19 January 2020

News Flash

हाताबाहेर गेलं की..

दिल्लीतील निर्भया बलात्कार प्रकरणावर एका विदेशी दिग्दर्शिकेने बनवलेल्या ‘इंडियाज् डॉटर’ या माहितीपटाने हलकल्लोळ माजला.

| March 15, 2015 03:42 am

दिल्लीतील निर्भया बलात्कार प्रकरणावर एका विदेशी दिग्दर्शिकेने बनवलेल्या ‘इंडियाज् डॉटर’ या माहितीपटाने हलकल्लोळ माजला. त्यात या प्रकरणातील आरोपी व त्यांच्या वकिलाने उधळलेल्या मुक्ताफळांनी भारतीय समाजाची नैतिकता जणू रसातळाला गेली आहे अशी जगाची समजूत होईल, या भीतीपोटी सरकारने त्याच्यावर बंदी घातली. परंतु तरीही तो प्रदर्शित झालाच. त्यावर मग उलटसुलट चर्चा व प्रतिक्रियांचे पेव फुटले. यासंदर्भात विचारशील तरुणाईचे नेमके काय म्हणणे आहे, हे जाणून घेणारे  तरुण रंगकर्मीचे लेख..

तिसरीच्या उन्हाळ्याच्या सुट्टीत मला पहिल्यांदा मनाविरुद्ध झालेल्या पुरुषाच्या स्पर्शाचा अनुभव आला. हे नेमकं आपल्यासोबत काय घडतंय, हे मला तेव्हा नीट कळलं नाही. हे आपण आपल्या वागण्याने ओढवून घेतलेलं नाही, आणि याच्या विरोधात तक्रार करायला हवी हे मनात यावं, इतका वेळ मी त्याचा तेव्हा विचारही केला नाही. त्या अनुभवातून आलेली किळस आपल्या पोटात घर करून गेली असं काहीतरी वाटलं. आणि ज्या पुरुषाला आपण ‘सर’ म्हणतो, ज्याच्यावर बिनदिक्कत विश्वास टाकून मोकळे होतो, ज्याचं कामच आपली काळजी घेणं आहे, त्याने हे केलं आणि मग ते लपवलं, ही जाणीव सोबत राहिली.
‘India’s daughter’ या डॉक्युमेंट्रीवर सरकारने आणलेली बंदी आणि त्यामागची कारणं हे दोन्ही गेले अनेक दिवस चच्रेत आहेत. कोणत्याही कलाकृतीवरची बंदी हा विचारस्वातंत्र्यावर, भाषणस्वातंत्र्यावर घाला नाही का? किंवा हे लोकशाहीत बसतं का? यासारखे ढोबळ प्रश्न मला आत्ता विचारायचे नाहीत. ती डॉक्युमेंट्री कशी सामान्य आहे, बंदीमुळे तिच्याकडे नको तितकं लक्ष वेधलं गेलं, या मतांचा, किंवा ती patronizing आहे आणि भारतीय व्यवस्था पुरुषप्रधान आहे, हे दाखवून द्यायला Leslie Udwig  कशाला हवी, असे प्रश्न विचारणाऱ्यांचाही प्रवाह यादरम्यान दिसून आला. पण मला आत्ता त्याहीबद्दल बोलायचं नाही.
मला वाटतं, बंदीसारखं काहीतरी घडलं की आपल्याला त्वेषाने फडकवायला झेंडा हातात मिळाल्यासारखा वाटतो. मग आपण ‘जागे’ होतो. इतरांनाही घसा खरवडून ‘जागं व्हायची वेळ आलेली आहे’ असं सुनावतो. छाती बडवून, रक्त आटवून हा ‘महत्त्वाचा’ विषय अधोरेखित करतो. हे सगळं करण्यात काही चूक आहे असं मला म्हणायचं नाही. या अशा पेटून उठण्यातूनच चळवळ जन्म घेते. पण मला वाटतं, कधी कधी हा आवेश फसवा ठरू शकतो. या विशिष्ट संदर्भात बोलायचं झालं तर ‘स्त्रीवाद’ घोषणांमध्ये अडकून पडतो आणि रोजच्या जगण्याच्या गाभ्याशी जाऊन काही मूलभूत प्रश्न विचारायचे राहून जाऊ शकतात.
मी मोठी होत असताना मुलींनी ‘माझं मुलींशी जमत नाही, मला मत्रिणींपेक्षा मित्रच जवळचे आहेत,’ हे विधान करणं स्त्रीवादी समजलं जायचं. असं म्हणणारीला मग इतर मुली आणि ती स्वत:ही ‘वेगळी’ समजायच्या. ती मुलींच्या परे गेलेली, मुलांनाही इंटरेिस्टग वाटतील अशा विषयांवर बोलू शकणारी- म्हणजे मग अर्थातच भारी असं गृहीत होतं. मीही हे विधान एकेकाळी अभिमानाने केलेलं आहे. मुद्दा- मित्र जास्त जवळचे वाटण्याचा नाही. तो वैयक्तिक choice  आहे. पण अगदी प्रामाणिकपणे सांगायचं झालं तर त्यात तेव्हा एक वर्चस्वाची भावना होती. ती का होती, हा प्रश्न मला तेव्हा पडला नाही. पुढे आपसूकच ‘कजाग’ बायांच्या गटात मी मोजली जाऊ लागले तेव्हा ते नसíगक वाटलं. आपण एक काहीतरी सर्वसामान्य नसलेली जमात आहोत.. बायका सहसा आपल्याला टाळतात.. आणि पुरुषांना गंमत वाटते, की कशी ना वेडी तडतड करते. यात आपण आक्षेप घ्यावा असं काही आहे, हे लक्षातही आलं नाही. ‘तुझ्या नाटकात प्रमुख पात्र स्त्रिया का असतात?’ हा प्रश्न विचारला जाईपर्यंत त्यात विशेष काही आहे आणि याचं आपल्याला उत्तर द्यावं लागणार आहे हे सुचलंही नव्हतं. ‘स्त्री-लेखिका’ म्हणून कुठे उल्लेख झाला की मला राग यायचा. एक काळ असाही होता- जेव्हा मी मुद्दाम असं नोंदवायचे, की मी ‘फेमिनिस्ट’ नाही. ‘फेमिनिस्ट’  म्हणजे कोणीतरी कायम पुरुषांवर चिडलेल्या बायका असतात असा माझा तेव्हा समज झाला होता. एका इंग्रजी सिनेमात ‘बायका जेव्हा कुरूप असतात, तेव्हा त्यांना मतं असतात..’ असा विनोद ऐकला तेव्हा नुसताच तुच्छ सुस्कारा सोडून मी टीव्ही बंद करून टाकला होता. हा विनोद आणि ओघानेच हा सिनेमा कोणासाठी बनवला आहे, हा प्रश्न नाही पडला.
पण या गोष्टी आपल्या रोजच्या जगण्यात इतक्या खोलवर रुतलेल्या आहेत, की त्या बोचण्याची सवयही आपसूकच करून घेतली जाते. माझ्या एका बॉयफ्रेंडच्या आईने मला पहिल्यांदा भेटल्यावर त्याला म्हटलं होतं, ‘नक्की लग्नाचा विचार आहे का? Dominating वाटते.’ मग आम्ही दोघे यावर हसलो. एकदा ‘हल्ली डिव्होर्स वाढलेत’ या विषयावर काही बायकांचं संभाषण मी ऐकलं. त्यातल्या एकीचं म्हणणं होतं की, हल्ली मुली जुळवून घ्यायला तयार नसतात म्हणून लग्नं तुटतात. ही तिच्या मते मुलींची चूक होती. मी अनेकदा बायकांनाच असं म्हणताना ऐकलंय- ‘हल्ली मुली नको तितक्या आगाऊ झाल्या आहेत..’, ‘मुली हाताबाहेर जाऊ लागल्या आहेत.’ कोणाला नको तितक्या किंवा कोणाच्या हाताबाहेर, हा प्रश्न मात्र विचारला जात नाही.
मी मध्यंतरी एक बिलबोर्ड पहिला. त्यावर एका शहरी तरुण मुलाचा फोटो होता आणि खाली लिहिलं होतं- ‘बायकांची सुरक्षा ही केवळ पोलिसांचीच नाही, तर माझीही जबाबदारी आहे.’ यात तसं पाहिलं तर चूक काही नाही. उद्या कोणी कोणाला त्रास देताना दिसलं तर पोलिसांची वाट न पाहत बसता आपण मदतीला धावून जावं, असा उदात्त विचार त्यामागे आहे. पण दुसऱ्या बाजूने बायकांची सुरक्षा करावीच लागू नये असा समाज निर्माण करणं ही माझी जबाबदारी आहे, असं तो बिलबोर्ड म्हणत नाही.
या विषयावर विचार होत असताना अनेकदा त्याचं एक खूप महत्त्वाचं अंग पुरेसं तपासलं जात नाही असं मला वाटतं. ते म्हणजे- पुरुषांचं इतर पुरुषांशी असलेलं नातं! हॉस्टेलचं आयुष्य पाहिलं तर ते काहीसं concentrated स्वरूपात दिसतं. अनेकदा कोणाच्याही देखरेखीत न जगावं लागणं हे मुलं इथं पहिल्यांदा अनुभवत असतात. बंधनं नसतात. हवं ते करण्याची मुभा असते. Superior समजली जाणारी मुलं ही सहसा शारीरिक शक्ती असलेली असतात. ‘पुरुषीपणा’ हा केलेल्या मारामाऱ्यांवरून ठरतो. Ragging  च्या प्रकारांमध्ये लंगिक खेळच सगळ्यात जास्त प्रमाणात असतो. एखाद्या tomboy असलेल्या मुलीची जितकी खिल्ली उडवली जाते, त्यापेक्षा एखाद्या ‘बायल्या’ मुलाला खूप जास्त भीषण humiliation ला तोंड द्यावं लागतं.
आपल्या भाषेतही हे दिसून येतं. शिव्या हे याबाबतीतलं कायम उल्लेख होत असलेलं उदाहरण आहे. पण त्याहीपेक्षा खोलवर हे दिसून येतं. कर्तृत्व गाजवू न शकण्याला, कमकुवत असण्याला आपण ‘षंढपणा’ म्हणतो. काहीही निष्पन्न होण्याची शक्यता नसण्याला आपण ‘वांझोटं’ म्हणतो. माझ्या मित्रांच्यात अगदी सर्रासपणे एखाद्याला खाली दाखवायला ‘छक्क्या’ म्हटलं जातं. हे कुठेतरी खोलवर आपल्याही नकळत या कल्पना बळकट करत नसतं का?
या सगळ्याच्या बरोबरीने आपण सेक्सबद्दल बोलत नाही. लंगिक गरजा मान्य करत नाही. बहुतेक मध्यमवर्गीय घरांमध्ये सेक्स न करताच मुलं जन्माला आल्याच्या आविर्भावात आई-बाप वावरत असतात. सेक्सचा आस्वाद घेणं, त्याबद्दल खुलेपणा बाळगणं तर दूरच; ती एक अंधारात गुपचूप उरकून टाकायची गोष्ट आहे असाच आपसातही पवित्रा असतो. ‘Condom च्या किंवा Sanitary napkin च्या जाहिराती टीव्हीवर कशाला दाखवतात हे लोक, आम्ही काय सांगायचं मुलांना?’ असा उलटा कांगावा ते करतात.
जेव्हा status quo अमान्य होऊ लागतो तेव्हा प्रॉब्लेम होतो. आहे हे असं आहे, आणि हे असंच राहणार आहे, हे मुलींनी धुडकावून लावलं की सगळं घुसळून निघतं. रेपचा सेक्सशी आहे त्यापेक्षा जास्त संबंध िहसेशी आहे. ती एक अद्दल घडवण्याची कृती आहे. ते शिक्षा देणं आहे. सगळ्यात टोकाची शिक्षा. कधीही भरून न येणारं नुकसान करणारी शिक्षा. जो अब्रू नावाचा ऐवज म्हणे लिमिटेड प्रमाणात प्रत्येक स्त्री घेऊन जन्माला येते, तो लुटण्याची शिक्षा. पण ही शिक्षा कशाबद्दल आहे? पुरुषाला त्याचं हक्काचं काहीतरी नाकारल्याबद्दल! त्यात सेक्स आलाच. तो पुरुषाच्या मते, बाईने त्याला नाकारण्याचा प्रश्नच येत नाही. भूक लागलेल्याला जेवण ‘मी तुझ्या पोटात जाणार नाही’ असं म्हणतं का? ते तसं म्हणू लागलं तर माणूस सहन करेल का? आणि ही शिक्षा कशाबद्दल आहे? समाजात पुरुषाच्या असलेल्या जागेवर बाईने अतिक्रमण केल्याबद्दल! जणू जागा पुन्हा एकदा लिमिटेड आहे. ती पुरुषाचीच असणं अपेक्षित आहे. तसं ठरलंच होतं सुरुवातीपासून. आता अचानक बायका येऊन ती व्यापू बघू लागल्या तर पुरुषांनी ती वाचवायचा प्रयत्न करायचा नाही का?!
म्हणूनच मला ही डॉक्युमेंट्रीवरील बंदीसुद्धा या पुरुषप्रधान संस्कृतीचाच एक आविष्कार वाटतो.
जोपर्यंत अगदी मूलभूत पातळीवर आपल्याला समाज म्हणून हे कळत नाही, की हा प्रश्न पुरुष versus बाई या भांडणाचा नाही, जोपर्यंत बायकांनाच इतर बायकांचा आक्रमकपणा खटकायचा थांबत नाही, जोपर्यंत आपण आपल्या लंगिक गरजांकडे प्रामाणिकपणे पाहत नाही, जोपर्यंत sexist विनोद forward िकरण्यात आपल्याला काहीच खटकत नाही, जोपर्यंत बाई आणि पुरुष यांच्यात खरीखुरी मत्री असू शकते हे आपल्या लक्षात येत नाही; तोपर्यंत हा प्रश्न सुटायला सुरुवातही होणार नाही.
‘हे सगळं व्हावं असं तीव्रपणे वाटणं म्हणजेच फेमिनिझम!’ हा शोध लागल्यापासून मी आता आवर्जून स्वत:ला ‘फेमिनिस्ट’ म्हणते.     

First Published on March 15, 2015 3:42 am

Web Title: after indias daughter
टॅग Bbc
Next Stories
1 मीरा कोसंबी : एक अजब रसायन
2 सुधीर..
3 उत्तरं आपल्या जमिनीतून उगवावी!
Just Now!
X