सहाव्या ‘आयपीएल’चे आज सूप वाजेल. परंतु त्याआधीच देशभर त्याच्या नावे शिमगा सुरू आहे. श्रीशांत आणि मंडळींनी तुरुंगातून त्याच्या यशस्वीतेवर शिक्कामोर्तबच केलं आहे. यासंबंधात श्रीशांतसह सर्वसंबंधितांशी आमचे विशेष प्रतिनिधी दिलीप प्रभावळकर यांनी प्रत्यक्ष बातचीत करून तयार केलेला हा खासम खास वृत्तान्त..
श्री शांतची मुलाखत घ्यायला आम्ही गेलो तेव्हा तो जेलच्या अरुंद खोलीत भिंतीलगतच्या एका कॉटवर नाक फुलवून झोपला होता. माझ्याबरोबर एक मल्याळी पत्रकार वरुण पिल्लेही होता. मोठय़ा मुष्किलीने आम्हाला ही मुलाखतीची वेळ देण्यात आली होती. पहिले दोन दिवस त्याने आंघोळच केली नव्हती. फाइव्ह स्टार हॉटेलच्या ऐषारामी बाथरूमच्या तुलनेत त्याला तुरुंगातले बाथरूम फारच अरुंद, अस्वच्छ वाटले होते. तिथे कसं छानपैकी पाण्यात डुंबायला; पडून राहायला टब होता. इथं जेमतेम उभं राहण्यापुरती जागा होती.
पण आता तो हळूहळू जेलमधल्या वातावरणाशी आणि (नसलेल्या) सुखसोयींशी जुळवून घेऊ लागला होता.
‘तुझा परफॉर्मन्स इतका गाजेल असं तुला वाटलं होतं का?’ मी मल्याळी पत्रकाराच्या मदतीने प्रश्न विचारायचं ठरवलं. श्रीशांतला मराठीही बऱ्यापैकी समजतं असं कळलं होतं. त्याच्या अनेक मैत्रिणींपैकी एक मराठी आहे आणि तिच्याशी त्याचा तासन् तास संवाद चालतो अशी बातमी होती.
‘कुठला परफॉर्मन्स म्हणताय? पंजाबविरुद्ध मॅचमध्ये मी खेळलो. कारण कॅप्टन राहुल द्रविडकडे- मी राजस्थान रॉयल्समधून खेळणारच, मी भारतातला सर्वश्रेष्ठ बॉलर आहे, असा हट्ट धरला. पण त्याने मला नंतर मुंबई इंडियन्सविरुद्ध खेळू दिलं नाही..’
‘तो परफॉर्मन्स नव्हे. आम्ही स्पॉट फिक्सिंगबद्दल बोलतोय..’
‘मला नेहमीच काहीतरी सनसनाटी करायला आवडतं..’ श्रीशांत कुशीवर वळत आळस देत म्हणाला. तो उठून बसला असता तर ते मॅनर्सना धरून झालं असतं. पण श्रीशांत कुठलेच नियम पाळत नाही, किंवा कदाचित दिल्ली पोलिसांच्या अविरत चौकशीला तोंड देऊन तो दमला असेल असं वाटलं.
‘हो. आम्ही मैदानावर पाहात आलोय ना- इंग्लंडमध्ये पीटर्सनच्या अंगावर टाकलेले बीमर्स काय, दक्षिण आफ्रिकेत नेलला चिडवायला विकेटच्या मध्यभागी केलेला डान्स काय, हरभजनशी झालेली हमरातुमरी काय, कोची एअरपोर्टवर घातलेलं थैमान..’ पिल्लेकडे बराच स्टॉक होता. तो क्रिकेटचा फॅन नसणार (केरळमध्ये क्रिकेट एवढं लोकप्रिय नाही.); पण गृहपाठ करून आला होता.
‘बुकीजना त्यामुळे खात्री होती, की हा भरवशाचा खेळाडू आहे. स्पॉट फिक्सिंग करेल तर हाच! अचूक बॉलिंग करून क्रिकेटर्सना पैसे मिळतात. पण चुकीची बॉलिंग करून जास्त मिळतात..’ श्रीशांतने वस्तुस्थिती सांगितली.
‘खरं आहे. बेटिंगला मदत करायला तुम्ही मंडळी जे सिग्नल्स बोलिंग करण्यापूर्वी द्यायचे, त्यात तुमची कल्पकता दिसते.’
श्रीशांत खूश झाला..
‘वेगवेगळ्या खुणा असतात. ओव्हर सुरू करण्यापूर्वी मी कधी नॅपकिन झटकून कंबरेकडे पॅन्टीत खोचायचो. कधी बुटाची नाडी सोडून परत बांधायचो. तर कधी बॉलिंग सुरू करण्यापूर्वी ओणवा होऊन पायाचे अंगठे पकडायचो. त्यामुळे बुकीजना इशारा मिळायचा. एकदा तर लागोपाठ तीन वाइड बॉल्स टाकून आणि एका ओव्हरला सोळा रन्स देऊन आमच्या टीमला हरवून देण्यासाठी मी खिशातून रुमाल काढून, नाकाला लावून जोरजोरात नाक शिंकरलं होतं! सगळ्या बुकीजना कळलं! एका ओव्हरचे साठ लाख मिळाले..’ श्रीशांत जुन्या आठवणींत रमला होता. एका ओव्हरमध्ये हॅट्ट्रिक केल्याचं अभिमानाने सांगावं तसं सोळा रन्स देऊन साठ लाख कमावल्याचं आणि टीम हरल्याचं तो सांगत होता.
‘तुमची बातमी पेपरात आल्यावर फार गडबड उडाली. लाखो लोकांनी शिव्या घातल्या.’
‘अभिनंदनाचे फोनही आले मला. पाकिस्तानी क्रिकेटर्स महम्मद आसिफ आणि सलमान बट यांनी फोन केला मला. त्यांच्यावर आठ-आठ, दहा-दहा र्वष बंदी आहे स्पॉट फिक्सिंग केल्याबद्दल.’
मधेच श्रीशांत दुसऱ्या कुशीवर वळला. त्याचं तोंड आता भिंतीकडे होतं. त्याला आपल्या (खऱ्या) भावना लपवायच्या तर नसतील? आनंदी आणि बेधडक, बिनधास्त बोलण्याचा हा देखावा तर नसेल? काही बिघडलेलं नाही असं भासवणारा मुखवटा? ‘वुई कॅन अंडरस्टँड शांताकुमारन्,’ असे म्हणून आम्ही दोघांनीही त्याला खांद्यावर थोपटलं.
‘क्रिकेट करिअर बरबाद झाले तर झाले, तू मल्याळी सिनेमात अ‍ॅक्टर बनू शकशील. क्लबमध्ये गाणारा सिंगर बनू शकशील. डान्सर तर तू आहेसच. राजकारणात नक्कीच जाऊ शकशील. स्वत:ला सिद्ध केलंयस तू.’
आम्ही पुन्हा एकदा त्याला थोपटलं. मी (पारा चढणाऱ्या) त्याच्या डोळ्यावर, तर पिल्लेने (तो बुकीला जिथे नॅपकिन खोचून सिग्नल द्यायचा तिथे!) कंबरेवर! मग आम्ही बाहेर पडलो.
त्याच्या घरच्यांची मुलाखत घ्यावी असं माझ्या मनात फार होतं. पण असं एकदम उठून केरळमधल्या श्रीशांतच्या कोठामंगलम् गावाला जाणं शक्य नव्हतं. पण पिल्लेने मार्ग काढला. २‘८स्र्ी वर श्रीशांतची आत्या भारथीदेवी बोलली. (श्रीशांत कढछ मध्ये खेळायला लागल्यापासून त्याने या सगळ्या तांत्रिक सोयी आपल्या लहानशा गावातही कुटुंबातल्या माणसांसाठी उपलब्ध करून दिल्या आहेत.)
‘लहानपणापासून तो स्वत:कडे लक्ष वेधून घ्यायचा..’ आत्या मल्याळम्मध्ये बोलली. पिल्लेने लगेच भाषांतर करून मला सांगितले.
‘त्याचे शिक्षक म्हणायचेच त्याला- हा मोठेपणी करमणूक करत राहील. स्वत:ची आणि लोकांची. आम्हाला पटलं. क्रिकेट खेळण्याबरोबरच संधी मिळेल तिथे नाच, मैत्रिणींबरोबर रोमान्स, मॅचनंतरच्या जंगी पाटर्य़ा, ग्राऊंडवर आणि बाहेरही भांडणं.. हे सगळे करमणुकीचे कार्यक्रम तर होते! शिक्षकांची भविष्यवाणी खरी ठरली.
‘आमच्या गावाला एक सर्कस आली होती. हा नेहमी त्या तंबूत जायला बघायचा. लागोपाठ वीस वेळा त्याने तो खेळ पाहिला. घरातल्या वडीलधाऱ्या मंडळींनी सर्कसमध्येच जाईल हा, असं भाकीत केलं होतं. पाहिलंत ना, हेही खरं ठरलं. तो कढछ मध्ये खेळू लागला!’
आम्ही स्पॉट फिक्सिंगवर तिची प्रतिक्रिया घेणार, तेवढय़ात कढछचे कमिशनर राजीव शुक्ला मुलाखतीला वेळ देण्यास राजी झाल्याचा फोन वाजला.
आम्ही हॉटेल लिबर्टी रेसिडेन्सीला पोहोचलो तेव्हा फराह खान आयपीएलचे शुक्ला, बी.सी.सी.आय.चे श्रीनिवासन आणि जगदाळे यांची तालीम घेत होत्या. ‘जम्पिंग झपाक जम्पक जम्पक’ असा (कढछ च्या जाहिरातबाजीचा!) डान्स चालला होता. शुक्ला आणि श्रीनिवासन यांचं पदलालित्य कौतुकास्पद होतं. ‘कढछ फििक्सग सर्कस’च्या भव्य आणि भपकेबाज पारितोषिक वितरण समारंभाची ही तयारी होती. या साऱ्या अतिश्रीमंत कढछ नामक डामडौलाच्या मागे भक्कमपणे उभ्या असलेल्या (किंवा येऊ बघणाऱ्या) काही राजकारण्यांनाही नाचामध्ये सहभागी करायचं होतं. पण ते धूर्तपणे यापासून लांब राहिल्याचं फराह खानकडून कळलं. ते वेगळ्या ‘फििक्सग’मध्ये बिझी होते.
‘पुढच्या कढछ ची तयारी सुरू कधी करणार आहात?,’ आम्ही शुक्लांना विचारलं. आताच्या तापदायक प्रकाराची, नाचक्कीची त्यांना आठवण नको असेल म्हणून आम्ही तो विषय टाळला. पण त्यांनीच तो काढला.
‘सतत आठवडाभर हेडलाइन्स येतायत पेपरात.. म्हणजे किती राष्ट्रीय महत्त्वाचा विषय आहे बघा कढछ आणि त्यातला भ्रष्टाचार!’ त्यांच्या बोलण्यात अभिमान डोकावल्याचा मला भास झाला.
‘पुढची तयारी सुरू झालीसुद्धा..’ ते म्हणाले.
‘पुढल्या वेळी काही सुधारणा करणार का?,’ नम्रपणे आम्ही विचारलं.
‘हो तर!’ शुक्ला उत्साहाने म्हणाले, ‘बेटिंग कायदेशीर करणार. बुकीजना प्रत्येक स्टेडियमवर एक वेगळा आलिशान स्टँडच देणार; जिथून ते प्लेअरला सूचना देऊ शकतील, त्यांच्या सूचक खुणा- सिग्नल्स बघू शकतील आणि निर्धास्तपणे बेटिंग करू शकतील.’
‘फारच छान! सामने अधिक आकर्षक करायच्या काही योजना आहेत का?’
‘होय तर! चीअर गर्ल्सची संख्या आणखी वाढवणार आहोत. सिक्सर मारली किंवा विकेट पडली की त्या पिचवर येऊन नाचून जातील. ड्रिंक्स ब्रेकच्या वेळी ड्रिंक्सच्या वाहनाबरोबर त्या टीम्सचे मालक- उदाहरणार्थ शाहरूख खान, शिल्पा शेट्टी स्वत: मैदानात येऊन खेळाडूंना पाणी पाजतील. शेन वॉर्नला मैदानात जाताना छातीला चिकटवलेल्या मायक्रोफोनवरून मुलाखत देताना तुम्ही पूर्वी पाहिलं असेल. आता हर्षां भोगले किंवा संजय मांजरेकर शॉर्ट स्क्वेअर लेगला खुर्चीच टाकून बसतील आणि प्रत्येक बॉल खेळताना तिथून बॅटस्मन, विकेट कीपर, क्लोज इन् फिल्डर्स यांच्या मुलाखती घेतील. यामुळे खेळ रंगतदार होईल.’
‘प्रत्येक टीममध्ये एक जागा राखीव ठेवण्याचा प्लॅन आहे..’ मध्येच श्रीनिवासन म्हणाले.
‘राखीव? कुणासाठी?’
‘एक राजकीय नेता प्रत्येक टीममध्ये असेल. अनेकांची फार इच्छा आहे. इच्छा नव्हे, आग्रहच! पाकिस्तानचे नवाझ शरीफ पंचवीस वर्षांपूर्वी पंजाब प्रांताचे मुख्यमंत्री असताना वेस्ट इंडिजच्या खतरनाक बॉलर्ससमोर कॅप्टन बनून एका मॅचमध्ये हौसेने उतरले होते. तेही हेल्मेट, चेस्ट पॅड, आर्मगार्ड वगैरे न लावता! आपल्याकडेही बऱ्याचजणांची इच्छा आहे. गडकरी आणि भुजबळ तरुण वयात अनुक्रमे नागपूर आणि नाशिक इथे क्रिकेट खेळले आहेत असं आम्ही ऐकलंय. गडकरी क्षेत्ररक्षणात चपळ होते. शॉर्ट मिड ऑफला राहून जवळजवळ अख्खी ऑफ साइड चित्त्याच्या चपळाईने कव्हर करायचे. भुजबळ चिकी सिंगल्स- चोरटय़ा धावा घेण्यात पटाईत होते. बॅटला बॉल लागला रे लागला, की मुसंडी मारून रन काढायचे. बॉल अडवण्यासाठी त्यांच्या वाटेत यायला बॉलरही कचरायचा. असे अनेक नेते आहेत. अरुण जेटली पस्तीस पावलांचा स्टार्ट घेऊन स्पिन बॉलिंग करायचे. या साऱ्यांना टीममध्ये जागा दिल्यामुळे टीम्सची प्रतिष्ठा वाढेल आणि राजकारणात त्यांचीही.’
‘कढछ मध्ये याच आणि इतक्याच टीम्स राहणार आहेत का?’
‘वाढणार! पुणे वॉरिअर्सप्रमाणेच आता नागपूर बॉम्बर्सची टीम येणार आहे. पुणे वॉरिअर्सला सहाराने पोसलं. नागपूर बॉम्बर्सच्या मागे ‘पूर्ती’ इंडस्ट्रीज् असेल. शिवाय गुरगाव ग्लॅडिएटर्स, मालवण इन्व्हेडर्स यांचेही अर्ज आले आहेत. गुरगाव टीमला रॉबर्ट वडेरांचे सशुल्क आशीर्वाद आहेत, तर मालवण इन्व्हेडर्सला अनेक प्रायोजकांनी (निमूटपणे) अर्थसाहाय्य  केले आहे. अधिकाधिक संघ या कढछ इव्हेन्टमध्ये सहभागी होतील. बॉलीवूडच्या तोंडात मारेल अशी ही फिक्सिवूड इंडस्ट्रीच होणार आहे. अधिक पैसा, अधिक जाहिराती, अधिक करमणूक, अधिक टाइमपास.’
राजीव शुक्ला आणि श्रीनिवासन यांच्या तोंडावर हसू मावत नव्हतं. आम्हीही यथाशक्ती हास्यप्रदर्शन केलं. पिल्ले तर भारावलाच होता.
‘सिक्युरिटी वाढवणार असाल ना? चीअर गर्ल्सची संख्या वाढणार, म्हणजे साहजिकच..!’
‘प्रचंड प्रमाणात वाढवणार आहोत. पण चीअर गर्ल्ससाठी नाही, खेळाडूंच्या रक्षणासाठी.’
‘काय म्हणता!’
‘हल्ली प्रेक्षकांचा नेम नाही. सगळी फसवाफसवी चालली आहे. पैसे कमावण्याचे धंदे आहेत. क्रिकेटला पार गाडून त्याच्या जिवावर हिडीस आणि भडक खेळाचा प्रकार चालू आहे अशी कुजबुज, चर्चा सर्वत्र ऐकू येत आहे, अशी आम्हाला गुप्तचर यंत्रणेकडून माहिती मिळाली आहे. म्हणून मुकेश अंबानींच्या सिक्युरिटीच्या दहा हजार पट सिक्युरिटीसाठी उफढा जवान तयार ठेवणार आहोत. कुठल्याही निमित्ताने पब्लिकचा पारा चढला, संतापाचा स्फोट झाला, आणि लोक मैदानात उतरले तर फिक्सिंग असो वा नसो; पण रंगीबेरंगी कपडय़ातल्या श्रीमंत क्रिकेटर्सचं रक्षण करणं हे आमचं कर्तव्य ठरतं.’
शुक्लांचं ऐकून श्रीनिवासन्नीही मान हलवली.
‘कढछ चे संस्थापक (सध्या परागंदा) ललित मोदी लोकांना फूस लावत आहेत अशी आमची माहिती आहे. नव्हे, आरोपच आहे.’ श्रीनिवासन संतापाने लाल झाले.
आम्ही आभार मानून निघालो. रिसेप्शन हॉलच्या भिंतीवरच्या भल्यामोठय़ा टीव्ही कढछ ची राजस्थान रॉयल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स ही रेकॉर्डेड मॅच चालू होती. राहुल द्रविड, सचिन तेंडुलकर यांना सुनील गावसकर काही प्रश्न विचारत होता. खरं तर आमच्या मनात भारतीय क्रिकेटचं भूषण असणाऱ्या या तिघांना अनेक प्रश्न विचारायचे होते. पण ते राहूनच गेले.
स्क्रीनवर गोंगाट सुरू होता. उन्माद, बेहोशी आणि नशा पब्लिकच्या अंगात भिनली होती. आम्हीही टाळ्या वाजवल्या.