माझं नाव आहे ‘हीट’लर! नाही, तो ओठांवर छोटीशी मिशी राखणारा, कुप्रसिद्ध हिटलर मी नव्हे, पण माझं नाव मात्र त्याच्यावरून ठेवण्यात आलंय.
इथे- या रेस्तराँमध्ये येण्याआधी आणि ‘हीट’लर असं नामकरण होण्याआधी मी संशोधक होतो. तेव्हा माझं नाव होतं, डॉ. विक्रांत सदावत्रे.
lr12‘हीट’लर काय किंवा डॉ. विक्रम सदावत्रे काय, त्याने काय फरक पडतो? नावं बदलल्याने आपलं अस्तित्व थोडीच बदलणार असतं? ते आपल्याला जसं असेल तसं निमूटपणे स्वीकारावंच लागतं. पण या शेजारच्या खिडकीत कबूतर घुमू लागलं की, माझी कर्मकहाणी सांगण्याची उबळ मला
अनावर होते..
0 0 0
मला तो दिवस अजूनही जसाच्या तसा आठवतो- माझ्या वाढदिवसाचा.
एखाद्दुसरा एसएमएस वगळता शुभेच्छा देणारं कोणी नसल्याने त्या दिवशी सकाळी उठल्यावर मी माझं मलाच ‘हॅप्पी बर्थडे’ म्हणून विश केलं होतं. नंतर आन्हिकं उरकून माझ्याकडच्या रोबोटिक मायक्रोवेव्हला एक ग्रिल्ड सँडविचची मी ऑर्डर दिली.
‘येस सर,’ अशा खास यांत्रिक आवाजात त्याचं उत्तर आलं.
मी सायन्सचा विद्यार्थी असलो तरी मला तत्त्वज्ञान, अध्यात्म या विषयांतही खूप रस आहे. मी कुठेतरी वाचलं होतं की, या जगात वेगवेगळ्या प्रकारच्या अनेक गायी असल्या तरीही आपण त्या सगळ्यांना ‘गाय’ असं म्हणतो. कारण त्या सगळ्यांमध्ये एक मूळ मूलभूत तत्त्व-‘गो-तत्त्व’सारखं असतं. या तत्त्वामुळे बाह्य़ांगी वेगळी असली तरी ती मुळात गायच ठरते.
यावर मी जरा खोलात विचार केल्यावर मला असं वाटलं की, हे गो-तत्त्व म्हणजे ज्याला आपण आत्मा म्हणतो तसंच काहीतरी तर नसेल..? असंही म्हटलं जातंच की, मुळात आत्मा तसाच राहतो, फक्त त्याचे कपडे म्हणजेच शरीरं बदलतात.. आणि यावरूनच माझ्या डोक्यात हा जैवरूपांतरणाचा किडा घुसला! या मूलभूत तत्त्वांच्या अदलाबदलीचा. तेव्हापासून मी स्वत:ला या विषयासाठी वाहून घेतलं. आणि आज चाळिसाव्या वाढदिवशी प्रत्यक्ष प्रयोगाचा दिवस येऊन ठेपला होता!
माझ्या प्रयोगासाठी मी एक दिसायला साधंच मशीन तयार केलं होतं. त्यात एका मोठय़ा बॅटरीसारख्या दिसणाऱ्या बॉक्सच्या दोन बाजूला वायरने जोडलेले दोन पितळी डबे होते. बॉक्सवर मशीन चालू-बंद करण्यासाठी काही बटणं होती.
आपण म्हणजे पूर्णत: रासायनिक क्रिया-अभिक्रिया असतो, या तत्त्वाचा वापर माझ्या प्रयोगात मी करणार होतो. सजीवांमधलं ते मूलतत्त्व म्हणजेही विशिष्ट रासायनिक क्रियांची साखळीच असणार, हे गृहीत धरून मी ही साखळी विशिष्ट प्रक्रियांद्वारे विद्युत ऊर्जेत रूपांतरित करणार होतो. आणि मग ती दुसऱ्या शरीरात वाहून नेऊन मूळ रूपात पुन्हा कार्यान्वित करणार होतो.
‘सँडविच तयार आहे,’ मायक्रोवेव्हने सांगितलं.
प्रयोग सुरू करण्यासाठी मी िपजऱ्यातून कबूतर आणि कुत्र्याचं पिल्लू बाहेर काढून त्यांना त्या-त्या पितळी डब्यात ठेवलं. प्रयोग यशस्वी झाला असता तर कुत्र्यात कबूतराचं मूलतत्त्व आलं असतं नि ते पिल्लू उडू शकलं असतं; तसंच कबूतराला भुंकता आलं असतं! म्हणजे मग असं करून माणूस उडू शकला असता, पोहू शकला असता.. कदाचित मरणाऱ्या माणसाला रूपांतरण करून नवं शरीर देता आलं असतं..! अनेक गूढ प्रश्नांची उकल करता आली असती.. मी थरारून गेलो!
मशीन सुरू केल्यावर त्यातून घुर्रघुर्र असा आवाज आला.. मी एकटक त्या मशीनकडे पाहात होतो. थरार, उत्कंठा, भीती अशा मिश्र भावनांचा कल्लोळ माझ्या मेंदूत उठला.
‘सँडविच तयार आहे,’ मायक्रोवेव्हने पुन्हा सांगितलं.
काही मिनिटांनी मशीनमधून सुई-सुई असा आवाज येऊ लागला. पितळी डब्यांभोवती चंदेरी आभा पसरली. मग मशीन सुईसुर्र.. पीपीपॉपॉ.. सुईसुर्र.. असा कर्कश आवाज करू लागलं, जणू ते केकाटत होतं! काहीतरी अघटित घडणार असं वाटून मी मशीन बंद करणार तोच त्या बॉक्समधून विजेची एक शलाका अंगावर आली.
‘सँडविच तयार..’
मला वेगवेगळ्या रंगांचे मोठे मोठे होणारे गोल दिसू लागले, मग शॉक लागल्यासारखी एक लहर सर्वागातून सरसरत गेली.. माझी शुद्ध हरपली..
जाग आल्यावर जाणवलं की, मी आक्रसलोय, माझे हात-पाय, मान, डोकं, गायब झालंय.. मग कळलं की, मी चौकोनी पेटी- एक मायक्रोवेव्ह झालोय.
0 0 0
खरंच, मी मायक्रोवेव्ह झालो होतो. माझ्या पोटात एक काचेची फिरणारी तबकडी होती. बाह्य़ांगावर एक स्क्रीन होता, त्यावर पिवळ्या रंगात सूचना, वेळ दिसायची. आज्ञा ऐकू येण्यासाठी एक मायक्रोफोन आणि बोलण्यासाठी स्पीकर होता. मला जोडूनच असलेल्या एका पेटीत ब्रेड, चीझ, भाज्या असा कच्चा माल भरून ठेवलेला होता.
मी घाबरलो होतो.  
‘पूर्ववत होण्यासाठी मशीन तर चालू केलं पाहिजे, पण कसं? कारण आता आपल्याला हातच नाहीयेत? पण आपण विचार करू शकतोय म्हणजे आपला मेंदू शाबूत आहे, हे एक बरंय!’ थोडा अधिक शांतपणे विचार केल्यावर लक्षात आलं, ‘मायक्रोवेव्हचं प्रोग्रॅिमग नीट लक्षात घेतल्यास त्यात फेरफार करून काहीतरी करता येईल.’
0 0 0
घराचा दरवाजा उघडला गेला. माझ्या घरी काम करणारी मोलकरीण-बिबाबाई आली होती. कामात व्यत्यय नको, म्हणून मीच तिच्याकडे घराची एक किल्ली दिली होती. ती यायची आणि काम करून जायची.
बिबाबाईचं लक्ष वेधून घेण्यासाठी मी म्हणालो, ‘मिसेस् बिबाबाई, तुमचं सँडविच तयार आहे!’ प्रोग्रॅिमगवर अजून मला ताबा मिळवता आला नसला, तरी आत्ता लक्ष वेधण्यासाठी हे पुरेसं होतं.
बिबाबाईने इकडे-तिकडे पाहिलं, मग दुर्लक्ष करून ती आत गेली. मी आपला तसाच चरफडत राहिलो.
दहा-पंधरा मिनिटांनी ती साफसफाई करण्यासाठी माझ्याजवळ आली. मी पुन्हा यांत्रिकपणे भडाभडा बोललो, ‘बिबाबाई.. मला मुक्त करा, त्या बॉक्सवरचं बटण दाबा..’ हेच वाक्य दोनदा पुन:पुन्हा म्हणालो. तशी बिबाबाई माझ्याकडे पाहू लागली. ती गांगरली, भांबवली होती. तिने माझी वायर हलवली. तिने माझ्याकडे, मग मशीनकडे, कबूतराकडे आणि पिल्लाकडे पाहिलं. तिला काय वाटलं कुणास ठाऊक; तिने झटकन मशीनचं बटण दाबलं. पुन्हा तसाच सुईसुई, पीपीपॉपॉ आवाज येऊ झाला, आणि एक विजेचा शलाका उठली!
0 0 0
बिबाबाई गायब झाली होती.
मशीनजवळ एक कबूतर होतं. ते गुटर्गू करत भांबावल्यागत खिडकीतून निघून गेलं.
मला अतीव दु:ख झालं होतं. माझ्या प्रयोगांमुळे इतर कोणाला त्रास व्हायला नको म्हणून मी मुद्दामहून सगळ्यांपासून दूर, एकटय़ाने माझं संशोधन करायचो. म्हणून मी लग्नही केलं नव्हतं! पण आज मात्र माझ्यामुळे एका माणसाच्या आयुष्याची वाट लागली होती.
बिबाबाईचा नवरा मेला होता आणि तिच्या दोन लहान मुलांची सगळी जबाबदारी तिच्यावर होती. आता त्या मुलांचं काय होईल, ते आईला कुठे शोधतील..?
मग मी निश्चय केला, ‘काही झालं तरी यातून बाहेर पडायचं आणि बिबाबाईला शोधून काढायचंच.’ पण प्रश्न होता, ‘कसं?’ कारण, आता घरी येणाऱ्यांपकी कोणीही नव्हतं. बिबाबाई हीच काय तो बाहेरच्या जग आणि मी यातला एक दुवा होता.
मला एक आयडिया सुचली. मुद्दामहून ब्रेड जाळण्याची. जेणेकरून माझ्यातून धूर येऊन तो खिडकीतून बाहेर जाईल आणि त्यामुळे शेजारा-पाजाऱ्यांचं लक्ष जाईल.
मी तसं केलं. काही मिनिटांतच माझ्या डोक्यावरच्या आउटलेटमधून गरम हवा बाहेर पडू लागली.. १५-२० मिनिटांनी करडा धूर बाहेर पडू लागला.. अध्र्या तासाने धूर काळा झाला, पण कोणीही येईना किंवा काही गडबड ऐकू येईना. पण तासाभराने खिडकीतून येणारा धूर पाहून सोसायटीचा वॉचमन वर आला. त्याने लागलीच अग्निशामक दलाला कळवलं आणि घर फोडून आलेल्या माणसाने सर्वप्रथम माझा स्विच बंद करून माझी बोलतीच बंद केली!
त्यानंतर पोलिसांत मी आणि बिबाबाई हरवल्याची तक्रार केली गेली. माझ्या घरीच तिची पिशवी सापडल्याने आमच्याबद्दल अनेक अफवा उठल्या, बातम्याही छापून आल्या.. आणि थोडय़ाच दिवसांत आम्ही विस्मरणातही गेलो!
माझ्या घरातून पोलिसांनी चौकशीसाठी ते मशीन आणि इतर गोष्टी जप्त केल्या. ते मशीन आता कुठेतरी भंगारात असेल किंवा नष्टही झालं असेल किंवा कोणाला तरी ‘गायब’ करत असेल..
0 0 0
पोलीस स्टेशनात मी नुसताच पडून होतो, पण एकदा एका हवालदाराने साहेबांना मस्का मारला आणि मला साफसूफ करून घरी नेलं. मायक्रोवेव्ह आणल्याचं पाहून त्याची बायको जाम खूश झाली. कारण त्यांच्या बििल्डगमध्ये आता फक्त तिच्याकडे मायक्रोवेव्ह होता. त्यामुळे बढाई मारता येणार होती. पण थोडय़ाच दिवसांत मी तिला नकोसा झालो. कारण मी मुद्दामहून पदार्थ जाळायचो. मग ती नवऱ्याकडे कटकट करायची, ‘काय पण मेलं मशीन; तुमच्यासारखंच आहे-तापट!’
एकेदिवशी वैतागून हवालदाराने मला भंगारात काढलं. पण किरकोळ बिघाड वगळता बाकी कामाचा आहे असं भंगारवाल्याला लक्षात आल्याने त्याने मला विकून टाकलं.
मला विकत घेणारा होता, या रेस्तराँचा मालक. त्याने तेव्हा नवीनच रेस्तराँ सुरू केलेलं, त्यामुळे स्वस्तात विकत घेऊन टाकलं मला. तेव्हापासून मी असा-इथे आहे.
‘हीट’लर, एक चीझ ग्रिल सँडविच!’
मी खूप तापतो, वाट्टेल ते बडबडतो म्हणून मला सगळे आचारी ‘हीट’लर म्हणतात आणि मी जास्त तापायच्या आधीच माझा स्विच बंद करून टाकतात!
आता मला या सगळ्याची सवय झालीय. पण इथे-माझ्या बाजूला असलेल्या खिडकीवर कबूतर करुण आवाजात घुमू लागलं ना की, वाटतं, ती बिबाबाई तर नसेल?