24 February 2020

News Flash

बाईमाणूस आणि कवीमाणूस

‘तोच चंद्रमा नभात’च्या निमित्ताने आठवण निघालीच आहे तर शांताबाईंच्या आणखी काही आठवणी तुमच्याबरोबर वाटून घ्याव्या असं मनात येतं आहे. ‘तोच चंद्रमा नभात’ या श्रुतीमधुर गीतापाठोपाठ

| April 28, 2013 12:04 pm

‘तोच चंद्रमा नभात’च्या निमित्ताने आठवण निघालीच आहे तर शांताबाईंच्या आणखी काही आठवणी तुमच्याबरोबर वाटून घ्याव्या असं मनात येतं आहे. ‘तोच चंद्रमा नभात’ या श्रुतीमधुर गीतापाठोपाठ काळजाचा ठाव घेणारं त्यांचं आणखी एक गीत कानावर पडलं. ‘थकलो, तरीही चालणे मला, हा माझा मार्ग एकला..’ मग कळलं की ते एक चित्रपटगीत होतं. ‘हा माझा मार्ग एकला’ या नावाच्या चित्रपटासाठी शांताबाईंनी ते लिहिलं होतं. त्याचेही संगीतकार आणि गायक होते सुधीर फडके. तो चित्रपट पाहायचा योग पुढे खूपच उशिरा आला, पण शांता शेळके या नावाची चित्रपट-गीतकार म्हणून मला झालेली ती पहिली ओळख होती. (तो त्यांचा पहिला चित्रपट नसूनही.) आणि पाठोपाठ तेव्हाचे नव्या उमेदीचे प्रयोगशील संगीतकार – गायक हृदयनाथ मंगेशकर यांच्या स्वरसाजाने नटलेला त्यांच्या नव्या गाण्यांचा एक टवटवीत खळाळ वाहू लागला. ‘जिवलगा, राहिले रे दूर घर माझे’ आणि ‘ही वाट दूर जाते स्वप्नामधील गावा..’  ही दोन गाणी त्यांच्या अग्रस्थानी होती. आणि जाणवलं की १९६० पासून जे मराठी भावगीताचं नवं पर्व सुरू झालं, त्यामध्ये अध्वर्यू म्हणून कवयित्री शांता शेळके हे नाव ठसठशीतपणे अधोरेखित झालं आहे.

१९७० च्या दशकारंभी मी स्वत: पुण्याचा रहिवासी झालो. लगेचच केव्हातरी लक्ष्मी क्रीडा मंदिरात हृदयाथ मंगेशकर यांची एक मैफल साजरी झाली. माझ्या स्मरणाप्रमाणे उषा वर्तक त्यांच्याबरोबर सहगायिका होत्या. आज आठवलं की मौज वाटते, की त्या अविस्मरणीय मैफिलीला जेमतेम शंभरएक इनेगिने श्रोते उपस्थित होते.. सुदैव असं की त्यामध्ये आमचा दोस्तकंपू अग्रभागी होता आणि खणखणून दादही देत होता. ‘वादळवारं सुटलं ग..’, ‘माज्या सारंगा’, ‘मी डोलकर’ ही गाणी त्यांच्या ध्वनिमुद्रिका प्रकाशित होण्याआधी प्रथमच सजीव आविष्करणातून ऐकताना आम्ही केवळ दंग होऊन गेलो. चकित करणाऱ्या त्या स्वररचना आणि ती अभिनव गायकी यांच्यामध्ये हरवून जातानाही एक नोंद मनावर कोरली गेलीच की, ते अनोखे शब्द कवयित्री शांता शेळके यांचे होते. पण त्यांचा व्यक्तिगत अनुबंध जुळला जाण्याचाही योग त्या पाठोपाठ अल्पावधीतच आला.

श्रीकांत मोघे, अनंत काणे आणि प्रभाकर मोने या त्रयीने ‘अभिजात’ नामक नव्या नाटय़-संस्थेची स्थापना करून शं. ना. नवरेलिखित ‘मन पाखरू पाखरू’ या सहज – मधुर नाटकाचा मुहूर्त केला. त्या नाटकाची संहिता वाचण्याचा योग ओघानेच लाभला. कथा खूप हृदयस्पर्शी, काव्यमय होती. आणि कथानकाच्या ओघात त्यात एक गीतही आलं होतं. ते गीत शांताबाईंनी लिहिलं होतं आणि संगीतकार असणार होते- जितेंद्र अभिषेकी. ‘असावे घरटे अपुले छान’च्या धर्तीचं ते गीत तसं छान सुबक होतं. स्त्रीमनाच्या लौकिक पातळीवरील मूलभूत भावांची अभिव्यक्ती त्यातून सुरेख होत होती. पण नाटक गाण्यात रमलेल्या आणि कवी, कलाकार आणि अभ्यासक या तीनही भूमिका जगणाऱ्या माझ्या मनाला मात्र असं वाटलं की, ज्या पाश्र्वभूमीवर नायिका ते गीत गाते ती ध्यानी घेता तिचं मनोगत इतकं सर्वसाधारण लौकिक पातळीवर असणार नाही. ते अधिक सूक्ष्म, अधिक खोल उतरणारं, पण तरीही अभिव्यक्ती खूप साधं-सुधं असलेलं असंच हवं. समोर तसे शब्द प्रत्यक्ष नाटकाच्या शीर्षकातच होते- मन पाखरू पाखरू.. तीही पुन्हा मातोश्री बहिणाबाईची शब्दकळा.. तेव्हा त्या पुण्यस्मरणातूनच जणू काही एक कविता साकार झाली.

मन पाखरू पाखरू त्येची दूरवर धाव

त्येच्या काळजाचा कुणा.. न्हाई लागत रे ठाव..

 

घेत झोके फांदीवर कधी गाई येडं गानं

कधी कोटरी आपुल्या बसे एकलंच खिन्न..

मन हावरं हावरं.. होई घाबरं-घुबरं

मन धावरं धावरं.. सदा कावरंबावरं..

 

मन अचपळ भारी येका ठायी ते ठरंना

त्येच्या पंखातला जोम त्याच्या त्येलाच पुरंना..

सदा अशी वणवण त्येला न्हाई येक गांव

कशासाठी आटापिटी त्येबी त्येला न्हाई ठावं..

 

परि त्येलाही कळतो हात मायेचा कांपरा

आनि हवासा वाटतो येडय़ा प्रीतीचा उबारा..

त्येची तहान ना भागे सात सागर पिऊन

तीच मिटे येकाक्षणी.. पापणीतल्या थेंबानं

 

ओढ हिंडायाची त्येला गंगनाच्या गाभाऱ्यात

तरी अवचित कधी पुन्हा येतं पिंजऱ्यात

मन पांखरू पांखरू असं दुनियेआगळं

कुण्या जन्मीच्या पुण्यानं द्येवा तुवां घडविलं?

 

स्वत: नाटककार, संगीतकार, कलाकार आणि दिग्दर्शक या सर्वानी एकमतानं (आणि एकमुखानंही) या कवितेचा सहज स्वीकार केला. पाहता पाहता पं. जितेंद्र अभिषेकींनी प्रत्ययकारी स्वररचनेत ती कविता ध्वनिमुद्रितही केली. यातून स्वत: शं. ना. नवरे यांचा लोभ जडला, तो आजमितीपर्यंत सोबत आहे. त्यामुळे तेव्हा त्या गीताचा तर नाटकात समावेश झालाच, पण माझी एक व्यक्तिगत कविताही त्याच नाटकात, नायकाचं एक हृदयस्पर्शी स्वगत म्हणून प्रकट झाली..

एक सांगशील आपले रस्ते

अवचित कुठे कसे जुळले?

आपल्याच नादांत चालताना हे देखणे वळण कसे भेटले?

साहित्यसंघ मंदिरात झालेल्या दिमाखदार शुभारंभ-प्रयोगात श्रीकांत मोघ्यांनी खास त्यांच्या प्रभावी लयदार शैलीत हे कवितामय स्वगत झोकात सादर केलं..

कविता संपली.. तुडुंब भरलेल्या रंगमंदिरातून मुशायऱ्यात यावी तशी भरघोस सामूहिक उत्स्फूर्त दाद उसळून उमटली तेव्हा आपण स्वप्नात तर नाही नां, म्हणून मी जवळ बसलेल्या मित्राच्या गुबगुबीत हाताला हलकासा चिमटा काढून पाहिला. प्रयोगांनंतर रंगभूमीवर अभिनंदनासाठी कलाकारांभोवती गराडा पडला होता. त्या सगळ्या ज्येष्ठ-श्रेष्ठ, आजच्या लाडक्या भाषेत बोलायचं तर- ‘दिग्गज’ मंडळीत मी अगदीच पोरसवदा होतो. आणि तेवढय़ात एका क्षणी अचानक मला दिसल्या कवयित्री शांता शेळके.. मी त्यांना प्रथमच समोर पाहत होतो. त्या दिलखुलासपणे सर्वाचं अभिनंदन करीत होत्या. आणि नंतर पाठ वळवून जाणार तेवढय़ात अगदी अकल्पितपणे त्या पुन्हा वळल्या आणि खूप आत्मीयतेनं त्यांनी दादाला विचारलं-‘श्रीकांत, सुधीर मोघे कोण?’ मी इकडे चिमटे काढायला नवे हात (शक्यतो, नाजूक) शोधू लागलेला.. दादा म्हणाला, ‘सुधीर ना, माझा भाऊ..’ त्यावर पुन्हा शांताबाईंचा प्रश्न.. ‘हो? कुठे असतात ते?’ मी इकडे त्यांच्या त्या ‘ते?’ या आदरार्थी शब्दप्रयोगाने मूच्र्छित होण्याच्या वाटेवर.. दादानं हसून.. ‘तो काय तो..’ म्हणत माझ्याकडे निर्देश केला आणि शांताबाईंनी उत्सुकतेनं वळून माझ्याकडे पाहिलं.. ती नजर आज या क्षणीही माझ्या नजरेसमोर जशीच्या तशी आहे. आपल्याच कॉलेजमधल्या, पिरियड बंक करून आलेल्या हूड पोरासारखं ते कवी-रूप पाहताना त्यांच्या नजरेतले भाव आश्चर्य, कुतूहल, माया आणि निखळ निर्मळ कौतुक असे झरझरा पालटत गेले. आमचं काही बोलणं झालं की नाही, कोण जाणे.. पण मी मात्र त्या एका क्षणात आणि एका दृष्टिक्षेपात त्यांच्या व्यक्तित्वाशी कायमचा जोडला गेलो. आणि त्यानंतरच केव्हातरी मला एक नवी पण अपूर्व जाग आली, जी मी माझ्या आयुष्यभर विसरू शकणार नाही. ‘मन पांखरू पांखरू’ हे नाटक आणि त्यांच्याशी जोडलेले हे सगळे शुभंकर योग; यातूनच माझ्या पुढच्या कलाजीवनाच्या वाटचालीचा खराखुरा शुभारंभ झाला. पण जेव्हा तो घटनाक्रम उलटा करून मी पाहू लागतो.. तेव्हा तो एकाच क्षणापाशी येऊन थबकतो आणि आजही मला अस्वस्थ करतो. मूळच्या नाटय़- संहितेत शांताबाईंच्या त्या मूळ गीताचा सहभाग निश्चित झाला होता. हेतूपूर्वक नव्हे पण तारुण्य-सुलभ उत्साहाच्या भरात मी त्या कवितेला काटशह देऊन त्या वर्तुळात घुसलो होतो.. शांताबाईंच्या समृद्ध कारकीर्दीत त्या एका छोटय़ा गीताच्या अभावानं कसलंच उणेपण येणार नव्हतं, आलंही नाही. पण म्हणून मी कसा सुटेन? विशेष म्हणजे त्या आमच्या प्रथम भेटीतील त्यांच्या त्या स्निग्ध नजरेत या कशाचा मागमूसही नव्हता.. ना पुढे कधी व्यक्त झाला.

बाईमाणूस आणि कवीमाणूस हे दोन्ही अर्थपूर्ण शब्दप्रयोग माझे फार आवडीचे.. पण या दोन्ही संज्ञा सर्वार्थाने सहज जगलेली एक व्यक्ती मला भाग्यानेच पहायला व अनुभवायलाही मिळाली.. कवयित्री शांता शेळके.

First Published on April 28, 2013 12:04 pm

Web Title: sudhir moghe sharing memories of kavi shantha shelke
Next Stories
1 एक छोटीसी भूल..
2 एका मुलीची गोष्ट
3 दोन कविता आणि दोन कवी
Just Now!
X