|| मकरंद देशपांडे

..आणि तो दिवस आला, जेव्हा माझ्यातल्या दिग्दर्शकानं माझ्यातल्या लेखकाच्या लिखाणाला नकार दिला. कारण त्याच्यासाठी आता ते घरगुती झालं होतं. लेखकानंसुद्धा लिखाण टोपण लावून बंद केलं. माझ्यातला दिग्दर्शक, एखाद्या स्थलांतरित पक्ष्यासारखा विश्वसाहित्याच्या समुद्रावरून उडत नाटकाच्या किनाऱ्यावर उतरला. नाटककारांच्या वसाहतीत खूप अनोळखी होते म्हणून खूप मोठेही वाटले आणि काही ओळखीचे (नावाने) वाचून झाल्यावर अनोळखी वाटले. मला माझ्या नवीन नाटकाच्या स्वयंवराचा शोधपूर्वक सोहळा चुकीचा वाटला.

मी शोध संपवला आणि जगणं सुरू झालं. निर्मल वर्मा हे हिंदी साहित्यात स्वर्णाक्षरात लिहिलं गेलेलं नाव. त्यांनी लिहिलेली एकपात्री एकांत ‘डेढम् इंच ऊपर’ मी दोन वेळा- वेगवेगळ्या पद्धतीने- पृथ्वी थिएटरच्या आवारात प्लॅटफॉर्म परफॉर्मन्स म्हणून सादर केली. पुन्हा नव्यानं शोध न घेण्याचा शोध सुरू झाल्यानं, दिग्गज लेखकांची विचारसरणी नुसती डोळ्यांखालून नव्हे तर अकलेवरून जाऊ द्यायची नव्हती. तिच्याबरोबर निर्विचार होऊन निवास करायचा होता. निर्मल वर्माच्या काही छान पंक्ती : ‘जिस क्षण आप इंतज़ार करना छोड देते हैं, उस क्षण आप जीना भी छोडम् देते हैं। जिन लोगों के सामने दूसरा रास्ता खुला रहता है, वे शायद ज्यादा सुखी नहीं हो पाते।’

‘डेढम् इंच ऊपर’चा पं. सत्यदेव दुबेंनी दिग्दर्शित आणि अमरीश पुरींनी अभिनीत केलेला प्रयोग पाहताना, ऐकताना पृथ्वी थिएटर जणू पृथ्वीपासून डेढम् इंच ऊपर झालं होतं! जरा डोळे बंद करून अमरीशजींच्या आवाजातल्या काही ओळी ऐका : ‘‘अगर आप चाहें तो इस मेज़ पर आ सकते हैं, जगह काफ़ी हैं। आखिर एक आदमी को कितनी जगह चाहिए, नहीं नहीं मुझे कोई तकलीफ़ नहीं होगी। बेशक अगर आप चाहे तो चुप रह सकते हैं, मैं खुद चुप रहना पसंद करता हूँ। आदमी बात कर सकता है, चुप रह सकता है, दोनों एक ही व़क्त, यह बहुत कम लोग जानते हैं।’’

पृथ्वी थिएटरमधला तो अविस्मरणीय प्रयोग कदाचित त्यांचा शेवटचा प्रयोग होता. प्रयोगानंतर त्यांना ग्रीन रूममध्ये भेटलो, तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर विलक्षण शांती होती. त्यांनी फिल्म्स शेकडो केल्या, पण त्या प्रयोगाला तोड नाही. जय पुरीसाहेब! जय नाटक!

पुढे अमोल पालेकरांमुळे मला अमरीश पुरींच्या स्मृतीप्रीत्यर्थ ठेवलेला ‘रंगकर्मी’ पुरस्कार रतन थियम या भारतीय रंगभूमीवरील ऋषितुल्य दिग्दर्शकाकडून मिळाला.

पृथ्वी थिएटरमध्ये नवीन नाटक करून आठ महिने गेले असं कधीच झालं नव्हतं. पण माझ्यातल्या दिग्दर्शकाचा प्राण अजूनही कायम होता. लेखक नॉट रिचेबल या मोडवर होता. तसं पाहिलं गेलं तर, या गंभीर परिस्थितीत पृथ्वी थिएटरचं किताबघर (पुस्तकांचं दुकान) धावून आलं. एक मोठ्ठं पुस्तक उचलताना त्याच्या भारानं एक छोटं पुस्तक खाली पडलं. त्यावर छान पांढऱ्या दाढीतलं रवींद्रनाथ टागोरांचं रेखाचित्र होतं. पुस्तकाचं नाव- ‘चित्रा’! खूपच कमी पानांचं पातळ पुस्तक. पण ते उचलून जागेवर ठेवताना पहिलं पान वाचलं आणि उभ्या उभ्या उगाचंच ते दुसरं जाड, मोठं पुस्तक हातात ठेवून ‘चित्रा’ वाचायला लागलो. इंग्रजीत होतं. काव्यात्मक लिखाण. पात्र होती- मदन, वसंत, अर्जुन आणि चित्रा. फर्स्ट साइट लव्हसारखं फर्स्ट रीडिंग लव्ह झालं. मी त्या पातळ पुस्तकाच्या प्रेमात पडलो!

मणिपूरच्या राजाला मुलगा हवा असतो म्हणून तो जप-तप-यज्ञ करतो. त्याला वरदान मिळतं, पण ते खरं होत नाही. मुलगीच जन्माला येते. तिला तो मुलासारखं वाढवतो. ती शस्त्रविद्य्ोत पारंगत होते. तिच्या दबदब्यानं जंगलात कोणीच शत्रू तग धरत नाही. अशा वेळी अज्ञातवासात असलेला अर्जुन तिच्या समोरून जातो, पण तिच्याकडे बघतदेखील नाही. तिला अचानक जाणवतं, की आपल्यात स्त्री-सुंदरता राहिली नाही. ती वडिलांना, देवाला कोसते. ती कठीण तपश्चय्रेला बसते. तेव्हा मदन (कामदेव) आणि वसंत (ऋतू) तिच्या मदतीला येतात. तिची व्यथा ऐकतात आणि तिचे दु:ख कमी करण्यासाठी तिला एका वर्षांसाठी सुंदर बनवतात.

आता अर्जुन तिला पाहतो, तेव्हा तिच्या प्रेमात पडतो. मणिपूरच्या जंगलात त्यांची प्रेमकथा सुरू होते. पण आता वर्ष संपणार असतं आणि हे सुखाचे क्षण लवकर संपतात. तिच्या सौंदर्याचा शेवटचा दिवस, शेवटची रात्र येऊन ठेपते. येणाऱ्या पहाटे तिच्यातील रांगडा धनुर्धर तिच्या नाजूक शरीरात शिरणार असतो. पण नेमकी ती शेवटची रात्रसुद्धा तिच्यापासून हिरावून घेतली जाते. कारण जेव्हा अर्जुन भेटायला येतो तेव्हा त्यानं जंगलातील चित्रा नावाच्या एका शूर धनुर्धराविषयी गाववाल्यांकडून ऐकलेलं असतं. पण गेले वर्षभर ती नसल्यानं जंगलात दरोडेखोर गावकऱ्यांना सतावत असतात. अर्जुन शेवटची रात्र सुंदर चित्राला शूर धनुर्धर चित्राविषयी सांगण्यात घालवतो. या काव्यात्मक शेवटानं माझ्यातल्या दिग्दर्शकाला मंत्रमुग्ध करून टाकलं.

वाचन अर्धा तासाचं, पण आयुष्यभर लक्षात राहील असं लिखाण. मी ठरवलं की, ‘चित्रा’ नाटक बसवायचं. सांताक्रुजला लुनर हॉटेलवर जाऊन केकेला (के. के. मेनन) म्हणालो की, ‘‘तू अर्जुन कर.’’ आणि पृथ्वीला संजना कपूरला सांगितलं की, ‘‘तू चित्रा.’’ वाचन केल्यावर प्रश्न पडला, की हे करायचं कसं? कारण ते खूप कमी, पण खूप जास्त असं होतं. त्यामुळे पटकन तालीम सुरू केली नाही. पुन्हा विचारात पडलो, की हे लिखाण काय आहे? का आवडलं? कारण हे काही नाटकासारखं लिहिलेलं नाटक नव्हे. कदाचित नृत्य-नाटय़ शैलीत करता येईल. पण मला तर नाटकच करायचं होतं. कारण मला नेहमी वाटतं, की नाटकात दुसरे परफॉर्मिग आर्ट्स आणून ते गिमिक होतं. नाटक हे काव्यात्मक जरी लिहिलेलं असलं तरी ते गद्यच असावं.

एका रात्री विलेपार्ले पूर्वेतील एअरपोर्ट हाकेच्या अंतरावर असलेल्या एक मजली पार्ले-निमेष सोसायटीच्या गच्चीवर चकरा मारत असताना, मधेच लांबून प्रकाशाचा एक ठिपका जवळ जवळ येताना दिसला. विमान होतं. ते विमान माझ्या डोक्यावरून उतरताना पाहताना अचानक डोक्यात लक्खं प्रकाश पडला, की सुंदरता ही मर्त्य आहे हे जर टागोरांना म्हणायचं असेल, तर त्याचं सादरीकरण हे सुंदरच असावं आणि ते रात्री अचानक दिसणाऱ्या प्रकाशाच्या ठिपक्यासारखं असावं! त्या ठिपक्यानं पुढे घेतलेला आकार हे महाकाय वास्तव आहे. तालीम सुरू करायला ते विमान उपयोगी पडलं? की रात्र? की ठिपका?

अज्ञातवासातील अर्जुन कसा असावा? सुंदर चित्राला पाहिल्यानंतर कसा असावा? शेवटच्या रात्री सुंदर चित्राच्या बाजूला बसून शूर धनुर्धर चित्राच्या विचारात हरवून गेलेला अर्जुन कसा असावा? या प्रश्नांची उत्तरं शोधत केकेनं तालमीला सुरुवात केली. केके मला एवढंच म्हणाला होता की, ‘‘अर्जुन साकार करणं, त्यातून टागोरांच्या अर्जुनाला रंगभूमीवर आणणं ही संधी मिळणं म्हणजे जीवनाचं काव्य होणं.’’

संजनाला माझी नाटकं पाहताना खूप गंमत वाटायची; पण माझ्या वेळापत्रकाशिवाय आणि मुक्त शैलीत चालणाऱ्या तालमींबद्दल तिची थोडी तक्रार असायची. कारण ती अतिशय शिस्तप्रिय अशा रंगभूमीच्या वातावरणात मोठी झाली. तिच्या आईचे वडील जेफरी केंडल हे इंग्लंडचे खूप मोठे रंगकर्मी. त्यांच्यासाठी ‘नाटक अभ्यास’ महत्त्वाचा आणि माझ्यासाठी ‘नाटकाचा ध्यास’!

संजनानं चित्रा ही शूर धनुर्धर दिसावी म्हणून शारीरिक व्यायाम सुरू केला. तालमीला सायकल चालवत यायची. मग ४५ मिनिटं व्यायाम आणि पुढे दिवसभर तालीम. मदनसाठी मला आलाप म्हणणारा नट मिळाला- अमित मिस्त्री! कारण शृंगारात संगीत हवं. तर वसंतासाठी प्रेमळ आणि खेळकर विजय मौर्य. आता उरलं एक पात्र.. मणिपूरचं जंगल. मला असं वाटलं, की मणिपूरचं जंगल आणि चित्राचं मन हे एक खूप महत्त्वाचं पात्र आहे. त्यासाठी नुसतं नेपथ्य नाही चालणार. तर एक नटी असावी, म्हणजे जंगल जिवंत होईल. कारण जंगल जेवढं बाहेर तेवढंच चित्राच्या मनातसुद्धा होतं.

शेक्सपीअरच्या ‘मॅकबेथ’मध्ये जसं जंगल चालतं झालं तसंच मोलीना सिंग नावाच्या मणिपुरी डान्सरच्या रूपानं मणिपूर जंगल पृथ्वी थिएटरला आलं व म्हणालं, ‘मला नाटकात घ्या.’

पुढचं पुढच्या सदरात.. जय सौंदर्य! जय टागोर! जय नाटक!               (पूर्वार्ध)

mvd248@gmail.com