जनतेत संयम उरलेला नाही..

‘लोकरंग’मधील (१० मार्च) ‘अवघड प्रश्नाला सोपे उत्तर!’ हा संकल्प गुर्जर यांचा लेख वाचला. पुलवामा हल्ल्याच्या पाश्र्वभूमीवर पाकिस्तानवर हवाई हल्ला का केला? स्वातंत्र्योत्तर काळातील सरकारांची ‘ठेविले अनंते तैसेचि राहावे.. चित्ती असू द्यावे समाधान’ असा पवित्रा सध्याच्या सरकारने का ठेवला नाही? हा या लेखाचा सूर आहे.

२००८ साली झालेल्या पाकपुरस्कृत हल्ल्याच्या पाश्र्वभूमीवर तत्कालीन भारत सरकारने संयमित वागून पाकिस्तानवर राजनैतिक दबाव वाढवल्यामुळे त्याला एकटे पाडले, दहशतवादविरोधी पावले उचलण्यासाठी भाग पाडले, असा एक अनाकलनीय शोध लावला आहे. तो माझ्यासारख्या सर्वसामान्याला अजिबात समजलेला नाही. कारण तत्कालीन भारत सरकारच्या काळात पाकिस्तानने सालाबादप्रमाणे दहशतवादी हल्ले करणे, लष्करी जवानांचे मुंडके उडवून अधिकृतरीत्या सरकारला परत पाठवणे व त्या बदल्यात आपण नेभळटासारखे निषेध व्यक्त करणे, एवढेच आमच्या बघण्यात आले आहे.

पुलवामा हल्ल्याकडे आंतरराष्ट्रीय समुदायाचं दुर्लक्ष केवळ भारताने प्रतिक्रियात्मक हवाई हल्ला केला म्हणून झालं, असं विधान लेखकानं केलं आहे. परंतु कधी नव्हे तो प्रचंड आंतरराष्ट्रीय समुदायाचा पाठिंबा दहशतवादविरोधासाठी एकवटू शकलो, हे माझ्यासारख्या सर्वसामान्याने अनुभवले व पाहिले आहे. लेखक एकीकडे म्हणतात, राजकीय नेतृत्वाला लष्कराला सर्वाधिकार देता येत नाही.. ते नेतृत्वानेच घ्यायचे असतात. बरोबर आहे. पण मग ते घेतल्यावर आपणच टीका करणार. बरं, लष्कराला सर्वाधिकार म्हणजे त्यांना जी कारवाई करणे योग्य वाटते ती करण्याची मुभा देणे. जी पूर्वीच्या सरकारांनी कधी दिली नव्हती.

थोडक्यात, भारतीय जनमानसात आता संयम राहिला नसून तो नैसर्गिक न्यायाच्या दृष्टीने योग्यच म्हटला पाहिजे.

– सुहास जी. जोशी, मुंबई</p>

प्रश्न गहन आहे; पण..

‘पुलवामा हल्ल्यानंतर पुढे काय?’ हा अनिकेत साठे यांचा लेख वाचला. कधी कधी आपण प्रश्न गहन आहे म्हणून इतके सखोल विचारमंथन करत बसतो, की तसे करताना प्रत्यक्षात त्या प्रश्नाचे मूलस्वरूप किती साधे-सोपे आहे याकडेच दुर्लक्ष होते.

एक काळ होता, जेव्हा मुंबईसारखे शहर अगदी स्वच्छ होते. बकालपणा, उघडी गटारे जवळजवळ नव्हतीच. मग विविध कारणांनी आणि ‘महानगरपालिकेच्या कृपेने’ बकालपणा वाढत गेला. अस्वच्छता वाढल्यामुळे ‘म्युनिसिपालिटी स्पॉन्सर्ड’ डासांचा त्रास खूपच वाढत गेला. शहर बकाल होऊ  नये म्हणून महापालिकेला विनवणे, धमकावणे हे सामान्य माणसाच्या हातात नव्हते. घराजवळील डासांच्या उत्पत्तीस्थानावर ‘सर्जिकल स्ट्राइक’ करून ती नष्ट करणे हेही अशक्यच होते. जगाकडून महापालिकेवर दबाव आणून त्यांना स्वच्छता प्रस्थापित करायला लावावी असा विचार सामान्य माणसांनी केला नाही. त्यांनी घराच्या खिडक्या-दारे प्रथम डासांच्या जाळ्या लावून बंद केली; जेणेकरून हवा तर मिळेल, पण डास येणार नाहीत. इतके करूनही काही डास घरात येणारच, हे गृहीत धरून रोज न चुकता संध्याकाळी एखादी अगरबत्ती वा अंगाला एखादे मलम न चुकता लावायला सुरुवात केली. टीव्ही बघत बसताना डासांची रॅकेट जवळच ठेवायला सुरुवात केली. झोपेत बेसावध असताना डास चावू नयेत म्हणून मच्छरदाणीचा नियमित वापर सुरू केला.

हे सर्व अत्यंत काटेकोरपणे केल्यामुळे सामान्य लोकांनी डासांचा प्रश्न त्यांच्यापुरता सोडवला आहे- आणि तोही जगाकडून वा महापालिकेकडून कसलीही अपेक्षा न ठेवता! त्यांनी दोन गोष्टी मात्र प्रकर्षांने केल्या- पहिले म्हणजे, रोजच्या दिनक्रमातील वर उल्लेख केलेल्या शिस्तीत ढिसाळपणा येईल असे वर्तन घरातील कोणाकडूनही खपवून घेतले नाही. आणि दुसरे म्हणजे, घरात डास जास्त झाले म्हणून त्यांना मारण्याकरता घरच जाळून टाकले नाही. सुज्ञांस अधिक सांगणे न लगे!

– प्रसाद दीक्षित, ठाणे</p>

आर्थिक लाभ, की अन्यही हेतू?

‘लोकरंग’मधील (१० मार्च) ‘चरित्रपट की विडंबनपट?’ हा ‘भाई : व्यक्ती की वल्ली’ या चरित्रपटावरील लेख एक फार महत्त्वाचा प्रश्न अधोरेखित करतो. तो म्हणजे, आजच्या मराठी दृक्श्राव्य माध्यमातील सारे कलाकार (यात दिग्दर्शकही अर्थातच आले.) त्यांच्या कलेशी प्रामाणिक असतात का? दुर्दैवाने याचे उत्तर ‘नाही’ असेच येते. बहुतांश कलाकार केवळ त्या कलेतून प्राप्त होणाऱ्या आर्थिक लाभाचेच भुकेले असतात, असे नाइलाजाने म्हणावे लागेल. म्हणूनच ते कलेशी प्रामाणिकतेचा कितीही जाहीर उदोउदो आणि वल्गना करत असले तरी त्यांचे उद्दिष्ट केवळ अर्थप्राप्ती हेच असते. त्यामुळेच ‘भाई : व्यक्ती की वल्ली’सारखे चित्रपट तयार केले जातात. या चित्रपटात पैसे मिळवण्याव्यतिरिक्तही काही हेतू मनात ठेवून असे चारित्र्यहनन केले गेले, अशी संबंधितांची शंका रास्त वाटते.

– प्रकाश मधुसूदन आपटे

दिग्दर्शकाने नक्की काय साधले?

‘लोकरंग’मधील (१० मार्च) ‘चरित्रपट की विडंबनपट?’ हा पुलं-सुनीताबाईंच्या निकटवर्तीयांनी लिहिलेल्या त्यांच्या ‘भाई : व्यक्ती की वल्ली’ या चरित्रपटावरील आक्षेप मांडणारा लेख वाचला. खरे तर पुलंची जन्मशताब्दी म्हणजे जुन्या पिढीने (ज्यांनी पुलंना अनुभवले) त्यांच्या साहित्यातून मिळवलेला आनंद पुढील पिढीकडे सोपवण्याची सुवर्णसंधी! परंतु ती सुवर्णसंधी या त्यांच्यावरील अभ्यासविरहित चरित्रपटाने केवळ ‘पुलं’ या नावावर गल्ला भरण्याच्या उद्देशाने घालवली असे वाटते. पुलंचे विपुल उपलब्ध साहित्य, माहिती व त्यांना जवळून अनुभवलेले निकटवर्तीय असूनही त्यांना चुकीच्या पद्धतीने दाखवले गेले, हे अनाकलनीयच आहे.

महाराष्ट्रीयांना आपल्या कलेतून हस्ते भरभरून आनंद देणाऱ्या व साहित्यातून मिळवलेल्या अर्थातूनच गरजूंना भरघोस हातभार लावणाऱ्या या वल्लीचे व्यक्तिमत्त्व त्यांच्याच जन्मशताब्दी पुढील पिढीस अत्यंत बेजबाबदारीने व चुकीच्या प्रकारे दाखवून नक्की कोणती उतराई केली? संपूर्ण महाराष्ट्राला अभिमान असणाऱ्या या साहित्यिक जोडप्याने राजकीय आणीबाणीतही अभिव्यक्तिस्वातंत्र्यासाठी लढा दिला. आता त्याचीच ढाल पुढे करत पुढील पिढीसाठी त्यांचे व्यक्तिमत्त्व निष्काळजीपणे आणि अपरिपक्वतेने दाखवून या मराठी दिग्दर्शकाने नक्की काय साधले?

– प्रवीण आंबेसकर, ठाणे

मग वैचारिकता कशी जोपासणार?

गिरीश पांडुरंग कुलकर्णी यांच्या ‘बहरहाल’ या सदरातील ‘गोरोबाचं गाडगं’ हा लेख म्हणजे सर्वसामान्य व्यक्तींची कथा अन् व्यथा! आधुनिक काळात धावपळीच्या आणि ताणतणाव घेऊन जगणाऱ्या जीवनात अनेक साध्या साध्या प्रश्नांची उत्तरे कठीण बनली आहेत. माणुसकी, नीतिमूल्ये यांच्या चौकटीत, सरळमार्गी जगण्यात सुखदु:खे सहन करीत मागची पिढी तरून गेली. आता मात्र माहितीचा स्फोट झालेल्या जगात मनातील विचारांचा गोंधळ, सामाजिक आणि वैयक्तिक जगण्यातील असंख्य विसंगती आणि अनेक गुंत्यांची सोडवणूक करताना होणाऱ्या तगमगीला सामोरे जावे लागते. घडणाऱ्या घटनांना प्रतिक्रिया देताना कोणाला काय वाटेल? उच्च विचारसरणी वगैरे गोष्टी कशा पेलणार? प्रपंच कठीण होताना वैचारिकता कशी जोपासणार?

– प्रफुल्लचंद्र काळे, नाशिक