विकासाच्या दृष्टीने मागास राहिलेल्या नागपूरमध्ये अनेक लोकोपयोगी महत्त्वाचे प्रकल्प आणणारे नरसिंह राव यांच्यासारखे लोकप्रतिनिधी मिळणे हे मतदारांसाठी भाग्याचेच लक्षण होते. इतकी प्रचंड विकासकामे करणाऱ्या नरसिंह राव यांना नागपूर ग्रामीण जिल्हा

काँग्रेस कमिटीने काय बक्षिसी द्यावी? १९८९ सालच्या सार्वत्रिक निवडणुकीत ‘आम्हाला बाहेरचा उमेदवार नको’ असा प्रस्ताव पास करून त्यांनी दिल्लीला पाठवला..

..आणि मला साक्षात्कार होऊ लागला, की आपल्यामध्ये कर्तृत्वाचे अनेक सुप्त गुण आहेत आणि त्यास चालना देण्याचे काम पी. व्ही. नरसिंह राव आणि त्यांचे खासगी सचिव रामू दामोदरन सतत करीत आहेत.

नरसिंह रावांचा मतदारसंघाचा पहिलाच दौरा होता. खासगी सचिवांनी मला बोलावून (राव हे संरक्षणमंत्री असल्याने) वायुसेनेच्या संबंधित अधिकाऱ्यांशी बोलून प्रवासाकरता विमानाच्या व्यवस्थेची निश्चिती करण्यास सुचवले. दोन तासांनी मी संबंधितांशी बोलणे झाल्याचे त्यांना सांगितल्यावर त्यांनी पुढील व्यवस्था करण्यास मला सांगितले. तेव्हा मी ती आधीच केल्याचे त्यांना सांगून टाकले. त्यांना आश्चर्य वाटले. त्यानंतर मात्र त्यांनी राव यांच्या दौऱ्याच्या कामात लक्ष न घालता ती सर्व जबाबदारीच माझ्यावरच टाकली.

काही दिवसांनी त्यांनी संसद सदस्यांनी आपल्या पत्रासोबत पाठवलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांच्या निवेदनावर मंत्रालयाने घेतलेल्या निर्णयाच्या फाइल्स संरक्षणमंत्र्यांकडे जाण्यापूर्वी ‘एक्झामिन’ करण्यासाठी माझ्याकडे पाठविण्यास सुरुवात केली. खरं तर आजवर एकही फाइलच काय, तिच्यावरचा साधा बंधही मी कधी सोडला नव्हता; त्या मला पूर्ण फाइलचे दर्शन होणे हे भाग्याचेच लक्षण नव्हे का? शिवाय आजपर्यंत मी इंग्रजीत कधीच नोट्स लिहिल्या नसल्यामुळे माझे इंग्रजीही बेताचेच होते. या सत्त्वपरीक्षेत उत्तीर्ण व्हायचे असेल तर अधिक वेळ खर्च करण्याची गरज होती. म्हणून मग मी दर रविवारी साडेदहा वाजता जेवणाचा डबा आणि कॉफी घेऊन ऑफिसला जाऊ लागलो. सायंकाळी पाचपर्यंत बहुतेक सर्व फाइल्स ‘एक्झामिन’ करून मी त्यावर नोट्स तयार करीत असे. घरी जाताना या नोट्स मी सोबत नेत असे आणि माझ्या शेजारी राहत असलेल्या एका सरकारी अधिकाऱ्यास त्या नोट्स वाचून इंग्रजीच्या दृष्टीने आवश्यक त्या सुधारणा करण्यास सांगत असे. दुसऱ्या दिवशी त्या पी. ए.ला टाईप करावयास सांगून ती फाइल खाजगी सचिवांमार्फत मंत्र्यांकडे जात असे. या फाइलींचा बारकाईने अभ्यास करून मी अनेक सरकारी कर्मचाऱ्यांना मंत्रालयाच्या निर्णयाच्या विरुद्ध जाऊन योग्य तो न्याय मिळवून दिला. माझे बहुतेक सर्व रविवार मात्र त्यासाठी खर्च करावे लागले होते. पण यामुळे माझी इंग्रजी भाषा सुधारत गेली. मनात मात्र एक विचार आजही येतो, की फाइलवर नोटिंग करणारा कर्मचारी सरकारी असूनही एका सरकारी कर्मचाऱ्याला त्याच्या खिशातून काही जात नसताना न्याय का देत नाही? ही प्रथा मला वाटते आजही तशीच सुरू आहे.

काही दिवसांनंतर मात्र खाजगी सचिवांनी माझ्याकडून गेलेल्या फाइल्स न वाचता सरळ मंत्र्यांकडे पाठवण्यास सुरुवात केली. ते स्पष्ट सांगत, की खांडेकरांनी फाइल पाहिली म्हणजे त्यात बदल करण्यास वावच नसतो.

मतदारसंघाच्या तिसऱ्या दौऱ्यात- म्हणजे माझ्या नियुक्तीनंतर दोन महिन्यांनी मतदारसंघातील कार्यक्रमासाठी नागपूरला गेलो असताना नरसिंह राव यांच्या प्रयत्नांनी सुरू करण्यात येणाऱ्या लिंबूवर्गीय संशोधन केंद्रासाठी कलेक्टरांच्या सल्ल्याने जी जमीन सुचवण्यात आली होती ती डिफेन्सच्या ताब्यात होती आणि ती या प्रोजेक्टसाठी देणे शक्य होते. नरसिंह राव संरक्षणमंत्री असल्यामुळे औपचारिकता म्हणून फक्त संरक्षण मंत्रालयाची परवानगी हवी होती व हे प्रकरण त्यांच्या विचाराधीन होते. नरसिंह रावांनी मला दिल्लीला गेल्यावर खाजगी सचिवांना संरक्षण मंत्रालयाच्या सचिवांकडे याबाबत चौकशी करण्यास सांगा, अशा सूचना दिल्या. दिल्लीला गेल्यावर मी नरसिंह रावांची ती सूचना एक नोट लिहून खाजगी सचिवांच्या कानावर घातली. अशा वेळी इतर खाजगी सचिवांनी निश्चितपणे स्वत:च चौकशी करून रावांना सांगितले असते. आयएएस खाजगी सचिवांच्या अहंला झक्का लागतो. राजकारणातलीच रीत प्रशासनातही असते. आपल्या अधीनस्थ अधिकारी डोईजड होऊ नये वा मंत्र्यांच्या जवळ जाऊ नये अशीच इच्छा बहुतेक खाजगी सचिवांची असते. ते फारसे आयएएस अधिकारी वगळता इतरांमध्ये मिसळत नाहीत. परंतु परस्परांना मात्र कोणतीही मदत करण्यात सदा तत्पर असतात. म्हणूनच त्यांची बदली कुठेही होवो; त्यांना काहीच अडचण येत नाही. पण रावांच्या खाजगी सचिवांनी त्यावर काय लिहिले माहीत आहे? ‘व्हॉट इज दी यूज ऑफ अ‍ॅडिशनल प्रायव्हेट सेक्रेटरी?’ अशी अपेक्षा नसलेल्या मला धक्काच बसला. मी त्यांच्याकडे जाऊन म्हटले, ‘सर, सचिवांशी मी कसा बोलणार?’ ते म्हणाले, ‘उस में क्या है? मंत्रीजी ने कहा है ना? ये मेरा काम नहीं है!’ आजपर्यंत अंडर सेक्रेटरीकडे जाऊन मी कोणत्याही कामासाठी कधी एक शब्दही बोललो नव्हतो, तिथे सेक्रेटरीकडे जाण्याचे धाडस मला होईना. रोज सकाळी ऑफिसात गेलो की आपल्या खोलीत जाऊन खुर्चीवर बसणे, लंच टाइममध्ये पाय मोकळे करण्यासाठी अर्धा तास बाहेर जाऊन मित्रांसोबत चक्कर मारून येणे, ऑफिस संपले की सायकल स्टँडवर जाऊन आपली सायकल घेऊन घरी जाणे.. याव्यतिरिक्त मी कधीही कोणाच्या खोलीत जाऊन कोणाशी बोललो नव्हतो. त्यामुळे पहिल्यांदाच नाइलाजास्तव सेक्रेटरींकडे जाऊन मंत्र्यांचा निरोप दिला. त्यांनी ताबडतोब चौकशी करून तासभरात माझ्याकडे संरक्षणमंत्र्यांसाठी एक नोट पाठवली. नंतर नरसिंह रावांनी सांगितले तर मी अन्य मंत्र्यांना भेटून संबंधित कामाची चौकशी करू लागलो. यानंतर खाजगी सचिव एकेक काम माझ्याकडे सोपवू लागले, हे मात्र खरे. माझ्या आयुष्यात हे एक मोठेच स्थित्यंतर नरसिंह रावांकडे आल्यामुळे झाले होते. माझ्यातील सुप्त गुणांचा परिचयही त्यातून होत गेला.

मी स्टाफ कार न वापरता सायकलवरून येणे-जाणे करतो, हे पाहून तर दोघांनाही माझ्या साध्या राहणीचे आश्चर्य वाटले. मतदारसंघाच्या पहिल्याच दौऱ्यात नागपूरला गेलो असताना नरसिंह रावांबरोबर मला पाहून अनेकांनी प्रसन्नता व्यक्त केली. कारण मी तत्पूर्वी मंत्र्यांबरोबर अनेकदा नागपूरला गेलो असल्याने आणि मी नागपूरचाच असल्यामुळे सर्वजण मला चांगले ओळखत होते. खांडेकरांमुळे यापुढे आपल्या कामासाठी थेट मंत्र्यांपर्यंत जाण्याची गरज भासणार नाही याचा त्यांना जास्त आनंद झाला होता. त्यांची ही प्रतिक्रिया पाहून नरसिंह रावांना आश्चर्यच वाटले. पहिल्या तीन-चार दौऱ्यांतील माझ्या कामाची पद्धत, लोकांशी मिळूनमिसळून वागण्याचा स्वभाव व मतदारांच्या अडचणी लक्षात घेऊन त्या सोडवण्यासाठी करत असलेले प्रयत्न यामुळे त्यांनी मतदारसंघातील लहानसहान बाबींची जबाबदारी माझ्याकडेच सुपूर्द केली. मतदारांनाच नव्हे, तर नरसिंह रावांशी सतत संपर्कात असणाऱ्या राज्यातील मंत्र्यांनाही या गोष्टीचं नेहमीच आश्चर्य वाटे, की नरसिंह रावांकडून प्रत्येक पत्राला तातडीने उत्तर जात असे. मतदारांमध्ये त्यामुळे एक विश्वासाची भावना निर्माण झाली होती. ते म्हणत, ‘पोस्टात पत्र टाकून घरी पोहोचत नाही तोच रावांकडून त्या पत्राचे उत्तर आलेले असायचे.’ पत्र- मग ते कसेही असो; दोन दिवसांत त्याचे उत्तर गेलेच पाहिजे असा रावांचा कटाक्ष असे.

आता नागपूरला परत येऊन दहा वर्षे लोटली आहेत. नुकताच एका भूमिपूजन समारंभासाठी गेलो असता पूजेसाठी आलेल्या गुरुजींशी माझा परिचय झाला. तेव्हा ते म्हणाले, ‘तुमच्या सहीचे पत्राचे उत्तर आजही माझ्या संग्रही आहे.’ लोकप्रतिनिधीचे केवळ हेच काम नसते, तर लोकांच्या महत्त्वाच्या गरजांकडेही त्याने लक्ष देण्याची गरज असते. नरसिंह रावांचा मतदारसंघ असा होता- की नागपूर हे त्याचे मध्यवर्ती ठिकाण होते, पण नागपूर ग्रामीण (रामटेक) मतदारसंघ त्याच्या आजूबाजूला पसरलेला होता. त्यामुळे रात्री मुक्कामास नागपूरलाच यावे लागे. दोन-तीन दौऱ्यांनंतर त्यांच्या लक्षात आले की राज्याची उपराजधानी असलेले नागपूर हे सुशिक्षित लोकवस्तीचे ‘शहर’ नसून एक ‘गाव’च आहे. कापडाच्या मिल बंद झाल्यानंतर इथे एकही मोठा उद्योगधंदा आलेला नव्हता. ग्रामीण भागात उच्च शिक्षणाची सोय नव्हती. याचे त्यांना नुसते आश्चर्यच वाटले नाही, तर धक्काच बसला. ज्या अर्थी इथे आतापर्यंत या गोष्टी झालेल्या नाहीत, त्याचा अर्थ येथील ज्यांना शक्य आहे त्यांना यात फारसा रस दिसत नाही हे त्यांच्या लक्षात आले.

आंध्रमध्ये अनेक वर्षे राजकारणात, सत्तेवर राहिल्यामुळे त्यांचे तेथील लोकांशी, विशेषत: उद्योगपतींशी चांगले संबंध होते. नरसिंह राव साधे, सरळ व प्रेमळ स्वभावाचे गृहस्थ होते. राजकारणात असूनही कुठलंही राजकारण न करता जनतेच्या हिताचीच कामं ते करत. त्यांनी आपल्या अशाच एका परिचितास रामटेकला इंजिनीअरिंग कॉलेज सुरू करण्यास सांगितले. रामटेक हे तहसीलचे ठिकाण होते. तर अन्य एका उद्योगपतीस नागपूर जिल्ह्य़ातील कन्हान नदीच्या काठावर पॉलिएस्टर कारखाना काढण्यास सुचविले. या कारखान्याच्या उद्घाटनाच्या वेळी एमआयडीसीचे अध्यक्ष आले होते. त्यांनी आपल्या भाषणात ‘हे काम मराठी माणसाने सुरू केले असते तर खचितच अधिक आनंद झाला असता,’ अशी खंत बोलून दाखवली होती. विदर्भात त्याकाळी २५० कोटींचा हा पहिलाच कारखाना होता. नंतर इथे आंध्रमधील एका उद्योगपतीचा अ‍ॅल्युमिनियमचा कारखानाही आला. आणि आता एनटीपीसीचे मोठे कार्यालयही इथेच आहे. थोडक्यात, मौदा हे उद्योगाचे केंद्र झाले आहे- ज्याचे जनक आहेत नरसिंह राव!

मराठी माणसाने विचार करावा अशा आणखी एका गोष्टीचा इथे उल्लेख करावासा वाटतो. त्याचा कुणी गैर अर्थ मात्र काढू नये. रामटेकच्या आजूबाजूची बरीच शेती आंध्रमधील लोकांनी विकत घेऊन ते आता वर्षांतून दोनदा, कधी कधी तीनदा पिके काढतात. आमचा शेतकरी मात्र आजही एकच पीक घेतो. याखेरीज नागपूरपासून अवघ्या २० कि. मी.वर असलेल्या कळमेश्वर इथे इस्पातचा मोठा कारखाना सुरू करण्यासाठी नरसिंह राव यांनी प्रोत्साहन दिले. एवढंच नाही, तर दुसऱ्या राज्यात जाणारं जपानकडून भेट मिळालेलं ‘कॅट स्कॅन’ मशीन नागपूर मेडिकल कॉलेजला त्यांनी मिळवून दिलं. तसंच देशभरात केवळ सहाच ठिकाणी सुरू करण्यात येणारे ‘रामन सायन्स सेंटर’ नागपुरात सुरू करण्यात त्यांना यश मिळालं. याचं एक केंद्र अगोदरच मुंबईत सुरू करण्यात आलं होतं. त्यावेळचे मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील-निलंगेकर यांच्या सहकार्याने हे केंद्र नागपूरच्या मध्यवर्ती भागात सुमारे चार एकर जागेत वसलेले आहे. या ठिकाणी शुक्रवार तलावाचा भाग होता. त्यातील पाणी नागपूरमधील एम्प्रेस या कापडाच्या मिलला पुरवले जात असे. ही मिल बंद झाल्याने हा तलाव बुजवण्यात येत होता. त्याच सुमारास मी काही सरकारी कामासाठी इथे आलो असताना ही जागा पाहिली होती आणि नरसिंह रावांना ती सुचवली होती. आज असंख्य विद्यार्थी या केन्द्राचा लाभ घेत आहेत. राजकारण्यांच्या दृष्टीने नसेल, परंतु जनतेच्या व विद्यार्थ्यांच्या दृष्टीने ते अतिशय महत्त्वाचे शैक्षणिक केन्द्र झाले आहे.

याशिवाय आंध्रमध्ये जाणारे दक्षिण मध्य सांस्कृतिक केंद्रसुद्धा नागपुरात आणण्यात राव यांना यश मिळाले. आज या केंद्रातर्फे होणाऱ्या अनेक सांस्कृतिक, कला, संगीत, लोकसंगीतादी कार्यक्रमांना लोकांचा उत्तम प्रतिसाद लाभतो. थोडक्यात सांगायचे झाले तर कोणतीही प्रसिद्धी न करता सुरू केलेली ही कामे मधेच बंद न पडता प्रगतिपथावर राहिली याचे कारण नरसिंह राव सतत या कामांचा आढावा घेत असत. अशी कामे लोकप्रतिनिधी तेव्हाच करू शकतो, जेव्हा तो द्रष्टा असतो. या सर्व गोष्टी त्यांच्या मानव संसाधन विकास मंत्रालयाच्या अधीन होत्या. या सर्व प्रकल्पांची उभारणी नरसिंह राव यांनी केवळ पाच वर्षांत केली. खेदाची गोष्ट म्हणजे राजकारणातील लोकांना मात्र याचे काहीच सोयरसुतक नाही.

नरसिंह रावांचे मंत्रिमंडळात दुसरे स्थान होते. फक्त ‘उपपंतप्रधान’ हा शिक्का तेवढा नव्हता. त्यांच्या शब्दाला मान होता. ते मतदारसंघात आले की सर्वाशी मिळूनमिसळून वागत. प्रत्येक कार्यक्रमात ते स्थानिक पदाधिकाऱ्यांना, कार्यकर्त्यांना प्राधान्य देत. त्यांचा यथोचित आदर करत. इतकी लोकोपयोगी कामे करणारा लोकप्रतिनिधी मिळणे हे मतदारांसाठी भाग्याचेच असते. इतकी महत्त्वाची विकासकामे करणाऱ्या नरसिंह रावांना नागपूर ग्रामीण जिल्हा काँग्रेस कमिटीने काय बक्षिसी द्यावी? १९८९ सालच्या सार्वत्रिक निवडणुकीत ‘आम्हाला बाहेरचा उमेदवार नको’ असा प्रस्ताव पास करून त्यांनी दिल्लीला पाठवला. तसेच १९९१ सालीसुद्धा तसेच. नरसिंह रावांना त्यांची कींव आली. कारण संकुचित विचारांच्या या कॉंग्रेस पदाधिकाऱ्यांनी नरसिंह रावांचे दिल्लीतील महत्त्वपूर्ण स्थान ओळखले नव्हते. चांगल्या लोकांनी राजकारणात यायला हवे, या मताच्या लोकांकरता ही अतिशय गंभीर व विचार करायला लावणारी बाब आहे.

ram.k.khandekar@gmail.com