अंजली कुलकर्णी

पी. विठ्ठल यांचे ‘मी सार्वकालिक सर्वत्र’ हा अलीकडेच प्रकाशित झाला आहे.वस्तूत: कोणत्याही कविता संग्रहातील कवितांचे मूल्यमापन करताना, विशेषत: समाजकेंद्री कवितांच्या आशयाच्या संदर्भात काही प्रश्न उपस्थित करणे आवश्यक असते. एकतर कवी त्याच्या समकालीन राजकीय, सामाजिक परिस्थितीबाबत समाधानी आहे की असमाधानी? समाधानी नसल्यास हे असमाधान, ही अस्वस्थता कोणत्या स्वरूपाची आहे? कवीने आपल्या कवितांमधून व्यवस्थेला काही प्रश्न विचारले आहेत का? कवितेतून त्याने बदलाची अपेक्षा व्यक्त केली आहे का की कवी प्रचलित व्यवस्थांनाच अधिक घट्ट करण्याचे काम करीत आहे? या प्रश्नांच्या उत्तरांतून कोणत्याही कवितेची सामाजिक परिप्रेक्ष्यातून आशयात्मक तपासणी करता येते. त्यानंतर अर्थातच कवीचे भाषिक भानातून कवीच्या अभिव्यक्तीचे आयाम न्याहाळता येतात.

‘मी सार्वकालिक सर्वत्र’ या संग्रहात ‘हस्तक्षेप’, ‘प्रदक्षिणा’, ‘आत्मपीडा’ या तीन विभागांतून पी. विठ्ठल यांची कविता फार सामर्थ्यांने प्रकट झाली आहे. ‘हस्तक्षेप’ या विभागातील कविता भोवतालावर अधिक बोलतात. विपरीत वर्तमानातील विविध व्यवस्थांवर कवीने केलेले भाष्य हा एक प्रकारे या समाजव्यवस्थानमध्ये केलेला न्याय्य हस्तक्षेपच असतो. ती त्याची राजकीय कृती असते; किंबहुना ती त्याची जबाबदारी आहे असेच कवी मानतो असे या कविता सांगतात. म्हणूनच या संग्रहातील ‘सरकार’ या कवितेत अत्यंत धारदारपणे ‘सरकार’ या व्यवस्थेवर पी. विठ्ठल ताशेरे ओढताना दिसतात. मूलत: पक्ष कोणताही असो, जनकल्याणासाठी स्थापन झालेली ‘सरकार’ ही संस्था कालौघात जनकल्याणाचा बुरखा घातलेली एक दमनयंत्रणाच ठरते, हे सत्य पी. विठ्ठल यांना उलगडलेले आहे. एक सर्वशक्तिमान, नकारात्मक आणि लोकहितविनाशी संस्था म्हणून जेव्हा ती काम करू लागते तेव्हा सर्वसामान्य जनता, लेखक, कवी, विचारवंत यांच्याकडून तातडीने नैतिक हस्तक्षेप करण्याची गरज असते, अशी कवीची भूमिका ‘सरकार’सारख्या कवितांमधून प्रतीत होते. पी. विठ्ठल हे मूलत: कवितेतून वेळोवेळी भूमिका मांडणारे कवी असल्याने हा ‘हस्तक्षेप’ त्यांच्या भूमिकेस अनुकूल ठरतो. ‘सरकार’ या कवितेत ते लिहितात,

सरकार !
जगाच्या इतिहासातली हजारो पानं
तुम्ही व्यापली आहेत
कधी तुम्ही तैमूर असता बाबर असता
तर कधी वांशिक साम्राज्य निर्माण
करण्यासाठी लाखो ज्यूंची कत्तल करणारे
हिटलर असता

आणि शेवटी या कवितेत ,
बघा माणूस होता आले तर..! असे उपरोधाने बजावून सांगण्याचा कवीचा नैतिक अधिकारही कवी वापरतो. तर ‘भीती संपली नाही’ या दुसऱ्या एका कवितेत पी. विठ्ठल यांनी सोशल मीडियावर इतिहास संशोधनाचे पाया नसलेले अतक्र्य काम करून समाजात अशांतता निर्माण करणाऱ्या विघातक वृत्तींवर टोकदारपणे भाष्य केले आहे. ते लिहितात,

‘आम्ही आमच्या पूर्वजांचे पार्थिव शोधत राहिलो
श्रेष्ठत्वाचे दावे प्रतिदावे करत राहिलो
ज्ञात- अज्ञाताचे असंख्य सांगाडे उकरून काढले मातीतून
आणि प्रतिष्ठेच्या अस्थी वाटत राहिलो फेसबुकवर’

‘स्व’च्या संदर्भात वर्तमानाचा शोध हे पी. विठ्ठल यांच्या कवितेचे एक अविभाज्य सूत्र राहिलेले आहे. त्यांच्या प्रकाशित झालेल्या आजवरच्या समग्र कवितेत त्यांनी सभोवतीच्या अस्वस्थ वर्तमानाच्या खुणा आणि ‘स्व’ जाणीव यांच्यातील धाग्यांची उकल करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांच्या कवितासंग्रहांची शीर्षके तपासली तरी त्यातील अनिवार्य ‘मी’ आपण पाहू शकतो. ‘माझ्या वर्तमानाची नोंद’, ‘शून्य एक मी’ आणि ‘मी सार्वकालिक सर्वत्र’ या तीनही संग्रहांतून कवितागत ‘मी’ चा वावर स्पष्टपणे जाणवतो. अर्थात हा ‘मी’ म्हणजे केवळ पी. विठ्ठल ही व्यक्ती किंवा कवी असे नसून हा ‘मी’ समाजातील संवेदनशील, विचार करणाऱ्या, निरखणाऱ्या, तपासणाऱ्या, प्रश्न विचारू पाहणाऱ्या बदलाची कांक्षा ठेवणाऱ्या, सजग जगणाऱ्या जबाबदार व्यक्तींचे प्रातिनिधिक रूप आहे, हे वेगळे सांगण्याची गरज नाही. अगदी या नव्या संग्रहातील आत्मनिष्ठ कवितांमधूनही हा प्रातिनिधिक ‘मी’ उपस्थित आहेच. कारण वर्तमानात माणसांचे जगणे व्यक्तिकेंद्री, आत्मकेंद्री झाले असले तरी ते समाजातील असंख्यापेक्षा वेगळे नाही. त्याचे जगणे, त्याची रहनसहन पद्धती, वेशभूषा, केशभूषा, कपडे, खाण्यापिण्याच्या सवयीएवढेच काय त्याची विचार करण्याची पद्धतीही एकसारखी, सपाट होत चालली आहे. ‘माणसांचाच एक ब्रँड विकसित होण्याच्या या काळात आत्मनिष्ठ ‘मी’च्या मानसिक, भावनिक, मूल्यात्मक समस्याही एकसारख्या होत चालल्या आहेत. म्हणूनच या संग्रहातील अस्वस्थतेची नाळ एकूणच आजच्या परिस्थितीशी जुळलेली आहे. अर्थात ‘मी’ चा हा प्रवास सर्वकाळात, सर्वत्र निरंतर सुरू आहे.
‘मी सार्वकालिक सर्वत्र’ या शीर्षकाची या संग्रहातील पहिलीच कविता या ‘सार्वकालिक’ आणि सर्वत्र असणाऱ्या ‘मी’च्या विविध मितींचा शोध घेते. पी. विठ्ठल यांनी या कवितेत मानवी सृष्टीच्या जन्मापासून माणसाच्या बहुरूपिणी भुकेचा, अस्तित्वाचा, लैंगिक प्रेरणांचा, सत्तेचा, महत्त्वाकांक्षेचा, इतिहासातील मुळांचा आणि त्यानंतरच्या संपूर्ण वर्चस्वाचा प्रवासपट मांडला आहे. माणसाने निसर्गाचे गमक शोधून काढले आणि निसर्गावर मांड ठोकली. अवाढव्य विश्व त्याने आपल्या बुद्धिचातुर्य आणि मनगटाच्या बळावर अंकित करून घेतले सुरुवातीला नुसतीच अस्तित्वापुरती असलेली त्याची मात करण्याची ऊर्मी मग अवघ्या सृष्टीला पादाक्रांत करण्याच्या ईष्र्येत कशी बदलली असेल हा निरंतर प्रश्न. मानवाने संपर्क भाषा तयार केली, विविध धर्म स्थापले, जीवनाच्या भौतिक गरजांबरोबर आध्यात्मिक, तात्त्विक गरजाही शमवताना विविध विचारप्रवाह निर्माण केले. इतिहास, भूगोल, गणित, विज्ञानासह विश्व निर्मितीचे रहस्य उलगडण्याचा आटापिटा चालवला. धर्माच्या धर्मसंस्था, धर्मगुरू, धर्मग्रंथ निर्मिताना त्याने चलाखीने श्रेष्ठ-कनिष्ठत्वाचे नियम घालून दिले. जमिनीच्या, संपत्तीच्या, वारशाच्या संकल्पनांबरोबर स्वामित्वभाव निर्माण झाले. त्यासाठी लढाया, युद्धे सुरू झाली. विविध प्रकारचे सत्तावाद सुरू झाले. अशा आदिम काळापासूनच्या मानवी वर्चस्ववादाच्या इतिहासाचा अन्वयार्थ या कवितेत कवीने लावला आहे.

‘एक इतिहास लिहिला गेला माझ्या भुकेसाठी
मी प्रथम पुरुष; मी द्वितीय, तृतीय, चतुर्थ –
क्रम बदलत गेले, लिंग बदलत गेले
हव्यासाचे लोभाचे चिंतेचे द्वेषाचे प्रदेश प्रगत होत गेले’ अशा उपरोधिक भाषेत तो अन्वय प्रकट होतो.

कवितासंग्रहाच्या दुसऱ्या ‘प्रदक्षिण’ या भागात वर्तमान परिस्थितीच्या परिदृश्यात प्रतीत होणारे ‘स्व’ जाणीव आणि नेणिवांचे विश्व पी. विठ्ठल यांनी उजागर केले आहे. विविध नातेसंबंधांतील स्त्री हा त्यांच्या कवितेचा आस्थाविषय आहे. स्त्रीत्वाचे विविध आयाम शोधताना इतिहास काळापासून लिंगसत्ताक व्यवस्थेने स्त्रीचे केलेले दमन आणि शोषण कवीला अन्याय्य आणि म्हणून त्याज्य वाटते. स्त्रीच्या व्यक्तित्वाचे अनेकविध सुंदर पैलू कवीला तिचे बलस्थान शोधायला आणि तिच्या सन्मानाचे उद्गार काढायला भाग पाडतात. तिचे नात्यांचे निकोप झाड वाढवणे, आपुलकीचे स्नेहशील धागे जपत राहणे, तिचे प्रिय व्यक्तीवर, नवऱ्यावर, मुलाबाळावर आणि प्रपंचासकट अवघ्या भोवतालावर आपल्या विशाल प्रेमाची उधळण करणे, तिचे भावशीलतेबरोबरच प्रसंगी कणखर, खंबीर असणे हे सारेच कवीला फार मोलाचे वाटते. कवी लिहून जातात ,

‘बाई संसाराच्या रिकाम्या जागा भरत राहते
सामंजस्याचं अध्यात्म सांभाळत राहते
जमीन सारवणे काय नि फरशी पुसणं काय
बाई माणसाच्या आदिम जगण्यालाच उजळ करत जाते’

कवितासंग्रहाच्या तिसऱ्या टप्प्यात आत्मपीडात्मक संवेदनेचे अनेक सूक्ष्म तंतू टिपणारे अनुभूतींचे प्रहर भेटतात.
‘आपल्याला बुद्ध होता येत नाही’ किंवा ‘सत्य हेच की आपण विस्थापित होत आहोत आपल्याच नात्यातून’ अशा अंत:स्रावी शब्दांतून ही कविता चिंतेचे सावट ठळक करत असली तरी ती फक्त चिंतेपाशी थांबत नाही तर बदलाचे , परिवर्तनाचे आश्वासनही ती देते.
‘परिशिष्टातल्या शिस्तबद्ध संदर्भासारखी’ किंवा ‘शोकात्मिकेच्या सूर्यास्ताची अपार वेदना’ सारख्या अत्यंत प्रत्ययकारी प्रतिमांमधून जाणिवेचा तळ गाठून तिथे तरंगणाऱ्या संवेदनेच्या प्रवाहांना नेमके चिमटीत पकडण्याचा ध्यास या कवीला लागला असल्याच्या खुणा त्यांच्या कवितेत दिसतात.

‘मी सार्वकालिक सर्वत्र’,

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पी. विठ्ठल, गोल्डनपेज पब्लिकेशन्स, पुणे,
पाने- १४०, किंमत- ३५० रुपये.