डॉ. अनुराधा कुलकर्णी – anuradhakulkarni21@gmail.com

छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक तसेच बलाढय़ मोगलांच्या कैदेतून आग्य्राहून महाराज यशस्वीपणे सुटून महाराष्ट्रात परत गेले याचा विसर औरंगजेबाला कधीही पडला नाही. दक्षिणेत तळ ठोकून मरेपर्यंत त्याने महाराष्ट्राला होरपळवले. महाराजांच्या दोन्ही पुत्रांना, त्यांच्या कुटुंबीयांना मनस्वी छळले. या प्रसंगाची मनाला खिळवणारी गुंफण डॉ. प्रमिला जरग लिखित ‘शिवपुत्र राजाराम’ या कादंबरीत करण्यात आली आहे. १७ व्या शतकातील ऐतिहासिक प्रसंगांच्या वर्णनाबरोबरच पिता-पुत्र, पत्नी, भाऊ-भावजय-दीर अशी कौटुंबिक नाती महाराष्ट्रात कशी नांदत होती हे या कादंबरीत ऐतिहासिक दाखल्यांसह दाखविले आहे.

NANA PATOLE AND SHAHU MAHARAJ
शाहू महाराजांच्या उमेदवारीवर नाना पटोलेंचे महत्त्वाचे भाष्य; म्हणाले, “छत्रपती परिवाराकडून…”
Shrimant Shahu Maharaj and Hasan Mushrif
श्रीमंत शाहू महाराजांनी निवडणुकीला उभे राहू नये असे वाटते; हसन मुश्रीफ
Chhatrapati Shivaji Maharaj
छत्रपती शिवरायांना ‘महाराज’ म्हणण्यापूर्वी नेमकं काय म्हटलं जायचं? ठाऊक आहे का?
Dilip Mohite Patil oppose Shivajirao Adhalarao Patil
“…तर राजकारण सोडून घरी बसेन”, शिवाजीराव अढळरावांचा उल्लेख करत दिलीप मोहितेंचा अजित पवारांना इशारा

राजाराम महाराजांच्या आयुष्यातील रायगड ते जिंजी आणि जिंजी ते महाराष्ट्र हा प्रवास कादंबरीत आहे. याबरोबरच सेनापती संताजी घोरपडे व धनाजी जाधवराव यांनी औरंगजेबाच्या तंबूचे लुटलेले सोन्याचे कळस, मोगलांशी केलेल्या रोमहर्षक छुप्या लढाया समर्पकरीत्या कादंबरीत आल्या आहेत.

औरंगजेबाने संभाजीराजांवर घेतलेला सूड, राणी येसूबाई आणि राजाराम महाराजांनी महाराष्ट्रातील रयतेला औरंगजेबाच्या क्रौर्यातून वाचवण्यासाठी केलेला पराकोटीचा संघर्ष.. रायगड व इतर किल्ल्यांची हार, शूर मराठा वीरांचे बलिदान, पत्नी, दोन सुना, नातू व इतर नातेवाईक असे प्रत्यक्ष शिवाजी महाराजांचे कुटुंबीय औरंगजेबाच्या कैदेत सापडणे.. हे प्रसंग वाचताना वाचकाचे डोळे पाणावले नाही तरच नवल!

जिंजीपर्यंतच्या प्रवास व साधुसंतांच्या मठांतील वास्तव्यात राजाराम महाराजांच्या वाटय़ाला आलेले आव्हानात्मक प्रसंग, राजाराम महाराजांचे व महाराणी ताराराणींचे सुखरूप जिंजीला पोहोचणे, राजाराम महाराजांना पुत्र-पुत्रीप्राप्ती, मराठी जनतेने सुखरूप पोहोचलेल्या आपल्या राजाला जिंजीला जाऊन भेटणे.. अशा घटनांतून हा क्रम उलगडत जातो. सरदार, जहागीरदार, वतनदार, साधुसंत असे महाराष्ट्रातील लोक जिंजीला जाऊन महाराजांना भेटून आले. या सर्वाचा महाराजांनी केलेला मानसन्मान, त्यांना वंशपरंपरेने जहागिरी देण्याचा निर्णय याचे यथार्थ वर्णन ऐतिहासिक पुराव्यांना धरून लेखिकेने केले आहे.

कपटी औरंगजेबाने घेरलेल्या महाराष्ट्रापासून शेकडो कोस दूर जिंजीलाही मोगलांचा बलाढय़ वेढा पडला असताना ‘दिल्लीवर विजय मिळवलात तर एक लाख सुवर्णमुद्रा मी तुम्हाला देईन,’ असे आपल्या शूर सरदाराला लिहून देणारा शिवरायांचा हा पराक्रमी पुत्र दिल्ली जिंकण्याच्या ध्येयापासून यत्किंचितही ढळत नाही.

ऐतिहासिक कादंबरीचा गाभा म्हणजे ललित शैली, सौंदर्यपूर्णतेने गुंफलेले ऐतिहासिक संदर्भ. या दोन्हींचा मेळ म्हणजे तारेवरची कसरतच. पण या कादंबरीत ललित शैलीत ऐतिहासिक रूक्ष संदर्भाची गुंफण करण्यात लेखिका यशस्वी झाली आहे.

ऐतिहासिक स्थळे, व्यक्ती, प्रसंग, काळ यांची सांगड कादंबरीतील सर्व प्रकरणांतून उत्तम प्रकारे घातली गेली आहे. लिखिताला पुराव्याची जोड म्हणून लेखिकेने प्रसंगांतील प्रमुख व्यक्तिरेखा, इतर राज्यकर्ते, मराठा राज्याचे अधिकारी, ज्याच्याशी प्रत्यक्ष लढा दिला त्या औरंगजेबाचे अधिकारी यांचे आठ पानी परिशिष्ट आणि घटनांची १८ पानी यादी पुस्तकात दिली आहे. कादंबरी असली तरी ती ऐतिहासिक आहे याचे भान राखून लेखिकेने ४३ संदर्भग्रंथांची सूचीही दिली आहे.

शिवछत्रपतींच्या निधनानंतर शिवरायांचे दोन्ही पुत्र व त्यांच्या कुटुंबीयांनी महाराष्ट्रातील रयतेसाठी, मराठा राज्यासाठी केलेल्या बलिदानाचे स्फूर्तिदायक चित्रण करण्यात लेखिका यशस्वी झाली आहे.

रूक्ष ऐतिहासिक कागदपत्रांमधूनही मनाला भिडणारे प्रसंग, लढायांची स्फूर्तिदायक व रोमहर्षक प्रसंगांची वर्णने, प्रवासवर्णने यांचे एकजिनसीकरण करून लालित्यपूर्ण ऐतिहासिक कादंबरी कशी लिहावी याचा हा वस्तुपाठ आहे. ललित वाङ्मयप्रेमींप्रमाणेच इतिहासाच्या अभ्यासकांनीही ही कादंबरी वाचनीय वाटेल. छत्रपती राजाराम महाराजांचा जीवनपट ऐतिहासिक संदर्भासह उत्तम रीतीने यात शब्दबद्ध झालेला आहे.

‘शिवपुत्र राजाराम’- डॉ. प्रमिला जरग, मेहता पब्लिशिंग हाऊस, पुणे., पृष्ठे- ४६८, मूूल्य- ५९५ रुपये.