News Flash

चिनी भगीरथांची कहाणी

महाराष्ट्रातील भीषण दुष्काळी परिस्थितीच्या पाश्र्वभूमीवर चीनमध्ये झालेल्या जलसंधारणाच्या एका लोकचळवळीची थक्ककरणारी कहाणी..

| April 21, 2013 12:14 pm

महाराष्ट्रातील भीषण दुष्काळी परिस्थितीच्या पाश्र्वभूमीवर चीनमध्ये झालेल्या जलसंधारणाच्या एका लोकचळवळीची थक्ककरणारी कहाणी..

सत्तरच्या दशकात विलासराव साळुंखे या यशस्वी इंजिनीअर उद्योजकानी ‘शेतकरी कुटुंबासाठी शाश्वत पाण्याचं सूत्र’ हा ध्यास घेऊन पाणी पंचायतीचं काम सुरू केलं, तेव्हा मी पुण्याच्या फर्गसन महाविद्यालयात शिकत होतो. प्रतापराव बोर्डे यांनी विलासराव साळुंख्यांची गाठ घालून दिली आणि मी पाणी पंचायतीचा कार्यकर्ता झालो. ‘समन्यायी पाणी- वाटप’, कुटुंबाला अडीच एकराकरता शाश्वत पाण्याची व्यवस्था, हातात असलेल्या पाण्याच्या काटकसरीनं वापरासाठी अत्याधुनिक प्रयोग करतानाच शेतकरी कुटुंबांत संपन्नता आणणं, हे या चळवळीचं उद्दिष्ट होतं. सासवड तालुक्यातील नायगाव या छोटेखानी गावात ही प्रयोगशाळा होती. १९७७-७८ मध्ये निवडणुका आल्या तेव्हा परिस्थिती दुष्काळाचीच होती. तेव्हा विधानसभेच्या निवडणुकीत ‘तुम्ही शेतकऱ्यांसाठी पाण्याची काय व्यवस्था करणार?’ असा प्रश्न उमेदवारांना विचारण्याची मोहीम पाणी पंचायतीनं हाती घेतली.

पाणी पंचायतीनं या चळवळीत कायम लोकसहभागाला महत्त्व दिलं. लोकसहभागाशिवाय पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटणं अशक्य आहे, हे लोकांना पटवून देण्यासाठी गावोगाव बठका सुरू होत्या. पण इकडे महाराष्ट्रात ही चळवळ मूळ धरत असतानाच त्याच्या २० र्वष आधीच तिकडे दूरदेशी हिमालयाच्या पलीकडे दुष्काळी आणि दरिद्री प्रदेश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चीनमधल्या लिन्हसीन प्रांतातल्या लोकांनी एक निश्चय केला होता. पिण्याला पाणी, शेतीला पाणी आणि शिवाय उद्योगालाही पाणी मिळालंच पाहिजे, या उद्देशाने चँगहो नदीचा प्रवाह वळवण्याचं शिवधनुष्य उचलायचा निर्धार त्यांनी केला आणि तो पूर्णही केला. साळुंखे यांनी त्याविषयी सांगितले होते, त्याचा माहितीपटही दाखवला होता. अगदी अलीकडे त्याविषयीचं एक पुस्तक वाचनात आलं आणि मी थरारून गेलो.

खरं तर भगीरथानं गंगा पृथ्वीवर आणली त्यापेक्षाही अवघड असंच हे काम होतं. पण हजारो नागरिकांनी एकहातानं, एकदिलानं काम करून आपला हा निर्धार ‘रेड फ्लॅग कॅनॉल’च्या रूपानं प्रत्यक्षात उतरवला. उत्तुंग पर्वतरांगा फोडून पाण्याचं दुíभक्ष आणि दुष्काळ कायमचा संपवून टाकणाऱ्या कॅनॉलच्या निर्मितीच्या प्रकल्पाची ही गोष्ट कल्पनेच्या तीरावरील कोणत्याही कपोलकल्पित गोष्टीपेक्षा मनाला अधिक उभारी देणारी आहे. आज तिची आठवण येण्याचं कारण? अर्थातच महाराष्ट्रावरचं अवर्षणाचं संकट! या पाश्र्वभूमीवर मला पुन्हा एकदा ही कहाणी आणि पाणीनियोजनाचे आणि समन्यायी वाटपाचा संदेश तळमळीनं देत त्यासाठी आयुष्य वेचणारे विलासराव साळुंखे आठवले. म्हणून हा लेखप्रपंच!

चीनमधून हाती आलेलं पुस्तक वाचतानाच समोर इंटरनेटच्या छोटय़ा पडद्यावर डॉक्युमेंटरीही सुरू होती.. आणि ‘चार दारिद्रय़ांचा प्रदेश’ या संज्ञेपाशी मी थबकलो. होनान परगण्यातला लिन्हसीन प्रदेश हा चीनच्या उत्तर-पश्चिमी भागातला एका कोपऱ्यातला भाग! शांक्सी आणि होपेई हे प्रदेश त्याच्या सीमेवरचे! या भागात तहांग पर्वतरांगा पसरलेल्या आहेत. थेट पश्चिमेकडून उत्तरेकडे! चार दारिद्रय़ांचा प्रदेश म्हणजे ‘उजाड पर्वत, पाण्याचं दारिद्रय़, कृषिक्षेत्रातलं दारिद्रय़ आणि दारिद्रय़ात खितपत असणारे लोक’!

शुष्क, खडकाळ पर्वत, मलोन् मल भटकंती केली तरी पाणी नाही. दुष्काळ पडायचा तेव्हा या भागातले रहिवासी, शेतकरी आशेने आकाशाकडे डोळे लावून पावसाची प्रतीक्षा करायचे. आणि प्रत्यक्षात जेव्हा केव्हा पाऊस यायचा, तेव्हा तो इतका मुसळधार कोसळायचा, की शेतातली सारी माती त्याच्याबरोबर धुऊन जायची आणि मागे उरायची फक्त खडकाळ जमीन!

पावसाचं पाणी साठवण्याच्या सोयी नव्हत्या. त्यामुळे उंच भागातून सारं पाणी वाहून जात असे. विहिरी उन्हाळ्यात आटून जात. डोंगराळ भागामुळे आधीच शेती खूप अवघड; त्यात हा बेभरवशाचा पाऊस. दिवसेंदिवस प्रश्न अधिकच गंभीर होत असे.

पाण्याचं अतिदुíभक्ष जाणवू लागलं की मलोन् मल पायपीट करत लोक पाण्याच्या प्रदेशाकडे जात. काहीजण तात्पुरते स्थलांतर करत, तर काही लांबवरच्या चँगो नदीवरून बादल्या, घागरी, डबे- ज्यातून शक्य असेल त्यातून पाणी भरून आणत. अनेकदा खांद्यावरून पाण्याच्या कावडी वाहून आणत. तर कधी गाढवांच्या पाठीवरून पाणी वाहून आणत. दूरवरच्या नदीवरून पाणी आणायचं म्हणजे सकाळी निघाल्यावर परतायला संध्याकाळच व्हायची. मग काहीजण चँगोच्या काठावर असणाऱ्या टेकडय़ांतील गुहांमध्ये आश्रय घेत. दुष्काळ पडला की सावकारीचा जाच व वेगवेगळ्या आजारांच्या साथी हे समीकरण पाठोपाठ येतच असे.

१९४९ मध्ये चीनमध्ये साम्यवादी क्रांती झाली. १९५७ मध्ये चीनमध्ये ‘ग्रेट लीप फॉर्वर्ड’चा नारा घुमला आणि देशाच्या कानाकोपऱ्यात नव्या क्रांतीचे वारे वाहू लागले. ‘स्वावलंबनातून विकास’ या संकल्पनेने उभा चीन उत्साहाने सळसळू लागला. त्यातूनच लिन्हसीन भागात ‘पाणी वाचवा, पाणी अडवा आणि पाणी जिरवा’चे प्रयोग सुरू झाले. नागरिक पुढे सरसावले आणि त्यांच्या अंगमेहनतीतून पाण्याचे साठे विकसित होऊ लागले. यातूनच ‘हीरो कॅनॉल’ प्रकल्प उभा राहिला. लोकांना आनंद झालाच; पण त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे त्यांना आत्मविश्वास मिळाला. पण १९५९ मध्ये पुन्हा मोठा दुष्काळ पडला. हीरो कॅनॉलही आटला. पण लोक निराश झाले नाहीत. त्यांच्या गाठीशी बोलका अनुभव होता. तांत्रिकदृष्टय़ा ते आता अधिक जाणकार झाले होते. त्यापेक्षाही महत्त्वाची गोष्ट म्हणजे असे अभियांत्रिकी प्रकल्प उभे करण्यासाठीचं मानसिक बळ त्यांच्यात पुरेपूर आलं होतं. बांधलेला हीरो कॅनॉल आणि पाण्याचे तीन मोठे साठे वाया जाणार नाहीत, एकदा त्यांना अखंड पाणी मिळत राहिलं की ते उपयुक्त ठरतील, याबद्दल लोकांना खात्री होती. पण नेमकं करायचं काय? तहांग पर्वतरांगांमधून जाणाऱ्या नदीचा प्रवाह हवा तसा वळवला तर? पण दऱ्याखोऱ्या, मोठ्ठय़ा डोंगररांगा यांतून वाहणारा प्रवाह वळवणं खरंच शक्य आहे?

खूप काळ चर्चा झाली. अखेरीस घराघरांत जाऊन मत घेण्यात आलं. सामान्य नागरिक, कामगार, तंत्रज्ञ, गवंडी यांची एक सव्‍‌र्हे टीम तयार करण्यात आली. प्रकल्पाच्या आखणीची जबाबदारी वु-त्झु-ताई या नुकत्याच वॉटर कन्झव्‍‌र्हन्सी स्कूलमधून उत्तीर्ण झालेल्या कम्युनिस्ट युथ लीगच्या तरुण सदस्यावर सोपवण्यात आली. काही कुशल गवंडी, रस्ते व पूल- बांधणीचे तंत्रज्ञ आणि इतरांच्या साथीनं त्यानं सारा परिसर िवचरून काढला. पर्वतरांगांतून मार्ग काढताना अनेकदा पाय सोलले जायचे. पण त्यांची जिद्द अभंग होती. त्या ईष्र्येतूनच अखेर नियोजित कॅनॉलचा मार्ग ठरला. या जिद्दीमागे एक स्वप्न होतं. ते केवळ या भागात पाणी आणून पूर्ण होणार नव्हतं, तर त्या पाण्यापाठोपाठ तिथे भविष्यात समृद्धीही येणार होती. लिन्हसीन प्रांतातल्या सात लाखांहून अधिकांच्या आशा आपल्यावर खिळल्या आहेत हे त्यांना ठाऊक होतं.

तीन महिन्यांत कच्चा आराखडा तयार झाला. पुन्हा एकदा लोकांशी चर्चा. एवढय़ा मोठय़ा कामासाठी आपल्याला पुरेसे लोक मिळतील? कामासाठी निधी कसा मिळवायचा? बांधकाम साहित्य कसं मिळवायचं? तज्ज्ञ कसे मिळणार? प्रश्न अनेक होते. पण त्यांची उत्तरंही लोकच देत होते. दहा हजार लोक या कामावर रुजू व्हायला तयार होते. स्वावलंबन, धान्यविक्री आणि अशाच अनेक उपक्रमांतून निधी उभारायचा निर्धारही झाला. आणि हो! बांधकाम साहित्य तर पर्वतरांगांतूनच मिळणार होतं. त्यासाठी काही गवंडय़ांची टीम काम करणार होती.

१९६० च्या फेब्रुवारीत या प्रकल्पाला मंजुरी मिळाली आणि काम सुरू झालं. दहा हजार लोक रांगेनं एका शिस्तीत भल्या पहाटे गावागावांतून नियोजित कॅनॉलच्या दिशेनं लाल झेंडे आणि आवश्यक ती हत्यारं घेऊन निघाले. वाटेत ठिकठिकाणी स्थानिक लोक त्यांना चहा-पाणी, प्रोत्साहन देत होते. प्रेरणादायी गाणी म्हणून त्यांचा उत्साह वाढवीत होते. कामाला जाणारे वाटेतल्या खडकांवर लिहीत होते : ‘कॅनॉलचं काम पूर्ण झाल्याशिवाय आम्ही परतणार नाही!’

काहीजण तहांग पर्वतातल्या गुहांमध्ये, तर काही तात्पुरत्या तंबू-राहुटय़ांमध्ये राहू लागले. आसपासच्या गावातले गावकरी त्यांच्या जेवणाखाणाची काळजी घेत होते. काम सोपं नव्हतं. लहान-मोठे अपघात, सतत होणाऱ्या दुखापती, इजा, इतर आजार यांवर उपचारासाठी गावोगावचे ‘बेअरफूट डॉक्टर्स’ सज्ज होते. या स्वयंसेवकांमध्ये स्त्रियांची संख्याही बरीच होती. जवळपासच्या गावातल्या महिलाही आपणहून पुढे येऊन अंगमेहनतीच्या कामातही सहभागी होत होत्या. गावातल्या म्हाताऱ्याकोताऱ्यांनी लहान मुलांना सांभाळण्याची जबाबदारी स्वीकारली होती.

कॅनॉल जिथून सुरू होणार होता, तिथपर्यंतचा सुमारे ७० कि.मी.चा रस्ता सात दिवसांत रात्रंदिवस काम करून पूर्ण करण्यात आला. रस्ता झाला आणि धान्य, भाजीपाला, हत्यारं, सुरुंग व इतर साहित्याचा ओघ सुरू झाला. आता डोंगररांगा फोडून पाण्यासाठी मार्ग करून देण्याचं जिकिरीचं काम सुरू झालं.

या कामगारांच्या हातात साधनं तरी काय होती? साधे हातोडे, छिन्नी आणि खिळे. बस्स! दिवसभर डोंगर फोडण्याचं काम चाले. शक्य असेल तिथे सुरुंगानं डोंगर फोडायचे. कुशल गवंडी फोडलेल्या डोंगरातलेच मोठे खडक, पाषाण, दगड यांतूनच छान गुळगुळीत चौकोनी, आयताकृती दगड बनवू लागले. अतिशय कष्टाचं काम होतं हे! पण याच दगडांचा वापर करून कॅनॉल बांधला जाणार होता..

बघता बघता कामगारांची संख्या दहा हजारांवरून ३७ हजारांवर गेली आणि त्यांच्या गाडय़ांमुळे ट्रॅफिक जॅम होऊ लागले. पण लोक डगमगले नाहीत. समोर आलेली समस्या- मग ती कोणतीही असो, त्यातून आपल्यालाच मार्ग काढायचा आहे, हे साऱ्यांना कळून चुकलं होतं. डोंगर फोडताना अनेकदा जिवावर उदार व्हावं लागे. पण पुरुषांइतकंच आत्मबल महिलांच्याही अंगी होतं. डोंगराच्या माथ्यावरून दोरीला लोंबकळत अधांतरी लटकून डोंगरात ड्रििलग करण्यात आलं. सुरुंगांचे स्फोट करताना सुरुंग पेरलेल्या जागेतून वेळीच बाहेर यावं लागे. नदीवर पूल बांधायचे, मोठमोठे बोगदे खणायचे आणि लहान-मोठे कालवे मुख्य कॅनॉलला जोडायचे, हे सगळं करायचं होतं. कामाचा व्याप मोठा होता. एक भुयारी कॅनॉल, तीन जोड कालवे, अनेक लहान-मोठे कालवे,अनेक तलाव तसंच बंधारे यासाठी एकूण १२५० लहान-मोठे डोंगर जिद्दीनं फोडण्यात आले व १३४ बोगद्यांतून २४ कि.मी. पाण्याचा प्रवाह मोकळा करण्यात आला.

या कामगारांनी एकूण दगड तरी किती फोडला?

एक कोटी ६४ लाख क्युबिक मीटर!

पण हे सारे परिश्रम कामी आले आणि चँगो नदीचा प्रवाह वळवून तिची पाण्याची पातळी वाढवून रेड फ्लॅग कॅनॉलद्वारे लिन्हसीन प्रांतात पाणी आणण्यात अखेर यश आलं. १९६० मध्ये सुरू झालेलं हे काम १९६९ मध्ये संपलं.

हा कॅनॉल व त्याच्या जोडीनं खोदलेल्या अनेक लहान-मोठय़ा तलावांमुळे दुष्काळ आणि पाण्याचं दुíभक्ष या गोष्टी इतिहासजमा झाल्या. उघडेबोडके डोंगर हिरवेगार झाले. आता वर्षभर या कॅनॉलमध्ये पाणी असतं. कॅनॉलला लागूनच लहान लहान प्रवाह शेतात सोडण्यात आल्याने या भागात आता भरपूर पाण्यावरची पिकं यशस्वीपणे घेता येतात. कापूस उत्पादन मोठय़ा प्रमाणावर होतं. तलाव व बंधाऱ्यांतून मासेमारी हा किफायतशीर व्यवसाय बनला आहे. एकेकाळच्या उजाड टेकडय़ांवर पीचचं उत्पादन होतं. लोखंड आणि स्टीलचा उद्योग फोफावला आहे. रासायनिक खतांचे कारखाने वाढत आहेत. शेतकऱ्यांना नेहमीच्या पिकाबरोबर जोडपीकंही घेता येऊ लागली आहेत.

निसर्गाला आपल्या धर्यानं आणि कठोर परिश्रमांनी जिंकून घेण्याच्या चिनी लोकांच्या मानसिकतेचं प्रतीक ‘रेड फ्लॅग कॅनॉल’च्या रूपात आज उभं आहे.

आता वेळ आहे आपल्या सहभागाची!

हे सारं आज मुद्दाम सांगावंसं वाटलं. शासन आणि स्वयंसेवी संस्थांच्या प्रयत्नांना जर नागरिकांच्या चिकाटीची आणि विश्वासाची जोड मिळाली तर काय चमत्कार घडू शकतो, हे या प्रकल्पानं दाखवून दिलंय. केवळ चर्चा करण्यापेक्षा आणि विधायक प्रयत्नांवरही टीका करण्यापेक्षा संघटित होऊन अडचणींचा सामना करणं, हे भावी पिढय़ांच्या दृष्टीनंही महत्त्वाचं ठरतं.

आज ‘रेड फ्लॅग कॅनॉल’चं म्युझियमही उभारण्यात आलंय. या कॅनॉलची जन्मकथा तिथे मांडण्यात आलीय.

इतिहासात डोकावलं तर पाण्याचं दुíभक्ष असणाऱ्या अनेक देशांत पाणीप्रश्न सोडवण्यासाठी उभ्या राहिलेल्या अनेक लोकचळवळी सामोऱ्या येतात. अगदी महाराष्ट्रातही पाणीप्रश्नाच्या निवारणासाठी कै. विलासराव साळुंखे, अण्णा हजारे, पोपटराव पवार, विजयअण्णा बोराडे यांनी अनेक लोकचळवळी उभ्या केल्या. राजेंद्रसिंग यांचं कामही सर्वाना ठाऊक आहे. त्यातून ग्रामविकासाची नवी मॉडेल्स उभी राहिली. आदर्श गावं आकाराला आली. या साऱ्यांत त्यांनी केलेलं पाणी व्यवस्थापन फार महत्त्वाचं ठरलं.

प्रश्न- आपण आता काही करणार आहोत की नाही, हा आहे!

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 21, 2013 12:14 pm

Web Title: story of china for finding the solution on drought
Next Stories
1 युद्धखुणा वागवणारा देश
2 क्रिकेटपटूंचं बायबल
3 दलितांनी कोषातून बाहेर पडावे!
Just Now!
X