निरूपमा महाजन

‘‘हिंदू’नंतरची दहा वर्षे’ याबद्दल ‘लोकरंग’तर्फे लेख पाठवण्याचे आवाहन आम्ही केले होते. त्यास उत्तम प्रतिसाद लाभला. तथापि, विषयाच्या अनुषंगाने लिहिण्यापेक्षा या कादंबरीची चिकित्सा करण्यावरच अनेकांचा भर जाणवला. काहींनी बदलत्या काळानुरूप ‘हिंदू’च्या पुढच्या भागांत काय अपेक्षित आहे याचा पाढा वाचला. आजूबाजूचे झपाटय़ाने बदलणारे वास्तव ‘हिंदू’च्या पुढील भागांत कसे उतरेल याचे ठोकताळे काहींनी मांडलेले दिसले. तथापि काहीही असले तरी ‘हिंदू’कडून मराठी वाचकांना बऱ्याच आशा-अपेक्षा आहेत, हे वास्तव आहेच. त्यापैकी प्रातिनिधिक लेख..

प्रचंड उत्सुकतेने ‘हिंदू’ ही कादंबरी घेऊन तर ठेवली होती, पण प्रत्यक्ष वाचायला लॉकडाऊन उजाडला. ही कादंबरी स्वत:चे व्यक्तिमत्त्व असलेली व स्वतंत्र आहे. पूर्ण समर्पण भावनेने आणि दृढ निश्चयाने ती वाचायला सुरुवात करत नाही तोपर्यंत ती तुम्हाला अजिबात जवळ येऊ देत नाही. त्यामुळे अनेक मित्र-मैत्रिणींनी सुरुवात करून ही कादंबरी अध्र्यातच सोडून दिली. अर्थात त्यात लेखनशैलीचाही काहीसा वाटा आहे. पण त्यातील एकंदरीत सामाजिक आशय व विषय इतका भारदस्त आहे की या साऱ्यावर मात करून वाचत राहणे नक्कीच भरभरून देऊन जाते. एक समाज म्हणून आजवर होत गेलेली आपली जडणघडण आणि त्याचे सूक्ष्म चित्रण कादंबरीत आहे. सामजिक, सांस्कृतिक, ऐतिहासिक इ. अनेक पैलूंवर स्वतंत्र भाष्य तिच्यात आहे.

जातिव्यवस्थेच्या उतरंडीसाठी सातपुडय़ाचे जे रूपक वापरले आहे ते अपरिहार्यता दाखवणारे असले तरी प्रत्येकालाच ती मान्य होईल असे नाही. सांस्कृतिक जडणघडणीत वारकरी संप्रदाय, नाथ पंथ इ.पासून ते अगदी ग्राम- स्तरावरील अंधश्रद्धा, त्यांचे परिणाम, वैद्यकीय असुविधा व त्याचे होणारे परिणाम या सर्व एकमेकांत गुंतलेल्या गोष्टींचे सूक्ष्म चित्रण लेखकाने केले आहे. कृ षी संस्कृतीतील दैनंदिन जीवनसंघर्ष, त्यातच जातिव्यवस्थेमुळे असलेले अवलंबित्व, यात शेतकऱ्याची होणारी फरफट, कुटुंबसंस्थेचे ताणेबाणे या सगळ्या गोष्टी अगदी सूक्ष्म तपशिलांसह डोळ्यांसमोर उभ्या राहतात. दुष्काळाचे वर्णन काळीज कापत जाते. कित्येक वर्षांनंतरही नायकाच्या डोळ्यांसमोर रोज जेवताना उभी राहणारी ती लहान मुलगी आपल्यालाही अस्वस्थ करते. अशा अनेक गोष्टींचे चित्रण वाचताना त्यातला विरोधाभास अस्वस्थ करून सोडणारा तसंच विचारप्रवर्तक आहे. संशोधन कार्यात गुंतलेले विद्यार्थी, विद्यापीठातील वातावरण, तेथील राजकारण, ग्रामीण आणि नागरी मुलांच्या भावविश्वाचे सूक्ष्म चित्रण, कृ षी संस्कृतीचे भवितव्य, बकाल नागरी बेरोजगारी, स्त्रियांचे समाजातील स्थान अशा विविध पैलूंवर भाष्य करणारी ही कादंबरी एकंदरीत आपली सामजिक, सांस्कृतिक, आर्थिक जडणघडण उलगडून दाखवते. एखाद्या पूर्णपणे अनोळखी व्यक्तीला ही संस्कृती समजून घेण्यास हे चित्रण उपयुक्त ठरू शकेल. आज ज्या स्थितीत आपण आहोत किं वा एक समाज म्हणून आपली जी काही जडणघडण झाली आहे, तिचे सूक्ष्म ताणेबाणे उलगडून दाखवण्यास ही कादंबरी उपयुक्त आहे. या संपूर्ण चित्रणासह लेखकाचे स्वत:चे असे भाष्य प्रत्येक विषयावर आहे. काही ठिकाणी ते अगदी परखड आहे, तर काही ठिकाणी स्थितीवादी.

‘मंडी’च्या तोंडून येथील स्त्रियांविषयी, त्यांच्या स्थितीविषयी बरेचसे भाष्य लेखकाने केले आहे. ते बऱ्याच ठिकाणी प्रोग्रेसिव्ह वाटते. पण कितीही झाले तरी ‘मंडी’ इथे उपरी आहे. आणि तिच्या तोंडून येणारे विचार म्हणजे समाज म्हणून आपल्यासाठीसुद्धा उपरेच- असे सूचित झाल्यासारखे वाटते. ‘बायको ओढणे’ या प्रकाराबद्दल जे काही तपशील दिले आहेत, ते आणि एकूणच हा प्रकार भयावह आहे. सामाजिक प्रश्न, त्यावरचे तोडगे आणि या सगळ्यात स्त्रियांची स्थिती याची जाणीव अशा घटना व तपशिलांमधून होत राहते.

वडिलांच्या क्रि याकर्मात पितरांची नावे घेतानाच त्यांच्यासोबत स्त्री-पूर्वजांचीही नावे घेण्याची नायकाची कल्पना आणि त्याचवेळी एकमेव कर्ता पुरुष म्हणून शिल्लक राहिल्याने कुटुंबाप्रति अत्यंत मोठय़ा जबाबदारीचे ओझे असल्याची जाणीव हे दोन्ही विरोधाभासी वाटते. नायकाच्या मनात खोलवर कुठेतरी स्थितीवादिता रुतून बसली असल्याचे हे निदर्शक वाटते. पण कमी-अधिक प्रमाणात हा नायक समस्त पुरुषांचे प्रतिनिधित्व करणारा वाटतो आणि त्यावरून त्यांच्या जडणघडणीची आणि विचारांची मीमांसा होऊ शकते. एकंदरीत जगण्याच्या अडगळीची समृद्धी दाखवून देण्यात कादंबरी यशस्वी तर झाली आहे; परंतु या अडगळीची उपयुक्तता व भवितव्य ज्याच्या त्याच्या दृष्टिकोनावरच अवलंबून आहे. ‘बदल’ ही एकमेव स्थिर गोष्ट आहे. त्यामुळे विचारांच्या घुसळणीतून येणारे सुयोग्य बदल स्वीकारण्यास तयार राहून स्थितीवादितेची रवानगी या अडगळीत करण्यात काहीही अयोग्य नसावे. या कादंबरीच्या निमित्ताने वैचारिक घुसळण होणे ही महत्त्वपूर्ण बाब आहे. अडगळ कितीही समृद्ध असली तरी मुळात ती ‘अडगळ’ आहे. समाज म्हणून सुदृढ होण्याच्या मार्गात जर ती अडगळ येत असेल तर तिला बाजूला ठेवण्याचा खुलेपणा दाखवता येणे हीच महत्त्वाची बाब आहे. अडगळ समृद्ध आहे म्हणून तिला कवटाळून बसणे हा समाज म्हणून आपल्या प्रगतीच्या मार्गातील मोठा अडसर ठरेल. प्रागतिक विचार करून थांबणे योग्य नाही, तर त्याप्रमाणे हातून कृतीही व्हायला हवी. कादंबरीतील नायकाप्रमाणे संभ्रमात राहणे आणि संभ्रमातच जगणे सोडून कृती केल्याशिवाय समाज म्हणून आपली प्रगती होणे केवळ अशक्य आहे.

मनुष्याच्या जगण्याच्या विविध पैलूंवर प्रकाश टाकून त्यातील समृद्ध अडगळ उलगडून दाखविण्याचे काम ‘हिंदू’मध्ये लेखकाने केले आहे. या विचारप्रवर्तनेतून काही सर्जनात्मक, नावीन्यपूर्ण दिग्दर्शन होऊन त्यानुसार कृ ती झाल्यासच या सर्व प्रपंचास काहीएक अर्थ प्राप्त होईल.