13 August 2020

News Flash

अ‍ॅसिड प्रकरणामुळे माझी शाळा सुटली..

‘मी..मिठाची बाहुली’हे वंदना मिश्र यांचं आत्मकथन! मुंबईतल्या एका धगधगीत सांस्कृतिक पर्वाचं त्यात वर्णन आहे. प्रतिकूल परिस्थितीशी निकराची झुंज देणाऱ्या एका साध्या, परंतु मानी, धैर्यशील

| July 27, 2014 01:06 am

‘मी..मिठाची बाहुली’हे वंदना मिश्र यांचं आत्मकथन!  मुंबईतल्या एका धगधगीत सांस्कृतिक पर्वाचं त्यात वर्णन आहे. प्रतिकूल परिस्थितीशी निकराची झुंज देणाऱ्या एका साध्या, परंतु मानी, धैर्यशील कुटुंबाची ही कथा राजहंस प्रकाशनातर्फे  प्रकाशित होत आहे. त्यातील एका प्रकरणाचा हा संपादित अंश..
दिवस नक्की आठवत नाही. सालसुद्धा नेमकं माझ्या नाही लक्षात. मी तेरा-चौदा वर्षांची होते. आईची रात्रपाळी होती. घरी मी आणि बाबू. काशी ट्रेनिंगसाठी पुण्याला होती.
रात्री बाराचा सुमार असेल. चाळ झोपेत छान गुरफटलेली. मी अन् बाबूसुद्धा गाढ निद्रेत होतो. अचानक दारावर जोरदार थाप पडली. खड-खड-खड, खडाटखड. बाबूला कशीबशी जाग आली. त्यानं मला उठवलं. बाबूनं दार उघडलं. दारात पोलीस. दोन जण होते.
‘‘लक्ष्मीबाई लोटलीकर इथं राहतात ना?’’ एकानं करडय़ा आवाजात विचारलं. आमच्या आईचा अगोदर कधी असा रुक्ष, तुटक अन् सरकारी भाषेत उल्लेख झालेला नव्हता. मी अन् बाबू एकदम गांगरूनच गेलो.
‘‘लक्ष्मीबाईंच्या अंगावर अ‍ॅसिड पडलंय. तुम्हांला हॉस्पिटलात यायचंय आमच्याबरोबर. चला,’’ दुसरा हवालदार थोडय़ा मऊ आवाजात म्हणाला.
मी आणि बाबू एकदम फुटून रडू लागलो.
नंदाच्या आईला, ताई चौधरींना आम्ही सांगितलं. आस्ते आस्ते चाळीतले लोक आमच्या दारापाशी जमा झाले. आईच्या अंगावर अ‍ॅसिड कसं पडलं? काय घडलं? अन् कसं? शरीराला नेमका कुठं अपाय झाला? सगळे प्रश्न ‘आ’वासून आमच्यापुढे उभे. पोलिसांकडे सगळी माहिती नव्हती. ‘‘हॉस्पिटलात चला,’’ इतकंच ते म्हणत होते.
बाबू अन् मी निघालो. सोबतीला नंदाच्या आई आणि ताई चौधरी आल्या. पोलीस जीपमधून पुढे गेले. आम्ही टॅक्सी करून बोरीबंदरजवळच्या जी.टी. हॉस्पिटलात पोहोचलो. मला टॅक्सीचं फार अप्रूप वाटायचं. टॅक्सीत पहिल्यांदाच बसले. पण प्रसंग कसला!
आईला जनरल वॉर्डमध्ये ठेवलं होतं. कॉटवर उपडी झोपली होती. कंबरेपर्यंत पातळ. बाकी काही आम्हाला दिसायला, कळायला मार्ग नाही. तिच्यावर मोठी जाळी टाकली होती. आम्ही आल्याचं तिला कळलं. ‘‘बाबू, कसे आलात रे इथं?’’ एवढं तिनं कसंबसं विचारलं. सारखं कण्हणं सुरू होतं तिचं, अन् सारखी पाणी मागत होती. तिच्या कॉटच्या शेजारी पाण्याचं पिंप ठेवलं होतं. तिच्या तोंडात नळी टाकली होती. ती चोखून चोखून पाणी प्यायचं असं आईचं सुरू होतं. आईचे केस लांब आणि दाट. केस पाठीवर येऊ नयेत म्हणून कॉटला बांधून ठेवले होते.
आईचं हे रूप पाहून आमच्या मनाचा थरकाप झाला. माझ्या निग्रही, करारी आईचं असं का झालं? आज तो सगळा प्रसंग आठवला की वाटतं, नियती माणसांना खेळण्याप्रमाणे वागवते. तिच्या लेखी माणूस म्हणजे बाहुल्या. मनात येईल तशी ती खेळते.
पोलिसांनी आईचं स्टेटमेंट लिहून घेतलं. नेमकं काय झालं अन् कसं ते समजलं नाही, असं तिनं पोलिसांना सांगितलं. ती सईबाईंच्या हॉस्पिटलचा जिना चढत होती. पाठीवर काही तरी ओलं, जळजळीत असं पडलंय हे आईच्या लक्षात आलं. पाठीला अगणित सुया टोचल्याप्रमाणे झालं तिला. ती कळवळत जिन्यावरच कोसळली.
आपण बरं आपलं काम बरं अशी आईची वृत्ती. कुणाशी फाजील सलगी नाही. कुणाशी वैर नाही. सूडबुद्धीनं कुणीतरी हे केलं असेल काय या प्रश्नाला आईनं ‘नाही’ असं उत्तर दिलं. प्रिन्सेस स्ट्रीटच्या पोलिसांनी ‘अपघात’ अशी नोंद करून प्रकरण दप्तरी दाखल केलं असेल.
माझ्या मनात मात्र अद्याप काही प्रश्न आहेत –
आई हॉस्पिटलचा जिना चढतेय आणि तिच्या पाठीवर अ‍ॅसिड पडतं यावर विश्वास बसणं कठीण आहे. कुणीतरी हे काम ठरवून केलं असं मला आजही वाटतं. जिन्याच्या परिसरात अ‍ॅसिडची बाटली असण्याचं कारण नाही. जिन्यालगतच्या भिंतीवर एखादी लाकडी फळी असेल अन् त्यावर अ‍ॅसिडची बाटली असेल, असं जरी मानलं तरीही ती आपोआप आईच्या अंगावर कशी सांडेल? सगळं योजनापूर्वक, ठरवून केलं गेलं असं वाटतं.
आता, कुणी केलं असेल, हा सवाल.
नोकरीच्या ठिकाणी बऱ्याचदा ताणाचे प्रसंग उभे राहतात. दोन सहकाऱ्यांमध्ये असूया असते वगैरे गोष्टी घडत असतात. परंतु सईबाईंच्या हॉस्पिटलात असं काहीही नव्हतं. मुळात मॅटर्निटी होम छोटंसंच होतं. आईकडे बहुतेक सगळा कारभार होता. एखाददुसरा ‘बाल्या’ गडी सोडला तरी बाकी सगळ्या स्त्रिया. झाड-लोट, धू-पूस करणाऱ्या, स्वयंपाक करणाऱ्या स्त्रियांना आईबद्दल असूया असण्याचं काहीच कारण नव्हतं.
आता एक मुख्य प्रश्न उरतो.
आमची आई तरुण होती, सुंदर होती; शिवाय विधवा आणि नर्सिगच्या नोकरीत. तिच्यावर कुणाची वाईट नजर पडली होती काय? अन् ती न बधल्यामुळे तिच्या अंगावर अ‍ॅसिड फेकण्याचा निर्घृण प्रकार झाला काय? आम्हा मुलांसाठी तिनं हा जालीम वार अंगावर झेलला काय? या प्रश्नांमुळे माझं डोकं सुन्न होतं आणि तळपायाची आग थेट मस्तकात जाते.
नर्सिगकडे पाहण्याची समाजाची नजर तेव्हा निर्मळ नव्हती. नर्सिग म्हणजे सेवा-शुश्रूषा. परंतु हा झाला सुविचार. आपला समाज ढोंगी आहे. तो अशा अनेक सुविचारांची नुसती पोपटपंची करत असतो. ते विचार खऱ्या अर्थानं मनात रुजत नाहीत. खरं तर नर्सला ‘सिस्टर’ म्हणण्याची पद्धत आहे. परंतु पेशंटचं गू-मूत उपसणारी बाई हीच तिची किंमत. तीच गत विधवेची. त्यात ती नाकी-डोळी नीटस असली अन् वयानं लहान असली की मग विचारूच नका. सगळ्या पुरुषांना ती ‘आपली’ वाटते. आई अशा दुहेरी कचाटय़ात सापडली होती. त्यातून हे अ‍ॅसिड प्रकरण उद्भवलं काय?
आई जवळजवळ तीन महिने जी.टी.मध्ये होती. मग घरी आली. रात्री १२ वाजता तिला टॅक्सीनं आम्ही घरी आणलं. तिच्या खाण्यावर र्निबध आले. साधं जेवायचं. तिखट, आंबट, तेलकट पदार्थ वज्र्य. औषधंही पुष्कळ घ्यावी लागायची तिला. पाठीला दोन-तीन प्रकारचं क्रीम लावायचे. पाठ उघडीच ठेवायची. ती खाटेवर पालथी झोपून असायची.
पहाटे पाच वाजता तिला पाठच्या नळावर प्रातर्विधीसाठी घेऊन जायचं. पाठीवर पातळसा कपडा टाकून. मग तिला स्पंज करायचं. स्वयंपाकाची सगळी जबाबदारी नंदाच्या आईनं आणि चौधरीताईंनी आनंदानं स्वीकारली. आईचं जेवण नंदाच्या आई करायच्या. मी आणि बाबू ताईंकडे जेवायचो. या दोन्ही कुटुंबांनी जवळजवळ तीन-चार महिने आमची काळजी घेतली. कसलीही अपेक्षा न ठेवता. असा शेजार मिळणं ही भाग्याची गोष्ट आहे.
महाभारतातली एक गोष्ट कुठं वाचली ते आता नेमकं आठवत नाही. पण मनाला भुरळ पाडणारी गोष्ट आहे हे नक्की. युद्ध संपल्यावर कृष्ण पांडवांचा निरोप घेतो. ‘‘काय मागायचंय ते मागा. मी देईन ते तुम्हाला,’’ असं प्रत्येकाला सांगतो. पहिला नंबर अर्थात कुंतीचा, तर ती कृष्णाला म्हणते, ‘‘देवा, आम्हाला दुसरं-तिसरं काही नकोय. अधनंमधनं आमच्याकडे दु:खाचं गाठोडं पाठवत जा.’’ कृष्ण बुचकळ्यात पडला. म्हणाला, ‘‘असं कसलं चमत्कारिक मागणं गं तुझं? काहीतरी चांगलं माग की.’’ त्यावर कुंती विषण्णसं हसून म्हणाली, ‘‘अरे, सुख मिळालं की बुद्धीला ग्लानी येते. दु:ख आलं की माणूस देवाची आठवण ठेवतो.’’
आईचं असंच झालं. अ‍ॅसिडची घटना घडल्यावर तिची परमेश्वरावरची श्रद्धा अधिक झाली. एकदा म्हणाली, ‘‘बाबी, देवाची मर्जी कशी बघ. अ‍ॅसिडनं चेहरा भाजला असता तर मी कायमची अधू झाले असते. कदाचित, डोळ्यांना इजा झाली असती. नाहीतर अख्खा चेहराच विद्रूप झाला असता मग? काय केलं असतं आपण? पाठीवर शेकलं ते बरंच झालं.’’
देवासंबंधी आमच्या आईचं धोरण अगदी चोख होतं. देवाची मनोभावे सेवा करायची. परंतु देवभोळेपणा तिला मान्य नव्हता. देवस्की, बुवाबाजी, महंत-महाराज या गोष्टींना तिचा सक्त विरोध होता. ‘अति झालं गुरवाचं, अन् कपाळ उठलं देवाचं’ असं करू नये. माणसानं मेहनतीनं, कष्टानं मोठं झालं पाहिजे. तुमच्या प्रयत्नांना देवाची साथ असतेच. त्यासाठी देवाकडे सौदेबाजी करण्याची गरज नाही. देवाकडे सद्बुद्धी मागावी. बाकी सगळं आपल्या बळावर पार पाडावं, अशी तिची भूमिका होती. कष्टाला शिक्षणाची जोड मिळाली तर फार उत्तम असं ती म्हणायची. शिक्षण घेणं शक्य नसेल, तर कसलंही हुनर (हल्लीच्या भाषेत ‘स्किल’) शिकून घ्या किंवा एखादी कला आत्मसात करा, असं तिचं म्हणणं असायचं.
मात्र अ‍ॅसिड प्रकरणामुळे माझी शाळा सुटली. आईला याचं खूप वाईट वाटलं, परंतु इलाज नव्हता. बाबूला शाळा सोडून घरात बसणं शक्य नव्हतं. त्याचं मॅट्रिकचं वर्ष होतं. तो मॅट्रिक झाला तर घरातली कोंडी फुटण्यास मदत झाली असती. काशीचं पुण्याला ट्रेनिंग सुरू होतं. आईचं करणार कोण? तिची खूप काळजी घ्यावी लागायची. सतत तिला दुसऱ्याची मदत लागायची. सरतेशेवटी मी शाळा सोडावी, असं आईनं ठरवलं. ती खूप दु:खी झाली. ‘बाबीला शिकता आलं नाही, याचं मला खूप लागून राहतं,’ असं म्हणायची.
शाळा मध्येच सुटली, या गोष्टीचं मला खूप वाईट वाटलं. आजही वाटतं. अगदी मनापासून सांगायचं तर मला डॉक्टर व्हायचं होतं. डॉ. सईबाई रानडे माझ्या आदर्श होत्या. त्या काळात डॉ. जिराड म्हणून एक प्रख्यात डॉक्टर होत्या. डॉ. आनंदीबाई जोशींबद्दल नंतरच्या काळात वाचायला मिळालं अन् मी भारावून गेले. आपल्या कामावर किती दृढ निष्ठा होती आनंदीबाईंची. डॉ. शांताबाई सप्तर्षी यांचंही तेव्हा पुष्कळ नाव होतं. परदेशात जाऊन डॉक्टरकीची सगळ्यात मोठी डिग्री मिळवावी, असं तेव्हा मला वाटायचं. रुग्णाची सेवा ही सगळ्यात मोठी माणुसकीची गोष्ट आहे, असं मी मानते. डॉक्टर रोग्याला बरं करतो याचा अर्थ तो त्याला नवजीवनच देतो ना. फार मोठी शक्ती आहे ही. मी रंगभूमीवर आले तेव्हा मामांना (विख्यात नाटककार मामा वरेरकर) म्हणाले की, ‘‘मला डॉक्टर व्हायचं होतं. डॉक्टरकडे फार मोठी ताकद असते.’’ त्यावर मामांनी माझी समजूत काढली. ते मला म्हणाले, ‘‘अगं बाबी, नटसुद्धा एका अर्थी डॉक्टरच की गो. डॉक्टर रुग्णाला औषधं देऊन, ऑपरेशन करून बरं करतो, तर नाटककार, नट-नटय़ाही हेच कार्य करतात. समाजाची शुश्रूषा करतात. उत्तम नाटकामुळे, दर्जेदार अभिनयामुळे प्रेक्षकांच्या मनावरचा ताण आस्ते आस्ते निवळतो. माणूस स्वच्छ मनानं घरी जातो. त्याच्या मनातले क्षोभ उडून जातात. ही एक प्रकारची शुश्रूषाच नाही काय?’’
मला मामांचं म्हणणं पटलं.
एखादा उत्तम सिनेमा पाहिला, एखादं उत्तम नाटक पाहिलं, की मनावरचे सगळे ताण निवळतात आणि माणूस पिसाप्रमाणे हलका होऊन आपल्या घरी जातो. ही कलेची फार मोठी ताकद आहे हे निर्विवाद.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 27, 2014 1:06 am

Web Title: mi mithachi bahuli coming book of vandana mishra
Next Stories
1 वास्तवाभिमुख जीवनचित्रण करणारी कादंबरी
2 आगामी : ‘नशायात्रे’चं अंधारं अधोजग
3 ‘मुळारंभ’चा आरंभ..
Just Now!
X