अभिजात संगीताने नटलेल्या चाली.. अस्सल भारतीयत्वाचा सुगंध असणाऱ्या! पण भावनांचे पदर अलगद खुलवत कुठे अति तलम, तर कुठे अत्यंत रोखठोक. कुठे सारंगी-सितारच्या झुलणाऱ्या स्वरांदोलनांत आपल्याला अडकवणाऱ्या, तर कुठे ढोलकची नजाकत आपल्यापुढे अलवारपणे आणणाऱ्या चालींचा मानकरी : रोशन! रोशनलाल नागरथ. फक्त ५० वर्षांचं आयुष्य घेऊन आलेल्या या संगीतकारानं स्वत:च्या टेम्परामेंटला जुळणारंच संगीत दिलं; पण अत्यंत समृद्ध व उत्कृष्ट अर्थ असणारंच काव्य आणि चालींची बांधणी अशी, की त्यातला एखादाही चिरा इकडे तिकडे होणे नाही. घट्ट बांधणीच्या, स्वरानुभवांत श्रीमंत असणाऱ्या, तिन्ही सप्तकांचं सौंदर्य उलगडणाऱ्या चाली हे रोशनच खास वैशिष्टय़. मग ते ‘रहे ना रहे हम’ असो की ‘अब क्या मिसाल दूँ’, किंवा ‘सारी सारी रात तेरी याद सताए’, ‘जो बात तुझ में है’ असो.. बारीक हरकती, आवाजाचा विशिष्ट लगाव, उत्कृष्ट ऑर्केस्ट्रेशन, अभिजात शास्त्रीय संगीताचा त्या ऑर्केस्ट्रेशनसोबत घातलेला सुंदर मेळ.. रोशनने आपली सांगीतिक दुनिया खरोखरच ‘रोशन’ केली. एकाच यमन रागात कव्वाली आणि तात्त्विक-आध्यात्मिक गाणं बांधणं म्हणजे त्या रागाचा आवाका लक्षात घेणं तर आलंच; त्याचबरोबर स्वत:च्या स्वररचनेवरचा किती विश्वास! यमनचेच स्वर ‘मन रे तू काहे न धीर धरे’ आणि ‘निगाहें मिलाने को’ या दोन्ही गाण्यांत वापरताना हाच विश्वास रोशनला वाटला असावा. म्हणूनच वाटतं, की रफीचा आवाज ज्या ‘अब क्या मिसाल दूँ’मध्ये असा मधाळ, प्रणयात पूर्ण भिजलेला, अनुरागी वाटतो, तोच आवाज ‘मन रे..’मध्ये किती आश्वासक, समजूत घालणारा वाटतो! हे रोशनच्या चालीचं यश आहे. ती चाल गायकाला दिशा दाखवत पुढे नेणारी वाटते.
रोशनलाल नागरथ. १४ जुल १९१७ ला पंजाबातल्या गुजरांवाला जिल्ह्य़ातल्या भटिया नावाच्या खेडय़ात विलक्षण वेगळ्या, अंतर्मुख, थोडासा मनात कुढणारा स्वभाव जन्मभर बाळगणाऱ्या या कलाकाराचा जन्म झाला. सुखवस्तू घरात जन्म झालेल्या रोशनलालचा लहानपणापासून उर्दू साहित्य व काव्याकडे ओढा होता. हा व्यासंग त्याच्या गाण्यांमध्येही प्रतिबिंबित होत राहिला. कारण एकाच शब्दाच्या वेगवेगळ्या अर्थछटा दाखवताना हा पलू विशेषत्वाने जाणवतो. पं. रातंजनकर, पं. मनहर बर्वे, उस्ताद अल्लाउदिन खाँसाहेब यांच्यासारख्या दिग्गजांचं मार्गदर्शन मिळाल्यामुळे रोशन यांच्या रागसंगीताच्या अनवट वाटा कधीच सरावाच्या झाल्या. वयाच्या अवघ्या २८ व्या वर्षी लखनौच्या आकाशवाणीत जलतरंगवादन रेडिओवर ऐकून केदार शर्मासारखा निर्माता- दिग्दर्शक त्यांना चित्रपट ऑफर करायला गेला होता. पण रोशनजींचा ओढा अभिजात शास्त्रीय संगीताकडे असल्याने ‘मला सिनेसंगीतात रस नाही,’ असं उत्तर त्यांनी दिलं. आणि विशेष म्हणजे त्यांची ही भावना नंतर अनेक चित्रपटांना संगीत देऊनसुद्धा कायम राहिली. त्यांचं पहिलं प्रेम हे शास्त्रीय संगीतावरच राहिलं. रेडिओत भेटलेली गायिका मत्रीण इरा मोईत्रा ही पुढे त्यांची पत्नी झाली. त्यांची सहाय्यकही झाली.
शुद्ध शास्त्रीय संगीत करायचं सोडून आपण सिनेसंगीतात रमतोय याबद्दलची सूक्ष्म खंत रोशनच्या मनात शेवटपर्यंत राहिली. मला नेहमी जाणवतं की, शास्त्रीय संगीतावर आधारीत चित्रपट संगीत देणाऱ्या संगीतकारांमध्येसुद्धा खूप फरक आहे. नौशाद, वसंत देसाई, जयदेव, रोशन ही यातली महत्त्वाची नावं. पण त्या प्रत्येकाच्या शैलीत फरक आहे. त्यापकी नौशाद आणि वसंत देसाई यांनी रागाचं बोट धरून, रागाचं सौंदर्य गृहीत धरून आणि वातावरणनिर्मितीच्या शक्तीवर पूर्ण विश्वास टाकत चाली केल्याचं जाणवतं. तर जयदेव व रोशन यांनी रागसंगीताला आणखी पुढे नेत, त्यातला जो improvisation factor  (विस्तारघटक) आहे, त्यावर जास्त विचार केलेला दिसतो. म्हणजे एकाच ओळीला जरा वेगळ्या चालीत वळवणं. हा बोल आलापाचाच प्रकार झाला. पण त्यामुळे गाणं श्रीमंत होतं. याची अनेक उदाहरणं आहेत. ‘जुल्में उल्फत पे हमें लोग सजा देते हैं’ (ताजमहल), ‘सलामे हसरत कबूल कर लो’ (बाबर), ‘तुम अगर मुझ को न चाहो’ (दिल ही तो है) अशी अनेक गाणी- विशेषकरून त्यांचे अंतरे यादृष्टीने ऐकून पाहा. ‘जुल्मे उल्फत पे’मध्ये ‘हमने दिल दे भी दिया’ ही ओळ, ‘सलामे हसरत’मध्ये ‘तुमही मेरे वास्ते खुदा हो’ ही ओळ, ‘तुम अगर मुझ को न चाहो तो’मध्ये ‘तुम जो मुझसे ना निबाहों तो कोई बात नहीं’ अशा अंतऱ्याच्या प्रत्येक ओळी ऐकून पाहा.. त्यांत किती नाजूक बदल केलेत. नुसतं गुणगुणलं तरी त्यातली श्रीमंती लक्षात येते.
रोशनजींचा पहिला चित्रपट ‘नेकी और बदी’ (१९४९) अजिबात चालला नाही. शर्माच्या आमंत्रणावरून मुंबईला येऊन चूक केली की काय असं वाटत असतानाच ‘बावरे नन’चं (१९५०) संगीत एखाद्या वादळासारखं सगळ्या सिनेसंगीतसृष्टीला हलवून गेलं. ‘तेरी दुनिया पे दिल लगता नहीं’ (मुकेश), ‘खयालों में किसी के’ (मुकेश-गीता), ‘सुन बरी बलम’ (राजकुमारी), ‘मुझे सच सच बता दो’ (राजकुमारी-मुकेश) यांसह सगळी गाणी प्रचंड गाजली. लोकांच्या ओठावर खेळू लागली. त्यातला वेगळेपणा त्यांना प्रकर्षांने जाणवला. आपण हे काहीतरी वेगळं ऐकतोय असं आजसुद्धा जाणवावं, यातच ‘प्रतिभा’ म्हणजे काय, हे लक्षात येतं. ‘खयालो में किसी के’ तर जगातल्या सर्वोत्तम द्वंद्वगीतांमध्ये सामील होण्याच्याच दर्जाचं गाणं आहे याबद्दल दुमत नसावं. राज कपूर आणि गीता बालीचा अल्लड अभिनय.. त्यातही राज कपूरचे ते खटय़ाळ डोळे, लटका रुसवा चेहऱ्यावर कमालीच्या सहजतेने दाखवणारा गीता बालीचा खूप गोड चेहरा आणि हे गाणं याचं असं काही मस्त कॉम्बिनेशन जमलं, की बरोबर ६४ वर्षे या गाण्याला होऊनही ते आजही आपल्याला रिझवू शकतं. आठवा- ‘चाँदनी चार दिन की है’ हे बजावणारा तो गीता बालीचा चेहरा, गीता दत्तचा आवाज, ‘दिलों को रौंदकर दिल अपना बहलाया नहीं करते’ ही कैफियत मांडणारा मुकेशचा आवाज.. देवाने सुंदर चेहरा दिला म्हणून काय झालं? ‘मिली हो चाँदसी सूरत तो इतराया नहीं करते..’ वा क्या बात है! तसंच ‘मुझे सच सच बता दो’मध्ये ‘क्या’ किती नसíगकपणे येतो. आणि प्रत्येक वेळी वेगळा. त्या वाक्यातला प्रश्न चालीत ज्या जागी असेल, त्या- त्या स्वराला साजेलसा.. त्यातूनच उमलणारा तो ‘क्या’! एक प्रश्न दोनदा विचारल्यावर दुसऱ्या वेळीचा ‘क्या’ अधिक प्रश्नार्थक येणार.
‘तेरी दुनिया में दिल लगता नहीं’ने मुकेशच्या आवाजातल्या कारुण्याचं सोनं केलं. कारण खरोखरच याच मूडमध्ये स्वत: असताना रोशनला ही चाल सुचली. अपयशाने विमनस्क होऊन बाडबिस्तरा बांधून दिल्लीला परत जावं की काय, या विचारात समुद्रावर फेरफटका मारताना सुचलेली चाल- ‘मं सजदे में गिरा हूँ, मुझको ए मालिक उठा ले, वापस बुला ले..’
शास्त्रीय संगीतातले अनेक राग रोशनच्या रचनांमध्ये सुरेख अस्तित्व दाखवतात. अर्थात त्या रागांचा आविष्कार हा खास रोशन शैलीतलाच असतो.
गौडमल्हार (गरजत बरसत सावन आयो), मल्हार (बरसात की रात..) दोन वेगळी गाणी (शराबी शराबी जुल्में उल्फत पे हमे लोग- ताजमहल), यमन (निगाहें मिलाने को, मन रे तू, तुम अगर मुझको, सलामे हसरत, छुपा लो ये दिल में प्यार, जिन्दगी भर नहीं भूलेगी, एरी आली पियाबिन (बंदिशीवर आधारीत), संसार से भागे फिरते हो.. एका यमनमधून इतके विविध रंग, मूड्स रोशनजींनी दाखवले आहेत. कलावती (काहे तरसाए जियरा), भीमपलासी (एरी मं तो प्रेमदीवानी- नौबहार), कामोद (एरी जाने ना दूंगी-चित्रलेखा) आणि भरवी (लागा चुनरी में दाग) अशी अनेक गाणी.. ‘लागा चुनरी में दाग’ तर अनेक कार्यक्रमांना शेवटी एका उंचीवर नेत राहिलं. मन्नादांच्या कारकीर्दीत ‘लागा’ जर नसतं, तर..? तसंच ‘फुलगेंदवा न मारो’ला (दिल ही तो है) विनोदाच्या अंगाने, वास्तवदर्शी (अडखळणे वगरे) प्रकाराने सिच्युएशनल बनवणं खूपच आव्हानात्मक होतं.
‘बावरे नन’नंतर आलेल्या ‘बेदर्द’, ‘मल्हार’, ‘हमलोग’, ‘अनहोनी’, ‘रागरंग’ या चित्रपटांमध्ये अनेक अविस्मरणीय गाणी रोशनजींनी दिली. ‘मल्हार’च्या गाण्यांमुळे खऱ्या अर्थाने त्यांचं नाव सर्वदूर ‘रोशन’ केलं. या चित्रपटांच्या गाण्यांची चर्चा आपण करणारच आहोत, पण त्याआधी रोशन समजून घेताना त्यांच्या शैलीतल्या काही खास नजाकतीने येणाऱ्या वैशिष्टय़ांकडे बघितलं पाहिजे. रोशनजींच्या गाण्यात ‘पॉज’ अशा विलक्षण नेमक्या जागी असतो, की त्या पहिल्या ओळीचा रोख कुठल्या दिशेनं आहे हे अचूक समजतं. विशेषत: प्रश्नार्थक गाणी जी असतात, त्यात हे प्रकर्षांने जाणवतं. ‘अब क्या मिसाल दूं मं तुम्हारे शबाब की’ (आरती) मध्ये ‘अब क्या..’ नंतर येणारा पॉज असो, किंवा ‘दुनिया करे सवाल तो हम, क्या जबाब दे’ (बहू बेगम) म्हणताना ‘सवाल तो हम..’नंतर येणारा पॉज.. या पॉजमुळे त्यापुढच्या ‘क्या’ला एक सुंदर ठामपणा येतो. ‘जुल्में उल्फत पे हमे लोग सजा देते है, कैसे नादान है शोलों को हवा देते है’ यातही पहिल्या ओळीनंतर रिदमदेखील थबकतो. ‘बार बार तोहे क्या समझाए पायल की झनकार’नंतरचा ‘क्या’ हा एका सुंदर विरामानंतर येतो. या सगळ्यामुळे त्या गाण्याचा नसíगक संवाद बनतो.
गाण्याचे मुखडे खालच्या पट्टीत ठेवण्याचं धाडस रोशनने त्या जमान्यात केलं; जेव्हा उंच पट्टीत चाली बांधण्याची स्टाईल खूप लोकप्रिय झाली होती. ‘बहे अखियोंसे धार’ (हमलोग), ‘मन रे तू काहे धीर न धरे’ (चित्रलेखा), ‘पाँव छू लेने दो’ (ताजमहल) अशी अनेक उदाहरणं आहेत.
लता मंगेशकर, मुकेश, रफी, तलत, मन्ना डे, सुधा मल्होत्रा, आशा भोसले या आवाजांच्या वेगळ्या शक्यता रोशनजींनी आजमावल्याचं आढळतं. लताबाईंच्या आवाजाच्या अनंत सुंदर वैशिष्टय़ांचा उपयोग अनेक संगीतकारांनी करून घेतला. कुणी त्यांच्या गळ्यातल्या लोकविलक्षण फिरतीचा, कुणी त्या अफाट रेंजचा, तर कुणी त्यांच्या आवाज कमी-जास्त करण्याच्या (फेड इन-आऊट) तंत्राचा, कुणी वेडय़ावाकडय़ा कसरती आरामात करू शकण्याच्या कौशल्याचा; पण रोशनने या आवाजातल्या गोल, मुलायम हळुवारपणाला इतकं सुंदर परिमाण दिलं, की फार उंच पट्टी न वापरता, तिथल्या तिथेच त्या शब्दांना वळवत, त्या आवाजाचं मंद्र आणि मध्य सप्तकातलं सौंदर्य दाखवत, विलक्षण गोड अशा ३ल्लं’ tonal quality ¨ चा अप्रतिम आविष्कार घडवत हा आवाज खुलवला. ऐका.. ‘बडे अरमानों से’ (मल्हार) किंवा ‘चली जा, चली जा’ (हमलोग)मधला लताबाईंचा आवाज. ‘समा के दिल में हमारे’ (अनहोनी)मधला त्यांचा गोडवा आठवा. असंच एक कहर गोड गाणं आठवतंय- ‘मेरे लाडले है मेरी दुवा’ (राजा बेटा).. किती गोड असावं एखादं गाणं! जास्त ऐकलं जात नाही, पण तुम्ही जरूर ऐका. डोळ्यांपुढे एक खूप गोड, प्रेमळ आई आपल्या पिल्लाला गोंजारतेय असं दृश्य क्षणार्धात त्या आवाजामुळे, त्या चालीच्या सुंदर वळणांमुळे डोळ्यापुढे उभं राहतं. ‘मेरे दिल की धडकन क्या बोले’ (अनहोनी) या तलतबरोबरच्या गाण्यात ‘क्या बोले’ हा शब्द कसा गोडव्याने येतो.. ते खरोखरच शब्दांत व्यक्त करणं अशक्य आहे. तसंच मुकेशच्या आवाजातल्या अनेक शक्यतांचा विचार रोशनने केल्याचं जाणवतं. त्याच्या आवाजातला दर्द तर जगप्रसिद्धच आहे. पण ‘तेरी दुनिया में दिल लगता नहीं’मधला तो खर्ज आणि ती अधोवदना चाल.. खाली झुकणारी. कारण ‘मं सजदे में गिरा हूँ’ असं म्हणताना स्वर खालीच जाणं किती सयुक्तिक! गत्रेत रुतत चालल्याचा अनुभव पहिल्या ओळीतच येतो. ‘अपनी नजर से उनकी नजर तक’ (हमलोग)मध्ये घोडय़ाच्या टापांसोबत खुललेला मुकेशचा आवाज खूप वेगळा वाटतो. ‘खयालो में किसी के’मध्ये ‘दिलों को रौंदकर दिल अपना बहलाया नहीं करते’ म्हणताना ‘दिलों को’वरची हरकत इतकी सुंदर, की मुकेशच्या आवाजातल्या या फिरतीचा इतर संगीतकारांनी तसा कमीच उपयोग करून घेतला असं वाटून जातं. मुकेशच्या आवाजातला दर्द, टोन यांचा बोलबाला झाला; पण ही फिरत थोडी दुर्लक्षितच राहिली.
सुधा मल्होत्रांचा आवाज सगळ्यात गोड लागलाय ते ‘सलामे हसरत कबूल कर लो’ (बाबर) या गाण्यात- असं मला नेहमी वाटतं. तशी साधीच चाल; पण सुधा मल्होत्रांची टोनल श्रीमंती दाखवून जाणारी. ‘कबूल कर लो’ हे शब्द ज्या गोडव्याने येतात.. क्या बात है! त्यात ‘कर लो’ला एक सुंदर हेलकावा आहे.. आर्जव आहे. अंतऱ्यात शेवटी ‘हसीन लम्हों को ढूंढती है’वर एक सुंदर जागा येऊन जाते. अहाहा!
रफीच्या आवाजाला उंच पट्टीत न नेता मध्य सप्तकातच फिरवणारी विलक्षण रोमँटिक गाणी खूप दिली रोशननी. ‘जो बात तुझ में है..’ त्यातला मधाळ, रोमँटिक आवाज आणि ‘दिल जो ना कह सका’ (भीगी रात)मधला तीव्र, भेदक आवाज यांत खूप फरक आहे. (या गाण्यांची चर्चा सविस्तर आपण पुढे करणार आहोत.) तलतचा आवाज मुलायम तर खराच; पण ‘मं दिल हूँ इक अरमान भरा’ (अनहोनी)मध्ये पियानोच्या साथीनं तो असा खुलतो.. की क्या कहने. आशाबाईंच्या आवाजातल्या नटखटपणासाठी, मध्य सप्तकातल्या ‘रे’पासून ते तार सप्तकातल्या ‘रे’पर्यंतच्या त्या सुंदर सरगमसाठी ‘निगाहें मिलाने को’चं शिल्प जन्माला येतं. आणि अनुरागात चिंब भिजलेला तो सुमनस्वर ‘शराबी शराबी ये सावन का मौसम’ (नूरजहां) म्हणत गारूड करतो.  (क्रमश:)