श्रीनगरच्या विमानतळाबाहेर पाऊल टाकताच गारठवून टाकणारी थंडी आपली पहिली पकड घेते. आम्ही उतरलो तेव्हा श्रीनगरमध्ये तीन डिग्री सेल्सिअस एवढं किमान तापमान होतं. आणि तरीही समोर पसरलेल्या पर्वतरांगांच्या शिखरांवर दिसणारा बर्फाचा थर सोडला तर कुठेच बर्फाची दुलई पसरलेली नव्हती. त्या गोठवून टाकणाऱ्या थंडीत काकडत, कसेबसे समोर आलेल्या गाडीत स्वत:ला अक्षरश: ढकलत उबदार वातावरणात बंदिस्त होण्याची आमची धडपड मिश्कीलपणे पाहणाऱ्या आमच्या काश्मिरी ड्रायव्हरचा पहिला प्रश्न होता- ‘आप काश्मीर में पहिली बार आए हो?’ त्याच्या प्रश्नाला आमच्या उत्तराची वाट न पाहता हिलाल हा आमचा काश्मीर प्रवासातील पहिला साथीदार सांगत होता, ‘यावर्षी पहिल्यांदाच असं झालं आहे की श्रीनगरमध्ये बर्फ पडलेला नाही.’ बर्फ पडला असता तर तुमची खैर नव्हती, असा सूचक इशारा त्याच्या त्या माहितीत होता. ‘धरतीवरचा स्वर्ग म्हणविल्या जाणाऱ्या कोश्मीरपासून तुम्ही इतकी र्वष दूर राहूच कसे शकलात?,’ हा त्याचा प्रश्न होता. खरं म्हणजे आत्ताही या नंदनवनाचं सौंदर्य अनुभवायला आम्ही आलो आहोत, की जेहलमच्या प्रचंड पुरात दुथडी भरून वाहिलेल्या पात्रातून आलेल्या चिखलाने काश्मीरचं सौंदर्य लिंपून टाकलंय की काय, याची शहानिशा करायला? हा प्रश्नच होता.lr18श्रीनगरच्या रस्त्यांवरून गाडी धावू लागली तसं आजूबाजूला पाहताना अगदी चारच महिन्यांपूर्वी चित्रवाहिन्यांवर पाहिलेलं पुराने उद्ध्वस्त झालेलं काश्मीर ते हेच का, असा प्रश्न पडत होता. पिरपांजाळ पर्वतरांगांचं ते अद्भुत दृश्य आणि या पर्वतरांगांच्या पायथ्याशी टुकीने उभी असलेली घरं, शाळा, रुग्णालय, गाडीच्या वेगाने पुढे जाणारे आम्ही आणि आम्हाला मागे टाकत जाणारी सुकलेली चिनार- सूचिपर्णीची लांबूडकी झाडं.. पायघोळ ‘फे रन’ घालून फिरणारी आणि फेरनच्या आत पोटाशी निखाऱ्यांनी फुललेली छोटी वेताची टोपली हाताने कवटाळून घेत थंडी पळवणारी काश्मिरी माणसं.. असं कुठल्याशा सुंदर चित्रात रेखाटलेलं वेगळंच जग जिवंत होऊन आजूबाजूला फिरत असावं तशा विस्फारल्या नजरांनी पाहणारे आम्हीही त्या चित्रातला एक भाग होऊन गेलो होतो. पण या चित्रात कुठेही पुरात वाहून गेलेल्या काश्मीरचा मागमूसही नव्हता.
२०१४ च्या सप्टेंबर महिन्यात असं काही घडलं होतं या शहरात, की ज्याने होत्याचं नव्हतं करून टाकलं होतं शहर, असं आम्ही ऐकलं होतं.. पाहिलं होतं. जगभरातील पर्यटकांचं आकर्षण, भारतीयांचा अभिमान असं हे नंदनवन होतं. त्या थैमानानंतर पाचव्याच महिन्यात आम्ही या नंदनवनात उतरलो होतो. परंतु त्याच दिमाखात इथल्या निसर्गानं आमचं स्वागत केलं होतं. नव्हे, येणाऱ्या प्रत्येक पर्यटकासाठी काश्मीरचा हा ‘अजूबा’ कायम असाच निसर्गाचे नवनवे रंग दाखवीत राहील, असं संशयाचं पारणं फिटत होतं. आमच्या मनातला शंकांचा कल्लोळ प्रश्नांवाटे बाहेर पडत होता. आणि हिलालला जे सांगायचं होतं त्याला वाट सापडली होती. भर शहरात जेहलमचा बांध फुटला होता हे खरं होतं. बांध तिचा फुटला खरा; पण शहरात घुसलेल्या पाण्याने लाखो काश्मिरींच्या डोळ्यांत अश्रूंचा पूर आणला, हेही तितकंच खरंय. ओसरलेल्या पाण्याने आपल्या खाणाखुणा घरांवर, माणसांच्या मनांवर कुठे कुठे शिल्लक ठेवल्या आहेत. पुराच्या चिखलाची पिवळसर पुटं आहेतही. नाही असं नाही. पण त्यावर काश्मिरींच्या जिद्दीचा नवा रंग चढला आहे. हे सगळं इथल्या लोकांनी मिळून पुन्हा उभं केलं आहे. सरकारने कुठलीही मदत केलेली नाही. काश्मिरी लोकांनी एकत्र येत इथल्याच काही सामाजिक संस्थांच्या मदतीने आपली घरं, आपलं शहर पुन्हा उभं केलं आहे. ‘सरकारची मदत किती? तर घरटी फक्त ३० हजार रुपये. काय करणार होतो आम्ही त्या पैशात? ज्यांनी विमा उतरवला होता त्यांनी त्या पैशातून पुन्हा दुकानं, घरं उभी केली. काहींनी आपली गुंतवणूक खर्ची केली. ज्यांची परिस्थिती नाही ते अजूनही एकेक फळी जोडत आपली घरंदारं उभी क रत आहेत,’ हिलाल सांगत होता. ‘आम्ही हे सगळं करतो आहोत, कारण आम्हाला आमचं जगण्याचं साधन मजबूत करायचं आहे. पर्यटन हा आमचा एकमात्र व्यवसाय आहे. आणि पर्यटकांनीच जर आमच्याकडे पाठ फिरवली, तर आम्ही कधीच पुढे जाऊ शकणार नाही. काश्मीरमध्ये येणारे पर्यटक हे आमचे पाहुणे आहेत. त्यांच्या केसालाही कोणी धक्का लावू शकणार नाही. इथे ते अगदी सुखात असतील..’ असा विश्वास त्याच्या बोलण्यातूनच नाही, तर कृतीतूनही व्यक्त होत राहिला.lr17श्रीनगरच्या विमानतळापासून ते दाल लेकसमोर असलेल्या पर्वतावर विस्तीर्ण जागेत वसलेल्या ‘ताज विवाना’ हॉटेलमध्ये आमचा प्रवेश होईपर्यंत काश्मीरबद्दलच्या साचून राहिलेल्या अनेक दंतकथा पुसल्या गेल्या होत्या. त्याऐवजी केवळ ‘अमन’साठी नाही, तर स्वबळावर अभिमानाने जगू पाहणाऱ्या काश्मीरचं एक नवं चित्र आमच्या मनात आकार घेऊ लागलं होतं. त्याच दिवशी श्रीनगरपासून ३० कि. मी. अंतरावर असलेल्या अवंतीपुराला आम्ही भेट दिली. राजा अवंतीवर्माने बांधलेल्या या अवंतीपुराचे अवशेषही त्याच दिमाखात उभे आहेत. अवंतीपुराच्या उंबरठय़ावरच उभं राहून समोर काही पायऱ्यांवर चढून बसलेले दोन समोरासमोरचे खांब आणि मधली जागा पाहिली की हटकून आठवण होते ती विशाल भारद्वाज दिग्दर्शित ‘हैदर’ चित्रपटाची. या चित्रपटातलं शाहीदचं ‘बिस्मिले बुलबुल’ हे गाणं याच दोन खांबांमधील मोकळ्या जागेत चित्रित झालेलं आहे. ‘अवंतीपुरा आणि त्याचाच पुढचा भाग म्हणून अवंतीवर्माने बांधलेलं सूरज मंदिर अशा दोन्ही ठिकाणी ‘हैदर’चं गाणं चित्रित झालं आहे..’ तिथे उपस्थित असलेल्या गाईडने माहिती पुरवली. सध्या अवंतीपुरा हे संरक्षित स्मारक म्हणून घोषित झालं आहे. काश्मीर आणि हिंदी चित्रपट हे अजबगजब समीकरण आहे. आणि अवंतीपुरापासून सुरू झालेल्या आमच्या प्रवासात हे फिल्मी समीकरण आमच्या येथील वास्तव्यात कायम होतं. काश्मीरमध्ये आलेल्या पुरानंतर तिथे चित्रित होणारा पहिला चित्रपट आहे अभिषेक कपूर दिग्दर्शित ‘फितूर’! आम्ही ज्या ‘ताज विवाना’मध्ये थांबलो होतो तिथेच या चित्रपटाची टीम वास्तव्याला असल्याने तिथपासून ते अगदी दाल लेकसमोर असलेल्या निशात गार्डनमध्ये प्रत्यक्ष चित्रिकरण करत असलेल्या कतरिना कैफ, आदित्य रॉय कपूर आणि रेखा यांची एक झलक दिसावी म्हणून आम्ही हरएक प्रयत्न केले. मात्र, दिग्दर्शक अभिषेक कपूर आणि मूळचा श्रीनगरचाच असलेला ‘अग्ली’फेम अभिनेता राहुल भट वगळता इतरांचा माग घेण्यात आम्ही सपशेल अपयशी ठरलो. पण काश्मिरी जनता मात्र बॉलिवूडच्या या ‘फितूर’ वास्तव्यामुळे एकदम खूश आहे. त्यांच्या पर्यटन व्यवसायवृद्धीसाठी बॉलिवूडचा फार मोठा हातभार लागतो. त्यामुळे आणखी हिंदी चित्रपट इथे चित्रणासाठी यायला हवेत असं त्यांना वाटतं. दाल लेकमधल्या शिकारात नृत्य करणाऱ्या ‘कश्मीर की कली’च्या शम्मी कपूरपासून ते गुलमर्गमधील खिलानमर्गच्या बर्फाळ पर्वतराजीवर स्किईंग करणाऱ्या ‘यह जवानी है दिवानी’तील रणबीर कपूरपर्यंत अनेक आठवणी इथल्या ठिकाणांवर खेळतात.
श्रीनगरवरून गुलमर्गच्या दिशेने निघालेल्या आम्हाला पुढच्या निसर्ग- साहसाची काहीच कल्पना नव्हती. इतका वेळ आम्ही कपडय़ांवर कपडे चढवूनही थंडीत गारठली होतो तरी आम्ही अद्यापि बर्फ पाहिला नव्हता. मात्र, तनमर्ग नावाची पाटी ओलांडताच आम्ही हिमशहरात पोहोचलो. रस्त्यावर दोन्ही बाजूने उभ्या राहिलेल्या बर्फाच्या डोंगरातून वाढ काढणारी आमची गाडी, झाडांच्या पाना-पानांवर तोलून उभं राहिलेलं बर्फ, बर्फाने आच्छादलेली हिमशिखरे असा सगळा बर्फाळ मामला नजरेत साठवत होतो. मात्र, खरी गंमत पुढेच होती. गुलमर्गमधली ‘गोंडोला’ केबल कार राईड खूप प्रसिद्ध आहे. उंचच उंच बर्फाळ डोंगरांमधून घेऊन जाणारी ही केबल कार किती उंचावर जावी? ३,९७९ मीटर उंचीवर नेणारी ही खिलानमर्गची केबल सेवा सर्वात उंचीवरची असल्याची माहिती इथली व्यवस्था सांभाळणाऱ्या झोहरने दिली. खिलानमर्गचा हा जगातील सर्वाधिक उंचीवरचा स्किईंग पॉइंट आहे. दोन टप्प्यांमध्ये ही केबल सेवा पूर्ण करण्यात आली होती. त्यामुळे ज्यांना सगळ्यात उंचावर जाऊन स्वर्गीय आनंद घ्यायचा असेल त्यांच्यासाठी २००६ साली दुसऱ्या टप्प्यातील केबल स्टेशन बांधण्यात आले, असं झोहरने सांगितलं. त्या उंचीवर पोहोचल्यानंतर ‘स्वर्गीय आनंद’ म्हणजे काय, याची प्रचीती यावी. लहानपणी ऐकलेली ढगातील परीची गोष्ट.. आपण त्या ढगात असलेल्या परीच्या विश्वात पोहोचतो. आपण जिथे उभे आहोत तिथे खाली ढगांची लांबच्या लांब पसरलेली मऊ मऊ गादी आणि समोर हिमालयाची शिखरं असं विहंगम दृश्य आपल्यासमोर असतं. आत्तापर्यंत हात-पाय थंडीने बधीर झालेले असतात. पायात असलेल्या जड गमबूटांमध्ये दडलेली पावलं आणखीन जड होतात. आणि तरीही एकदा हातात बर्फ घेण्याचा मोह आपल्याला आवरता येत नाही. इथे थोडय़ा अंतरावर सैन्याचं ठाणं आहे. इतक्या कमी तापमानात आणि प्रतिकूल परिस्थितीत एवढय़ा उंचीवर केबल स्टेशन्स उभारणाऱ्या हातांना कौतुकाने सलाम ठोकावासा वाटतो. ही कु ठलीच यंत्रणा सरकारी मदतीने उभी राहिलेली नाही, हे विशेष.
गुलमर्गची बर्फोनुभूती घेऊन अत्यानंदात परतलेले आम्ही पुन्हा दाल लेकला आलो. ओळीने उभ्या असलेल्या शिकारांमधून केलेली दाल लेकची सफर हाही अवर्णनीय अनुभव. शहराच्या मधोमध बाहू पसरून असलेला हा दाल लेक म्हणजे जणू पाण्यावरचं एक छोटंसं शहरच. छोटय़ा होडीतून भाजीपाल्यापासून पश्मिना शालीपर्यंत सगळ्या गोष्टी विकणारी तरंगती दुकानं, होडीतूनच शाळेसाठी निघालेली लहान मुलं यांच्यातून वाट काढत आमचा शिकारा तलावाच्या एका बाजूने रांगेत उभ्या असलेल्या हाऊसबोटपर्यंत पोहोचला. ‘क्रिस्टल पॅलेस’ नामक हाऊसबोटीत आमचं स्वागत करण्यात आलं. शाही फर्निचर, खाली पसरलेले गालिचे, मोठेमोठे पलंग, छतावर असलेली मोठी झुंबरं असं ऐषोरामी वास्तव्य देणाऱ्या हाऊसबोट्स पुराच्या पाण्यावरही तरंगत राहिल्या. त्यामुळे फार नुकसान झाले नाही, असं हाऊसबोटीची देखरेख करणाऱ्या अमीन यांनी सांगितलं. अमीन मूळचे पहेलगामचे. हाऊसबोटीच्या व्यवसायात बस्तान बसवलेल्या अमीन यांना श्रीनगर ते पहेलगाम ही वारी नित्याची. हाऊसबोटींच्या देखरेखीचे काम मोठे जिकिरीचे. त्यामुळे त्यात राहण्याचा खर्चही तितकाच मोठा आहे. पर्यटन वाढलं तरच हाऊसबोटींचा व्यवसाय जोम धरतो. हाऊसबोटीसारखीच व्यथा शिकारांचीही आहे. ओळीने सातशेच्या वर शिकारा इथे उभे असतात. रोज रांगेत उभं राहून जेव्हा नंबर येईल तेव्हाच व्यवसाय होणार अशी अवस्था असल्याचे शिकारा मालक मोहम्मद यांनी सांगितले. गेले दोन महिने ‘मेक माय ट्रीप डॉट कॉम’ या ऑनलाइन ट्रॅव्हल कंपनीच्या माध्यमातून शिकारा आणि हाऊसबोट चालक आपला व्यवसाय वाढविण्यासाठी नियोजन करत आहेत.
काश्मीर हे देशांतर्गत पर्यटन व्यवसायातून सर्वाधिक उत्पन्न मिळवणारे राज्य आहे. मात्र, पुरामुळे जणू सगळे काश्मीरच नष्ट झाले असल्याच्या वृत्तांनी पर्यटकांची मनं झाकोळली आणि त्यांनी काश्मीरचे नावच टाकून दिले. प्रत्यक्षात काश्मीरमध्ये पुरामुळे नुकसान झालं असलं तरी फार लवकर इथल्या लोकांनी परिस्थिती पूर्ववत केली आहे. आज इथला पर्यटन उद्योग पूर्ववत झाला असला तरी इथल्या व्यावसायिकांना पर्यटकांची पहिल्यासारखी गर्दी हवी आहे. यासाठीच पुन्हा एकदा कोश्मीरची वेगळी पॅकेजेस देत पर्यटकांना इथे आणण्याच्या दृष्टीने विविध प्रयत्न सुरू असल्याची माहिती ‘मेक माय ट्रीप’चे हॉलिडे प्रमुख रणजीत ओक यांनी सांगितलं.
अर्थात काश्मीरच्या समस्या संपलेल्या नाहीत. मुख्य शहरातच असलेलं सैन्याचं अस्तित्व आपल्यालाही अस्वस्थ करून जातं. मुंबई ते दिल्लीपर्यंतच्या प्रवासादरम्यान भेटलेल्या गिरीजा या काश्मिरी पंडितांच्या कु टुंबातील महिलेच्या डोळ्यातलं पाणी आपल्याला आतून हलवतं. काश्मिरी पंडितांचे स्थलांतर, त्यांची झालेली हुसकावणी हा इथल्या निसर्गसौंदर्यावर उमटलेला इतिहासाचा काळा डाग क धीच पुसता येणारा नाही. काश्मीरमध्ये अजूनही नोक री-व्यवसायाच्या दृष्टीने तरुणांसाठी भरीव असं काहीच उभं राहिलेलं नाही. ‘आमच्या मुली इथेच शिकतात. इथे शिक्षणाची चांगली सोय आहे. पण शिकून नोकरीसाठी मात्र त्यांना काश्मीरच्या बाहेर पडावं लागतं..’ अशा व्यथा एकानं बोलून दाखवली.
आज पर्यटनामुळे हॉटेल्समधून त्यांच्यापैकी काहींना कामाच्या संधी उपलब्ध होत आहेत खऱ्या; पण त्या पुरेशा नाहीत. ही सगळी परिस्थिती स्वीकारलेल्या काश्मिरी जनतेला आपला वर्तमान अजून मजबूत करायचा आहे. पर्यटन व्यवसाय हा त्या वर्तमानाला घट्ट धरून ठेवणारा जगण्याचा धागा आहे. म्हणूनच पर्यटकांसाठी काश्मिरी जनतेचं हार्दिक आमंत्रण आहे.