मकरंद देशपांडे

‘जंगल के पार’ हे नाटक माझ्या नाटय़यात्रेतील एक अशी जखम आहे, की तिला आठवणींच्या हवेची झुळुकसुद्धा ताजी करते. जखम ही शक्यतो चुकीनं किंवा लक्ष नसल्याने होते. पण ‘जंगल के पार’ नाटकात नाटक म्हणून लागणारी सगळी अंगं ताकदीची होती. मुख्य भूमिका के. के. मेनन, त्याला साथ द्यायला संजना कपूर, विजय मौर्य, अमित मिस्त्री आणि वेशभूषा प्रोफेशनल ममता (नाव विसरलो). ममताने एखाद्या फॅशन शो ते फँटसी फिल्मला लागणारे कॉस्च्युम्स बनवले होते. तेव्हा आम्ही दोन लाखांचा खर्च केला होता कपडय़ांवर!

नेपथ्य समीर नाडकर्णी यांचंच! त्यांनी ‘पृथ्वी थिएटर’च्या सेंटर डोअरवर एक मोठ्ठा, शक्तिशाली माणसाचा धातूचा चेहरा हातांनी बनवला होता आणि त्यातनं बाहेर आलेला रॅम्प ही जीभ होती. त्यातून पात्रं प्रवेश करायची. प्रकाशयोजनेत निऑन लाइट्स वापरले होते, ज्यांद्वारे फँटसी फ्युचरिस्टिक इफेक्ट्स साधता आले. सॅच्युरेटेड लाइट्स म्हणजे प्रकाशाची तीव्रता- ज्यात चेहरा, प्रॉपर्टी उठून दिसतात. पार्श्वसंगीत हेवी मेटल रॉक होतं. म्हणजे समजा गिटारला आपण खूप अँप्लिफाय केलं, तर त्याचा आवाज डिस्टॉर्ट होतो; पण त्यात एक ऊर्जा असते, जी माणसाला अमानवीय शक्तीची अनुभूती देते. नाटकाचं कथानकच असं होतं, की त्याला वेशभूषा, प्रकाश, नेपथ्य, संगीत हे मोजमापात वा पारंपरिक साचात बसणारं नको होतं.

चंद्रप्रकाश हा एक शिल्पकार असे मुखवटे बनवायचा, की ते म्हणे अगदी जिवंत व्हायचे! १३ व्या शतकातला ‘कोणार्क’ (रथ) जेव्हा तयार झाला तेव्हा शिल्पकार म्हणाला होता की, ‘हा सूर्यदेवाला अर्पण केलेला रथ आहे. तो इथून उडूनही जाईल.’ सूर्योदय झाला तेव्हा खरंच सगळे घाबरले होते, की हा एवढा खरा दिसणारा रथ आता जागेवरून हलणार तर नाही ना!

ही एक आख्यायिका म्हणा वा कविकल्पना, पण ‘जंगल के पार’ नाटकाचा नायक हा अशीच अद्भुत कलाशक्ती असलेला शिल्पकार! त्याने बनवलेले ‘सात्त्विक’, ‘तामसिक’ व ‘राजसिक’ गुणांचे मुखवटेच त्याचे तीन असिस्टंट असतात आणि ते घेऊन चंद्रप्रकाश निघालाय एका भविष्याकडे. त्या वाटेत आहे एक जंगल आणि ते जंगल पार करून गेल्यावर तो बनवणार आहे एक गाव- जे हरवलेलं आहे. जंगलात जाताना त्याला भेटतो एक मुलगा, जो आपलं नाव ‘बॉय’ असं सांगतो. हा मुलगा आपल्या शक्तिशाली राजाची आख्यायिका चंद्रप्रकाशला ऐकवतो. चंद्रप्रकाशच्या मनात शंका-कुशंका निर्माण होतात. तो त्या मुलाला त्याच्या राजाला भेटवण्याची विनंती करतो. पण बॉय म्हणतो की, ‘‘राजा कुणाला भेटत नाही. त्याच्या फक्त गोष्टीच तुम्ही ऐकू शकता.’’

तेव्हा चंद्रप्रकाश एक युक्ती करतो आणि राजाच्या एका गोष्टीत त्याला भेटतो. तर तो जंगलचा राजा सिंह असतो. चंद्रप्रकाश शिकारी बनून त्याला जाळ्यात अडकवतो. मग एक उंदीर- ज्याला राजाने पूर्वी जीवनदान दिलेलं असतं- ते जाळं आपल्या दातांनी तोडतो. पण त्या गोष्टीत गेल्यावर चंद्रप्रकाशला राजा सिंह आता म्हातारा झालेला दिसतो. त्याच्या पंजात ताकद उरलेली नसते, नखं तुटलेली आणि दात पडलेले असतात. घशातून डरकाळीही फुटत नसते. हे चित्र पाहून गोष्टीतून बाहेर आल्यावर चंद्रप्रकाशला दु:ख होतं. तो त्या बॉयला सांगतो की, ‘‘तू तुझ्या राजाला सांग, की मी त्याला पुन्हा नवीन जीवन देईन. माझ्याकडे ‘सत्त्व’, ‘रज’ आणि ‘तम’ गुण आहेत.’’ बॉयला हे काही कळत नाही. पण तो म्हणतो की, ‘‘पण माझा राजा फक्त दुसऱ्या राजालाच भेटतो.’’ त्यावर चंद्रप्रकाश एक मुखवटा घालून त्याला आपली ओळख राजा म्हणून करून देतो. मग तो बॉय आपल्या राजाशी चंद्रप्रकाशची भेट घडवून देतो. म्हाताऱ्या राजाला चंद्रप्रकाश नवीन पंजे, नखं, दात द्यायचे वचन देतो. पण राजाला हवं असतं तरुण हृदय, करायची असते शिकार, बनायचं असतं राजा.. त्याला एका डरकाळीनं जंगलाला घाबरून टाकायचं असतं!

चंद्रप्रकाश ‘हो’ म्हणतो. ‘तम’ आणि ‘रज’ उत्साहाने मदत करायला लागतात. पण ‘सत्त्व’ नाही म्हणतो. चंद्रप्रकाश रागावून त्याला जंगल सोडून जायला सांगतो. मग चंद्रप्रकाश ‘तम’ व ‘रज’बरोबर राजाला त्याचं नवीन रूप देतो. आता राजा सिंह आपल्या नवीन रूपात डरकाळी फोडणारच होता, तर पुन्हा ‘सत्त्व’ येतो आणि चंद्रप्रकाशला नवीन राजाकडून नजीकच्या भविष्यात होऊ घातलेल्या हिंसेची आगाऊ सूचना देतो. पण चंद्रप्रकाश आपल्या अद्भुत कलेच्या मस्तीत असतो. तो ‘सत्त्वा’ला पिटाळून लावतो आणि सिंह डरकाळी फोडतो. जंगल दणाणून सोडतो. चंद्रप्रकाश, ‘रज’ आणि ‘तम’ आनंदी होतात. पण तो सिंह चंद्रप्रकाशवरच झडप घालतो. दोघांत द्वंद्व होतं. चंद्रप्रकाश आपल्या हातांनी बनवलेल्या, नवीन जीवन दिलेल्या सिंहाकडून होणाऱ्या मृत्यूला हसून स्वीकारतो. ‘सत्त्व’ आणि बॉय जंगलाबाहेर उभे राहतात.

चंद्रप्रकाशची आई त्याला शोधत जंगलात येते. तिची इच्छा असते, की चंद्रप्रकाशनं मुखवटे बनवणं थांबवावं. कारण एक दिवस हे मुखवटेच त्याच्या जीवावर उठतील. आणि नेमकं तेच झालेलं ती पाहते. ‘‘या राजात मी जिवंत आहे,’’ असं आईला सांगून चंद्रप्रकाश प्राण सोडतो. ‘सत्त्व’बरोबर असलेला बॉय चंद्रप्रकाशच्या आईला सोबत घेऊन चंद्रप्रकाशचं गावाचं स्वप्न पूर्ण करण्याच्या कामाला लागतो. आता चंद्रप्रकाश हा बॉयच्या गोष्टीत आईला भेटतो!

‘जंगल के पार’ ही एक दंतकथा नाटय़रूपात लिहिली गेली. या दंतकथेला दंतकथेसारखं, पण फँटसी पद्धतीनं मांडायचं होतं. के. के. मेनननी चंद्रप्रकाश करताना सुरुवातीला आपल्या तीन असिस्टंट्सबरोबर (सत्त्व, रज आणि तम) शारीरिक शैलीचा, बॉयबरोबर मुखवटा अभिनय (इटालियन Commedia dell’arte  या १६ व्या शतकातील शैलीचा आधार घेऊन), राजाच्या गोष्टीत जाऊन म्हाताऱ्या सिंहाला शिकारी बनून जाळ्यात पकडणं हे कार्टून शैलीत, तर सिंहाबरोबरचं द्वंद्व व शेवट ग्रीक शोकांतिकेचा भाग वाटेल असा- म्हणजे अभिनय एखाद्या एपिक कवितेसारखा! मृत्यू स्टेजवर दाखवायचा नाही, त्यामुळे तो अंधारात.

केकेची मेहनत, अभिनय तंत्र आणि त्याबरोबर असलेला प्रामाणिकपणा हा एखाद्या दिग्दर्शकाला देवाने बनवून पाठवलेले शिल्प आहे. संजना कपूरने साकारलेली आई ही एखाद्या परीकथेतली वाटावी एवढी सुंदर. तिच्या संवादफेकीत खूप माया होती. (आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तिच्या आईकडचं आजोळ हे शेक्सपीअर नाटकवाले, ब्रिटिश संस्कार.) संवाद व हावभाव मोजकेच, जेवढे पाहिजे तेवढेच. चंद्रप्रकाशचे ‘सत्त्व’, ‘रज’, ‘तम’ हे एखाद्या सर्कशीतीले विदूषक, त्यामुळे त्यांच्या दृश्यांतला कॉन्ट्रास्ट परिणामकारक झाला. फैजल खानचा म्हातारा सिंह हा एखाद्या बालनाटकातला वाटावा असा विडंबनात्मक धाटणीचा व मग जीवनरूपातला हिंस्र सिंह मुक्त लोकनाटय़ातलासारखा. नटांनी तालीम तीन महिने केली. सहा ते आठ तास रोज. तांत्रिक बाजूही महिनाभर आधी तयार!

काही नाटकांबद्दलची हवा ही आधीच पसरलेली असते. ‘जंगल के पार’ या नाटकाचा पहिला शो तत्कालीन समांतर रंगभूमीवरच्या जवळपास सगळ्यांनाच पाहायचा होता. रात्रीचा शो अ‍ॅडव्हान्स हाऊसफुल्ल! प्रेक्षक पायऱ्यांवरही बसले होते. कुणालाही पहिला शो मिस करायचा नव्हता. नाटक मोठं असल्याने दोन इंटरव्हल केले होते. प्रेक्षक आत आले आणि लावलेला सेट पाहून खूश झाले. काहींनी टाळ्या वाजवल्या. मी सुरुवातीला दोन इंटरव्हल आहेत अशी घोषणा केली आणि पायरीवरचा प्रेक्षक म्हणाला, ‘‘म्हणजे बारा वाजणार शो संपायला!’’ थोडा हशा आणि टाळ्या अशा वातावरणात शो सुरू झाला. अप्रतिम अभिनय. तांत्रिक बाजूही उत्तम. पण पहिल्या इंटरव्हलमध्ये अध्रे प्रेक्षक उठून गेले. दुसऱ्या इंटरव्हलला बाहेर गेलेले आलेच नाहीत आणि नाटकाचा तिसरा अंक पाहायला बसली होती आठ डोकी. त्यातही सहा परिचयाची आणि दोन महत्त्वाची. तिसरा अंक रात्री एक वाजून २० मिनिटांनी संपला. ‘पृथ्वी’ला झालेलं कदाचित हे सगळ्यात लांब नाटक असावं!

महत्त्वाच्या दोन डोक्यांपैकी एक होतं समीर मोंडल यांचं! भारतीय चित्रकलेत यांचं खूप मोठं योगदान आहे. ते वॉटर कलर पेंटिंग करतात. त्यांनी अख्खं नाटक तन्मयतेनं पाहिलं. ते मला म्हणाले, ‘‘मकरंद, जर आपण ‘जंगल के पार’ हे नाटक एका डीमर बोर्डवर मांडलं तर.. म्हणजे अभिनय, शैली, नेपथ्य, मुखवटे, प्रकाशयोजना, इफेक्ट्स, संगीत आणि विषय हे सगळं! हे डीमर कमी-जास्त मात्रेत वर-खाली असते, तर प्रेक्षकांना नाटकाचा आनंद घेता आला असता. तुझ्या नाटकात नाटकाची ही सगळी अंगं- म्हणजे हे डीमर वरच होते. त्यामुळे प्रेक्षकांना तीव्रता सहन झाली नाही. Too much of good is not good for longer time.

दुसरं महत्त्वाचं डोकं म्हणजे- मागच्या लेखात ज्यांचा उल्लेख केला होता ते तेजस्वी लेखक राज सुपे! के. के. मेननचे खास मित्र! मला म्हणाले, ‘‘उद्या बोलू ‘लुनर’वर.’’ मग दुसऱ्या दिवशी सान्ताक्रुजला ‘कॅफे लुनर’वर भेटलो. दोन कटिंग चहावर इसापनीती, पंचतंत्र आणि जातक कथांबद्दल राज सुपेंनी एक स्वगत म्हटलं आणि मग दंतकथा व परीकथा यांच्यामधला फरक मांडताना म्हणाले, ‘‘‘जंगल के पार’ हे नाटक जागतिक दर्जाचं लिखाण आहे. फक्त ते दंतकथेतून परीकथेत आणि परीकथेतून अ‍ॅब्सर्ड थिएटरमध्ये जातं.’’ (अ‍ॅब्सर्ड नाटक हे तिथं घडतं जिथं मानवी जीवनाला काही अर्थ नाही. त्यामुळे संवाद हा शून्य असतो वा असंबद्ध असतो.) राज सुपेंनी मला ‘जागतिक’ आणि ‘असंबद्ध’ असं दोन्ही म्हटलं! आणखी दोन कटिंग चहा आले. मग दस्त्येवस्कीच्या लिखाणाबद्दल बोललो. त्यांचं बोलणं थांबलंच नाही. ‘जंगल के पार’ हे नाटक लागलेली ठेच नसून मलाचा दगड आहे असं त्यांचं म्हणणं पडलं.

आज हे लिहायलाही मी ‘कॅफे लुनर’ला आलो.. २५ वर्षांनी! ‘‘लुनरमध्ये आजही सात रुपयांचा कटिंग चहा मिळतो!’’ -‘लुनर’चा मालक हनिफ मला पाहून म्हणाला. मकरंद आणि त्याच्या डोळ्यांत एका क्षणात २५ वर्ष नाहीशी झाली. फक्त आता तो पैसे घ्यायला तयार नव्हता. राज सुपे आता ऋषिकेशला आहेत. त्यांना फोन लावला. हनिफ त्यांच्याशी बोलला. उगाच मला डोळ्यांत पाणी दिसलं. त्यांनी मला आदराने वर बसायला सांगितलं. मी सुपेंना म्हटलं, ‘‘काळ बदलला तरी माणसं भेटली आणि त्यांच्यातलं माणूसपण जिवंत पाहिलं, की ‘थिएटर ऑफ अ‍ॅब्सर्ड’ संपतं.’’ त्यावर सुपे म्हणाले, ‘‘दस्त्येवस्कीला विचारलं गेलं होतं, की तुम्हाला Christ the man आणि Christ the God यामध्ये कोणाला भेटायला आवडेल? तर दस्त्येवस्की म्हणाला- Christ the man!’’

mvd248@gmail.com