आपले आयुष्य अधिक समृद्ध होत जाते ते थोरामोठय़ांच्या सहवासाने! त्यांच्याशी निगडित आठवणी कायम मनाच्या कुपीत बंद करून त्यांचे आयुष्यभर स्मरण करावे आणि आपली ओंजळ अधिकाधिक समृद्ध होत जावी, असेच काहीसे असते. रमेश उदारे यांच्याही बाबतीत असेच झाले आहे. त्यांना साहित्य सहवासात राहण्याचा योग आला आणि मराठी साहित्यातील दिग्गज साहित्यिकांचा सहवास त्यांना लाभला. त्यांना अनेक साहित्यिकांचे प्रेम मिळाले. त्यातूनच लेखकाच्या अनुभवांची ओंजळ कशी समृद्ध होत गेली, याची कहाणी म्हणजेच ‘साहित्य सहवास’ हे पुस्तक होय. या पुस्तकात त्यांना ज्या साहित्यिक, पत्रकारांचा सहवास लाभला त्यांच्याप्रति आपली कृतज्ञता व्यक्त करणारे हृद्य लेखन त्यांनी केले आहे.

साहित्य सहवासात तसेच इतरत्रही अनेक मराठी साहित्यिक, कवी, पत्रकारांचा सहवास लेखकाला लाभला. त्यांचे प्रेम मिळाले. या साहित्यिकांमध्ये पु. भा. भावे, विद्याधर गोखले, वि. वा. शिरवाडकर, पु. ल. देशपांडे, श्री. ना. पेंडसे, विजया राजाध्यक्ष, मंगेश पाडगांवकर, व. पु. काळे, सुभाष भेंडे अशांचा समावेश आहे. लेखकाच्या या मनोगतातून त्या- त्या लेखकाची स्वभाववैशिष्टय़े अधोरेखित होत जातात. संबंधित साहित्यिकांचं व्यक्तिमत्त्व वाचकांसमोर अलगदपणे उभं राहतं. त्याचप्रमाणे लेखक व त्यांच्या सहवासात आलेल्या साहित्यिक मंडळींतील एक अलवार नातं उलगडत जातं. त्यातील सहृदयता जाणवते. या मान्यवरांचा सहवास लेखकाचा जीवनानुभव समृद्ध करणारा आहे आणि म्हणूनच लेखकाच्या मनात त्यांच्याविषयी कृतज्ञभाव आहे. तो पुस्तकात वाचकाला पदोपदी जाणवतो.
‘साहित्य सहवास’- रमेश उदारे, अनघा प्रकाशन,
पृष्ठे- १४६,
किंमत- १७० रु. ल्ल