साधना साप्ताहिकाचे संपादक विनोद शिरसाठ यांचा ‘सम्यक- सकारात्मक’ हा लेखसंग्रह लवकरच प्रकाशित होत आहे. २ नोव्हेंबर रोजी पुण्यात, तर १४ डिसेंबर २००३ रोजी दापोली येथे नाटककार विजय तेंडुलकर यांच्या प्रकट मुलाखती झाल्या होत्या. त्या पाश्र्वभूमीवर शिरसाठ यांनी हे पत्र लिहिले होते. (त्याला आता दहा र्वष होत आहेत.)

त्यातला हा संपादित अंश-

Babasaheb Ambedkar published Mooknayak lyrics by Vamandada Kardak in the voice of Hariharan
एका वर्तमानपत्राचे गाणे होताना…! ‘मूकनायक’ या वामनदादा कर्डकांचे गीत हरिहरन यांच्या आवाजात; आज प्रसारण
out there screaming book
बुकबातमी: ‘भयप्रेमीं’साठीचा दस्तावेज..
Kennedy novel Marathi short stories Ram Kolarkaran editing magazines
कथावार्ता: कॅनडी नवलघुकथा..
lokrang, article, pandit kumar gandharv, singing style, thoughts, indian classical music, book, about to launch, gandharvanche dene pandit kumarjinshi sanvad,
कुमारजींचा सांगीतिक विचार

आदरणीय विजय तेंडुलकर,

२ नोव्हेंबरची गोष्ट. दिवाळी सुट्टी संपवून पुण्यात आलो होतो. ‘सकाळ’मधली जाहिरात वाचली. ‘‘ ‘सृष्टी’चा चालता-बोलता दिवाळी अंक : विजय तेंडुलकरांच्या साहित्यिक कारकीर्दीचा रंगमंचीय आविष्कार.’’ मी रोमांचित झालो. बरोबर पाच वाजता ‘सिम्बायोसिस’च्या ‘विश्वभवन’ इमारतीत पोहोचलो. ‘कार्यक्रम’ वेळेवर सुरू झाला आणि तब्बल तीन तास चालला. तुमच्या विविध भावमुद्रा टिपलेली छायाचित्रं सुरुवातीलाच दाखवली गेली. त्याच्या जोडीला ‘निवेदन’ जाणीवपूर्वक दिलं नसावं, हे चट्कन लक्षात आलं. ‘चित्रं वाचायची असतात’, असं तुमच्याच एका लेखात वाचलं होतं.

नंतर तुमच्या काही साहित्याचं वाचन झालं. तुम्ही स्वतवर लिहिलेल्या व इतरांनी तुमच्यावर लिहिलेल्या लेखांचंही वाचन झालं. जब्बार पटेल, निळू फुले, श्रीराम लागू आदी रथी-महारथींच्या प्रतिक्रिया ऐकल्या. साहित्य, नाटक व चित्रपट क्षेत्रांतील तुमचं अफाट कर्तृत्व आणि तुमचं अथांग व्यक्तिमत्त्व यांचा धावता आढावा घेणारा ‘चित्रपट’ पाहिल्यासारखं वाटलं. अत्यंत आखीव-रेखीव झालेल्या कार्यक्रमामुळे विश्वभवनमधील साडेतीनशे लोकांप्रमाणेच मीसुद्धा भारावून गेलो.

शेवटी व्यासपीठावरील वक्ते श्रोत्यांत येऊन बसले. संपूर्ण रंगमंच तुमच्यासाठी मोकळा करून दिला. आधीचे तीन तास सभागृहात ‘पिनड्रॉप सायलेन्स’चे वातावरण होतेच; पण तुमच्या नावाची उद्घोषणा झाल्यावर त्या शांततेला आणखी गांभीर्य आलं. साऱ्यांच्या नजरा व्यासपीठाच्या मध्यभागावर खिळल्या आणि तेवढय़ात सतीश आळेकरांनी तुम्हाला व्यासपीठावर आणून सोडलं. तुम्ही हातातले कागद त्यांच्याकडे दिले.

तुमची ती उंच व भरदार शरीरयष्टी. दाढीमुळे व्यक्तिमत्त्वाला आलेले वेगळे परिमाण. हिरवे जाकीट आणि ढगळ कुर्ता-पायजमा अशा वेषात तुम्ही रंगमंचावर मध्यभागी सम्राटाच्या आविर्भावात आसनस्थ झालात. दीर्घ श्वास घेऊन बोलायला सुरुवात केलीत. प्रत्येक जण तुमचा प्रत्येक शब्द ऐकण्यासाठी आतुर झालेला.

सुरुवातीची तीन-चार मिनिटे तुम्ही फार सौम्यपणे बोललात. त्यानंतर मात्र..‘‘आपल्याविषयी इतके गरसमज मी का पसरविले, असा मला एक मूलभूत प्रश्न आहे.. माझ्या कणखरपणाविषयी, दमदारपणाविषयी इथे बोललं गेलं.. पण मी अनेकदा ढसढसा रडलेलो आहे.. अलीकडे तर मी जास्त रडतो.. माझ्यातलं जे मूल आहे, ते रडतंय.. ‘लेखणी हे शस्त्र आहे’ असं कोणी म्हटलंय, मला माहीत नाही.. मला मात्र असं वाटतंय की, माझ्या हातात खरं शस्त्र असायला पाहिजे होतं.. लेखणीने खून होऊ शकत नाही म्हणून मी रडतो.. मला असं वाटतं की, काही माणसांना जगण्याचा हक्क असता कामा नये.. त्यांना आपण जगू देतो, हा आपला गुन्हा आहे.. त्या लोकांना मारलं पाहिजे.. त्या लोकांचा मारेकरी व्हायला मला आवडेल.. तो मी होऊ शकत नाही, हे माझं फार मोठं दुख आहे.. लेखक म्हणून माझी ताकद इतकी कमी आहे की, मी त्यांचं काहीही करू शकत नाही.. पुनर्जन्मावर माझा विश्वास नाही.. पण तो मिळाला तर मी म्हणेन- मला लेखणी नको, शस्त्र हवं. मला फार आयुष्यही नको.. काही मोजकी माणसंच मी मारणार आणि न्यायालयासमोर जाऊन सांगणार की, मी विचारपूर्वक यांना मारलं आहे.. आणि ती पुन्हा समोर आली, तर या शस्त्राने मी त्यांना पुन्हा मारीन..’’

तेंडुलकर, तुम्ही एक-एक वाक्य ‘पॉझ’ घेऊन धीरगंभीर आवाजात उच्चारत होता आणि सारं सभागृह अवाक् झालं होतं. तुम्ही बोलत होता आणि श्रोते श्वास रोखून ऐकत होते. एकही शब्द निसटून जाऊ नये म्हणून, कान गोळा करून ऐकत होते. अनेकांच्या हृदयाचे ठोके मंदावले होते. माझी अवस्थाही यापेक्षा वेगळी नव्हती. प्रत्येक शब्द मोजून, मापून, तासून वापरणाऱ्या वक्त्याच्या तोंडून इतकं स्फोटक व इतकं प्रक्षोभक भाषण ऐकण्याची त्या सर्वाची बहुधा पहिलीच वेळ असावी.

अवघी दहा मिनिटे तुम्ही बोललात.. अनेकांप्रमाणे मीसुद्धा टाळ्या वाजवायचे विसरून गेलो. कार्यक्रम संपल्यावर सर्व जण सुन्न मनाने, शांतपणे बाहेर पडत होते. सभागृहातून बाहेर आल्यावरही लोक आपापसांत बोलत नव्हते.

मी बाहेर पडताना क्षणभर ‘कॉमन मॅन’च्या पुतळ्याजवळ थबकलो. नंतर एका धुंदीतच घराकडे चालत राहिलो. तडातड चालतच दोन-अडीच किलोमीटर कधी आलो, ते कळलंच नाही. सकाळी लवकर जाग आली. उठून बसलो. डोकं जड पडलं होतं. दारू प्यायल्यावर नशा चढते म्हणतात, मला त्याचा अनुभव नाही; पण ती नशा कशी असू शकते, याचा अंदाज आला. त्या दिवशी दुपापर्यंत मी त्या नशेतच होतो.
गेल्या दहा वर्षांत निदान पाचशे कार्यक्रमांना मी उपस्थिती लावली असेल; पण हा कार्यक्रम अद्भुत, अविस्मरणीय होता. नंतरचे दोन-तीन दिवस त्या कार्यक्रमाचा वृत्तान्त जवळच्या लोकांना सांगत होतो. ‘सामान्य माणसांच्या मनातील भावनाच तुम्ही व्यक्त केल्यात’ असं तुम्हाला ओळखणाऱ्यांचं म्हणणं होतं. काही प्रतिक्रिया मात्र तुमच्याइतक्याच टोकाच्या होत्या.

एक सज्जन, दुर्मीळ पुस्तकांचे विक्रेते म्हणाले, ‘‘तेंडुलकर र्अधच बोलले. त्यांनी हे सांगायला पाहिजे होतं की, फाळणीच्या वेळी लाखो लोकांच्या कत्तली झाल्या, त्याला जबाबदार गांधी होते. म्हणून नथुरामने केलं, ते योग्यच होतं.’’

दुसरा म्हणाला, ‘‘त्या लोकांचा खून करणं राहू दे, निदान त्यांची नावं सांगायचं धाडस तरी करायला हवं होतं!’’
तिसऱ्याने प्रतिप्रश्न केला, ‘‘मुंबईत पिस्तुल मिळवणं अवघड नाही. मग तेंडुलकर भाषणं करण्यापेक्षा कृती का करत नाहीत?’’
चौथ्याने जाहीर केलं, ‘‘गेली कित्येक वष्रे बाळासाहेब सांगत होते, ते यांनी सांगितलंय. यात नवं आणि विशेष ते काय आहे?’’
पाचव्याने हसत-हसत सांगितलं, ‘‘वयाची पंचाहत्तरी पार केल्यावर कळलं यांना. उशिरा सुचलेलं शहाणपण- दुसरं काय!’’ आणखी काही प्रतिक्रिया अशा होत्या.. ‘‘तेंडुलकरांचं दुसरं बालपण सुरू झालंय..’’, ‘‘प्रकाशझोतात कसं राहायचं, ही कला या माणसाला चांगली जमते’’.. ‘‘वैफल्यग्रस्त माणसाचे बोल आहेत, गांभीर्याने घ्यायचे नसतात.’’.. ‘‘कौटुंबिक आघातामुळे तेंडुलकरांचे मानसिक संतुलन बिघडलेय..’’
या प्रतिक्रियांनी माझ्या विचारप्रक्रियेला चालना दिली, हे खरं; पण इतकी वरवरची आणि उथळ प्रतिक्रिया देणं मला तरी शक्य नव्हतं. कारणं अनेक होती. तुमची पाच-सात भाषणं मी ऐकली होती. चार-पाच नाटकं पाहिली होती. दहा-बारा पुस्तकं वाचली होती. ‘सामना’ चित्रपट तर सोळा वेळा पाहिला होता. तुम्ही स्वतवर लिहिलेलं, इतरांनी तुमच्यावर लिहिलेलं अधाशासारखं वाचलं होतं. तुमच्यातला लेखक मोठा की माणूस- यावर बराच विचार केला होता. तुमच्या जीवनशैलीनं जबरदस्त प्रभावित झालो होतो. या सर्वाच्या परिणामी तुम्हाला ‘कॉन्शस कीपर’ मानत होतो.

यश गिरवण्याचं नाकारणारा लेखक

म्हणून सदसद्विवेकबुद्धीला जागृत ठेवून तुमच्या भाषणाचं विश्लेषण करू लागलो. एव्हाना, भाषेची मर्यादा नको तितकी कळू लागल्याने तुम्हाला नेमकं काय म्हणायचंय, तिथपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करू लागलो. तुम्हाला अभिप्रेत असलेला आशय शोधू लागलो. या साऱ्या डोकेफोडीतून माझी एक ओळीची प्रतिक्रिया तयार झाली. ती मी कुणी न विचारताच देत राहिलो..

‘‘तेंडुलकरांच्या भावना मी समजू शकतो; पण त्यांनी व्यक्त केलेल्या विचारांशी मी सहमत नाही!’’
होय तेंडुलकर सर, तुमच्या भावनांशी मी पूर्णत: सहमत आहे. सभोवताली जे चाललंय, ते उद्वेग आणणारं आहे. माणूस दिवसेंदिवस भौतिक, वैज्ञानिक प्रगती करतो आहे; पण त्याच वेगाने नतिक अधोगती होत आहे. चंगळवाद, भोगवाद सर्व स्तरांवर बोकाळला आहे. चारित्र्य, सहिष्णुता या संकल्पना हद्दपार होण्याच्या मार्गावर आहेत. ‘यश’ आणि ‘कर्तृत्व’ शब्दांचे अर्थच बदलले आहेत. जातीयवाद व धर्माधता हिडीस स्वरूपात पुढे येत आहे. हे सारं पाहताना कोणत्याही विवेकी माणसाला क्लेश होणारच; तसे ते तुम्हालाही होत असणार!.. पन्नास वर्षांपूर्वी गंगाधर गाडगीळांनी ‘किडलेली माणसे’ ही कथा लिहून खळबळ उडवून दिली होती. आणि आता तुम्ही ‘किडलेली समाजव्यवस्था’ या निष्कर्षांवर आला आहात.

तेंडुलकरांच्या नाटय़भूमीची पाळेमुळे

तुमचं प्रक्षोभक भाषणच सांगतंय, लोकशाहीच्या चारही स्तंभांवर- किंबहुना, ‘लोकशाही’ व्यवस्थेवरच तुमचा विश्वास राहिलेला नाही. आणि मग तुम्हाला काय करावंसं वाटतंय किंवा पुनर्जन्म मिळाला तर काय करायला आवडेल, ते तुम्ही सांगितलंत; पण इतरांनी काय करावं, हे नाही सांगितलंत- म्हणून मी अस्वस्थ आहे.

त्यामानाने तुमचं सोपं आहे तेंडुलकर सर! पंचाहत्तर वर्षांचं आयुष्य उपभोगून ‘जीवननाटय़ा’तून एक्झिट घेण्याच्या मार्गावर आहात तुम्ही! पण माझं काय? माझ्या पिढीचं काय? तुम्हाला आदरणीय मानणाऱ्यांचं काय? तुम्ही म्हणता तशा किडलेल्या समाजव्यवस्थेला सामोरं जायचंय माझ्या पिढीला. पाय रोवून उभं राहायचंय. जमलंच तर थोडंफार कर्तृत्व गाजवायचंय. माझ्या पिढीसाठी गाईड आणि गुरू उरले नाहीत. तुमच्यासारखे थोडे ‘कॉन्शस कीपर’ आहेत; पण तुम्ही तर सरळ हात वर करून मोकळे झालात.. मग आम्ही काय बोध घ्यायचा? तुम्ही म्हणता तसं हातात पिस्तुल घेऊन गोळ्यांच्या फैरी झाडायच्या?

पण सर, तुमचाच कित्ता गिरवायचा ठरवलं; तर कोणाकोणाला गोळ्या घालायच्या, त्यांची यादी करावी लागेल. त्याचे अधिकार कोणाकोणाला द्यायचे, त्यांचीही यादी करावी लागेल. यातच भ्रष्टाचार होण्याची शक्यता जास्त आहे. आणि समजा- भ्रष्टाचार नाहीच होऊ दिला, तरी ‘एकमत’ होणं अशक्य आहे. मग?

‘ते’ मराठी नाटक पाहिलं आणि कुणीतरी तोंडात मारल्यानं खुर्चीखाली पडल्यासारखं वाटलं : जावेद अख्तर

आदरणीय तेंडुलकर सर, तुम्ही केलेली यादी मला मान्य होईल; पण तुमच्यासारख्याच दुसऱ्या एखाद्या सत्शील व चारित्र्यवान माणसाने अशी यादी केली, तर कदाचित तो माणूस त्याच्या यादीत तुमचंही नाव घालील. तुम्ही प्रक्षोभक नाटकं लिहून समाजात दुफळी माजवलीत, असा आरोप तुमच्यावर ठेवला जाईल. गांधींच्या खुनाचं समर्थन करणारे खूप लोक या देशात आहेत; मग तुमच्या खुनाचं समर्थन करणं अशक्य का आहे?

म्हणून सर, तुमच्या भावना मी समजू शकतो; पण तुम्ही व्यक्त केलेल्या विचारांशी मी सहमत नाही!
कमीत कमी दोष असणारी शासनप्रणाली निवडायची असेल, तर ‘लोकशाही’ला पर्याय नाही. आणि लोकशाहीचे सर्वच स्तंभ खिळखिळे झाले असतील, तर ते समाजस्वास्थ्य बिघडल्याचं लक्षण असतं. दीर्घकाळच्या कुव्यवस्थेने समाजस्वास्थ बिघडले, तर त्यासाठीची उपाययोजनाही दीर्घकालीन असावी लागते, हे काय तुमच्यासारख्यांना सांगायला हवं?

बाकी तुम्हाला मानलं सर! अस्वस्थ समाजाचं प्रतिनिधित्व करणं, त्याच्या भाव-भावनांचं चित्रण करणं हे कोणत्याही साहित्यिकाचं आद्यकर्तव्य मानलं जातं. एकविसाव्या शतकाच्या सुरुवातीला, जनमताची पर्वा न करता, मोठं धाडस दाखवून असं कर्तव्य बजावणारा पहिला मराठी लेखक म्हणून भावी इतिहासकार तुमचा उल्लेख करतील. अजगराप्रमाणे सुस्तावलेल्या समाजाला, झोपेचं सोंग घेऊन पडलेल्या साहित्यिविश्वाला डिवचण्याचं काम तुम्ही केलंत; त्याबद्दल मात्र तुम्हाला धन्यवाद दिले पाहिजेत!

मधल्या भिंती कनिष्ठ मध्यमवर्गीय जाणिवांचे चित्रण

तेंडुलकर सर, गेल्या वर्षभरात तुम्हाला पत्र लिहायचे प्रसंग तीन वेळा आले. श्री. पु. भागवतांसारख्या सत्शील व्यक्तीने मनोहर जोशींसारख्या अभद्र व्यक्तीच्या हस्ते पुरस्कार घेऊ नये, असं आवाहन करणारं तुमचं ते प्रसिद्ध पत्र.. त्यानंतर अमेरिकेतील मराठी जनांसमोर ‘उपकार-औदार्य-त्याग’ या संकल्पनांवर घेतलेला पाठ- हा दुसरा प्रसंग. आणि सिम्बायोसिस विश्वभवनमधील भाषण हा तिसरा प्रसंग. तीनही वेळा कागद-पेन घेऊन बसलो; पण ‘आदरणीय विजय तेंडुलकर’ लिहून थांबलो.

पण परवा दापोलीला झालेल्या तुमच्या भाषणाचा वृत्तान्त वाचला. ‘माझ्या हातात पिस्तुल दिलं, तर मी सर्वप्रथम नरेंद्र मोदींवर गोळ्या झाडेन’, हे तुमचं अपेक्षित विधान वाचलं. तेव्हा माझ्या आतले विचारकल्लोळ पुन्हा उफाळून आले. ते सर्व बाहेर ओकल्याशिवाय स्वस्थ बसणंच अशक्य झालं. म्हणजे माझी मानसिक गरज म्हणून हे पत्र लिहिलं. पत्रात लहान तोंडी मोठा घास घेण्याचा प्रयत्न दिसेल; पण त्याला माझा नाइलाज आहे.
आपला,
विनोद शिरसाठ