‘लोकरंग’मधील (१४ एप्रिल) ‘जनतेस पत्र..’ हा श्याम मनोहर यांचा लेख आवडला. आता मी नेत्यांना पत्र लिहीत आहे..

मी एक सामान्य मतदार आहे. मी सकाळी उठतो, पेपरवाला मुलगा येतो, नंतर दुधवाला येतो. त्यानंतर घरी काम करणारी आजी येते. मग मी ऑफिसला निघतो. वाटेत मला रिक्षावाले भाऊ, बसचे कंडक्टरकाका, पुढे टीसीमामा, रेल्वेत सहप्रवासी- त्यात काका, मामा, भाऊ, आत्या, भगिनी.. सगळेच भेटतात. मग मी ऑफिसला पोहोचतो. तेथे सिक्युरिटी गार्डकाका, मग कचरा काढणारे मामा, मग डिपार्टमेंटमधील शिपाईकाका या सर्वाना गुड मॉर्निग करीत मी जागेवर बसतो. दिवसभर अनेकांना भेटतो व परत घरी येतो. येताना बँकेत, दुकानात जात अनेकांना भेटतो. पण त्यांच्यापैकी कुणालाही मी ‘तू हिंदू की मुसलमान की दलित’ काहीच विचारीत नाही. मात्र, निवडणुका आल्या की, महिनाभर राजकीय नेते दूरचित्रवाणी, सर्व प्रसारमाध्यमे, भाषणे यांतून दिवसभर जाती व धर्माचे विष पसरविण्याचे अव्याहत काम करीत असतात. आता स्वातंत्र्य मिळून अनेक वर्षे झाली. नव्या पिढीला यांत काडीचाही रस नाही. तेव्हा आता राजकीय नेत्यांनो, कृपया हे धंदे बंद करा आणि भारत समृद्ध कसा करता येईल, तसेच फक्त आपल्याच नव्हे तर सामान्य जनतेच्या भावी पिढय़ांना सुखाने कसे जगता येईल, याविषयी मार्गदर्शन करावे अशी कळकळीची विनंती आहे.

आपला, प्रदीप करमरकर, ठाणे</strong>

 

लेखक-शास्त्रज्ञांचा प्रभाव किती?

‘जनतेस पत्र..’ हा श्याम मनोहर यांचा लेख वरवर विनोदी, पण गांभीर्यपूर्वक वाचले तर व्यापक आशयाचा! ‘जनता’ हा शब्द अनेक प्रकारे अनेक ठिकाणी अनेक हेतूंनी- विशेषत: राजकारणी लोकांकडून भाषणात, जाहीरनाम्यांत वापरला जाणारा शब्द. या जनतेचा कळवळा फक्त निवडणुकांपुरताच असतो. लेखाच्या शेवटी ‘प्रिय व्यक्ती..’ हे संबोधन आणि देशात वाचनालये-म्युझियमची गरज आणि लेखक-शास्त्रज्ञ यांच्या दुय्यम स्थानाबद्दल चिंता व्यक्त झाली. पण मुळात हे लोक किती आणि त्यांचा मतदान व निकालावर प्रभाव किती? जातीपातीची, आर्थिक, तसेच निवडणूक जिंकण्यासाठी असणारी अनेक समीकरणे जुळवावी लागतात. त्यात कोणाला किती महत्त्व हे ठरलेले असते. तरीही जनतेस लिहिलेल्या या पत्राने जनजागृती, प्रबोधन व्हावे ही अपेक्षा!

– प्र. मु. काळे, नाशिक

 

‘अनुराधा’: झपाटलेपणाची अनुभूती

‘‘अनुराधा’ हा एक अनुभव आहे..’ या पहिल्याच वाक्यापासून झपाटून टाकणारा डॉ. मृदुला दाढे-जोशी यांचा ‘अनुराधा’ आणि पं. रविशंकर’ हा लेख (७ एप्रिल) वाचला. ५५ वर्षांपूर्वी हा चित्रपट पाहिला, तेव्हा सुरुवातीलाच रेडिओवर लागलेले ‘सावरे सावरे..’ हे गीत कसे झपाटून टाकते, याचा अनुभव मी घेतला होता. नंतर असे झपाटलेपण हा लेख वाचताना जाणवले. या चित्रपटातील सर्व गाणी आणि त्यातील बारकावे या लेखात इतक्या समर्थपणे मांडले आहेत, की त्यास दाद द्यायलाच हवी. हृषीकेश मुखर्जी यांनी या चित्रपटाचे संगीत देण्यासाठी पं. रविशंकर यांची निवड केली. म्हणून या दोघांची ही कलाकृती एकमेकांस पूरक आणि श्रेष्ठ ठरली असे निश्चितपणे म्हणता येते. कथा डोळ्यांपुढे ठेवून संगीतकाराची निवड ते करत होते आणि त्याची ‘हवा’ आहे म्हणून नव्हे, हे लेखातील वाक्य मार्मिक आहे.

– मुकुंद नवरे, मुंबई

 

अंभी आणि जयचंदची वंशावळ

‘लोकरंग’मधील (१० मार्च) ‘इतिहासाचे वर्तमान’ हा लोकेश शेवडे यांचा लेख वाचला. शेवडे यांनी याआधी साधारण पाच वर्षांपूर्वी- २० एप्रिल २०१४ च्या ‘लोकरंग’मध्ये ‘मध्यमवर्ग, कॉर्पोरेट्स अन् कॉन्सण्ट्रेशन कॅम्प’ हा लेख लिहून हिटलरच्या क्रूर इतिहासावर प्रकाशझोत टाकला होता. तो लेख ज्यांनी वाचला असेल, त्यांना ‘इतिहासाचे वर्तमान’ या लेखाचा मथितार्थ समजेल. २०१४ साली शेवडे यांनी लेख लिहिला, तेव्हा २०१४ च्या लोकसभा निवडणुका झाल्या नव्हत्या. तरीही त्यांचा जर्मनीत असलेला बालमित्र राजूने त्यांना विचारले, ‘‘भारतात कसं आहे रे सध्या? तिथंही डायनॅमिक नेत्यांच्या मागे मोठमोठे उद्योगपती पैशांच्या थैल्या घेऊन उभे राहिलेत म्हणे?’’ हे ऐकून शेवडे शून्यात पाहात राहिले. याचा अर्थ २०१४ च्या निवडणुकीत बहुमतांनी निवडून येणारी व्यक्ती हिटलरप्रमाणे वागेल, असे शेवडे यांना तेव्हा सुचवायचे नव्हते ना?

सध्या भारतात अंभी आणि जयचंदची वंशावळ वाढत आहे. या वंशावळीने आपल्या पूर्वजांमुळे भारतात परकीय राजवट स्थिरावली याची खंत करावी; इतरांनी नव्हे!

– प्रभाकर कृ. ठाकूर, पालघर