यावर्षीचा साहित्यासाठीचा नोबेल पुरस्कार कॅनॅडियन कथालेखिका अ‍ॅलिस मन्रो यांना देण्यात आला. त्याअनुषंगाने मराठी कथेची आजची अवस्था काय आहे? साठच्या दशकात दर्जेदार (नव)कथा लिहिली गेली. पण अलीकडच्या काळात कथा फारशी लिहिली जात नाही. जी लिहिली जाते आहे तिचा परीघ आक्रसत चालला आहे, तसेच ती खुरटत चालली आहे. असे का होत आहे, याची चाचपणी करत मराठी कथेचे रोडावलेपण आणि तिची आवश्यकता या विषयीचे दृष्टिकोन सांगणारे हे लेख..
एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात व विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात ब्रिटिशांच्या प्रभावाने अनुक्रमे लघुकथा व नवकथा यांचा उदय झाला. काळाच्या ओघात ‘कथे’चे विषय पालटत गेले. आशय व अभिव्यक्ती बदलली तरी तिची मुख्य लक्षणे कायम राहिली.
वास्तवाच्या आधारे कल्पिताची निर्मिती, व्यक्तीच्या मन:स्थितीचे, तिच्या आयुष्यात घडलेल्या एखाद्या प्रसंगाचे किंवा समाजातील वेचक जीवनानुभवांचे नेमक्या, काटेकोर शब्दांत केलेले चित्रण, मर्यादित अवकाशात निर्माण करावी लागणारी, विभिन्न स्वभावधर्म असणारी पात्रे, त्यांच्या परस्परसंबंधातून आकारत जाणारे कथानक, त्याला पोषक ठरणारे वातावरण आणि या सर्वाना मूर्त रूप देणारी निवेदनपद्धती व भाषाशैली हे कथेचे मूलघटक होत. या घटकांची कौशल्यपूर्ण गुंफण करण्यातून जसा कथार्थ सूचित होतो, तशी लेखकाची जीवनदृष्टीही त्यातून प्रकटते. ‘कथे’च्या आखीव-रेखीव पैस व तिला असलेली स्थलकालाची मर्यादा ध्यानात घेऊनच बहुधा ‘कथा’ म्हणजे एक झाड तर कादंबरी म्हणजे वृक्ष-वेलींनी व्यापलेले अरण्य. कथा एकल गायन-वादनासारखी असते तर कादंबरी म्हणजे जणू वृंद, समूहगान असते, असे म्हटले जाते. एककेंद्रित्वातून वाचकाच्या मनावर एक संस्कार तीव्रतेने करणे कथेत अपेक्षित असते. अनुभवाची अशी संपृक्तता, संक्षेप, मितव्यय मोजके पण प्रत्ययकारी प्रसंग आणि अल्पाक्षरबहुल शैली असलेल्या कथा सध्या मराठीमध्ये लिहिल्या जातात का? अन्य साहित्यप्रकारापेक्षा तुलनेने त्यांचे प्रमाण किती कमी-अधिक आहे? जसे आंतरमहाविद्यालयीन किंवा राज्यनाटय़ स्पर्धेतून आज नावाजले जाणारे काही प्रयोगशील नाटककार उदयास आले, तसे वेगवेगळय़ा कथास्पर्धामधून चमकलेले किती व कोणते कथाकार बहुचर्चित वा लक्षणीय ठरले? एखाद्या कथाकाराची मोहोर राष्ट्रीय पातळीवर उमटलेली आहे काय? नसेल तर त्याची कोणती कारणे संभवतात?
कथेतील अनुभवाचा विस्तार व आवाका मर्यादित असल्याने वास्तविक कथालेखन नव्या जोमाने बहरायला हवे होते परंतु असे घडलेले दिसत नाही. उलट कसदार व गुणवान कथांची संख्या दिवसेंदिवस घटते आहे. किंबहुना कथाच नव्हे तर मराठीतील कथात्म लेखनाचा परीघच आक्रसत चाललेला आहे. १९६० आणि १९७०च्या दशकात जयवंत दळवींची कादंबरी हे ‘दीपावली’च्या दिवाळी अंकाचे प्रमुख आकर्षण होते. किंवा सुभाष भेंडे, श्री. ज. जोशी, ज्योत्स्ना देवधर, व. पु. काळे, विजया राजाध्यक्ष, ह. मो. मराठे इ. लेखक-लेखिका ‘हंस’, ‘माहेर’, ‘मानिनी’, ‘कथाश्री’, ‘प्रपंच’, अशा मध्यममार्गी, मध्यमवर्गीय वाचकवर्ग असलेल्या नियतकालिकांतून नित्यनेमाने कथा लिहीत असत. १९८०च्या दशकात साधारणपणे चारशे ते साडेचारशे नियतकालिकांचे दिवाळी अंक महाराष्ट्राच्या वेगवेगळय़ा भागांतून प्रकाशित होत. त्यांच्यातील निवडक साहित्याचे संपादन ‘अक्षर दिवाळी’ या नावाने प्रसिद्ध होत असे. आज दिवाळी अंकाची संख्या निम्म्यावर आली आहे. ‘अक्षर दिवाळी’चा उपक्रम केव्हाच बंद पडला आहे. आणि स्मरणात नव्हे तर किमान अथपासून इतिपर्यंत वाचाव्याशा वाटतील, अशा दोन किंवा तीनसुद्धा कथा नियतकालिकांमध्ये क्वचितच आढळतात. मराठीतील ‘कथा’ हा साहित्यप्रकार प्रामुख्याने नियतकालिकांच्या आधाराने, आश्रयाने वाढला, बहरला. म्हणूनच कथालेखनातील स्थित्यंतरे, त्यातील बदलत्या प्रवृत्तींची नोंद करताना ‘करमणूक’, ‘मनोरंजन’, रत्नाकर’ व ‘यशवंत’, ‘जोत्स्ना’ व समीक्षक’, कालखंडाच्या अनुषंगाने असे विभाजन करताना संबंधित नियतकालिकांच्या निर्देशाने ते दाखवले जातात. त्यामुळे कथाकार आणि त्यांच्या कथांना प्रसिद्धी देणारे नियतकालिक, त्याचा वाचकवर्ग आणि मुख्यत: त्यांची आशयसूत्रे व ती आविष्कृत करण्याचे तंत्र यांचे परस्परांशी दृढ नाते जमत-जुळत गेले. श्री. ज. जोशी, व. पु. काळे यांच्यासारखे लोकप्रिय लेखक कधी ‘सत्यकथा’ व  ‘मौज’ या गंभीर प्रवृत्तींचे भरण-पोषण करणाऱ्या नियतकालिकांच्या वाटेला गेले नाहीत, तसे श्री. दा. पानवलकर, जी. ए. कुलकर्णी, राजेंद्र बनहट्टी, शरच्चंद्र चिरमुले, भारत सासणे, विद्याधर पुंडलिक, विलास सारंग, दिलीप चित्रे, गौरी देशपांडे, सानिया, आशा बगे, राजन खान इ. नावे सहसा ‘माहेर’, ‘प्रपंच’, ‘मानिनी’ इ. रंजनपर नियतकालिकांच्या श्रेयनामावलीत आढळली नाहीत. आता नियमित प्रसिद्ध होणारी मासिकेच कमी झाल्याने कथांना लगेचच प्रकाश दिसणेही मुश्कील झाले आहे. हातून लिहून झाले तरी ते छापायचे कुठे, हा प्रश्न दिवसेंदिवस बिकट बनत चालला आहे. त्यामुळे कथाकाराचा विशिष्ट नियतकालिकाशी असलेला सांधाच तुटला आहे. मग संपादक-लेखक यांच्या त्या निमित्ताने होणाऱ्या चर्चा, त्यातून कथेवर केली जाणारी परिष्करणे, त्यासंबंधी होणारा पत्रव्यवहार, समानधर्मा मित्रवर्तुळात एखाद्या कथेचे लेखकाने केलेले वाचन आणि एखादय़ा गाजलेल्या कथेवरील दीर्घ समीक्षालेख. ही सारी प्रक्रियाच संपुष्टात आली आहे, इतिहासजमा झाली आहे, याचे नवल वाटायला नको.
१९९० नंतर दूरदर्शनच्या कृष्णधवल पडद्यावरही मराठी साहित्यातील नावाजलेल्या कथांवर आधारित मालिका सादर होत होत्या. (उदा. श्रावणसरी, कथनी इ.) परंतु जसजशी वाहिन्यांची संख्या वाढली तसतसे अकारण लांबण लावलेल्या, अनाठायी उपकथानकांनी भरलेल्या दृक्श्राव्य कार्यक्रमांचे पेव फुटले. आबालवृद्धांना चार घटका रिझवणाऱ्या, त्यांचा वेळ घालवणाऱ्या कथामालिकांचे लेखन हा पूर्णवेळाचा व्यवसाय बनला. कथा हे साहित्यरूप न राहता बाजारात खपणारी एक आकर्षक वस्तू झाली. एकदा पैसे मोजल्यावर घरात बसून, लोळून आरामात, चहा पीत, पदार्थ चवीने खात, गप्पा मारत समोर दिसणारी चित्तरकथा ऐकता-पाहता येऊ लागली. त्यासाठी एकाग्रतेची जरुरी नव्हती.
आकलनसुलभ असणे ही कथानकाची प्राथमिक अट होती. त्यामुळे आरंभ, मध्य व अंत यातले काहीही चुकले, बुडले तरी चालते. विचार करायला नसल्याने डोक्याला किंचितही शीण येत नाही. त्यामुळे लोकप्रिय कथाकारांना लिहिण्याची काही गरजच उरली नाही. त्यांचे कार्य शेकडो वाहिन्यांवर दिवस-रात्र रतीब घालणाऱ्या मालिकांनी उत्तम प्रकारे बजावले आहे. स्वाभाविकपणे रहस्यकथा (सस्पेन्स थ्रिलर), नवलकथा, भयकथा, गूढकथा हे प्रकारही जवळपास नामशेष झाले आहेत. नारायण धारप, रत्नाकर मतकरी, द. पां. खांबटे यांचे कूळ त्यांच्यापाशीच संपले आहे. मंगला गोडबोले व मुकुंद टाकसाळे यांसारखे मोजके अपवाद वगळले तर विनोदाच्या आश्रयाने कथेची उभारणी करणारे अत्यल्प लेखक आहेत. हेच विज्ञानकथांच्या बाबतीतही म्हणता येईल. निरंजन घाटे, सुबोध जावडेकर, रेखा बैजल, बाळ फोंडके वगळले तर अन्य कोणाचे नाव या संदर्भात चटकन आठवत नाही.
तुलनेने कुटुंबकथा आजही लिहिल्या जात आहेत. एकत्र कुटुंब ते एकटीचे वा एकटय़ाचे कुटुंब अशी वाटचाल झाली असली तरी रक्ताच्या वा जोडलेल्या माणसांच्या नातेसंबंधातील निरगाठी, त्या गुंत्यामधून उत्पन्न होणारे ताण व पेचप्रसंग विशेषत: लेखिकांच्या आस्थेचा विषय ठरतात. गौरी देशपांडे, आशा बगे, सानिया, सुनीती आफळे, जोत्स्ना देवधर यांच्यापासून गेल्या १०-२० वर्षांत उदयाला आलेल्या आणि मान्यता मिळवलेल्या मेघना पेठे, नीरजा, मोनिका गजेंद्रगडकर, प्रतिमा जोशी व प्रज्ञा लोखंडे यांच्यापर्यंत कितीतरी लेखिकांनी मराठी कथाविश्वात आपले स्वतंत्र स्थान निर्माण केले आहे. यापैकी काही जणी कथेकडून कादंबरीकडे वळल्या, हेही येथे ध्यानात घेण्याजोगे आहे. मात्र त्यांच्या लेखनाची गतीही संथ आहे, वयाने तिशी-पस्तिशीत असलेल्या, ताज्या दमाच्या आणि समकालीन संदर्भविश्वाच्या अनुषंगाने सबंध विश्वातील चढ-उतार शब्दांकित करण्यासाठी लागणारी ‘कथे’वरील पकड असणाऱ्या लेखिकाही फारशा दिसत नाहीत.
याचे एक कारण असे आहे की कथा लेखनाकडे काही जण फावल्या वेळचा छंद, लहर किंवा विरंगुळा म्हणून पाहतात. आपण काहीतरी रचून लिहिले ते कशात तरी छापूनही आले यानेही बरेच जण सुखावतात. जवळचे चार लोक याचा उल्लेख आपापसात का होईना पण करतात, त्याने एक वेगळी ओळख मिळाल्यासारखे वाटते.  यातून आत्मसंतुष्टता इतकी वाढते की आपल्याला आलेल्या वा न आलेल्या, आपण प्रत्यक्ष पाहिलेल्या वा कोणाकडून तरी ऐकलेल्या अनुभवाला काल्पनिक पात्रांच्या साहाय्याने जरा भारी शब्दरूप दिले म्हणजे ‘कथा’ ही समजूत प्रबळ होते. चटपटीतपणे सांगितलेले किस्से त्यात बेताबेताने भावविवशता, प्रक्षोभ वा हास्यनिर्मिती यांचा शिडकावा केलेला असला की पुरे!
चांगल्या कथानिर्मितीसाठी केवळ आपली प्रेरणा सच्ची असून वा अन्य साधनसुविधांची उपलब्धी असून भागत नाही. किंबहुना सुसूत्रपणे लिहिलेली कोणतीही गोष्ट म्हणजे ‘कथा’ नव्हे. तसेच कथा उत्तम होण्यासाठी काहीतरी नवीन कल्पना सुचणे वा स्फुरणेही पुरेसे नसते तर कथाबीज विकसित करण्यासाठी मुळात लेखकाची मनोभूमी सुपीक असावी लागते. त्याकरिता तिची अखंड मशागत करणे जरुरीचे असते. परंतु याची सुस्पष्ट जाणीव बहुसंख्य जणांना नसल्याने ते प्रसंगोपात्त लिहितात. लिहिण्याची ‘क्रिया’ त्यांच्या हातून घडते पण ती अर्थपूर्ण कृती होत नाही. आता जे मनात साठले-साचले आहे ते निकराने व्यक्त करायलाच हवे, त्याशिवाय गत्यंतर नाही, अशी अपरिहार्यताही त्यामागे नसते. जशी सवड मिळेल तशी ते आपली लेखनाची आवड, हौस पुरी करतात. यामुळे बऱ्याचदा अपुऱ्या दिवसांचे अशक्त मूल जन्माला यावे, तशी या गोष्टीरूप लेखनाची गत होते.
भ्रष्टाचार, अन्याय-अत्याचार, जातीय दंगली, स्त्री-पुरुषसंबंध, मनोविकार, अनाथ वा दत्तक मुलांच्या समस्या, बँकांमधील व्यवहार, वृद्धांची दुरवस्था, दारिद्रय़, दुष्काळ, पाणीटंचाई, विज्ञान व तंत्रज्ञानाचे फायदे-तोटे, ग्रामजीवनाचे पालटलेले रंगरूप, बचत गटांमुळे व राजकारणातील आरक्षणामुळे महिलांचे झालेले सबलीकरण आणि भविष्यातील आभासविश्व असे नानाविध विषय लेखनासाठी निवडले तरी लेखकाच्या त्या संबंधीचे आकलन पृष्ठस्तरीय असल्याने ते फक्त वैचित्र्यपूर्ण ठरते. त्यावर आधारित जीवनानुभव कलानुभवात संक्रमित होत नाही. कारण लेखकाच्या ठिकाणी जरी उपजत प्रतिभा असली तरी तिला जी अभ्यासाची, व्यासंगाची व सूक्ष्म अवलोकन- निरीक्षणाची जोड द्यावी लागते. तिचा येथे अभाव असतो. त्यामुळे प्रसंग असले तरी ते एका धाग्यात गोवलेले नसतात. पात्रांच्या उक्ती-कृतीमध्ये आंतरिक सुसंगतता आढळत नाही. घटना विश्वसनीय वा संभवनीय नसतात, त्यामुळे कथा एकसंध राहत नाही. तिचा परिणामही क्षीण होतो.
मुळात आपल्याला नेमके काय सांगायचे, पोचवायचे आहे, कशाचा शोध घ्यावयाचा आहे याबद्दल लेखकाच्या मनातच संभ्रम असतो. उदा. कोणते अनुभव ‘कथे’च्या रूपबंधातून प्रभावीपणे प्रकट होऊ शकतील, याची समज असण्यासाठी आपण एका विशिष्ट परंपरेतील दुवा आहोत याचे भान त्याला असावे लागते. परंतु कितीतरी लेखकांनी काही वाचलेलेच नसते. वाचण्याची आवश्यकताही त्यांना वाटत नाही. त्यामुळे वॉशिंग्टन, टोरांटो, दुबई येथून लिहिणाऱ्यांच्या गोष्टीतील नायक-नायिका अजूनही लताकुंजात, जलाशयाकाठी भेटून स्पर्शातील थरार, रोमांच अनुभवतात. आणि प्रेमकूजन करतात. कालसुसंगत म्हणजे काय ते ठाऊक नसल्याने कालबाहय़ म्हणजे काय तेही उमजत नाही. असे लेखन वाचकाच्या मनात कोणतीही संवेदना निर्माण करण्यास असमर्थ ठरते. म्हणून गोष्टी लिहिणारे सर्व जण ‘कथाकार’ नसतात. हे पक्के ध्यानात ठेवले पाहिजे. तसेच इंटरनेट, फेसबुक व ब्लॉग याद्वारा केले जाणारे स्वैरलेखन हेही कथेला पर्याय बनू शकत नाही.
वस्तुत: सध्या आजूबाजूला जे दिसते, अनुभवास येते ते वास्तव्य साहित्यापेक्षा कितीतरी पटीने अधिक सुरस व चमत्कारिक आहे. मती कुंठित करणाऱ्या घटना रोज घडत आहेत. घरात, कुटुंबात खोलवर त्यांचे परिणाम झिरपत आहेत. ते प्रत्येकाला सोसावे, भोगावे लागत आहेत. अशा सर्वस्वी विपरीत परिस्थितीतही संवेदनशील, विचारी माणसाला धीराने नेट धरून जगायचे आहे. आपल्या जगण्याला अर्थ यायचा आहे. त्यासाठी अल्बेर काम्यूच्या सिसिफससारखा निष्फळ खटाटोपही आनंदाने करीत राहण्याची त्याची तयारी आहे. फक्त या मार्गक्रमणेत जे स्वत्त्व आणि सत्य (कदाचित) गवसणार आहे ते उत्कटपणे सांगण्यासाठी, समजून घेण्यासाठी त्याला कोणाच्या तरी सोबतीची, कोणाशी तरी संवाद साधण्याची आस आहे. तर मग स्वातंत्र्याला अवकाश प्राप्त करून देणाऱ्या आणि सहिष्णुतेचा संस्कार करणाऱ्या कथानिर्मितीइतका दुसरा भरवशाचा मार्ग कोणता?

shiv sena spent rs 70 thousand on sakhi mahotsav
शिवसेनेच्या सखी महोत्सवासाठी केवळ ७० हजार खर्च ? माहिती अधिकार कार्यकर्त्याची तक्रार
out there screaming book
बुकबातमी: ‘भयप्रेमीं’साठीचा दस्तावेज..
Why frequent allegations of political infiltration in Sahitya Akademi
विश्लेषण: साहित्य अकादमीत राजकीय घुसखोरीचा आरोप वारंवार का?
piyush goyal
लखलखत्या तरुण तेजांकितांचा आज गौरव; केंद्रीय वाणिज्य व उद्योगमंत्री पियूष गोयल प्रमुख अतिथी