News Flash

डिजिटल चलचित्र कॅमेरा

फिल्म वापरून चलचित्र करण्यास सुरुवात झाल्यानंतर काही काळातच हे तंत्र जगभर पसरले आणि अनेक अंगांनी त्याचा विकास होत गेला

| August 16, 2015 03:15 am

फिल्म वापरून चलचित्र करण्यास सुरुवात झाल्यानंतर काही काळातच हे तंत्र जगभर पसरले आणि अनेक अंगांनी त्याचा विकास होत गेला. अनेक चित्रपट तयार होऊ लागले. पण तरीही त्याच्या तांत्रिक क्लिष्टतेमुळे आणि आर्थिक गणितामुळे सामान्य माणसाला हवा तेव्हा चित्रपट बघायला जरी उपलब्ध होता; तरी तो करायला दुर्लभच होता. चित्रपट तयार करणे हा एक मोठा उद्योग बनत गेला. पण चित्रपट तयार करण्याचा विचार फक्त पैसा जमवू शकणारा माणूसच करू शकत होता. मात्र तंत्रज्ञ स्वस्थ बसलेले नव्हते. त्यांनी चलचित्र मुद्रित करण्याच्या नवीन पद्धती शोधल्या आणि त्याचाच परिणाम म्हणून कुणीही, कुठेही, कसाही चित्रपट बनवू शकतो अशी परिस्थिती आज आहे.

आज तुम्हाला खरोखरच चलचित्रपट बनवायचा असेल तर..
१. प्रथम तुमचा डिजिटल कॅमेरा (किंवा भ्रमणध्वनीमधला) ठीक आहे ना, हे तपासा. त्याची बॅटरी पूर्ण भारित (ूँं१ॠी)ि आहे ना, हे तपासा.
२. तुम्हाला काय चित्रित करायचे आहे, ते ठरवा.
३. चित्रपटात कोण असणार आहे- दुसरी माणसे, प्राणी, निसर्ग.. ते ठरवा.
४. कॅमेरा पाहिजे तेथे ठेवा अथवा घेऊन जा आणि कळ दाबून चालू करा आणि हवे तेवढे चित्रीकरण करा.
५. केलेले चित्रीकरण संगणकावर पुनर्मुद्रित करा आणि चलचित्रे संपादन (Editing) करण्याची प्रणाली (जी सहज उपलब्ध असते!) वापरून तुम्हाला हवा तसा चित्रपट तयार करा.
६. तयार केलेला चित्रपट इतरांना दाखवण्यासाठी इंटरनेटवर त्याला प्रसिद्ध करा, किंवा त्याच्या तबकडय़ा (DVD) काढा.. अनेक मार्ग आहेत.
इतके हे सर्व प्रकरण सोपे झाले आहे. आणि हा बदल आहे केवळ काही दशकांतला. फिल्म चलचित्र कॅमेऱ्याला पर्याय शोधण्याचे काम १९२०-३० च्या काळात सुरू झाले. पूर्वसुरींनी केलेल्या प्रयोगांवर पुढे अधिक काम करून १९३० मध्ये जॉन लोगी बेअर्ड या स्कॉटिश अभियंत्याने पहिले व्हिडीओ चलचित्रण केले. पण पुढे १९८० पर्यंत जो व्हिडीओ कॅमेरा वापरला गेला, त्याचे प्रथम सादरीकरण केले ते रे डॉल्बी, चार्ल्स गिन्सबर्ग आणि चार्ल्स अ‍ॅण्डर्सन यांनी. १४ एप्रिल १९५६ ला त्यांनी प्रतिमा आणि आवाज एकत्र मुद्रित करणाऱ्या व्हिडीओ कॅमेऱ्याचा शोध लावला. यामध्ये प्रकाशाबरोबर होणाऱ्या रासायनिक प्रतिक्रियेमुळे प्रतिमेचे मुद्रण करणाऱ्या फिल्मऐवजी चुंबकीय प्रभावामुळे ध्वनी आणि प्रतिमा मुद्रण करणाऱ्या (Video Home System- VHS) फितीचा वापर केला गेला. पुढे या प्रकारच्या कॅमेऱ्याच्या आकार आणि स्वरूपातही बदल होत गेले आणि १९८० च्या सुमारास हा छोटा कॅमेरा ‘कॅमकॉर्डर’ (चित्र क्र. १) या नावाने सामान्य लोकांच्या हातात आला.
जेरोम लेमेल्सनने १९८० मध्ये कॅमकॉर्डरच्या शोधाचे स्वामित्व हक्क मिळवले. पण त्याने जेव्हा १९७७ मध्ये हीच कल्पना स्वामित्व हक्कासाठी अमेरिकन स्वामित्व हक्क संस्थेकडे पाठवली होती तेव्हा ही अति ताणलेली कल्पना असून नजीकच्या काळात कोणीही हे उपकरण बनवण्याची सुतराम शक्यता नसल्याचा निर्वाळा देत त्याचा अर्ज फेटाळला गेला होता.
पुढे ९० च्या दशकात डिजिटल तंत्राचा शोध लागल्यावर हाही कॅमेरा मागे पडला आणि सांख्यिकी तंत्र वापरून चकतीवर प्रतिमा मुद्रण करणाऱ्या डिजिटल चलचित्र कॅमेऱ्याचे राज्य सुरू झाले.
या कॅमकॉर्डरचे दोन भाग असतात. चित्र क्र. २ मध्ये दिसणारा व्हीसीआर (Video Cassette Recorder) भाग- ज्यामध्ये चुंबकीय फितीवर प्रतिमामुद्रण होते, तर चित्र क्र. ३ मध्ये दिसणारा कॅमेरा भाग- ज्यामध्ये प्रतिमा टिपून ती फितीकडे पाठवण्याचे काम होते. इतर सर्व कामे चलचित्र कॅमेऱ्याप्रमाणेच होतात. म्हणजे बाहेरून येणारा प्रकाश भिंगातून आत येतो. दृश्यशोधकातून किंवा आता कॅमेऱ्याच्या मागच्या बाजूस लावलेल्या LCD पडद्यावर समोरील प्रतिमा आपण बघू शकतो आणि हवी तेव्हा कॅमेऱ्याची कळ दाबून त्याला सुरू करतो. आत येणारे प्रकाशकिरण फिल्मवर न जाता ते चित्र क्र. ४ मध्ये दिसणाऱ्या CCD कडे जातात आणि तिथून ते चुंबकीय फितीकडे किंवा चकतीकडे पाठवले जातात आणि कॅमेऱ्यासमोरील प्रतिमा मुद्रित होते. सदृश (analog) पद्धतीने चालणाऱ्या कॅमेऱ्यात चुंबकीय फीत असते, तर सांख्यिकी (analog) कॅमेऱ्यात संग्राहक चकती असते.
CCD (Charged Coupled Device) किंवा उटडर CMOS (Complementary metal-oxide semi-conductor) या प्रकारच्या कॅमेऱ्यात प्रकाश संवेदक म्हणून काम करतो आणि आलेल्या प्रकाशऊर्जेचे विद्युत ऊर्जेत रूपांतर करतो. हे करण्यासाठी या १ सें.मी.चौरस आकार असलेल्या संवेदकावर ३ लाख ते ५ लाख सूक्ष्म प्रकाश-संवेदी ((Light Sensitive) डायोड बसवलेले असतात. त्यांना फोटोसाइट म्हणतात. अर्धवाहक(semi-conductor) असलेल्या वाळूपासून बनलेले हे फोटोसाइट त्यांच्या विशिष्ट भौतिक रचनेमुळे प्रकाशऊर्जा शोषून घेतात आणि त्यामुळे त्यांच्यातील इलेक्ट्रॉन उत्तेजित होऊन बाहेर पडतात आणि त्यामुळे विद्युतप्रवाह तयार होतो. फोटोसाइट त्यांच्यावर पडलेल्या प्रकाशाच्या तीव्रतेनुसार कमी-जास्त इलेक्ट्रॉन सोडतात. जास्त तीव्रतेचा प्रकाश कमी तीव्रतेच्या प्रकाशापेक्षा जास्त विद्युतभार तयार करतो आणि समोरील प्रतिमेचे व्हिडीओ चित्र तयार करून पुढे असलेल्या बायर फिल्टरकडे पाठवतो. बायर फिल्टर प्रतिमेत असलेल्या रंगांतील लाल, हिरवा आणि निळा या तीन मूळ रंगांचे प्रमाण मोजतो आणि त्या प्रमाणात विद्युतभार प्रमाणित करतो. सदृश कॅमेऱ्यात हे संकेत चुंबकीय लहरीत रूपांतरित होऊन फितीवर मुद्रित होतात, तर सांख्यिकी कॅमेऱ्यातीलADC (Analog Digital Converter) या संकेतांचे १ आणि ० आकडय़ांच्या साखळीत रूपांतर करून त्याना संग्राहक चकतीमध्ये साठवून ठेवतात.
चित्र क्र. ५ मध्ये स्वयंचलित नाभीकरण करणाऱ्या ((Auto Focusing Lens) भिंगाची रचना दाखवली आहे आणि चित्र क्र. ६ मध्ये ही यंत्रणा चालवणारी मोटर दिसते. बाहेरील प्रकाशाची तीव्रता मोजणारा अवरक्त (Infra red) किरणांचा झोत भिंगापुढे असणाऱ्या वस्तूवर आपटून परत येतो आणि संवेदक भिंगापासून वस्तूचे अंतर मोजून त्याप्रमाणे यंत्रणेतील मोटरला संदेश देतो आणि मोटर फिरून भिंग पुढे-मागे करते आणि योग्य त्या दर्जाची प्रतिमा चित्रित होते.
या सर्व तंत्रज्ञानामुळे चित्रीकरण करणे फार सोपे झाले आहे. आणि काय टिपायचे, याचा विचार करून वेगवेगळे प्रयोग करताना खर्चाचा विचार करण्याची गरज नसल्याने आज ही शब्दश: सर्वसामान्यांच्या हातातील कला झाली आहे. ल्ल
dpdeodhar@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 16, 2015 3:15 am

Web Title: digital camera
Next Stories
1 चलचित्र कॅमेरा
2 डिजिटल कॅमेरा
3 कॅमेरा
Just Now!
X