रवींद्र पाथरे

नागपूर येथे होणाऱ्या ९९ व्या अ. भा. मराठी नाटय़संमेलनाचे नियोजित अध्यक्ष प्रेमानंद गज्वी यांच्याशी केलेली बातचीत..

गेली सुमारे पन्नास वर्ष नाटककार प्रेमानंद गज्वी यांचं नाव साहित्य-नाटय़क्षेत्रात चर्चेत राहिलं आहे. ‘देवनवरी’, ‘घोटभर पाणी’, ‘तन-माजोरी’, ‘जय जय रघुवीर समर्थ’, ‘किरवंत’, ‘गांधी-आंबेडकर’, ‘व्याकरण’ (आधीचं ‘डॅम इट अनू गोरे’), ‘छावणी’ यांसारखी सामाजिक-राजकीय प्रश्न मांडणारी आणि त्याद्वारे आपलं असं काहीएक मतप्रदर्शन करणारी नाटकं आणि एकांकिका गज्वींनी लिहिल्या आणि वेळोवेळी वाद आणि वादंगही निर्माण केले. त्यांच्या नाटकांवर, त्यामागच्या उद्देशांवर हेत्वारोपही केले गेले. गज्वींनी ठामपणे हे हेत्वारोप खोडून काढले. त्यांच्या अलीकडच्या ‘छावणी’ या नाटकावर तर घटनाविरोधी, देशद्रोही म्हणून ठपका ठेवून ते सेन्सॉरने प्रदीर्घ काळ रखडवून ठेवलं होतं. मात्र, त्यासंबंधात गज्वींनी प्रसारमाध्यमांतून वाचा फोडताच सेन्सॉर बोर्डाच्या अध्यक्षांनी आपल्या विशेषाधिकारात त्याला ‘क्लीन चिट’ देऊन टाकली. तीही वृत्तवाहिनीवर ‘छावणी’च्या गळचेपीसंदर्भात जाहीर चर्चा सुरू असताना! एका क्षणात गज्वी ‘देशद्रोही’चे ‘देशप्रेमी’ ठरले! कुठलीही शहानिशा न करता! सेन्सॉर बोर्डाच्या आक्षेपांचे खंडनमंडन न करताच!

आज तेच प्रेमानंद गज्वी नागपूर येथे होणाऱ्या ९९ व्या अ. भा. मराठी नाटय़संमेलनाचे अध्यक्ष म्हणून विराजमान होत आहेत. एका संघर्षपूर्ण प्रवासाची एका अर्थी यशस्वी सांगता होत आहे. हे भाग्य आंतरराष्ट्रीय ख्यातीप्राप्त नाटककार विजय तेंडुलकर यांनाही लाभले नाही. या- निमित्तानं गज्वी एक नाटककार, समाजचिंतक म्हणून आपल्या घडणीकडे, लेखनाकडे आणि एकूणच समाजवास्तवाकडे कशा तऱ्हेने, कोणत्या दृष्टीने पाहतात, हे जाणून घेण्याचा हा प्रयत्न..

तुमच्यातल्या लेखकाला खतपाणी मिळेल असं कोणतं वातावरण तुम्हाला घडणीच्या वयात मिळालं? भोवतालच्या सामाजिक वास्तवाची जाणीव होण्याचा पहिला क्षण कोणता होता?

– माझा जन्म पिंपळगावचा (जि. चंद्रपूर). बालपण नागपूर जिल्ह्यातील कारगावात गेलं. खाऊनपिऊन सुखी घरात वाढल्याने गरिबीचे चटके वगैरे काही बसले नाहीत. गावात स्पृश्यास्पृश्यतेचं वातावरण नव्हतं. साहजिकपणे त्याचा काच काय असतो याची जाणीव होण्याचा प्रश्नच नव्हता. पुढे नागपूरला मॉरिस कॉलेजमध्ये शिकत असतानाही ‘तसा’ काही अनुभव मला आला नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं धर्मातर आमच्यापर्यंत पोचलं ते गावागावांतून झालेल्या दीक्षा-सोहळ्यांतून. आपल्या सग्यासोयऱ्यानं बौद्ध धर्म स्वीकारला म्हणून बहुतेकांनी त्यांचं अनुकरण केलं, इतकंच. जुन्या उपास्य देवतांच्या झालेल्या गच्छंतीव्यतिरिक्त आमच्या गावगाडय़ात, जगण्यात काही फरक पडला नव्हता. गावातलं सौहार्दाचं वातावरणही त्यामुळे गढुळलं, असंही काही झालं नाही.

आमच्या घरात लोककलेचा वारसा होता. दंडार, खडी गंमत हे प्रकार वाडवडिलांपासून चालत आलेले. दिवाळी आणि उन्हाळ्याच्या दिवसांत गावात ते सादर होत. घरातच हे संस्कार झाल्यामुळे मी गाण्याकडे ओढला गेलो. नागपूर आणि आजूबाजूचा प्रांत हा तेव्हा मध्य प्रदेशचा हिस्सा असल्याने हिंदीचा प्रभाव स्वाभाविकच. त्यातून कव्वालीच्या कार्यक्रमांना जाणं, ते ऐकणं नकळत होत गेलं. तेही संस्कार आपसूक मिळत गेले. शाळेतल्या ‘गड आला, पण सिंह गेला’, ‘उमाजी नाईक’ यांसारख्या नाटकांतून कामं करण्याची संधी मिळाली आणि त्यातून नाटकाचे संस्कारही होत गेले. हे सगळं सहज घडत गेलं. पण या नकळत रुजलेल्या बीजांना खतपाणी मिळालं ते मी नोकरीसाठी मुंबईत आल्यावर. गोविंद म्हशीलकर तेव्हा कव्वालीचे कार्यक्रम करीत. मी तेव्हा सडाफटिंग असल्याने वेळ मिळेल तेव्हा त्यांच्यासोबत कव्वालीच्या कार्यक्रमांना जात असे.

एकदा म्हशीलकर काही कारणांनी कार्यक्रमाच्या ठिकाणी वेळेवर पोहोचू शकले नाहीत. तेव्हा त्यांच्या सोबत्यांनी मला एखाद् दुसरं गाणं सादर करायचा आग्रह केला. मी दोन कव्वाली सादर करेतोवर म्हशीलकर तिथे पोहोचले. मी स्टेजवरून खाली उतरायला निघालो असता म्हशीलकरांनी मला तिथंच थांबायला सांगितलं. त्यांना माझ्या कव्वाली आवडल्या असाव्यात. तेव्हापासून मीही कव्वाल म्हणून त्यांच्यासोबत कार्यक्रमाला जाऊ लागलो. अर्थात् हा दौर काही फार काळ टिकला नाही.

पुढे मी रामकृष्ण गाडगीळ यांच्या सान्निध्यात आलो. त्यांचा ‘नाटय़सहकार’ नावाचा ग्रुप होता. राज्य नाटय़स्पर्धेत ते नाटकं सादर करीत. या ग्रुपमध्ये सामील झाल्यावर माझं नाटय़लेखन सुरू झालं. बाबा आढावांच्या ‘एक गाव, एक पाणवठा’सारख्या चळवळीचं अपयश त्यादरम्यान मला प्रकर्षांनं जाणवलं होतं. त्यातूनच माझी ‘घोटभर पाणी’ ही एकांकिका जन्माला आली. जिचं अनपेक्षितपणे भरभरून स्वागत झालं. तिचे हजारावर प्रयोग झाले. ‘घोटभर पाणी’ पुस्तकाच्या प्रकाशनाला विजय तेंडुलकर आले होते. राजा ढाले होते. इथून माझा नाटककार म्हणून प्रवास सुरू झाला.

‘देवनवरी’चं कथाबीज मला एका बातमीत सापडलं. देवदासीवर झालेल्या बलात्काराची बातमी माझ्या वाचनात आली आणि माझं विचारचक्र सुरू झालं. प्रत्यक्ष देवीच्या साक्षीनेच तिच्या सेवेकरी तरुणीवर बलात्कार होतो. मग देव आहे कुठं? असा प्रश्न मला पडला. त्यातून ‘देवनवरी’ आकारास आली. या नाटकाचा पूर्वार्ध कवितेच्या फॉर्ममध्ये आहे. कारण यादरम्यान माझं कथा-कवितालेखनही समांतरपणे सुरू होतं. या काळात मी काही गूढकथाही लिहिल्या. परंतु पुढे कथा-कविता लेखनाऐवजी माझं नाटक- एकांकिका या फॉर्मवरच लक्ष केंद्रित झालं.

मला एखादी समस्या, प्रश्न अचानक समोर येतो आणि मग त्यावर विचार करता करता हळूहळू ‘नाटक’ डोक्यात आकाराला येत जातं. त्यासाठी लागणारे संदर्भ शोधणं, संबंधितांना भेटणं, त्यांच्याकडून तपशील जाणून घेणं वगैरे गोष्टी अभ्यासाचा भाग म्हणून मी करत जातो. मी काही संशोधक नाही. परंतु माझ्या मांडणीसाठी आवश्यक ते मूलद्रव्य मात्र मी कष्टपूर्वक गोळा करतो. त्यात मग हयगय करीत नाही.

तुम्ही आपल्या काही एकांकिकांची पुढे जाऊन नाटकं केलीत. ही प्रोसेस नेमकी कशी होती?

– मी सगळ्याच एकांकिकांची नाटकं केलेली नाहीत. ज्या एकांकिकांमध्ये मला नाटकाचं ‘पोटेन्शियल’ दिसलं, जाणवलं, त्याच एकांकिकांचं मी नाटकात रूपांतर केलं. ही खूप अवघड प्रक्रिया आहे. प्रत्येक वेळी त्यात तुम्हाला यश येईलच असं नाही. माझं ‘वांझ माती’ असंच फसलं. आजकाल जी मंडळी एकांकिकांची नाटकं करतात, तो खरं तर एकांकिकांचा विस्तार असतो.. इम्प्रोव्हायझेशन तंत्रानं केलेला! त्यांना ‘नाटकं’ म्हणता येणार नाही. त्यात नव्यानं काही गवसत नाही. बहुश: मनोरंजनपर एकांकिकाविस्तारच आपल्याला त्यांतून पाहायला मिळतात.

नाटकाचं तंत्र हाती आल्यावर एखादं रंजनपर नाटक लिहावं असं तुम्हाला कधी वाटलं नाही का?

– नाही. तो माझा पिंड नाही. मला विनोदी वा रंजक नाटक लिहिताच येणार नाही. याचं कारण माझी ‘थॉट प्रोसेस’! मी एखाद्या विषयाकडे गंभीरपणेच पाहतो. आणि त्याच प्रकारे तो मी नाटकांतून मांडू शकतो. शफाअत खान मात्र त्याच विषयाकडे तिरकस दृष्टीने पाहील आणि त्यावर ब्लॅक कॉमेडी लिहील. पण तो त्याचा पिंड झाला. त्याच्या साध्या बोलण्यातही जो तिरकसपणा जाणवतो, ती त्याच्या ‘थॉट प्रोसस’ची निष्पत्ती आहे. त्याची ती उपजत प्रवृत्ती आहे. साहजिकपणेच त्याच्या नाटकांतून ती उतरते. दुसरं म्हणजे कौटुंबिक जिव्हाळ्याची, नातेसंबंधांतील तिढय़ाची नाटकं लिहिण्यात मला कधीच रस नव्हता. आपले सगळेच लेखक त्या प्रकारची नाटकं लिहीत आले आहेत. आपल्या मध्यमवर्गीय प्रेक्षकाला त्याच्या सीमित जाणिवेत ती पाहायलाही आवडतात. पण मला प्रेक्षकांना विचारप्रवृत्त करायला लावणारी नाटकं लिहिणंच पसंत आहे. एखादी गोष्ट स्वत: शोधून काढण्याची उत्तेजना जोवर मला येत नाही तोवर मला चैन पडत नाही. एकदा माझा एक मित्र ‘समर्थ रामदास हे ‘कम्युनिस्ट’ आहेत’ असं म्हणाला. त्याबरोबर माझे कान टवकारले. ही काय बुवा भानगड आहे? त्यानं माझी उत्सुकता जागवली. मग मी समर्थ रामदासांचं लेखन वाचून काढलं. सज्जनगडावर गेलो. अनेकांशी या विषयावर बोललो. त्यांचं म्हणणं जाणून घेतलं. त्यातून जन्माला आलं – ‘जय जय रघुवीर समर्थ’! यात आपण नवं काही तरी शोधून काढल्याचं थ्रिल मला खूप आनंद देतं.

तुमच्या ‘गांधी-आंबेडकर’वर उलटसुलट खूप चर्चा झाली. तुम्ही पक्षपाती असल्याचा आरोपही झाला. आता पुलाखालून बरंच पाणी वाहून गेल्यावर तुम्हाला काय वाटतं त्या नाटकाबद्दल?

– मी ‘गांधी-आंबेडकर’ लिहिलं त्यात माझ्या मनाचं काहीच नाहीए. सगळ्या ‘फॅक्टस्’ मी संशोधनातून, अभ्यासातून पडताळून मगच मी ते नाटक लिहिलंय. गांधी आणि आंबेडकरांबद्दल मला मुळीच आपपरभाव नाही. आमच्या गावात गांधींबद्दल आदर होता, परंतु शहरात आल्यावर मला गांधींविरोधी मतं ऐकायला मिळाली. हे असं का, असा मला प्रश्न पडला. गांधी आणि आंबेडकर दोघांनाही अस्पृश्यतेचा प्रश्न सुटला पाहिजे असं वाटत होतं. मग ही दोन महान व्यक्तिमत्त्वं एकत्र का आली नाहीत, असा प्रश्न मला पडला. मी पूर्वी ‘धर्मयुग’ वाचत असे. स्वातंत्र्याच्या चाळिशीनिमित्ताने १९८७ साली ‘धर्मयुग’ने देशाची फाळणी कशी झाली, याबद्दलचा खास अंक काढला होता. त्यातून मला बऱ्याच गोष्टी कळल्या. याच काळात चंद्रप्रकाश जिज्ञासू नावाच्या लेखकानं डॉ. आंबेडकरांची अनुवादित केलेली भाषणं माझ्या वाचनात आली. धनंजय कीर यांनी लिहिलेलं ‘आंबेडकर चरित्र’ही मी वाचलं होतं. आणि मुख्य म्हणजे य. दि. फडके यांनी ‘आम्हास आम्ही पुन्हा पहावे’ हा लेख डॉ. आंबेडकरांच्या भाषणावर आधारित लिहिला होता. या सगळ्या संदर्भग्रंथांतून गांधी आणि आंबेडकरांचं मला जे आकलन झालं त्यावर आधारून मी ‘गांधी-आंबेडकर’ हे नाटक लिहिलं. मी ना गांधींच्या बाजूने होतो, ना डॉ. आंबेडकरांच्या! मी प्रश्नाच्या बाजूने होतो. परंतु तरीही या नाटकाच्या विरोधात अनेक जण चिडून उठले. माझे मित्र आणि सुहृद म्हणवणारेही या नाटकामुळे काही काळ माझ्यापासून दुरावले. सेन्सॉर बोर्डाने नाटकात ६० कट्स सुचवले होते. मी ते साफ नाकारले. मी त्यांच्यासमोर संदर्भग्रंथच ठेवले आणि यापलीकडे मी काही गैर केलं असेल तर सांगा, असं सेन्सॉरला आव्हान दिलं. नाटकातलं प्रत्येक वाक्य, संवाद यांना लिखित संदर्भाची जोड मी तयारच ठेवली होती. कारण असं काही तरी होणार हे मला माहीतच होतं. साहजिकच विरोधकांची तोंडं गप्प झाली. मी स्वत:शी प्रामाणिक राहून लिहितो. कुणाला त्यामुळे काय वाटेल म्हणून नाही.

तुमच्या ‘व्याकरण’ (आधीचं नाव : ‘डॅम इट अनू गोरे!) या नाटकावरही अशीच टीकेची झोड उठली. मेधा पाटकरांच्या आंदोलनाची खिल्ली त्यात उडवली गेलीय, असा आक्षेप काहींनी घेतला. खरं काय..?

–  माझं हे नाटक खरं तर कोयना धरण विस्थापितांचे प्रश्न मांडण्यासाठी मी लिहिलं होतं. परंतु त्या वेळी नर्मदा धरणासंबंधी जोरदार उलटसुलट चर्चा होत होत्या, म्हणून मी नर्मदा धरणाचा संदर्भ घेतला. मी स्वत: गोसीखुर्द धरणाचे बळी जवळून पाहिलेत. त्यांची ससेहोलपट आजही सुरू आहे. यानिमित्तानं धरण बांधणारे, त्यासाठी वित्तसाहाय्य करणाऱ्या आंतरराष्ट्रीय संस्था, त्यातलं राजकारण, आंदोलकांची भूमिका, पाण्याचं आणि त्यातून मिळणाऱ्या लाभांचं राजकारण, धरण बांधकामातील भ्रष्टाचार असा सगळा व्यापक पट मला मांडायचा होता. परंतु त्याकडे मेधा पाटकरांच्या आंदोलनाविरोधातील नाटक या दृष्टिकोनातून पाहिलं गेलं. ते साफ चुकीचं होतं. यामुळे माझी अनेक मित्रमंडळी दुखावली. पण मला जे म्हणायचं होतं ते कुणीच नीटपणे समजून घेतलं नाही.

दलित नाटय़-चळवळीचा एक जोमदार प्रवाह ऐंशीच्या दशकात निर्माण होऊन १०-१२ वर्षांतच तो लुप्त झाला. असं का झालं?

– कोणतीही चळवळ म्हटली की तिला एक उद्देश असतो. हेतू असतो. तो संपला की ती चळवळ संपते. दलित रंगभूमीच्या बाबतीतही तेच घडलं. त्या काळात लिहिणाऱ्या नाटककारांनी आपलं, आपल्या वाडवडलांचं, समाजाचं जगणं, त्यांच्यावरील अन्याय-अत्याचार याबद्दल विद्रोही भूमिकेतून पोटतिडकीनं लिहिलं. परंतु ते संचित संपल्यावर त्यांना बदलत्या काळाचे, बदलत्या भवतालाचे प्रश्न आणि समस्या नीटशा समजून घेता आल्या नाहीत म्हणा किंवा त्यांचं आकलन झालं नाही म्हणा; ते लिहायचे थांबले. आणि ही चळवळ संपली. खरं तर याच काळात जागतिकीकरणाचं घोंघावणारं वादळ आपल्या देशात आलं. त्याने सगळंच उलटंपालटं केलं. शहरीकरणाचा वेग झपाटय़ानं वाढला. गावगाडय़ाची समीकरणं संदर्भहीन झाली. स्थलांतराने नवे प्रश्न निर्माण झाले. नवा शोषित वर्ग निर्माण झाला. गरीब-श्रीमंतांतील दरी अधिकच रुंदावत गेली. ‘आहे रे’ आणि ‘नाही रे’ वर्गातील संघर्षांनं, जात वास्तवानं अधिकच तीव्र रूप धारण केलं. गाव-खेडय़ांचं रूप बदललं. दूर संपर्कक्रांतीनं समस्यांची धग वेगानं सर्वत्र पसरू लागली. हे झपाटय़ाने झालेले, होत असलेले बदल, त्यातील ताणेबाणे पकडण्यात नाटककार तोकडे पडले. स्वाभाविकपणेच त्यांचं लेखनही थंडावलं.

हे फक्त दलित रंगभूमीच्याच बाबतीत घडलं असं नाही, तर सर्वच बाबतींत झालं. कामगार चळवळ लयास गेली. दलित पॅन्थरचा अंगार त्याआधीच विझला होता. सामाजिक-सांस्कृतिक चळवळींच्या बाबतींतही हेच झालं. सत्तरच्या दशकांत या सगळ्या चळवळी ऐन भरात होत्या. आज त्यांचं काय झालंय? कुठे आहेत त्या? खासगीकरण, उदारीकरण आणि जागतिकीकरणानं सगळंच गिळंकृत केलंय.

अमोल पालेकरांनी अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा मुद्दा उपस्थित करून नाटकाचं सेन्सॉर बोर्ड रद्द करावं यासाठी न्यायालयाचे दरवाजे ठोठावले आहेत. तुम्हीही काही काळ सेन्सॉर बोर्डाचे सदस्य होता. नाटय़संहिता सेन्सॉर व्हाव्यात की होऊ नयेत? तुमचं मत काय आहे?

–  मी सेन्सॉर बोर्डावर असताना कुणाचीच संहिता मी अडवली नाही. मात्र ताकाला जाऊन भांडं लपवण्याची चापलुसी कुणी करत असेल तर ते त्याच्या निदर्शनासही आणून दिलं. यात लेखकानं आपला हेतू प्रामाणिकपणे नाटकातून मांडावा, एवढीच त्यामागची भूमिका असे. आज अमोल पालेकर सेन्सॉर बोर्ड रद्द करण्यासंदर्भात लढा देत आहेत. त्याला माझा पाठिंबाच आहे. लेखकाचं अभिव्यक्तिस्वातंत्र्य अबाधितच राहायला हवं. आज जे भयाचं, दहशतीचं वातावरण निर्माण केलं जात आहे, त्या पार्श्वभूमीवर तर सगळ्या कलावंतांनी एकदिलानं अभिव्यक्तिस्वातंत्र्याच्या बाजूने उभं राहायला हवं. जे लेखिका नयनतारा सहगल यांना मुंबईत सन्मानानं बोलावून संवेदनशील लेखक समुदायानं अलीकडेच केलं. ते एक चांगलं गेश्चर होतं.

आज सेन्सॉर बोर्डापेक्षाही बाहेरची, गल्लीबोळातली सेन्सॉरशिप जास्त धोकादायक बनली आहे. ती तात्त्विक, वैचारिक पातळीवर असती तर काही हरकत नव्हती; परंतु विरोधी मत, विरोधी आवाज ऐकून घ्यायचाच नाही. तो नुसता दडपून टाकायचा नाही, तर सरळ संपवायचाच, ही आजची भीषण परिस्थिती आहे. पूर्वीही हे होत होतं, नाही असं नाही. पण आज विरोधी विचार, वेगळं मत व्यक्त करणाऱ्यांना ठार करण्यापर्यंत मजल गेली आहे. कुणालाही शहरी दहशतवादी ठरवून शासन त्याला गजाआड करू शकतं. अशा वातावरणात लेखक आणि कलावंत

मंडळींवर अधिकच जबाबदारी येते.. त्यांनी  गरज आहे अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा लढा प्राणपणाने लढण्याची! लोकशाही अबाधित राखण्याची!

ravindra.pathare@expressindia.com