सकाळपासून संध्याकाळपर्यंत कान किटेस्तोवर परमार्थाचे गोडवे गाणाऱ्या भारताची आजची दशा पाहता परमार्थ म्हणजे शतकानुशतके चाललेले निव्वळ ढोंग आहे, हे आपल्या लक्षात येईल. हे ढोंग चालू करायला आणि चालू ठेवायला कळत आणि नकळत आपण सर्वच जबाबदार आहोत. हे ढोंग किती वर्षे चालणार आहे, हे परमेश्वर जाणे. स्वार्थ याचा अर्थच कुणी मनावर घेत नाही. सारखे दुसऱ्याला मदत करा, समाजसेवा करा, असेच ऐकायला येते. असे लहानपणापासून ऐकूनदेखील आपल्याला लिहितादेखील येणार नाहीत अशा आकडय़ांचा गैरव्यवहार माणसे करतात. याचाच अर्थ आपल्या शिकवणुकीत काहीतरी भयंकर चुकते आहे.
‘आधी स्वत:ला मदत करा; मग दुसऱ्याला करा..’ हे स्वार्थी विधान समजले जाते. स्वार्थ म्हणजे काय, असे विचारले असता आपल्या तुंबडय़ा भरणे, जमेल ते ओरबाडणे, दुसऱ्याचे हिसकावून घेणे, दुसऱ्याचा माल हडप करणे, काळा पैसा करणे, कुणाला मदत न करता आपणच सारे लाटणे.. यापैकी काहीही आपल्याला ऐकायला मिळू शकते. पण ज्यांना असे वाटते, त्यांना स्वार्थ म्हणजे काय, हे नक्कीच समजलेले नाही. असे लोक असा ‘स्वार्थ’ करून मग देवस्थानांना, रुग्णालयांना, अनाथाश्रमांना देणग्या देऊन ‘परमार्थ’ साधू इच्छितात. ही आपली.. भारताची कमीत कमी गेल्या काही वर्षांतली गौरवशाली परंपरा आहे…(उर्वरित लेख वाचण्यासाठी खालील आकड्यांवर क्लिक करा)
स्वार्थ हे परमार्थाचे प्रवेशद्वार आहे. दचकलात? पण हा स्वार्थ कसा आहे, ते समजून घ्या. माझा स्वार्थ हा उत्तम प्रकारे आयुष्य काढण्यात आहे. ‘विना दैन्येन जीवनम् अनायासेन मरणम्’ असे ज्याचे आयुष्य जाईल तो उत्तम आयुष्य जगला, असे आपण म्हणू शकतो. असे जर सर्वाना मिळू शकेल, तरच ते आयुष्य खरे उत्तम जाईल. यासाठी आपल्याला फक्त एकच गोष्ट करायची आहे; ती म्हणजे- आपण जे काम करतो ते चोख आणि आनंदाने करायचे आहे. कंडक्टरपासून डॉक्टपर्यंत आणि पंचायतीपासून पंतप्रधानांपर्यंत फक्त आपले काम नीट करायचे आहे. भारतात हे आपण ‘समाज’ म्हणून कदाचित कधीच केलेले नाही. देशभक्ती म्हणजे मोर्चे काढून पाकिस्तानच्या नावे शंख करणे किंवा सैन्यात जाणे नव्हे; तर आपले काम आपल्या जागी राहून उत्तमरीत्या करीत राहणे, होय. देशाचा उत्कर्ष त्यामुळे  होतो. मोर्चे काढून नव्हे. रस्त्याचे कंत्राट घ्यायचे ते पैसे चारून. मग निकृष्ट काम करायचे. आणि आपण स्वत: तर त्या खड्डे पडलेल्या रस्त्यातून जायचेच, पण आपल्यासारखेच इतरांनाही जाताना पाहायचे; त्यांचे शिव्याशाप घ्यायचे आणि घरी जाऊन वातानुकूलित खोलीत बसून एखादी ब्लू फिल्म पाहायची- हा स्वार्थ नव्हे. उत्तम दर्जाचे रस्ते बांधून त्याचे चोख पैसे घेणे, आपण स्वत: आणि सर्वजण  त्यावरून सुखाने जाताना पाहत त्यांचे आशीर्वाद घेणे, हा खरा स्वार्थ! जरूर नसताना रुग्णांना औषधे द्यायची अगर शस्त्रक्रिया करायची पैसे घ्यायचे आणि परदेशात हिंडायला जायचे, हा स्वार्थ नव्हे. रुग्णांना कमीत कमी खर्चात सुयोग्य सल्ला देऊन चोख पैसे घेणे, आणि ते बरे झाल्यावर त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहणे, हा खरा स्वार्थ! निकृष्ट दर्जाची बांधकामे करायची, त्यांचे पैसे घ्यायचे; ती पडून माणसे मेली की त्यांचे शिव्याशाप घ्यायचे आणि त्यातले काही पैसे देवस्थानाला द्यायचे, हा स्वार्थ नव्हे. उत्तम दर्जाचे बांधकाम करून, योग्य पैसे घेऊन अनेकजणांना डोक्यावर छप्पर देणे, हा खरा स्वार्थ! वाट्टेल ते करून निवडून यायचे, प्रत्येक योजनेतून पैसे हडप करायचे आणि ते पैसे वापरून मोठमोठय़ा मालमत्ता करायच्या- हा स्वार्थ नव्हे. हाती आलेला अधिकार वापरून समाजातल्या सर्व घटकांना आपापली जबाबदारी समजावणे आणि प्रत्येक पैसा न् पैसा योग्य असाच खर्च करणे, हा खरा स्वार्थ! मोठमोठे कारखाने काढायचे, आसपासच्या हवा-पाण्याचे प्रच्छन्न प्रदूषण करायचे, प्रचंड पैसा करायचा आणि मग गाजावाजा करून एक मंदिर बांधायचे, हा स्वार्थ नव्हे. असलाच तर तद्दन मूर्खपणा आहे. फक्त पैसे मिळवायचे आणि घाण वासाच्या हवेचा श्वास घेत जगायचे, गटार झालेल्या नदीकाठी बंगला बांधायचा आणि नदीचे पाणी पिता येत नसल्याने प्लॅस्टिकच्या बाटलीतले पाणी प्यायचे. इथली जंगले तोडायला मदत करायची आणि परदेशातील जंगल सफारीला जायचे- यात काय आनंद आहे? या सुजलाम् सुफलाम् देशात जन्माला आलेल्या आजवरच्या माणसांनी या देशाचे जवळजवळ वाळवंट करून ठेवले आहे. पुढच्या पिढीला सांगण्यासारखे त्यांच्याकडे काहीही नाही. वाईट काम करून ‘कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन’ असे म्हणून निलाजरेपणे राहायचे, हा आपला धर्म बनू पाहत आहे…(उर्वरित लेख वाचण्यासाठी खालील आकड्यांवर क्लिक करा)
भिकाऱ्याला दिलेली भीक ही मदत नव्हे. आपण करतो ते काम नीट करणे, याहून मोठी मदत अगर याहून मोठा परमार्थ जगात कोणताही असू शकत नाही. आपला देश हा खरोखरच सुजलाम् सुफलाम् असताना आपण सारे भारतीय एखाद्या माकडाच्या टोळीसारखे एकमेकांवर आणि आपल्याच देशावर तुटून पडलो आहोत. आपण नुसता विध्वंस चालवला आहे. आपण नुसतेच वाईट काम करत नाही; आपण त्याचे ‘आध्यात्मिक विवरण’ही करतो, आणि ‘हे असेच चालणार, कारण कलियुग आहे,’ असे म्हणून त्यावर पांघरुणही घालतो. पण चोख काम मात्र करीत नाही. चांगले काम करून घरी परत येण्याचा आनंद रोजच्या रोज घेऊ शकत असताना तो आपण घेत नाही.
आनंदात राहणे हा माझा स्वार्थ आहे. तर, माझ्या आसपासचे जे काही आहे- त्यात निसर्गापासून मानवापर्यंत सारे काही आले- ते सारे आनंदात असले पाहिजेत, हाही माझा स्वार्थच आहे. कारण माझे पोट भरलेले आणि इतर सारे उपाशी असतील तर त्यात काय आनंद? माझ्या डोक्यावर छप्पर आणि इतर सारे उन्हापावसात असतील तर त्यात काय मजा? त्यासाठी माझ्या शरीराबाहेरची पंचमहाभूते आणि माझे शरीर ज्या पंचमहाभूतांनी बनले आहे, ही सारी महत्त्वाची ठरतात. माझे स्वास्थ्य उत्तम राहण्यासाठी मी व्यायाम करीन. त्यासाठी मी ज्या हवेत श्वास घेतो ती हवा स्वच्छ असली पाहिजे. मी जे पाणी पितो ते स्वच्छ असले पाहिजे. जे अन्न खातो ते प्रदूषणविरहित असले पाहिजे. माझ्या आसपासची पृथ्वी ही सुजलाम् सुफलाम् असली पाहिजे, हा माझा खरा ‘स्वार्थ’ आहे.
त्यासाठी माझ्याकडून मी हवेचे प्रदूषण तर करणार नाहीच, पण सुगंधी फुलांची झाडे आणि वेली लावीन; जेणेकरून माझा आसमंत सुगंधी होऊन जाईल. नदीच्या पाण्यात गटारे सोडणार नाही. माझ्या शहरातील नदीचे पाणी मला सहज पिता आले पाहिजे असा प्रयत्न करीन. घरातली घाण रस्त्यावर टाकणार नाही. शहरातील विष्ठेपासून ते कचऱ्यापर्यंत सर्व घाणीतून उत्तम खत आणि स्वयंपाकाचा गॅस मिळवीन. कुठल्याही देवाची देवळे रस्त्यात बांधणार नाही. मांडव घालून उत्सव करणार नाही, मिरवणुका आणि मोर्चे काढणार नाही. कारण रस्ता हा राजमार्गच असायला हवा. त्याचे आकाशतत्त्व अबाधित असले पाहिजे….(उर्वरित लेख वाचण्यासाठी खालील आकड्यांवर क्लिक करा)
हे सारे आपले आपणच केले पाहिजे. कारण मला माझा स्वार्थ महत्वाचा आहे. अत्यंत स्वार्थी माणूस पूर्णपणे नि:स्वार्थी असतो, कारण त्याला खरा स्वार्थ समजलेला असतो. या स्वार्थातून परमार्थाचे दार उघडते. दुसऱ्याला मदत आपोआप होत राहते. त्याची वाच्यता करायला लागत नाही. किंबहुना आपण कुणाला मदत करतो आहोत, हेदेखील कळत नाही. त्यामुळे कोणताही ‘आध्यात्मिक अहंकार’ होत नाही. कोणत्याही पारमार्थिक प्रवचनांच्या मागे लागू नका. ‘निगाहे करम’ एवढेच लक्षात असू द्या. आपले काम उत्तमरीत्या करणे याहून दुसरा परमार्थ नाही. कामात चोऱ्या करून इतर काही परमार्थ करणे, हे निव्वळ ढोंग आहे हे लक्षात असू द्या. आपले स्वास्थ्य हे इतर सर्व महाभूतांच्या स्वास्थ्याशी निगडित आहे. पिंडी ते ब्रह्मांडी आहे, तसेच ब्रह्मांडी आहे तेच पिंडी आहे. त्यामुळे माझे स्वास्थ्य किंवा माझा आनंद आणि आपले स्वास्थ्य आणि आपला आनंद एकच आहे; तो आपण सारे स्वार्थी बनून घेऊयात!!!

trees, Eastern Expressway,
पूर्व द्रुतगती मार्गावरील ५० झाडांवर विषप्रयोग, पालिका अधिकाऱ्यांच्या तक्रारीनंतर अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल
Loksatta anvyarth Naxalites killed in Kanker district of Chhattisgad
अन्वयार्थ: आता दीर्घकालीन उपायच गरजेचा..
nitin gadkari
चावडी: मी प्रचार (नाही) करणार!
navi mumbai, Valve Repair, Traffic Congestion, footpath close, Pedestrian Woes, kopar khairane, teen taki area, marathi news,
व्हॉल्व दुरुस्तीच्या कामामुळे पादचाऱ्यांचे हाल; कोपरखैरणेत तीन टाकी परिसरात पदपथ बंद