|| मकरंद देशपांडे

आजचा लेख लिहिण्याआधी असं वाटलं, की ‘लोकरंग’मध्ये ‘नाटकवाला’ आवर्जून वाचणाऱ्या नाटकप्रेमी किंवा फक्त प्रेमी वाचकांना ‘धन्यवाद’ म्हणू या. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यांतून प्रतिक्रिया येत आहेत आणि खूप आनंदही देऊन जात आहेत. मेलवर अशा प्रतिक्रिया मिळत आहेत की-

‘पुढच्या सदराची प्रतीक्षा करीत आहोत. असेच लिहीत राहा.’.. ‘पृथ्वी थिएटरला एवढे वेगवेगळे प्रयोग होत आहेत?’.. ‘आमची बघायची राहिली ही नाटकं! या नाटकांचं स्क्रिप्ट वाचायला मिळेल का?’.. ‘तुमच्या हिमतीला दाद द्यायला हवी.’.. ‘तुम्हाला जीवनगौरव पुरस्कार द्यायला हवा.’.. ‘पद्मश्री मिळायलाच हवं.’..

हे एक बरं झालं, की वाचकांनी मनावर घेतलं आहे. पण खरं सांगू का, हे पुरस्कार शक्यतो त्यांना मिळतात- ज्यांना ते हवे असतात. मला फक्त रंगमंच हवा होता आणि अजूनही हवा आहे. रिकामा रंगमंच पुन्हा प्रयोगांनी भरायला हवा आहे. प्रयोग हा खऱ्या अर्थाने माझ्यासाठी योग आहे. जेव्हा जेव्हा जीवनात तोल गेला, तेव्हा तेव्हा नाटकांनी सावरायला रंगमंच दिला.

पुरस्कार म्हणजे आपल्या कामाचा सत्कार; आणि तोच आपल्यासाठी सापळासुद्धा आहे. कधी कधी काही लोकांच्या प्रतिक्रिया फारच मौलिक व काळजाला हात घालणाऱ्या असतात, आणि त्याच पुरस्कारही असतात.

भारताचे ज्येष्ठ रंगकर्मी, नाटय़गुरू, नाटककार, दिग्दर्शक आणि एनएसडीमध्ये असताना अल्काझींचे (एनएसडीचे पहिले डीन) सर्वेसर्वा असे कमलाकर सोनटक्के जेव्हा आवर्जून ‘शेक्सपीअरचा म्हातारा’ बघून ‘किंग लीअर’चं असं रूप दाखवताना घेतलेली रिस्क आणि विविध अभिनयशैली यांबद्दल सविस्तर प्रतिक्रिया देतात, तेव्हा खूप बरं वाटतं. ‘एपिक गडबड’ नाटक पाहून त्यांनी प्रतिक्रिया दिली- ‘हे मराठी रंगभूमीवरील प्रहसन आणि मुक्तनाटय़ाचं रसरशीत मनोरंजक धमाल पॅकेज आहे. रंगभूमीवरील शब्द, कथानक, चरित्र चित्रण, नाटय़संघर्ष, उपहास यांच्या नव्या भविष्यदर्शी शक्यता या नाटय़प्रयोगातून ओसंडून वाहतात. हा धमाल विनोदी दंगा बघायलाच हवा. सर्व कलावंत आणि तंत्रज्ञांचे मनापासून अभिनंदन. निर्मात्यांना भावी प्रयोगासाठी शुभकामना.’

पहिला लेख वाचून त्यांनी एसएमएस केला : ‘खरंच मॅक, फाड डाला तूने!’  ते अगदी.. ‘ऐरावत की जन्मकथा बहुत रोचक और प्रदर्शन साहसपूर्ण तथा अद्भुत रस को बढावा देनेवाली. उद्बोधक लेख-धारावाहिक! आनंद आता है. गौरवभाव बढाता है. बधाई, भाई मकरंदजी!’

खरं तर त्यांनी मला ‘जी’ म्हणूच नये. कारण त्यांनी स्वत: खूप म्हणजे खूप काम केलंय. ‘लोकसत्ता’त प्रसिद्ध झालेला त्यांचा ‘नाटय़ प्रशिक्षणानं दिला पुनर्जन्म’ हा लेख (१७ मार्च २०१८) सगळ्यांनी जरूर वाचावा. कमलाकर सोनटक्के सर तुम्हाला माझा साष्टांग नमस्कार!

विजय केंकरे या माझ्या आवडत्या दिग्दर्शक-नटानं सदर सुरू झाल्या झाल्या- ६ जानेवारीला एसएमएस पाठवला : ‘मस्त झालाय लेख मॅक!’ १६ फेब्रुवारीला : ‘आजचा लेख छान आहे. ‘भाषा ठेंगणी पडली’ ही टर्म छान आहे.’ ३ मार्चला : ‘मॅक, शैली मस्त आहे लेखनाची. मराठीत लिहिणं वाढव.’ अशा प्रतिक्रिया दिल्या.

आंतरमहाविद्यालयीन स्पर्धातला विनोदी नट सचिन कंटक कामात व्यग्र असला, तरी सदर वाचून दहा ओळी लिहिल्याशिवाय थांबला नाही.

पर्वतारोहण करतानाचा मित्र संदीप पाटील या सदरामुळे पुन्हा संपर्कात आला : ‘मी आवर्जून प्रत्येक रविवारी तुझा लेख वाचतो आणि मला माहीत असलेल्या मक्याशी जुळवायला बघतो. भेटायचा योग कधी येईल माहीत नाही, पण माझ्या उदंड सदिच्छा. असाच लिहीत जा आणि काम करत जा.’

माझी वहिनी शुभांगी ही प्रत्येक लेख वाचते आणि ते कात्रण कापून ठेवते. तिनं असं ठरवलं आहे की, या डिजिटल जगात ५२ आठवडय़ांनंतर ती मला या लेखांची एक हार्ड कॉपी गिफ्ट करणार आहे!

माझा खूपच आवडता, सर्वागीण नट आणि प्रगल्भ व्यक्तिमत्त्व असलेला मित्र मकरंद अनासपुरेची प्रतिक्रिया अशी : ‘नाटकवाला उत्तम! Love You!’.. ‘आजचा ‘देववानर’ अप्रतिम! Love You!’

प्रेमानं खूपच जवळची वाटणारी नटी अमृता सुभाषनं लिहिलं होतं : ‘डार्लिग, आत्ताच वाचला लेख! खूप आवडला. दर वेळी वाचेनच. Your writing is like you are talking…  तू बोलतोस असंच वाटतं. त्यामुळे तुला भेटल्यासारखं वाटतं. So will keep meeting you every Sunday!’

अमृताची आई ज्योती सुभाष म्हणजे माझ्यासाठी आजच्या परिपूर्ण अदाकारा आहेत. मग ते नाटक, टीव्ही, चित्रपट कोणतंही माध्यम असो. त्यांनी मला २४ फेब्रुवारीला प्रतिक्रिया पाठवली : ‘तुझे लेख वाचत असते. आवडतात मला. आजच्या तुझ्या लेखातल्या रवी बासवानीच्या उल्लेखामुळे मलापण त्याची फार आठवण आली. ‘जाने भी दो यारो’च्या आधी मी दिल्लीत असताना बऱ्याचदा भेटलो होतो आम्ही. तुझ्यामुळे त्या गुणी आणि हसऱ्या मित्राची आठवण पुन्हा एकदा मनात जागी झाली.’

बीड, धुळे, पुणे, ठाणे, इचलकरंजी, सांगली, कोल्हापूर, औरंगाबाद आणि.. इथून प्रतिक्रिया पाठवणाऱ्यांना माझा नमस्कार. मला एक खंत अशी वाटते की, सगळ्याच नाटकांच्या पूर्ण स्क्रिप्ट्स आता माझ्याकडे नाहीत. काहींचे फक्त पहिले अंक आहेत, तर काहींचे पहिले ड्राफ्ट्स आहेत. पण प्रयत्न आहे की, जमतील तेवढी सगळी नाटकं एक दिवस पुस्तकरूपी आणेन.

मी स्वत: रंगकर्मी म्हणून नाटकं वाचणारा नाही, त्यापेक्षा ती बघणारा आहे. कारण नाटकाचा प्रयोग झाल्याशिवाय ते ‘नाटक’ नाही, असं मला वाटतं. लेखक-दिग्दर्शक आणि कधी कधी नट अशी तिहेरी भूमिका केल्यामुळे माझ्यासाठी नाटकाचा प्रयोग हेच नाटक!

‘अश्वविश्व’ हे नाटक लिहिण्याचं कारण अश्व आहे. मग तो राणा प्रतापचा चेतक असो वा शिवाजी महाराजांचा घोडा असो; आपल्या राजासाठी प्राण देणारे हे प्राणी नव्हेत, ही बलस्थानं आहेत. त्यांचं नुसतं स्मरण करूनही अंगात बळ आणि वेग अनुभवता येतो. हळदीघाटातलं युद्ध संपवून स्वत: जखमी असतानासुद्धा चेतकनं जखमी राणा प्रतापला आपल्या पाठीवर बसवून घाटापासून दूर सुरक्षित ठिकाणी नेलं आणि नंतरच आपले प्राण सोडले.

शिवाजी महाराजांनी केलेली सुरतेची लूट किंवा मोगलांबरोबर केलेल्या लढाया, उभे केलेले साम्राज्य, स्वराज्याची स्थापना या सर्वामध्ये त्यांच्या घोडदळाचा वाटा मोठा होताच. मोती, विश्वास, कृष्णा, इंद्रायणी, तुरंगी अशी काही त्यांच्या घोडय़ांची नावं होती. असंही वाचनात आलं की, शिवाजी महाराजांनी घोडय़ांच्या तबेल्यात गेल्यावर म्हटलं होतं-

‘यस्याश्वास्तस्य राज्यं।

यस्याश्वास्तस्य मेदिनी।।

यस्याश्वास्तस्य सौख्यं।

यस्याश्वास्तस्य साम्राज्यं।।’

याचा अर्थ असा की, माझ्याकडे हे जे स्वराज्य आहे, जे काही आनंदाचे क्षण आहेत ते या माझ्या घोडय़ांमुळेच आहेत.

नाटक लिहिताना मला अश्वाचं विश्व निर्माण करायचं होतं आणि तेही एका काल्पनिक गोष्टीत. एका तबेल्यात (अस्तंबल) त्याच्या मालकाच्या मुलाचा व घोडय़ाच्या मुलाचा जन्म एकाच दिवशी होतो आणि दोघांचं नशीब जोडलं जातं. मालकाचा मुलगा सारंग आग्नेय देशाच्या राजाचा सरसेनापती होतो आणि घोडा ऐरण हा सेतू देशाच्या सम्राटाचा सम्राट-अश्व बनतो. दोघं आपल्या राजाला लढाया जिंकून देतात.

एक दिवस दोन्ही योद्धय़ांचं नशीब बदलतं. सरसेनापती सारंगला त्याचा राजा त्याला मारण्याचा कट करतोय, हे कळल्यावर एका पावसाळी रात्री लाखी नावाच्या घोडीवर बसून सारंग सेतू देशात येतो. सेतू देशात सम्राट-अश्वाचा पुतळा निर्माण करण्यात येणार असतो. सारंगला कळतं, की तो मारला गेला आहे. सेतू देशाच्या राजाला सतत सात रात्री स्वप्न पडलेलं असतं, की एका अश्वाच्या पाठीवर त्याचा मृत्यू आहे आणि तो सम्राट-अश्व आहे.

आग्नेय देशाच्या राजाला त्याच्या ज्योतिषानं सांगितलेलं असतं की, त्याचा घात त्याचा सरसेनापती करेल. सारंग सेतू देशाच्या राजाला आपली कहाणी सांगतो आणि जर ही भविष्यवाणी खरी ठरणार असेल, तर तो म्हणतो की, ‘मी तुमच्या सेनेकडून लढून आग्नेय देशाच्या राजाला पराभूत करून त्याचं शीश घेऊन येईन.’ सेतू देशाची राजकुमारी कांक्षिणी सारंगच्या प्रेमात पडते. अश्व ऐरणच्या पुतळ्यासमोर घोडी लाखी रडते.

एक विलक्षण, दिव्यदृष्टी, विश्वास, विश्वासघात, प्रेम, कपटांचं नाटय़ घडतं. अश्व आणि अश्वावरती विजयी होणाऱ्या राजांची तेवढीच मोठी दु:खान्तिकाही होते.

‘अश्वविश्व’ काहींना क्लासिकल ग्रीक शैलीतलं, तर काहींना त्यातलं नाटय़ शेक्सपीअरन वाटलं. पण माझ्यासाठी ते आपल्या मातीतलं होतं. त्याचं दिग्दर्शन मी माझ्या कलादिग्दर्शकाला- टेडी मौर्याला करायला सांगितलं. नटांना दुहेरी भूमिका करायच्या होत्या. सरसेनापती सारंग आणि सम्राट-अश्व ऐरण अभिमन्यू सिंग या नटानं अद्भुत ऊर्जेनं केला. जणू काही त्याच्यात अश्वाचं बळ एकवटलं होतं. राजकुमारी कांक्षिणी आणि घोडी लाखी मोना आंबेगावकरनं फारच मोहक केली.

‘अश्वविश्व’चा प्रयोग मोठय़ा बागेत केला. त्या काळात ‘पृथ्वी थिएटर’ किंवा मोठय़ा ओपन जागेत मला नाटक करायला आवडायचं. असं वाटायचं की, एखादा काळ उभा करायला खराखुरा आजचा परिसर हवा. बागा, त्या बाजूच्या इमारती, गाडय़ांचे आवाज आणि नाटकात पाचशे वर्षांपूर्वीचा काळ..

जय अश्व! जय विश्व!

जय नाटक! जय वाचक!

mvd248@gmail.com