राणी अब्बक्कदेवी’ ही सुरेखा शहा लिखित ऐतिहासिक कादंबरी आवर्जून वाचावी अशी आहे. एक अत्यंत अपरिचित (विशेषत: महाराष्ट्रीयांस) असे व्यक्तिमत्त्व प्रथमच यानिमित्ताने वाचकांसमोर येत आहे. ‘पराक्रम, स्वाभिमान, क्षात्रतेजाची मूर्ती, कर्नाटकभूषिणी, जनहितकारिणी, दर्यासारंगिणी, अन्यायी शत्रूविध्वंसिनी, रणरागिणी, तेजस्विनी, तुबुनाड प्रदेशातील राणी अब्बक्कदेवी- जिने पन्नास वर्षे जुलमी पोर्तुगीजांशी अखंड, अविरत झुंज दिली, तिची ही अमर कहाणी!’ अशा शब्दांत लेखिकेने राणीचे चित्र उभे केले आहे.या कादंबरीचे थोडक्यात सार असे.. १५४४ मध्ये जन्मलेल्या राणी अब्बक्कदेवीचा १७ व्या वर्षी राज्याभिषेक झाला. १५८२ पर्यंत राणीचा उत्कर्षांचा काळ आणि १६२३ मध्ये पोर्तुगीजांशी लढताना राणीला वीरमरण आले. ही राणी चौट राजघराण्यातील. हे घराणे तुबुनाडच्या राजकीय क्षेत्रातील प्रमुख राजकीय शक्ती. त्यांच्या अखत्यारीत उळ्ळाल, मिआर, अकुळ, मागणी, पुत्तिगे, मेल, मुंडकुरसी, मुडबिद्री या प्रदेशांचा समावेश होता. हे राजघराणे विजयनगरचे मांडलिक होते. मुडबिद्री येथील प्रमुख जैन मंदिर त्रिभुवन तिलक चुडामणी (हजार खांबी मंदिर) हे चौट राजघराण्याने उभारले. राणी अब्बक्कदेवीने स्वत:चे स्वतंत्र आरमार निर्माण केले आणि पोर्तुगीजांचा अनेकदा पराभव केला. तिचा पती बंगराज याने पोर्तुगीजांना खंडणी देऊन त्यांचे मांडलिकत्व पत्करले तेव्हा राणीने पतीबरोबरचे वैवाहिक संबंध वयाच्या पंचविशीत तोडले. अशा पराक्रमी राणीनंतर तिचा नातू गादीवर आला. त्याचे राज्य टिपू सुलतानाने समाप्त केले.हा सगळा घटनाक्रम या कादंबरीत १४६ पृष्ठांमध्ये आला आहे. ही कादंबरी ऐतिहासिक कागदपत्रे, शोधनिबंध, लेख आणि मुलाखती प्रत्यक्ष क्षेत्रभेट देऊन लिहिलेली आहे. या लेखनाकरता वापरलेल्या संदर्भग्रंथांची यादी पाहिली की लेखिकेने घेतलेले कष्ट जाणवतात.कादंबरी वाचत असताना तीव्रतेने जाणवते, की कादंबरी आणि ऐतिहासिक चरित्रलेखन यांच्या सीमारेषेवर हे लेखन रेंगाळलेले आहे. त्यामुळे काही गंभीर प्रश्न या कादंबरीत निर्माण झालेले आहेत. उदा. राणीचा मृत्यू १६२३ मध्ये झाला. (पृ. ८) आणि नंतर तिचा नातू- म्हणजे मुलीचा मुलगा राज्यावर आला. परंतु म्हैसूरचा राजा टिपू सुलतान याने त्याचे राज्य नष्ट केले. (पृ. १७). या मजकुराच्या खोल तपशिलात गेल्यास असे लक्षात येते की, राणीच्या मृत्यूनंतर टिपू सुलतानाचा झालेला उदय यात १४८ वर्षे एवढे अंतर आहे. एवढा प्रदीर्घ काळ एकच नातू राज्य करणे अशक्य आहे.ऐतिहासिक कादंबरी असूनही कादंबरीतला मजकूर वर्तमानकाळाकडे झुकला आहे. एके ठिकाणी राजघराण्याचे नाव चौट, तर दुसरीकडे चौटा असे आले आहे. लेखिकेने परिशिष्ट १ मध्ये लिंगण्ण कवी केळदि नृप विजय असा संदर्भ दिला आहे. मराठय़ांचा इतिहास खंड- पहिला (पृ. ४८८) मध्ये ‘मराठय़ांच्या इतिहासाची साधने : शिवकाल’ या लेखात प्र. न. देशपांडे यांनी या ग्रंथाचा उल्लेख ‘केळदिनृपविजयम्’ असा केला आहे. पृ. १४३ वर पोर्तुगीज कागदपत्रांच्या संपादनासाठी ‘पिस्लुरेवनर’ असे नाव दिले आहे. ते ‘पिसुर्लेकर’ असावे. मुखपृष्ठावर छापलेले छायाचित्र आणि पुस्तकाच्या मध्यात असणारी राणीची कल्पनाचित्रे यांचा मेळ बसत नाही.या काही त्रुटी वगळल्यास एका अत्यंत दुर्लक्षित विषयावर सुरेखा शहा यांनी लिहिले आहे, त्याचे स्वागत करायला हवे. इतिहास संशोधकांना, नाटककारांना, कवींना प्रेरणा देऊ शकेल अशी ही चरित्रवजा ऐतिहासिक कादंबरी आहे. लेखिका, प्रकाशक यांचे या विषयातील पहिलेपण आणि प्रामाणिक कष्ट मोकळ्या मनाने मान्य करावयास हरकत नाही.

‘राणी अब्बक्कदेवी’-  सुरेखा शहा, मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊस,

पृष्ठे- १४६, किंमत- १८० रु. ल्ल