‘अभिजात पाश्चात्त्य संगीतज्ञान’ या मनोहर पारनेरकर यांच्या लेखात त्यांनी काही निवडक व प्रसिद्ध पाश्चात्य संगीतरचनांची शिफारस केली आहे. त्यातील मोझार्टची सिम्फनी क्र. ४० चा उल्लेख आहे. या सिम्फनीचा उपयोग संगीतकार सलील चौधरी यांनी केला आणि ‘इतना ना मुझसे तू प्यार बढा’ या सुमधुर गीताची रचना केली. याच सिम्फनीच्या संदर्भात अजून एक हृद्य आठवण आहे. संगीतकार ‘पंचम’ अर्थात आर. डी. बर्मननासुद्धा या सिम्फनीवर आधारित काही काम करायचे होते. मात्र, त्यांना जेव्हा आधीच आलेल्या सलीलदांच्या वरील उल्लेख केलेल्या गाण्याची  माहिती मिळाली तेव्हा मात्र ते थोडेसे खट्टू झाले. तरीसुद्धा त्यांचे सहकारी गिटारिस्ट भानू गुप्ता यांनी आरडींना याच सिम्फनीवर आधारित छोटेसे तुकडे गिटारवर ऐकवले आणि काही क्षणातच पंचमदांनी ‘ऐसे ना मुझे तुम देखो, सीने से लगा लूंगा’ हे ‘डार्लिग डार्लिग’ चित्रपटातील देव आनंदवर चित्रित आणि किशोरकुमारने गायलेले गाणे तयार केले. छंद किंवा मूळ पाश्चात्त्य सुरावट तीच आहे, पण त्यावर आधारित दोन वेगळ्या संगीतरचना. आपल्याकडे एकच छंद धरून त्यावर बेतलेल्या अनेक रचनांची खूप उदाहरणे आहेत.
– हर्षवर्धन दातार, ठाणे 

निंबाळ आश्रम कर्नाटकात 

‘भारताचे तत्त्ववेत्ते राष्ट्रपती’ या मनोहर पारनेरकर यांनी लिहिलेल्या लेखात निंबाळ हे महाराष्ट्रात असल्याचा उल्लेख होता. कर्नाटकातील निंबाळ येथील गुरुदेव रानडे आश्रम अध्यात्म आणि तत्त्वज्ञानाच्या साधकांसाठी एक तीर्थक्षेत्र आहे. विजापूर महामार्गावरील होर्ती येथून डावीकडे सुमारे दहा कि. मीटर अंतरावर हा आश्रम आहे. रेल्वेनेही निंबाळला जाता येते. केवळ महाराष्ट्र आणि कर्नाटकातच नव्हे, तर देशात आणि परदेशातही निंबाळ आश्रमाचे साधक आहेत. माजी राष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन हे गुरुदेव रामकृष्ण दत्तात्रय रानडे यांचे एक चाहते होते. येथे वर्षभर साधना सुरू असते. गुरुदेव रानडे (३ जुलै १८८६ – ६ जून १९५७) सांगली इथे विलिंग्डन महाविद्यालयात प्राध्यापक होते. त्यानंतर ते अलाहाबाद विद्यापीठात तत्त्वज्ञान विभागाचे प्रमुख झाले. त्या विद्यापीठात त्यांनी १९२७ ते १९४५ पर्यंत तत्त्वज्ञान हा विषय शिकवला. रानडे १९४५ ते १९४७ पर्यंत या विद्यापीठाचे कुलगुरू होते. निवृत्तीनंतर ते निंबाळ इथे स्थायिक झाले.
– दिलीप चावरे, अंधेरी