News Flash

‘ललित’ म्हंजे काय रे भाऊ?

रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीने साक्षेपी संपादक कै. राम पटवर्धन यांच्या पहिल्या स्मृतिदिनानिमित्ताने उत्तन येथे लेखक, प्रकाशक, संपादक यांचं एक संवाद-सत्र आयोजित केलं होतं.

रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीने साक्षेपी संपादक कै. राम पटवर्धन यांच्या पहिल्या स्मृतिदिनानिमित्ताने उत्तन येथे लेखक, प्रकाशक, संपादक यांचं एक संवाद-सत्र आयोजित केलं होतं. त्यात सहभागी झालेले डॉ. आशुतोष जावडेकर यांचं मराठीतील ‘ललित’ लेखनाची व्याख्या तसेच ललित लेखनाच्या व्याप्तीविषयीचं हे चिंतन..

बा हेर हिरवाकंच पाऊस कोसळत असताना रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीच्या परिसंवाद कक्षामध्ये गरमागरम भज्यांऐवजी (तीही यथावकाश आलीच!) गरमागरम चर्चा झडत होती. निमित्त होतं- प्रबोधिनीनं योजलेल्या संवाद सभेचं! १३-१४ जून रोजी ज्येष्ठ लेखक, प्रकाशक, संपादक यांच्या उपस्थितीत साहित्याशी संबंधित अनेक विषयांवर चर्चा सुरू  होत्या; आणि दुसऱ्या दिवशी असा हिरवाकंच पाऊस पडत असताना भलतीच अस्तित्ववादी चर्चा सभेसमोर उभी होती. विषय होता- ‘साहित्य व्यवहारातील ललित साहित्याचा अवकाश संकोचत आहे का?’ ज्येष्ठ पत्रकार आल्हाद गोडबोले हे संवादक होते. वीणा गवाणकर, शशिकांत सावंत आणि मी सहभागी वक्ते या भूमिकेत होतो. आणि समोर सारीच मोठी मंडळी हजर होती. बहुतांशी बुजुर्गाचं म्हणणं होतं की, अवकाश संकोचत आहे! संपादकांकडे सकस ललित लिखाण सध्या येत नाही, यावर पुष्कळांचं एकमत होतं. त्यामागे तसे अनुभवही खात्रीनं होते. वीणा गवाणकर आणि शशिकांत सावंत यांनी वास्तवाचा अभ्यास करून कथा-कादंबऱ्या मराठीमध्ये येत आहेत का, असा सुयोग्य प्रश्न उपस्थित केला. संशोधन करून मग ललित लिखाणाकडे लेखक वळतो का, हा त्याच प्रश्नाचा आतला पदर होता. एका नामवंत प्रकाशनगृहाच्या प्रमुखांनी त्यांच्या सूचीमधला ‘ललित’ विभाग कसा झपाटय़ानं आक्रसतो आहे, हे सांगितलं. मासिकाच्या, नियतकालिकांच्या संपादकांनी ललित लिखाणाच्या ढासळत्या संख्येकडे आणि दर्जाकडे लक्ष वेधलं. आणि हे चालू असताना मला मात्र स्मरत होते- उत्तम मराठीत उत्तम लेखन करणारे माझे तरुण लेखक मित्र-मैत्रिणी; जे रूढार्थाने ‘लेखक’ या शिक्क्याखाली नोंदपात्र झालेले नाहीत; पण फेसबुकवर, ब्लॉग्जवर खरंच ताजं लिहितात अशी संवेदनशील माणसं, अजूनही कविसंमेलनामध्ये चार बाजारू कवितांमधल्या एका अस्सल, अभिजात कवितेला बरोबर ओळखून दाद देणारा वाचक- श्रोतृवर्ग; बदलत्या साहित्यिकतेच्या मूल्यांविषयी मी नुकताच इंग्रजी विभागाच्या परिसंवादासाठी लिहिलेला ‘पेपर’..
आणि मग असा काहीसा नकारात्मक सूर हवेत तरळत असताना माझी बोलण्याची खेप आली तेव्हा विचारावंसं वाटलं- ‘‘मुदलात ‘ललित’ साहित्य म्हणजे काय? ‘ललित’ची व्याख्या ही केवळ कथा-कादंबरी-कविता इथेच सीमित होते आहे का?’’ पुढे परिसंवादावर त्यावर अपेक्षेप्रमाणे वाद-संवाद आणि हास्यविनोदही झडले आणि चहाची वेळ होताच सारं ललित-विश्व चहामध्ये मश्गुल झालं.
पण आज त्यानिमित्तानं मी उपस्थित केलेल्या प्रश्नावर मला थोडं विस्तारानं लिहायचं आहे. कारण मराठी समीक्षेमधल्या अनेक सांप्रत मतभेदांचं, वादांचं मूळ इथे आहे अशी माझी अभ्यासान्ती धारणा झाली आहे. ‘ललित’ची व्याख्या ठरवायला आपल्याला विरुद्धार्थी ‘माहितीपर’चा आधार घ्यायला लागतो आणि पहिलं द्वंद्व उभं ठाकतं : ललित विरुद्धच अ-ललित ऊर्फ तथ्याधिष्ठित किंवा सामान्य भाषेत ‘माहितीपर.’ त्याच्या मागोमाग इंग्रजी ज्या ‘बायनरी’ची छाया यामागे उभी आहे ते ‘फिक्शन/ नॉन-फिक्शन’ हे द्वंद्वही उभं ठाकतं. ‘वैचारिक लेखन/ सर्जनशील लेखन’ असंही एक द्वंद्व त्याच्या आसपास उभं असतं. आणि सध्याचं भलतंच गाजत असलेलं ‘अभिजात विरुद्ध लोकप्रिय’ हे द्वंद्वदेखील खरं तर याच साऱ्या जोडय़ांमागे खेळत असतं. ही झाली समीक्षेच्या नजरेतून उभी ठाकणारी द्वंद्वं. पण ‘ललित लेखक विरुद्ध माहितीपर लेखक’ असंही एक समीक्षाबाह्य माणसा-माणसांचं भांडण ऊर्फ द्वंद्व असतं. पास्ता नाहीतर सूप्सच्या रेसिपीज्, यशस्वी- गुणी- श्रीमंत- आदर्श होण्यासाठीच्या रामबाण युक्त्या, वाघ-तरस-कुत्रे आणि त्यांच्या प्रजाती.. या साऱ्या गोष्टी ज्या पुस्तकांमध्ये असतात त्यांच्या हजार- हजार प्रती खपताना दोन-तीन वर्षे घासून कादंबरी लिहिलेला लेखक बघत असतो. आणि बघतो तरी कसा? आकसाने, संशयाने आणि पुष्कळदा तुच्छतेने. याउलट, मन लावून अनवट विषयावर संशोधन करून एखादा लेखक लालित्यपूर्ण पद्धतीनं पुस्तक लिहितो, तरी त्याची जिम्मा ही ‘खपाऊ, माहितीपर’ लिखाणात होते तेव्हा तो डोक्याला हात लावून बसतो. (मला इथे आधीच सांगायला हवं : खपाऊ, बिनखपाऊ, उथळ, प्रगाढ, ललित, तथ्याधिष्ठित अशा साऱ्याच पुस्तकांची मराठीत गरज आहे. मराठी भाषा या साऱ्या तऱ्हांच्या साहित्य व्यवहाराने मोठी होणार आहे. ‘व्यवहार’ म्हणूनही.. भाषा म्हणूनही!)
आज असा काळ खरं तर आला आहे, की साऱ्याच सीमा या पुसट होत आहेत. समीक्षेतले अनेक ‘वाद’ हे दुसऱ्या ‘वादां’मध्ये विरघळत आहेत. ‘अभिजात विरुद्ध लोकप्रिय’ या ‘बायनरी’पासूनच सुरू करू या. झुंपा लाहिरीचं ‘दि नेमसेक’ हे पुस्तक मला यासंदर्भात आठवतं. ती कादंबरी अभिजात आहेच. पुलित्झर पुरस्कार मिळाल्यामुळे असं नाही; तर त्या कादंबरीच्या खोल आशयामुळे, उत्कट अभिव्यक्तीमुळे ती जगभरच्या वाचकांना अभिजात वाटली आहे. पण जसं खरवडलं की दिसून येतात त्यामधले ‘popular elements’- गोगोलच्या दुसऱ्या प्रेयसीसोबतचे संवाद,  प्रसंग यांची दोन प्रकरणभर (एकूण प्रकरणं दहा- पुस्तकाची; गोगोलची नव्हे!) असलेली भरताड ही एकुणात ‘मिल्स अँड बून्स’सारख्या तद्दन खपाऊ प्रेम-कादंबऱ्यांमध्ये शोभावी अशीच आहे. आणि याउलट, ज्याच्यावर ‘लोकप्रिय’ लेखकाचा शिक्का मारला गेला आहे, अशांच्या लिखाणात एकाएकी मधल्या एखाद्या टप्प्यावर अभिजातता अवतरते. बिल ब्रायसन हे सातासमुद्रापलीकडचं उदाहरण. चेतन भगत हे इथलं. ‘फाइव्ह पॉइंट समवन’ ही अत्यंत चतुर कादंबरी आहे. वाचकांचा लसावि- मसावि समोर ठेवून लिहिलेली. पण लिहिता लिहिता सावध बाजारू लेखकही लिहिण्याच्या ऊर्मीत अभिजात लिहून जातो.
कॉलेजच्या गच्चीत तीन मित्र टोकाशी बसून सिगारेट ओढतात त्या प्रसंगात चेतन भगत नकळत त्या धूम्रवलयांवर, त्याकडे बघताना मनात उमटणाऱ्या निर्थकतेच्या प्रचंड ताकदीच्या जाणिवेवर बघता बघता अभिजात भाषेत एक परिच्छेद लिहितात तेव्हा अभिजात आणि पॉप्युलर घटक हळूहळू नकळत-कळत एकमेकांत मिसळताना मला दिसतात.
अन् मग समोर येतं- ‘दि गँड्र बॅटल’ : ललित विरुद्ध अ-ललित. आणि प्रवासवर्णनं वाचली की मग या द्वंद्वाला अनंत फाटे फुटतात. वीणा पाटील यांची प्रवासवर्णनं आणि सानिया किंवा सुलभा ब्रह्मनाळकर यांची प्रवासवर्णनं यांत उघडच भेद राहणार आहे. दोन्ही प्रकार त्यांच्या त्यांच्या ठिकाणी चांगलेच आहेत, आणि गरजेचेही! सिंगापूरच्या बागेत सख्यत्वाचा शोध घेणारी सानियाची लेखणी मला अपार सुखावत गेली तरी प्रत्यक्ष सिंगापूरला जाण्याआधी मी वीणा पाटील यांचं पुस्तक नक्कीच विकत घेईन! पण समीक्षा या दोन टोकांना एकाच सदरात टाकते- प्रवासवर्णन. प्रकाशकांच्या सूचीत कधीच ‘ललित’ सदरात ही पुस्तकं आढळत नाहीत. अरुणा ढेरे यांनी ‘नवा वास, नवी माती’ या प्रवासवर्णनाच्या निमित्तानं खरं तर मिथकं उलगडली आहेत. सुलभा ब्रह्मनाळकरांच्या ‘बंद खिडकीबाहेर’मध्ये प्रवासवर्णन आहे खरं; पण त्याहून झुळझुळते आहे त्यामधे एका मनस्वी प्रेयसी-प्रियकराच्या सहजीवनाची कथा!
आता प्रवासवर्णनांच्या एक पाऊल पुढे जाऊन ढळढळीत ‘माहितीपर’ लेखनाकडे जाऊ. मला वाटतं, यातले बरेचसे गैरसमज हे कच्च्या, विकीपिडिया-गुगल कॉपी-पेस्ट करणाऱ्या माहितीपर लेखनामुळे झाले आहेत. ते तर असतं केवळ माहितीचं संकलन. (तेही पुष्कळदा उडत उडत अपुऱ्या स्रोतानिशी केलेलं.) उत्तम, तथ्याधिष्ठित लेखन हे केवळ माहितीचं संकलन करून थांबत नाही, तर लेखक स्वत:चा म्हणून दृष्टिकोन त्या माहितीला देतो, त्या ‘माहित्यांना’ हवं तसं वळवतो आणि त्याचं अनुभूतीत रूपांतर करतो. असं नेहमी साधतंच असं नाही. कधी कधी ‘माहिती’ ही ‘माहिती’च राहते. पण जेव्हा तिचा अनुभव लेखकाकरवी वाचकाला ‘अनुभूती’च्या स्वरूपात मिळतो, तेव्हा ते लिखाण खरं तर ‘ललित’च बनतं. गिरीश कुबेर यांचं ‘एका तेलियाने’ हे पुस्तक याचं उत्तम उदाहरण आहे. वरवर बघता ते ‘माहितीपर’ लेखन आहे. आणि त्यामध्ये तेल-उद्योगाची, त्यातल्या अर्थ-राजकारणाची, व्यक्तींची ‘माहिती’देखील आहेच. पण त्यापुढे जात ती एक मोठ्ठी ‘कथा’ बनते. एखाद्या कथेतल्या जिवंत पात्रांसारखी ती ‘तेल-व्यवसायातली माणसं’ हा-हा म्हणता बनतात आणि त्यांचं कथन हे तुटक नसतं, तर घट्ट विणलेल्या कथेसारखं एकसंध असतं. (याउलट, एखादी बंडल कथा ही वरवर ‘ललित’ असली तरी सरतेशेवटी ‘काल्पनिक’, ‘माहित्यां’चे न जुळणारे तुकडे जोडणारी अपुरी गोधडी असते.) ललित लिखाणही शेवटी याच प्रक्रियेतून जातं. फरक केवळ ‘काल्पनिकते’चा असतो. ललित लेखकालाही स्वत:ला, परिसराला, समाजाला उकरून, शोधून आधी त्या ‘माहिती’चं संकलन करावं लागतं आणि मग घडलेल्या घटना, माणसं, भूगोल, इतिहास याची ‘माहिती’ पात्रांकरवी अन्वयार्थात रूपांतरित होते, आणि मग कथा किंवा कादंबरी साकारते.
या द्वंद्वाकडे ‘सर्जनशील विरुद्ध वैचारिक’ अशा नजरेनं पूर्वी बघितलेलं आहे. (डॉ. अरुण टिकेकर यांनी संवाद-सभेत समारोपादरम्यान ‘हे’ द्वंद्व जास्त मोलाचं असल्याची भूमिका घेतली.) ‘ललित- अ-ललित’पेक्षा हे द्वंद्व खोल जातं, हे उघडच आहे. पण जेव्हा मी इरावती कर्वे आणि दुर्गा भागवत या दोन जबरदस्त लेखिकांचं लिखाण वाचतो तेव्हा ते द्वंद्व कोसळतंच पार! त्या दोघी एकाच वेळी सर्जनशील आणि वैचारिक लिहितात. ‘एकसमयावच्छेदे’करून ललित आणि माहितीपर अशा उडय़ा  एकाच लेखात दुर्गाबाई आणि इरावतीबाई मारतात. तेही छोटय़ा, दहा पानी लेखात. उदा. ‘ही नर्मदासुंदरी- दुर्गा भागवत- प्रवासवर्णन. यात संशोधनपर लेखन, काव्य, आत्मचरित्रात्मक तुकडे असं सगळंच त्या झकास विणतात आणि विवक्षित साहित्यप्रकारांचीही ऐशीतैशी करतात.
यावरून आठवतं आहे, की ‘ॠील्ल१ी२’चं प्राबल्य जगभर ढासळतं आहे. साऱ्याच कलांमध्ये! ‘लयपश्चिमा’मध्ये मी म्हटलं होतंच, की अभिजनांचं शास्त्रीय संगीत, जनांचं ‘बॉलीवूड’ वगैरे संगीत आणि आदिम ‘लोकसंगीत’ हे तीन गड अभेद्य, अजिंक्य वगैरे राहिलेले नाहीत! ‘कबिरा’सारख्या एखाद्या गाण्यात ती तीनही संगीतं अवतरतात. साहित्याचंही तसंच आहे. कथा, कविता, कादंबरी अशा स्वरूपात साहित्याकडे न बघता ते ‘ऊ्र२ू४१२ी’ (डिस्कोर्स) म्हणून बघितलं जातं. नवीन समीक्षा-जग तसा आग्रह धरतं. (मग ‘सावित्री’ कथा की कादंबरी, हा प्रश्न निर्थक ठरतो; तसंच नेमाडय़ांच्या कथा हा पुरेसा वाङ्मयप्रकार नसल्याचा जुना दावाही!) महत्त्व संदर्भाला (ूल्ल३ी७३) असतं. फेसबुकवरचं एखादं ‘सिम्बॉल’देखील विवक्षित संदर्भात ‘ललित’ बनू शकतं! मग एखादी जाहिरातही ‘ललित’ होऊ शकते! जगातले पुष्कळ समीक्षक चित्रपटालाही ‘साहित्या’मध्ये मोडू बघताहेत. (अर्थात, जगानं केलं म्हणजे आपण तो समीक्षा-निकष आंधळेपणे स्वीकारावा असं नाही, हे चर्चेमध्ये कुणीतरी मांडलंच. ते योग्य असलं तरी हेही ध्यानात घ्यायला हवं की, अखेरीस देरीदाचं ‘डीकन्स्ट्रक्शन’ आणि नागार्जुनाचा ‘शून्यवाद’ हा जवळजवळ एकाच बिंदूपाशी येतो.)
आणि मग या साऱ्या पाश्र्वभूमीवर जेव्हा मी आत्ताच्या ललित अवकाशाकडे बघतो तेव्हा मला जाणवतं की, ते संकोचणारं नाही. कदाचित गरज आहे ‘ललित’च्या व्याख्यावर्धनाची! ती व्याख्याच उलट संकोचलेली वाटते आहे. आणि अगदी कथा-कादंबरी वगैरे धरलं तरी नवे लेखक उत्तम लिहिताना मला दिसताहेत. नुकताच मी ‘लोकरंग’मध्ये लिहिलेला ‘अ‍ॅटिटय़ूडची कविता’ हा लेख वाचकांना आठवत असेल. पंचविशीची पिढी काय जोमाने कविता लिहीते आहे. किंवा कादंबरी म्हटलं तरी मागच्या जूनमध्ये आलेली गणेश मतकरीची ‘अध्र्या खिडक्या उघडय़ा’, मृणालिनी वनारसेची ‘प्रतीक’ आणि (विनय वगैरे सोडून) माझी ‘मुळारंभ’ या तीन कादंबऱ्या वर्धित होणारा ललित अवकाश दाखवायला पुरेशा आहेत!
आणि आठवताहेत मला पु. ल. देशपांडे. त्यांनी ‘अभिजात विरुद्ध लोकप्रिय’, ‘ललित- अ-ललित’, ‘सर्जनशील- वैचारिक’ अशा साऱ्या द्वंद्वांना किती सहज आपल्या लेखनात मिटवून, सामावून घेतलं! ‘अपूर्वाई’ हे काही केवळ प्रवासवर्णन नव्हतं. आत्मचरित्रपर तर नव्हतंच. आणि त्यातली माहितीही केव्हाच कालबाह्य झाली आहे. तरीही ते पुस्तक टिकलं आहे, कारण मुळात त्यात आहे एक जिवंत, चैतन्य असलेली कथा, (पुलं तेव्हा बडे सरकारी अधिकारी असतानाही) त्यात रेखाटलेलं मध्यमवर्गीय गडबडगोंधळ करणारं काल्पनिक ‘मी’ नावाचं पात्र! नाटकाची संहिता लिहावी तसं लिहिलेलं ते प्रवासवर्णन! ‘ललित’ साहित्याची व्याख्या पुलंसारख्या अनेक लेखकांनी सैल केलेलीच आहे- जिथे पुष्कळ वाङ्मयप्रकार एकमेकांत मिसळतात आणि माहिती व अनुभूती दोन्ही एकजीव नांदतात. पुलंच्या ‘वराती’तली दोन शाळकरी पोरं बोलत असतात. छोटा पोरगा विचारतो, ‘दारू म्हंजे काय रे भाऊ?’ मोठा समजावतो- ‘जे मादक द्रव्य पिले असता मनुष्य बडबड बडबड करतो, त्यास दारू असे म्हणतात.’ ‘म्हंजे आपली आई का रे भाऊ?’ धाकटं करट विचारतं. आणि मग हा विनोद रंगल्यावर शेवटी ते करट विचारतं, ‘म्हंजे सरळ व्हिस्की असे का सांगत नाहीस!’ आणि एकच हशा फुटतो.
‘ललित म्हंजे काय रे भाऊ?’ या प्रश्नाचं उत्तर असं एकाक्षरी, सहजपणे देता आलं असतं तर किती बरं झालं असतं!
डॉ. आशुतोष जावडेकर – ashudentist@gmail.com   

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 28, 2015 12:26 pm

Web Title: what does aesthetics
Next Stories
1 प्रयोगमुक्त आशयाचे नवे सर्जन
2 ‘द लॉर्ड ऑफ द रिंग्ज’चे महाकाय शिवधनुष्य
3 ‘अत्रे कट्टा’ नावासारखाच धट्टाकट्टा!
Just Now!
X