लोकमान्य टिळकांनी ज्या उद्देशाने सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला तो हेतू आज कालबाह्य़ झाला आहे. त्याची जागा उत्सवाच्या उन्मादी रूपाने घेतली आहे. त्यावर टीका होतच असते. मात्र, यंदा मुंबईतील ३५० गणेशोत्सव मंडळांनी अनावश्यक खर्च कमी करून ते पैसे दुष्काळग्रस्तांसाठी देण्याचे जाहीर केले आहे. तसेच काही गणेश मंडळांनी पूर्वीपासूनच समाजोपयोगी कार्याचा वसा घेतलेला आहे. अशा काही गणेश मंडळांच्या उपक्रमांचा वेध..

 

लो.टिळकांच्या प्रेरणेने सुरू झालेल्या आपल्याकडच्या सार्वजनिक गणेशोत्सवास १२३ वर्षांची प्रदीर्घ, समृद्ध परंपरा आहे. स्वातंत्र्यपूर्व काळातील गणेशोत्सवाला समाजप्रबोधनाचे अधिष्ठान होते. तसेच स्वातंत्र्योत्तर काळातदेखील अनेक गणेशोत्सव मंडळांनी विविध उपक्रमांद्वारे समाजकार्यात आपला खारीचा वाटा उचललेला दिसतो. सामाजिक बांधीलकी जपणारी असे काही प्रातिनिधिक गणेशोत्सव..

मुंबईतल्या लालबागच्या राजाची स्थापना १९३४ साली स्थानिक रहिवाशी व व्यापाऱ्यांच्या नवसाने झाली. तेव्हापासून नवसाला पावणारा म्हणून त्याची ख्याती पसरली. आज लाखो भाविक त्याच्या दर्शनासाठी येतात. मंडळाचे तीन हजार कार्यकर्ते तीन महिने गणेशोत्सवासाठी राबत असतात. मंडळाचे अध्यक्ष अशोक पवार यांनी मंडळातर्फे राबविल्या जाणाऱ्या सामाजिक उपक्रमांबद्दल माहिती देताना सांगितले की, १९९८ साली मंडळाने प्रथम के. ई. एम. इस्पितळातील रुग्णांसाठी दोन लाख रुपयांचा मदतनिधी दिला. आज ही रक्कम तीन कोटीवर गेली आहे. या निधीतून मुंबईतील नायर, सायन, जे. जे., वाडिया या शासकीय रुग्णालयांतील असंख्य रुग्णांना शस्त्रक्रिया व वैद्यकीय उपचारांसाठी भरीव मदत दिली जाते. मंडळाचे आणखी एक महत्त्वाचे कार्य म्हणजे अत्याधुनिक डायलेसिस सेंटर! इथे गरीब रुग्णांना नाममात्र शंभर रुपये शुल्कात डायलेसिस व आवश्यक त्या रक्तचाचण्या केल्या जातात. वर्षांला सुमारे तीस हजार गरजू रुग्णांना डायलेसिसची ही सुविधा पुरवली जाते. त्यामुळे अनेक कुटुंबांची आर्थिक परवड टळली आहे.

रुग्णसेवेबरोबरच मंडळाने ‘लालबागचा राजा प्रबोधिनी’ या अद्ययावत वास्तूत विद्यार्थ्यांसाठी ग्रंथालय सुरू केले आहे. दहावी ते पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी पंचवीसच्या वर विद्याशाखांतील महत्त्वाची पुस्तके या ठिकाणी उपलब्ध आहेत. शिवाय पुस्तकपेढीच्या माध्यमातून गरीब व गरजू विद्यार्थ्यांना शालेय वर्षांकरिता त्यांच्या अभ्यासक्रमाची पुस्तके विनामूल्य वापरावयास दिली जातात. तसेच आठ हजार हुशार, गरीब विद्यार्थी शिष्यवृत्ती योजनेचाही लाभ घेत आहेत. विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी पोषक वातावरण मिळावे यासाठी अभ्यासिका उपलब्ध करून देण्यात आली आहे. प्रबोधिनीत संगणक प्रशिक्षण केंद्रही आहे. तिथे अल्प दरात संगणक अभ्यासक्रम शिकवले जातात. स्पर्धापरीक्षांसाठी तयारी करणाऱ्यांना तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाचा लाभ मिळतो. याशिवाय इथे ‘एम्प्लॉयमेंट सेल’ आहे. या विभागात देशविदेशातल्या नोकरीच्या संधीची माहिती एका क्लिक्वर उपलब्ध होते. सामान्य कुटुंबातील तरुणही उज्ज्वल भविष्यासाठी सक्षम व्हावा, हे या सर्व उपक्रमांचे उद्दिष्ट आहे.

राष्ट्रीय आपत्तीच्या वेळीही मंडळाने सक्रीय योगदान केले आहे. २००५ साली रायगड जिल्ह्यातील पूरग्रस्तांसाठी अन्नधान्य, कपडेलत्ते, भांडीकुंडी आणि वैद्यकीय मदत पुरवण्यात आली. या महापुरात वाहून गेलेले शिवाई महाविद्यालय पुनश्च उभारण्यासाठी मंडळाने आर्थिक साहाय्य केले. महाड तालुक्यातील जुई गावात दरड कोसळून मोठय़ा प्रमाणावर वित्त व जीवितहानी झाली हाती. मंडळाने ५० लाख रुपये खर्च करून गावकऱ्यांना ३० घरे बांधून दिली आणि संपूर्ण गावाचे पुनर्वसन केले. या आपत्तीत कोंडवी गावातील गँगरीन झालेल्या एका महिलेच्या पायावर शस्त्रक्रिया करून तिलाही वाचवले.

पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टची स्थापना स्व. तात्यासाहेब गोडसे यांच्या प्रयत्नांतून झाली. ‘देव मंदिरातून मानव-मंदिराकडे!’ हा संदेश कार्यकर्त्यांना देऊन त्यांनी अनेक समाजोपयोगी उपक्रम राबवले. मंडळाचे अध्यक्ष अशोक गोडसे सांगतात- आज ट्रस्टकडे समाजातल्या सर्व थरांतल्या लोकांकडून जो पैशाचा ओघ येतो त्यातून रंजल्यागांजलेल्यांना मदत मिळावी असा आमचा प्रयत्न असतो. आता ससून इस्पितळाचेच उदाहरण घ्या. तिथे राज्याच्या दुर्गम खेडेगावांतील व पुणे शहरातील जो आर्थिकदृष्टय़ा पिचलेला वर्ग येतो त्यांच्यासाठी मंडळाने १०० कोटींची मदत देण्याचे ठरवले आहे. त्यानुसार तेथे अत्याधुनिक स्वयंपाकघर व किचनसाठी उपयुक्त सर्व साधनसामुग्री ट्रस्टने दिली आहे. ससूनमधले रुग्ण व त्यांच्या निगराणीसाठी दूरवरून आलेले त्यांचे नातलग अशा दोन हजार लोकांना दररोज भोजन, न्याहारी, दूध, फळे, कडधान्ये, भाजीपाला मंडळाकडून पुरवला जातो. यासाठी महिना १४ लाख रुपये खर्च येतो. याखेरीज मंडळाचे कार्यकर्ते दुर्गम भागांत फिरून मदतीची आवश्यकता असलेल्या गावांची पाहणी करतात. राख या गावात गेल्या पंधरा वर्षांत पाऊस पडलेला नाही. या गावासाठी मंडळाने टँकर्सची व्यवस्था केली. पिंगोरी हे असंच एक दुष्काळग्रस्त गाव! ते ट्रस्टने दत्तक घेतलं. तिथल्या धरणातला गाळ उपसण्याचं काम सुरूकेलं. तेव्हा अवघ्या दीड महिन्यात या धरणात ५१ कोटी लिटर पाणीसाठा झाला. त्यानंतर या गावासाठी आम्ही पंचवीस हजार सीताफळाची रोपं दिली. डोंगरावर चर खणून तिथे ही झाडं लावली; जेणेकरून मृद्संधारण व जलसंधारण अशी दोन्ही कामं झाली. पिंगोरीसारखंच आणखी एक गाव आडगाव- निमगांव केतकी. २०१४ साली तिथे गारपीट झाली. तिथल्या शेतमजुरांची घरं, शेतं, शेळ्यामेंढय़ा सगळं जमीनदोस्त झालं. जयगणेश आपत्ती निवारण अभियानाअंतर्गत तिथल्या बारा कुटुंबांना आम्ही पक्की घरं बांधून दिली. शेळ्या, शेतीचं साहित्य व अन्नधान्य देऊन त्यांचं पुनर्वसन केलं. ट्रस्टचे प्रकल्प केवळ ग्रामीण लोकांसाठीच नसून पुणे शहरामधील झोपडपट्टीतील गरीब व गरजू ५५० विद्यार्थ्यांचं पालकत्व ट्रस्टने घेतलं आहे. या मुलांसाठी अभ्यासिका, समुपदेशन केंद्र, संस्कारवर्ग, फी, वह्य़ा-पुस्तके, वैद्यकीय उपचार आणि एक लाखाचे विमा संरक्षण अशी भरीव मदत त्यांना मंडळाकडून केली जाते. कोंढवा इथे तरुण मुलांसाठी कुशल तंत्रज्ञानाचे वर्ग घेतले जातात. तिथेच प्रसन्न वातावरणातील वृद्धाश्रम व देवदासी आणि वेश्यांच्या मुलांसाठीचे बालसंगोपन केंद्रही चालवले जाते. यंदा वारीच्या मार्गावर पन्नास हजार रोपं लावली गेली व वारकऱ्यांना वैद्यकीय मदत पुरवण्यात आली.’

श्रीमंत दगडूशेठ ट्रस्टच्या या कामांतून प्रेरणा घेऊन ५०० गणेशोत्सव मंडळांतील पाच हजार कार्यकर्ते एकत्र आले आणि खडकवासला धरणातून गाळ काढण्याच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पास सुरुवात झाली. कर्नल सुरेश पाटील हे गेली चार वर्षे या प्रकल्पासाठी प्रयत्नशील होते. पण त्यांना म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नव्हता. तेव्हा पुण्यातील बहुसंख्य गणेशोत्सव मंडळांनी पुढाकार घेऊन या प्रकल्पासाठी भरीव आर्थिक मदत तर केलीच; शिवाय आवश्यक ते मनुष्यबळही पुरवले. या सर्वाच्या अथक प्रयत्नांतून आज खडकवासला धरणातून तीस हजार डंपर गाळ काढला गेला आहे. त्यामुळे पाण्याच्या साठय़ात लाखो लिटरची वाढ झाली आहे. धरणातून काढलेला हा गाळ स्थानिक शेतकऱ्यांना शेतासाठी विनामूल्य दिला जातो. देशभरातील साडेचार हजार धरणे अशा पद्धतीने साफ झाली तर खूप मोठा पाणीसाठा उपलब्ध होईल. यंदाच्या दुष्काळाच्या पाश्र्वभूमीवर या कार्याचे महत्त्व ठळकपणे अधोरेखित होते.

पुण्यातील धनकवडी विभागातील ‘आदर्श मित्र मंडळ’ हे गणेशोत्सव मंडळ गेली १४ वर्षे कार्यरत आहे. मंडळाचे अध्यक्ष उदय जगताप यांनी सक्रीय पुढाकार घेत समाजातल्या अत्यंत उपेक्षित घटकासाठी- गुन्हेगारांच्या पुनर्वसनासाठीचा उपक्रम राबवला. त्यांनी सांगितलं- ‘तुरुंगातून सुटलेल्या २६ अट्टल गुन्हेगारांना मंडळाने नोकरी-व्यवसाय मिळवून दिला. तेव्हा त्यांच्या बायका म्हणाल्या, ‘१४ वर्षांनी आमच्या दारात आज कंदील लागला. आम्ही खरी दिवाळी साजरी केली.’ मृत गुन्हेगारांच्या ५० मुलांना मंडळाने शिक्षणासाठी दत्तक घेतले आहे. शिवाय झोपडपट्टीतील वाममार्गाला लागलेल्या ३०० मुलांसाठी समुपदेशन केंद्र आणि ई-लर्निगचे क्लासेस पोलिसांच्या मदतीने सुरू केले. त्यामुळे या भागातील गुन्हेगारीत लक्षणीय घट झाली आहे. पुढे याच क्षेत्रात काम करायचं ठरवलं तेव्हा असं लक्षात आलं की, नक्षलग्रस्त क्षेत्रात नक्षलवाद्यांनी ज्यांना मारलं, त्यांच्या मुलांना शाळेसाठी रोज जंगलातून पाच ते सात कि. मी. पायपीट करावी लागते. अशा ५० मुलांना मंडळाने सायकली आणि शालेय साहित्य दिलं तेव्हा या मुलांच्या चेहऱ्यावर हसूं फुललं. या नक्षलग्रस्त भागातील अनेक पीडित कुटुंबांना आम्ही पाच लाख सरकारी अनुदान, तसेच बाराजणांना दुकान व शेतजमिनींचं वाटप केलं. या गावातल्या एका गावकऱ्याने सांगितलं की, ‘आजवर पोलिसांनी अनेक नक्षलवाद्यांचं रक्त वाहिलं. पण नुकतंच एका नक्षलवाद्याच्या भावाला रक्ताची गरज लागली तेव्हा एका पोलिसानेच त्याला रक्त दिलं.’ रक्तरंजित क्रांतीमार्गाला हे माणुसकीचं वळण देण्याचं श्रेय आदर्श मित्र मंडळ या गणेशोत्सव मंडळाला जातं.

पुण्यातील साईनाथ मंडळ ट्रस्टचे पियूष शहा दरवर्षी न चुकता देवदासींसाठी दिवाळीचा फराळ, बांगडय़ा, मेंदीचे कोन पाठवतात. तसेच सामाजिक विषयांवरील पथनाटय़ाचे जिवंत देखावे गणेशोत्सव काळात सादर करतात- जे पुण्यात अत्यंत लोकप्रिय आहेत. मुंबईतील ‘शिवडीचा राजा’ हा किताब मिरवणारे मंडळही गेली ६३ वर्षे पर्यावरण, दहशतवाद, स्त्रीभ्रूणहत्या अशा सामाजिक विषयांवरील चलत्चित्रांचे देखावे सजावटीत सादर करतात आणि त्याचा आनंद लुटण्यासाठी स्टेडियमसदृश उत्तम बैठकव्यवस्था भाविकांसाठी करण्यात येते. या देखाव्यांसाठी मंडळाला अनेक पुरस्कार मिळाले आहेत. मंडळाचे अध्यक्ष विजय इंदुलकर सांगतात, ‘आम्ही गरीब व गरजू विद्यार्थ्यांसाठी पुस्तकपेढी चालवतो. महिलांसाठी बचतगट, वृद्धांसाठी ज्येष्ठ नागरिक कट्टा, कला-क्रीडा महोत्सवांचे आयोजन असे उपक्रम वर्षभर राबवतो. अभ्युदयनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आदिवासी पाडय़ांमध्ये रक्तदान व नेत्रदान शिबिरे, तसेच वैद्यकीय तपासणी शिबिरे घेतात. या सामाजिक उपक्रमांसाठी त्यांना ‘गिरनार-लोकसत्ता’चे प्रथम पारितोषिकही मिळाले आहे. जोगेश्वरीतील श्यामनगर गणेशोत्सव मंडळाचे हे सुवर्णमहोत्सवी वर्ष! त्यानिमित्ताने त्यांनी वर्षभरात ५० उपक्रम राबवले. मंडळ आदिवासी पाडय़ांत कपडे, शालेय वस्तू व खेळांचे वाटप, आजी-आजोबांसाठी कौटुंबिक मेळावा आणि पोलीस मेळावाही घेते. तसेच दरवर्षी होळीदिवशी होळीला पुरणपोळ्या अर्पण न करता त्या जमा करून कामा इस्पितळातल्या गोरगरीबांना वाटल्या जातात, असे मंडळाचे दत्ता सरदेसाई यांनी सांगितले.

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ समन्वय समितीचे अध्यक्ष अॅड. नरेश दहीबावकर यांनी यासंदर्भात बोलताना सांगितले की, ‘आज समन्वय समितीने सर्व गणेशोत्सव मंडळे, पोलीस दल आणि पर्यावरणवादी यांना एकत्र आणले आहे. नियम पाळूनही उत्सव साजरा करता येतो हे मंडळांना पटवले आहे. समितीच्या प्रयत्नाने हिडीस नृत्यगाणी, मारामाऱ्या, गुंडगिरी, कर्कश्श डीजे या सर्वाना आळा बसला आहे. आज सर्व मंडळे नोंदणीकृत असल्याने स्वयंपूर्ण झाली आहेत. मंडळात उत्सवानिमित्त जमा होणाऱ्या निधीचा उपयोग ते विविध सामाजिक उपक्रमांसाठी करत आहेत, हे विशेष उल्लेखनीय आहे. भूकंप, दुष्काळ, जलप्रलय अशा आपत्तींत केवळ आर्थिक मदतच नव्हे, तर मंडळातील सेवाभावी कार्यकर्ते लोकांच्या मदतीसाठी धावून जातात. याच सामाजिक जाणिवेतून सुरज वालावलकर, राजेश राणेंसारखे तरुण गणपतीमूर्तीच्या पुनर्विसर्जनाचे, वाहतूक नियंत्रणाचे व नागरिकांच्या जीवरक्षणाचे काम स्वेच्छेने करतात. म्हणूनच गणेशोत्सव मंडळांवर केवळ टीकेची झोड न उठवता त्यांच्या विधायक कार्याचीही नोंद समाजाने घ्यावी असे मनापासून वाटते.’

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे ही सामाजिक कार्यकर्ते, नेते आणि कलाकार घडविणारी एक प्रयोगशाळा आहे. सामाजिक कार्यातून मानवी मूल्ये जपण्याचा, समाजाप्रती संवेदनशीलता निर्माण करण्याचा प्रयत्न गणेशोत्सव मंडळे करीत आहेत. मात्र, ही मंडळे सत्ताकेंद्रे न होता सेवाकेंद्रे व्हावीत, हीच सदिच्छा!

माधुरी ताम्हणे -madhuri.m.tamhane@gmail.com