बहुआयामी व्यक्तिमत्त्वाचे नेते जॉर्ज फर्नाडिस यांचे निकटवर्ती मित्र अरुण नाईक यांनी कथन केलेल्या त्यांच्या आठवणी..
आज जॉर्ज आपल्यात नाही. मी जॉर्जला बरीच वर्ष ओळखतो. आपण सगळेच ओळखतो. तो कायम धावतपळत असायचा. कायम कामात व्यग्र. पण आज तो आपल्यात नाहीए. गेली बरीच वर्ष तो होता, पण झोपून होता.. आजारी होता.
जॉर्जला बऱ्याच विषयांत रस असे. तसं तोच म्हणायचा. अर्थात सर्वात आधी कामगार चळवळीत. मुंबईत म्युनिसिपल मजदूर युनियन, बॉम्बे लेबर युनियन, टॅक्सीमेन्स युनियन या संघटना जॉर्जने स्थापन केल्या. बी. ई. एस. टी. वर्कर्स युनियन पी. डिमेलोंकडून त्याच्याकडे आली. पी. डिमेलो हे जॉर्जचे गुरू.
पन्नास आणि साठच्या दशकांमध्ये या युनियन सर्वशक्तिमान होत गेल्या. त्या काळात मुंबईच्या कामगार चळवळीत अनेक दिग्गज होते. श्रीपाद अमृत डांगे, आर. जे. मेहता, एस. आर. कुलकर्णी. त्यांच्यात जॉर्ज सर्वसमावेशक होता. सर्वाना एकत्र घेऊन जाणारा होता. मेहतांनी प्रीमियर ऑटोमोबाइल्सचा मोठा संप घडवला. जॉर्जने त्यांना समर्थन म्हणून ‘मुंबई बंद’ची हाक दिली. तो त्याचा पहिला ‘बंद’! तो प्रचंड यशस्वी झाला. ऑक्सफर्ड इंग्लिश डिक्शनरीमध्ये ‘बंद’ हा शब्द घालण्यात आला! पुढे ‘घेराव’, ‘चक्का जाम’, ‘हरताल’ हे शब्द या कोशात आले. त्याचं सर्व श्रेय जॉर्जलाच जातं. पुढे जॉर्जला ‘बंद सम्राट’ म्हणू लागले.
१९६० च्या दशकात जॉर्ज महापालिका सदस्य म्हणून निवडून येत असे. तिथे त्याने बरीच आंदोलनं केली. यात सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्याला देऊ केलेली सदनिका त्याने नाकारली. आज वरळी सी फेसला महापालिका सदस्यांसाठीच्या सदनिका आहेत. हा प्रस्ताव जेव्हा पहिल्या प्रथम आला तेव्हा जॉर्जने त्याला विरोध केला. त्याचं म्हणणं होतं, ‘महानगरपालिकेचं काम लोकांसाठी सदनिका बांधणे हे आहे; स्वत:साठी नाही!’ पुढे कुल्र्याला ‘लोहिया नगर’ ही टॅक्सीवाल्यांसाठी गृहनिर्माण संस्था जॉर्जच्या प्रयत्नांमुळे निर्माण झाली. तिथेही जॉर्जने स्वत:साठी सदनिका ठेवली नाही.
१९६७ मध्ये सार्वत्रिक निवडणुका झाल्या. दक्षिण मुंबईमधून स. का. पाटील नेहमी निवडून येत असत. ते सर्वशक्तिमान होते. केंद्रात मंत्री होते. मुंबई प्रदेश काँग्रेस समितीचे प्रमुख होते. त्यांना पाडणं फारच कठीण होतं. पण जॉर्जने ते करून दाखवलं आणि त्याचं भारतातच नव्हे, तर जगभर नाव झालं. ‘जॉर्ज- द जायंट किलर’ म्हणून! नंतर जॉर्जने भारतभरातून निवडणुका लढवल्या आणि जिंकल्या. काही हरलाही. पहिली निवडणूक दणक्यात जिंकणारा हा जायंट किलर शेवटची निवडणूक मात्र हरला!
ऑल इंडिया रेल्वेमेन्स फेडरेशनने १९७४ मध्ये जॉर्जला अध्यक्ष म्हणून निवडलं. लगेचच त्याने ‘दी ग्रेट रेल्वे स्ट्राइक’ म्हणून ओळखला जाणारा ४० दिवसांचा संपूर्ण यशस्वी संप घडवला. पुढे इंदिरा गांधी यांना सत्तेतून घालवण्यास हा संपही कारण ठरला. तो इतिहास सर्वानाच माहीत आहे.
इतर देशांतून झालेल्या स्वातंत्र्य चळवळींना जॉर्जने कायम मदत केली. तिबेट, बर्मा, पूर्व पाकिस्तान! कित्येकदा तिथले आंदोलक जॉर्जच्या घरी राहिले आहेत. जॉर्जने त्यांचं साहित्य छापलं आहे. त्यांनी काढलेली विद्रोही चित्रं विकली आहेत. जॉर्जने आर. जे. मेहता, बाळ ठाकरे, शेतकरी संघटनेचे शरद जोशी यांना पाठिंबा दिला. परंतु या मंडळींनी त्याची परतफेड काय केली? कामगार चळवळीत जॉर्जने बरेच नेते निर्माण केले. नारायण फेणाणी, महम्मद हुसेन बाजी, शरद राव, ए. एल. क्वाड्रस, महाबळ शेट्टी. मदत केलेल्यांपैकीच काहींनी जॉर्जच्या पाठीत खंजीर खुपसला. १९७१ च्या निवडणुकीत ठाकरेंनी नवल टाटांना मदत केली. शरद राव हा शरद पवारांच्या पक्षात गेला. पवारांनी त्याला घेतलाही. ही होती मैत्रीची परतफेड! बिहारमध्ये लालूला खरा विरोध केला तो जॉर्जनेच. यात अब्दुल गफूर आणि नितीशकुमार त्याच्याबरोबर होते. सत्ता मिळाली आणि नितीशकुमार जॉर्जला विसरला.
जॉर्जचं संपूर्ण आयुष्य एका क्रांतिकारकाचं होतं. तो रेल्वे रुळांवर झोपला. दोनदा. तो कित्येक वेळा जेलमध्ये गेला. मुंबईतल्या कामगार चळवळीत मोरारजी देसाई आणि यशवंतराव चव्हाण यांनी त्याला जेलमध्ये टाकलं. परंतु जॉर्जने ते मनात ठेवलं नाही. या दोघांबरोबर त्याने पुढे मैत्रीही केली. शेतकरी संघटनेचे शरद जोशी नाशिकमध्ये कांद्याचं आंदोलन करत होते. जॉर्ज तिथे पोचला व जेलमध्ये भरती झाला.
आणीबाणी घोषित झाली त्या दिवशी जॉर्ज गोपालपूर-ऑन-सी मध्ये होता. हे लैलाच्या आईचं घर. लैला कबीर.. जॉर्जची पत्नी. तिची आई हिंदू. वडील हुमायुन कबीर मुसलमान. तर सुट्टीसाठी जॉर्ज गोपालपूरला गेला होता. जेव्हा जॉर्जला आणीबाणी लागू झाल्याचं कळलं तेव्हा तो कोळ्याच्या वेशात तिथून पळाला आणि कोलकात्याला पोचला. त्यानंतर दाढी वाढवून आणि फेटा घालून वर्षभर तो उत्तर हिंदुस्थानात सरदारजी बनून फिरत होता. तो एका जुन्या अॅम्बेसेडरमधून ती स्वत: चालवत गाडीचे सुटे भाग विकत होता. शेवटी त्याला अटक झाली ती कोलकात्याच्या एका चर्चमधून. तो तिथल्या पाद्र्याला फसवून एक वेडसर वयस्कर ख्रिश्चन बनून तिथे राहत होता.
आपण सेनापती बापटांची आठवण काढतो. त्यांनी बॉम्ब बनवला होता. जॉर्जनेही बनवला. आणीबाणीविरोधात त्याने रेल्वेच्या मालगाडय़ा उडवण्यासाठी डायनामाइट कट रचला. तो डाव फसला आणि त्याला अटक झाली. तिहार जेलमध्ये त्याला ठेवण्यात आलं. तिथे त्याचा प्रचंड छळ करण्यात आला.
पुढे आणीबाणी हटवण्यात आली आणि निवडणुका झाल्या. जॉर्जने बिहारमधल्या मुजफ्फरपूरमधून ती निवडणूक लढवली आणि प्रचंड बहुमताने तो निवडून आला. त्यावेळी तो तिहार जेलमध्येच होता!
जॉर्जची लोकसभा कारकीर्द बरीच गाजली. विरोधी पक्षात असताना तो सरकारविरुद्ध जोरदार भूमिका घेत असे. त्याची अर्थसंकल्पावरील भाषणे आजही लोकांच्या लक्षात आहेत. इतर विरोधी पक्षही आपल्या वाटय़ाचा भाषणाचा वेळ जॉर्जला देत असत. मंत्री म्हणूनही जॉर्ज प्रभावी ठरला. प्रथम कम्युनिकेशन्स, पोस्ट ऑफिसचं नूतनीकरण, नंतर उद्योग मंत्री असताना जिल्हास्तरावर उद्योग केंद्र उभारणी. त्या काळात उद्योग मंत्रालयाचे वेगवेगळे भाग झाले नव्हते. आर्थिक नियम न पाळल्याबद्दल त्याने कोकाकोला आणि आय. बी. एम. या बडय़ा उद्योगांना देशाबाहेर काढलं. बऱ्याच लोकांना, विशेषत: भांडवलदारांना हे आवडलं नाही. रेल्वे मंत्री झाल्यावर जॉर्ज वास्तविक नाराज होता. व्ही. पी. सिंग यांना प्रथम पाठिंबा दिला तो जॉर्जनेच. त्याने सर्वत्र जाहीर सभा घेतल्या. जॉर्जमुळे सिंग निवडून आले. परंतु सिंगांनी मधू दंडवते यांना वित्त खातं दिलं, मुफ्ती महम्मद सईदना गृह दिलं, कुणाला संरक्षण व परराष्ट्र खातं दिलं. पण याही वेळी नाराज असूनही जॉर्जने रेल्वे मंत्रालय जोमाने चालवलं. त्याने कोकण रेल्वेसाठी बिमल जालान यांच्याकडून आर्थिक आणि श्रीधरन् यांच्याकडून तांत्रिक सल्ला घेतला. महाराष्ट्र (शरद पवार), गोवा (चर्चिल आलेमाव), कर्नाटक (वीरेंद्र पाटील) आणि केरळ यांचा संपूर्ण पाठिंबा मिळवला. जॉर्जने स्वत: पैसा उभा केला. रेल्वे बाँड काढले आणि सर्वत्र सभा घेऊन ते विकले. हे सरकार फक्त अकरा महिनेच टिकलं.
तेवढय़ा काळात जॉर्जने कोकण रेल्वे प्राधिकरणाची स्थापना केली. पुढे कोकण रेल्वे पूर्ण होईपर्यंत जॉर्जने श्रीधरन् यांची पाठराखण केली. कोकण रेल्वे जॉर्जमुळेच शक्य झाली.
याच काळात काश्मीरमध्ये बरीच गोंधळी परिस्थिती निर्माण झाली होती. राजीव गांधी तेव्हा विरोधी पक्षनेते होते. प्रधानमंत्री व्ही. पी. सिंग यांच्या घरी एक बैठक झाली. तीत ठरलं की, राजीव गांधी यांच्या नेतृत्वाखाली एक शिष्टमंडळ काश्मीरला पाठवण्यात यावं. त्यात जॉर्जही होता. काश्मीरमध्ये तेव्हा फारुख अब्दुल्ला मुख्यमंत्री होते. दिल्लीत मुफ्ती महम्मद सईद गृहमंत्री होते. जगमोहन काश्मीरचे राज्यपाल होते. श्रीनगरमध्ये कर्फ्यू होता. दिल्लीहून आलेले सर्व सदस्य हॉटेलमध्येच बसून राहिले. जॉर्ज मात्र बाहेर पडला. सोबत फक्त खासगी सचिव. ते एका रेल्वे गेस्ट हाऊसमध्ये जाऊन राहिले. या काळात तो अतिरेक्यांना भेटला. तिथल्या नागरिकांना भेटला. तीन-चार दिवसांनी हे शिष्टमंडळ दिल्लीला परत आलं. जॉर्जशिवायच. त्याचा पत्ता नव्हता. त्यानंतर दोन दिवसांनी जॉर्ज दिल्लीत परत आला. तो तेव्हा कुठे होता? काश्मीरमध्ये फिरत होता. पुन्हा बैठक झाली. राजीव गांधींनी अहवाल दिला. काश्मीरसाठी केंद्राचा मंत्री असावा असा प्रस्ताव मांडला. आणि जॉर्जकडे हे मंत्रीपद द्यावं अशी शिफारस केली.
अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये जॉर्ज संरक्षणमंत्री झाला. हे बऱ्याच लोकांना आवडलं नाही. मात्र जॉर्जची भूमिका स्पष्ट होती. ज्या काळात जॉर्ज वाढला तो काळ काँग्रेसचा होता. लोहियांचा काँग्रेसला विरोध होता, तसाच जे. पीं.चाही होता. त्याला ‘अँटी काँग्रेसिझम’ असं म्हणतात. १९६७ नंतर उत्तर भारतात बऱ्याच राज्यांत काँग्रेसची सरकारं पडली. या सर्व आंदोलनांत जनसंघ हा काँग्रेसविरोधी पक्ष होता.
आणीबाणीमध्ये जनसंघाचे सदस्यसुद्धा अटकेत होते. मोरारजींच्या मंत्रिमंडळात ते होते. जनता पक्षात होते. ते सरकार पडल्यावर ते भाजपवासी झाले. नंतर त्यांनी व्ही. पी. सिंग यांच्या सरकारला पाठिंबा दिला. पुढे काढूनही घेतला. इथपर्यंत ठीक होतं. मात्र नरसिंह राव पंतप्रधान झाल्यावर बाबरी मशीद पाडण्यात आली आणि भाजप अस्पृश्य झाला. सर्व डाव्या पक्षांना तो नकोसा झाला.
पुढच्या काळात डावे पक्ष भाजपविरोधी झाले आणि काँग्रेस त्यांना जवळची वाटू लागली. काही समाजवादी काँग्रेसबरोबर गेले. अशा परिस्थितीत जनता दलात फूट पडली. काही भाजपविरोधी, तर काही काँग्रेसविरोधी झाले. जॉर्जने या सुमारास समता पक्ष स्थापन केला. काँग्रेसचं अराजक वाढत होतं. त्याला विरोध होत होता. त्यातून वाजपेयी लोकप्रिय होत गेले. दुसऱ्या बाजूला होते- लालू यादव, मुलायमसिंह, मायावती- काशीराम. जॉर्जच्या समता पक्षाने भाजपबरोबर युती केली. या युतीत २३ पक्ष होते. सरकार स्थापन झालं आणि सहा वर्ष टिकलं. या काळात जॉर्जने बनवलेला किमान समान कार्यक्रम राबवण्यात आला. त्यात मुसलमानविरोध नव्हता, अयोध्येचं राममंदिर नव्हतं.
संरक्षण मंत्री म्हणून जॉर्जची कामगिरी चांगली होती. कारगिल युद्ध आपण जिंकलं. त्यात जॉर्जचा मोठा वाटा होता. जवानांचं मनोधैर्य वाढवण्यात जॉर्ज यशस्वी ठरला. तो कायम फिरतीवर असे. तो ३७ वेळा सियाचेनला जाऊन आला! इथे -४० अंश सेल्सिअस इतकी थंडी असते. याच सुमारास अॅडमिरल विष्णू भागवत यांना बडतर्फ करण्यात आलं. हा निर्णय वादग्रस्त ठरला.
याच काळात तहलका प्रकरण घडलं. यात जॉर्ज निदरेष होता. आणि पुढे तसा तो ठरलाही. त्याचप्रमाणे शवपेटिकांची खरेदी, बॅरॅक मिसाइलची खरेदी प्रकरणे. जॉर्ज त्यातूनही सहीसलामत सुटला.
जॉर्ज अत्यंत फर्डा वक्ता होता. श्रोत्यांना तो मंत्रमुग्ध करत असे. त्याची भाषणं अभ्यासपूर्ण असत. प्रत्येक भाषणाची तो आधी तयारी करत असे.
त्याच्याबद्दल म्हटलं जातं की, त्याला दहा भाषा बोलता येत. मी स्वत: जॉर्जला तुळू, कन्नड, कोकणी, मराठी, गुजराती, हिंदी, तामिळ, बंगाली आणि इंग्रजी बोलताना पाहिलं आहे. यातल्या बऱ्याच भाषांमध्ये जॉर्ज लिहीतही असे. जॉर्जचं इंग्रजी लिखाण फारच सुंदर असे. मी त्याच्यासोबत २५ वर्ष काम केलं. त्याची ‘ळँी ३ँी१ २्रीि’ आणि बरीच पुस्तकं मी छापली. त्याने लिहिलेलं मी संपादित करत असे. मला त्यावर फार काम करावं लागत नसे. त्याचं लिखाण परिपूर्ण असे.
जॉर्जच्या विविध लढय़ांमध्ये cargill या अमेरिकन कंपनीचा कांडला बंदर ताब्यात घेण्याचा कट महत्त्वाचा आहे. १९६७ मध्ये कच्छचं रण लंपास करण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न आणि जॉर्जने त्याविरोधात दिलेला लढा आठवतो. हिंदू-मुस्लीम दंगलींच्या वेळी जॉर्ज उभयपक्षी सलोख्यासाठी सक्रीय असे. १९९३ च्या मुंबई दंगलीत मी त्याच्याबरोबर काम केलं होतं. २००२ मध्ये गोध्रात दंगली झाल्या तेव्हा जॉर्ज संरक्षणमंत्री होता, आणि मोदी गुजरातचे मुख्यमंत्री. पंतप्रधान वाजपेयी तेव्हा ‘राजधर्म संभालो’ म्हणाले. त्यावेळी जॉर्ज स्वत: अहमदाबादला गेला. सैन्य घेऊन गेला आणि दंगली शमवल्या.
कामगार नेता, कार्यकर्ता, राजकीय नेता, संसदपटू, मंत्री, वक्ता, लेखक, संपादक असा चतुरस्र जॉर्ज. पण कोणी कधीच त्याला कोणतं पारितोषिक दिलं नाही. खरं तर जॉर्जला ‘भारतरत्न’ द्यायला हवं होतं. आता जॉर्ज गेला. आता उशीर झालाय. जॉर्ज कायम प्रकाशझोतामध्ये राहिला, पण तो पूर्णपणे यशस्वी झाला नाही. लोकांनी हातचं राखूनच त्याचं अवलोकन केलं. का? तो ख्रिश्चन होता म्हणून? तो विरोधी पक्षात होता म्हणून? त्याने भांडवलदारांना, धर्माध लोकांना, चोर राजकारण्यांना कायम विरोध केला म्हणून? मोरारजींची साथ सोडून तो चरणसिंगांबरोबर गेला म्हणून? त्याने मधू लिमयेंच्या आग्रहामुळे मंत्रीपदाचा राजीनामा दिला म्हणून?
या सगळ्या प्रश्नांची उत्तरं सर्वानाच माहीत आहेत. पण लोकांना भीती तरी वाटते, लाज तरी वाटते किंवा द्वेष तरी वाटतो. आणि ते आपला निर्णय राखून ठेवतात.
arunnaik@gmail.com