News Flash

कर्मयोगी

‘विज्ञानऋषी’, ‘मिसाइल मॅन’ अशी अनेक विशेषणे लाभलेले माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम हे या सगळ्यापलीकडे एक हृद्य माणूसही होते.

| July 27, 2016 03:13 pm

‘विज्ञानऋषी’, ‘मिसाइल मॅन’ अशी अनेक विशेषणे लाभलेले माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम हे या सगळ्यापलीकडे एक हृद्य माणूसही होते. त्यांना विविध क्षेत्रांतले अनेक मित्र होते. परंतु आपल्यापेक्षा बारा-तेरा वष्रे लहान असलेल्या प्रा. वाय. एस. राजन यांच्याशी असलेली त्यांची मैत्री आगळीच होती. विज्ञानातील सूत्रांपासून साहित्यापर्यंत अनेक गोष्टींवर ते त्यांच्याशी बोलत. तब्बल ५० वष्रे ही मैत्री जपणाऱ्या डॉ. कलाम यांच्याबद्दल या सुहृदाने सांगितलेल्या आठवणी..
मी आणि डॉ. कलाम आम्ही अगदी लहानपणापासूनचे मित्र असावेत असे अनेकांना वाटते. पण प्रत्यक्षात तसं नाहीए. डॉ. कलाम हे इस्रोमध्ये असताना त्यांच्यावर ‘एसएलव्ही’च्या निर्मितीची जबाबदारी सोपविण्यात आली होती. या प्रक्रियेचा एक भाग म्हणून ते अहमदाबादमधील फिजिकल रिसर्च लॅबमध्ये नेहमी येत असत. मी त्यावेळी अवघा २१ वर्षांचा होतो. लॅबमध्ये संशोधनाचे काम करत होतो. साधारणत: १९६५ मध्ये आमची पहिली भेट झाली. एकदा डॉ. कलाम नेहमीप्रमाणे लॅबमध्ये आले असता त्यांना माझ्याकडे पाहून काय वाटले माहीत नाही; पण त्यांनी मला मी संशोधन करत असलेल्या विषयाबद्दल काही प्रश्न विचारले. तेथून आमचा जो संवाद सुरू झाला तो शेवटपर्यंत कायम सुरू होता.
डॉ. कलाम यांच्या नेतृत्वाखाली भारतीय बनावटीच्या एसएलव्ही-३ चे १८ जुलै १९८० रोजी यशस्वी प्रक्षेपण झाले. अनेक अपयशानंतरचे हे पहिलेच यशस्वी प्रक्षेपण असल्याने या चमूत काम करणाऱ्यांना एक वेगळाच आत्मविश्वास त्यामुळे मिळाला. डॉ. कलाम यांना या कामगिरीसाठी १९८१ साली पद्मभूषण देऊन गौरविण्यात आले. १९६५ मध्ये आमची पहिली भेट झाल्यानंतरच्या काळात डॉ. कलाम थिरुवनंतपुरम येथील विक्रम साराभाई अंतराळ संशोधन केंद्रात काम करत होते. तर मी बेंगळुरूतील इस्रोच्या मुख्यालयात होतो. यादरम्यान कामानिमित्ताने आम्ही नियमित गप्पा मारायचो. त्यातून आम्ही खूप निकट आलो. विज्ञान तंत्रज्ञानावरून आम्ही कधी तामिळ कवी थिरुवल्लूवर आणि सुब्रमणिय भारती यांच्या कवितांबद्दल चर्चा करू लागलो, हे आम्हालाच कळले नाही. डॉ. कलाम यांचा साहित्याचा अभ्यास खूप दांडगा होता. मलाही त्यात रस असल्यामुळे आमची चांगली गट्टी जमली. ठरवून नव्हे, तर नकळत आम्ही इतके चांगले मित्र बनलो, की अनेकांना वाटू लागले की आम्ही बालमित्रच आहोत.
डॉ. कलाम यांचे काम बघून त्यांनी डीआरडीओमध्ये येऊन काम करावे अशी राजा रामण्णा यांनी इच्छा व्यक्त केली. त्यावेळी इस्रोमध्ये अनेक तज्ज्ञ वैज्ञानिक काम करत होते. परंतु डीआरडीओमध्ये संशोधन करणाऱ्या वैज्ञानिकांची मोठी पोकळी निर्माण झाली होती. ती भरून काढण्यासाठी डॉ. कलाम यांनी पुढे यावे असे रामण्णा यांच्याबरोबरच डीआरडीओचे माजी प्रमुख व्ही. एस. अरुणाचलम यांनाही वाटत होते. पण इस्रोचे तत्कालीन प्रमुख सतीश धवन यांना मात्र कलाम यांनी तेथे जाऊ नये असे मनापासून वाटत होते. काही मोजकेच लोक होते- जे कलामांना डीआरडीओचे आव्हान स्वीकारा असे सांगत होते. त्यात मीही होतो. कलाम यांनी तेथे जाऊन नवीन संशोधन करावे अशी माझी इच्छा होती. १९८२ मध्ये डॉ. कलाम यांनी ते आव्हान स्वीकारले आणि यशस्वीपणे पेललेही.
दरम्यानच्या काळात मला इस्रोमध्ये वैज्ञानिक सचिव होण्याची संधी मिळाली. त्यावेळी डॉ. कलाम यांच्याशी चर्चा करून इस्रोमधील अनेक अंतर्गत समस्यांवर मी तोडगे काढले. हाती घेऊ ते काम सर्वोत्तमच करायचे, हा त्यांचा खाक्या असल्याने त्यांनी डीआरडीओचा अक्षरश: कायापालट केला. तेथे त्यांनी क्षेपणास्त्रनिर्मितीचा कार्यक्रम आखला आणि त्यास गतीही दिली. तथापि एसएलव्ही प्रक्षेपणाचे यश असो वा डीआरडीओतील संशोधनाचे यश असो; डॉ. कलाम नेहमीच ‘माझ्यासोबत चांगला चमू होता म्हणूनच हे शक्य झाले,’ असे म्हणत. पुढे ते डीआरडीओचे महासंचालकही झाले. तरीही आमच्या संवादात कधीच खंड पडला नाही. १९९८ मध्ये ‘टेक्नॉलॉजी इन्फर्मेशन, फोरकास्टिंग अॅण्ड अॅसेसमेंट कौन्सिल’ (टीआयएफएसी) ची स्थापना झाली. तिथे पुन्हा आम्हाला एकत्र काम करण्याची संधी मिळाली.
‘इंडिया व्हिजन २०२०’
डॉ. कलाम यांच्यासोत विज्ञान, तंत्रज्ञान आणि साहित्यच नव्हे, तर देशाचा विकास आणि आदर्श देश कसा असावा, या विषयांवरही आमची चर्चा होत असे. ज्यावेळेस आम्ही भारताच्या विकासाचा विचार करायला सुरुवात केली त्यावेळी भारताची परिस्थिती आजच्यापेक्षा खूपच वेगळी होती. अनेक क्षेत्रांमध्ये देश मागे होता. २०२० मध्ये भारत विकसित देश म्हणून उदयास यावा, हे स्वप्न डॉ. कलाम उराशी बाळगून होते. त्यादृष्टीने त्यांचा अभ्यास सुरू होता. या अभ्यासात त्यांनी मलाही सहभागी करून घेतले. नुसते स्वप्न पाहण्यापेक्षा ते प्रत्यक्षात साकारायचे कसे, याचा आराखडा आपण तयार केला पाहिजे हा त्यांचा आग्रह असे. त्यामुळे यासंबंधीच्या पुस्तकात आम्ही अगदी पंचायत राजमध्ये काम कसे होऊ शकते, इथपासून ते केंद्र सरकार आणि उद्योगांच्या विविध जबाबदाऱ्यांवर प्रकाश टाकला होता. दोन वर्षांच्या अभ्यासांती १९९८ मध्ये हे पुस्तक प्रकाशित झाले. त्यावेळचा त्यांचा आनंद अवर्णनीय होता. डॉ. कलाम कधीच निवृत्त झाले नाहीत. एक काम संपले की दुसरे काम त्यांनी हातात घेतलेच म्हणून समजा. राष्ट्रपती झाल्यानंतर ते ‘इंडिया व्हिजन २०२०’ ही मोहीम सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यात यशस्वी झाले. ते राष्ट्रपती असतानाही आम्ही दिवसातून किमान एकदा तरी बोलायचोच. डॉ. कलाम यांनी माझ्यावर एक कविताही केली आहे. ही कविता म्हणजे आमच्या मैत्रीची अमूल्य अशी आठवण आहे. ‘इंडिया व्हिजन २०२०’सह अन्य पुस्तकांमध्येही मला डॉ. कलाम यांचा सहलेखक होता आलं हे मी माझं भाग्यच समजतो.
‘इंडिया व्हिजन २०२०’ या पुस्तकातील सर्व गोष्टी प्रत्यक्षात उतरतीलच असे नाही. परंतु त्याचे काही परिणाम हळूहळू दिसू लागले होते. देशाच्या प्रगतीचा सद्य:आलेख लक्षात घेता विकसित देश होण्यासाठी २०२० सालानंतर काय करावे लागेल, हे सांगणे डॉ. कलाम यांना आपले कर्तव्य वाटले आणि त्यांनी ‘बियाँड २०२०’ या पुस्तकाच्या कामाला सुरुवात केली. त्यातही मी सहभागी झालो. २०१४ साली हे पुस्तक प्रकाशित झाले तेव्हाही कलाम यांच्या चेहऱ्यावर तोच निखळ आनंद तरळत होता.
डॉ. कलाम यांच्या निधनाचे वृत्त समजले तेव्हा माझा त्यावर विश्वासच बसत नव्हता. दोनच दिवस आधी आमचा संवाद झाला होता. शनिवारी ते दिल्लीत माझी दोन्ही मुलं आणि नातवंडांना भेटून आले होते. तसेच माझ्या पत्नीशीही ते फोनवरून बोलले. तिला म्हणाले, ‘ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये मी तुमच्या घरी जेवायला येईन.’ डॉ. कलाम आमच्या घरी अनेकदा जेवायला येत. त्यांना दक्षिण भारतीय जेवण खूप आवडत असे. घरी आले की माझ्या पत्नीला नेहमी म्हणत असत की, ‘थोडा तिखा बनाओ.’
विज्ञान, तंत्रज्ञान, साहित्य यांच्या पलीकडे एक माणूस म्हणूनही कलाम आदर्शच होते. लहान मुलं हा त्यांचा आवडीचा विषय. कुठेही लहान मुलं दिसली की ते तेथे रमत असत. माझ्या घरी माझ्या मुलांना त्यांनी खेळवलं. आता नातवंडांनाही ते खेळवत असत. हाती घेऊ ते काम अत्यंत प्रेमाने आणि सचोटीने करण्याची त्यांची पद्धत होती. ते सतत कुठल्या ना कुठल्या विचारांत असत. मग तो साहित्याबद्दलचा असेल वा देशासमोरील एखाद्या गहन प्रश्नाबाबतचा! भविष्यातील घडामोडींची चाहूल घेण्याचा त्यांचा नेहमी प्रयत्न असे. त्यांना ज्यावेळी राष्ट्रपतीपदासंबंधात विचारण्यात आले तेव्हा त्यांच्या निकटवर्तीयांना त्यांनी हे पद स्वीकारू नये असे वाटत होते. पण त्यांनी त्यांचे न ऐकता राष्ट्रपतीपद स्वीकारले आणि त्या पदाला एक नवीनच झळाळी दिली. म्हणूनच मला नेहमी वाटते की डॉ. कलाम हे खरेखुरे कर्मयोगी आहेत.
शब्दांकन : नीरज पंडित -niraj.pandit@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 2, 2015 1:59 am

Web Title: prof ys rajan memory of dr apj abdul kalam
Next Stories
1 उडाला तर कावळा, बुडाला तर बेडूक
2 तो प्रवास सुंदर होता..
3 माणसामाणसांमधलं अंतर
Just Now!
X