरं आमादमी हे बिरूद बेशिस्तीला जोडूनच येत आस्तं. कॉमन मानूस म्हंजे काई यकाच साच्यातून निंगालेला सेम टू सेम दिसनारा चायना माल नस्तो. त्यांच्यात उन्नीस-बीस आस्तंच. दाम, राम, बंड, छेद चालतच ऱ्हातो. ध्यानात घे, जवा कर्करोगाचा इशारा देवूनबी मान्सं तंबाखु खातात तवा ते नो पार्कीगच्या बोर्डाखालीच गाडी पार्क करनार, हे गृहित धरावं लागतं राजकारनात. आन् तसंच त्यांना टॅकल करावं लागतं. म्हनून तू शिस्तीचं जे काय स्वप्न बगून ऱ्हायलास, ते सत्यात नसतं. आलं, तं बोऱ्या वाजत आस्तो.’
 दोस्ताला जे सांगायचं व्हतं ते त्याला नेमक्या शब्दात सांगता येत नव्हतं. त्यो शब्दाचे डोंगर उभे करत व्हता. आन् माझ्या जिभेवर आमादमी हातपाय पसरून बसला व्हता. मंग म्याच त्याला म्हन्लं,
‘दोस्ता, मी हुडकू लागतो तुझ्यासाठी आमादमी. पन मला सांग, त्याचं फ्यूचर काय?’
‘आमादमीला फ्यूचर आस्तं?..लाट जशी येती तशी ती जातबी आस्ती. त्यात त्यो कसा टीकून ऱ्हातो त्याच्यावर ते डिपेंड हाये बबऱ्या. हार्षद मेहताचा घोटाळा भायेर आला तवा कॉमन पब्लिकला स्टॉक मार्केटचा लैच अवेरनेस आला व्हता. नोकऱ्या सोडू सोडू लोकं शेअरमंदी घुसले. सांप्रतला काय पोजीशन हाये? दोन-चार लाखांचा चुराडा करून ते पुन्यांदा पैल्याच नोकऱ्यात अॅडजेस्टमेंट करताहेत की न्हाई? तसंच हे. आमादमी हे आमचं फाईंड न्हाई; ते तुमाला पायजेल..’
‘दोस्ता, चीत भी मेरी आन् पट भी मेरी आसं चाल्लय तुझं. तुमाला पार्टीसाठी आमादमी तर पायजेल, आन् वरनं आमादमीला तू चिल्लरमंदीबी काडून ऱ्हायलास. तुमचा ह्य़ो डाव आता चालनार न्हाई. आमी तुमाला बिलकुल भिनार न्हाई. आता जे काय व्हयाचं आसंन ते होवूंदे. तुमचे पॉलिटिकल मॅथेमॅटिक्स आन् फिलॉसॉफी गेली गड्डय़ात. आमादमी आता लडनारच. टिपू सुलतान म्हन्तो, ‘बकरी होवून शंभर दिवस जगन्यापक्षा वाघ होवून यक दिवस जगलेलं बरं!’’
म्या आसा आचानक भडकल्यानं त्याला आजूकच चेव आला. त्यो पुन्यांदा बावळ्यावानी फिदीफिदी हासू लागला. त्यानं परत जर्दा काडला. लावला. माझ्या आणखीनच जवळ येत म्हन्ला,
‘बबऱ्या, टिपूनं हे वाक्य कोन्त्या संदर्भात म्हन्लं व्हतं आन् तवा त्याच्या म्होरं कोन व्हतं, हे बगावं लागंन. त्याचा अँगल प्राणीमात्रांसाठी व्हता की मान्सांसाठी, हेबी तपासावं लागंन.. मला सांग बबऱ्या, जगामंदी वाघ आन् बकरी आशे दोनच प्राणी हायेत काय? बाकीच्यांचा वंश नामशेष झालाय काय? हात्ती, घोडे, उंट, कोल्हे, गेंडे, लांडगे, वानरं.. आन् गेलाबाजार बैलं, गाढवं हायेतच की! बाकी प्राण्यांचं कायतरी कमी-जास्त आयुष्य आसंनच ना? यक आन् शंभर रेंजमंदी जगत आस्तीनच ना ते? त्यांच्यापैकी यक व्हायचं आपन. फुकनीची आयडंेटिटीबी ऱ्हाती आन् जगताबी येतं. वाघ-बकरीचाच अट्टहास कामून? आयुष्य म्हंजे चहा हाये काय ब्रँड नेमवर जगायला?’
त्याच्या स्टेटमेंटवर म्या टाळी दिली. टाळी ही कवा कवा सोयीस्कर गोष्ट आस्ती. यखांद्या मानसाला यखांदी गोष्ट प्रुव्ह करायची आसंन, त्यो जिद्दीलाच पेटलेला आसंन, तं त्याच्याम्होरं जादा ऑग्र्यूमेंट करूने. त्याला लूज पडू देवूने. डिस्कशनमंदी कुनी जिंकलं म्हंजे आपन हारत नस्तो. प्रॅक्टीकल लेव्हलला आपल्यातला आमादमी यवडंच शिकवतो आपल्याला. न्हाय तरी मान्साच्या इचारावर वय मात करतं, हे साऱ्याच चळवळीकडून शिकलोय आपन.
(ता. क. – ‘फुकनीचं, आपल्या देशात कितीक आमादमी हायेत?’ आसं दोस्तानं मला इचारलं. तवा म्या म्हन्लं, ‘दोस्ता, आमादमी जन्माला येतो, तसा मरूनबी जातो. प्रॉडक्शन किती आन् स्टॉकमंदी किती, ह्य़ाची नोंद करायला त्यो काई कारखान्यातला माल न्हाई. जिथं जगन्या-मरन्याच्या गोष्टी आसतेत तिथं कोन्तीच फिगर कंदीबी ऑथेंटिक नस्ती. इन द सेन्स, ज्या गोष्टी मान्साच्या हातात न्हाईत त्यात कसलंच ठाम विधान करता येत नस्तं. म्हनून दोस्ता, आमादमी फिगरमंदी न्हाई,  जिगरमंदी मोजावा लागत आस्तोय.’)

Amir Khan Video Supporting Congress Asking for 15 lakhs
“जर कुणाच्या खात्यात १५ लाख नसतील तर..”, म्हणत आमिर खान काँग्रेसच्या प्रचाराला उतरला? Video पाहिलात का?
How to prevent heart attacks
Heart Attack : हृदयविकाराचा धोका कसा टाळायचा? वयाच्या विसाव्या वर्षापासून लावा ‘या’ सवयी, तज्ज्ञ सांगतात…
youth dies
मस्करी जीवावर बेतली; कम्प्रेसरच्या सहाय्याने मित्राच्या गुदद्वारात हवा भरली, तरूणाचा दुर्दैवी मृत्यू
Benjamin Basumatary sleeping on cash
नोटांच्या ढिगाऱ्यावर झोपलेल्या नेत्याचा फोटो व्हायरल; भाजपाच्या मित्रपक्षाने म्हटले…