दिलीप माजगावकर
मानवी मनातल्या वृत्ती-प्रवृत्तींचा शोध घेणारी नाटकं असोत वा शैलीदार ललित लेखन.. प्रख्यात नाटककार विजय तेंडुलकर यांनी नेहमीच भोवतालच्या सामाजिक-राजकीय-सांस्कृतिक जीवनावर भेदक कटाक्ष टाकलेला दिसून येतो. आज भोवतालचे संदर्भ जरी बदलले असले तरी तेंडुलकर कालबाह्य़ झाल्याचे आढळून येत नाहीत ते त्यामुळेच. येत्या १९ मे रोजी तेंडुलकरांचा दहावा स्मृतिदिन येत आहे. त्यानिमित्ताने..
नाटककार तेंडुलकरांवर गेल्या पन्नास-पंचावन्न वर्षांत उतू, ओसंडून जाणाऱ्या कौतुकापासून ते अगदी जिव्हारी लागणाऱ्या भाषेत जितकं लिहून, बोलून झालंय की मला नाही वाटत, इतर कोणा समकालीनावर कधी इतकं लिहिलं-बोललं गेलंय. या अगदी दोन टोकाच्या प्रतिक्रियांतून एक सत्य मात्र उरलंय, की विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात केवळ मराठी नाही, तर भारतीय रंगभूमीला निराळं परिमाण आणि निर्णायक वळण देणारे ते नाटककार आहेत. तेंडुलकरांचा पन्नास वर्षांचा नाटय़प्रवास, त्यांची नाटकं, त्यांचे विषय, त्यांचं सादरीकरण, त्यासाठी वापरलेली भाषा आणि काही नाटकांवर घोंघावलेली वादळं बघता या स्थानावर त्यांचा रास्त अधिकार पोहोचतोच.
‘मराठी रंगभूमीचा चेहरामोहरा विजय तेंडुलकरांनी बदलला’
खरं तर नाटकांइतकं तेंडुलकरांनी ललित लेखनही मोठय़ा प्रमाणावर केलं. त्यांच्या शब्दांत सांगायचं तर- ते कधी सक्तीनं, तर बरंचसं जगण्याच्या गरजेतून झालं. कविता सोडून कथा, कादंबरी, व्यक्तिचित्रं, ललित निबंध हे सगळे फॉम्र्स त्यांनी हाताळले. त्यांचं निवडक ललित लेखन तर त्यांच्या काही उत्कृष्ट नाटकांइतकं सुरेख आहे. पण त्यांच्या ललित लेखनावर मात्र कधी भरभरून बोललं गेलं नाही. एखादा कलावंत एकापेक्षा अधिक कलांत किंवा फॉम्र्समध्ये काम करतो तेव्हा असं होत असावं का? काही वर्षांपूर्वी जगातल्या उत्कृष्ट अशा शंभर कवींच्या प्रत्येकी एक कवितेचा संग्रह माझ्या वाचनात आला. त्यात पिकासोची एक सुंदर कविता होती आणि मागच्या बाजूला कवी म्हणून त्याचं मोठेपण सांगून झाल्यावर ‘अल्सो अॅन आर्टिस्ट’ अशी त्याची ओळख होती! तेंडुलकरांच्या ललित लेखनाबाबतही काहीसं असंच आहे, इतकं ते वरच्या दर्जाचं आहे.
तेंडुलकरांच्या नाटकाशी एक प्रेक्षक इतकाच माझा संबंध आला; पण त्यांच्या ललित लेखनाशी मी जवळून परिचित आहे. इतकंच नाही, तर काहीसा साक्षीदारही आहे. जवळपास ४० वर्षांपूर्वी ‘रातराणी’ नावाचं एक सदर ते ‘माणूस’मधून लिहीत होते. मुंबईच्या सांस्कृतिक जगतावरचं ते लेखन होतं. कोणताही विषय त्यांना वज्र्य नव्हता. त्यात नाटक, चित्रपट, व्यक्तिचित्रं, कुस्ती, सर्कस अशा सर्व विषयांवर त्यांनी लिहिलं आहे. आपल्यापकी अनेकांनी ते लेखन वाचलं असेल. नसेल तर आवर्जून वाचा. आजही ते तितकंच ताजं आणि टवटवीत आहे. एखाद्या नाटक-चित्रपटाकडे, प्रसंगाकडे, त्यामागच्या माणसाकडे पाहण्याची वेगळी नजर तुम्हाला त्यात मिळेल. आचार्य अत्रे, पॉल म्यूनी आणि किंगकाँगवरचे त्यांचे मृत्युलेख बघा. आचार्य रजनीश, बाबा आमटे यांची व्यक्तिचित्रं वाचा, किंवा ‘सगीना महातो’, ‘बोनी अॅण्ड क्लाईड’ यांसारख्या चित्रपटांवरची परीक्षणं बघा. प्रत्येक ठिकाणचे तेंडुलकर निराळे आहेत. त्या-त्या प्रसंगामागचा माणूस ते एका आस्थेनं समजून घेतात. त्याला काळं-पांढरं लेबल लावायची ते घाई करत नाहीत. त्यांच्या भाषेवर संस्कृतचा प्रभाव जाणवत नाही, तरी तिला स्वतचं असं एक वजन आहे. त्यांच्या शैलीचं एक उदाहरण देतो. ‘ग्रॅण्ड-प्री’ नावाच्या एका चित्रपटावर त्यांनी परीक्षण लिहिलंय. हा हॉलीवूडचा एक चोख व्यावसायिक चित्रपट. मोटार रेसिंगच्या पाश्र्वभूमीवरची एक साधी-सरळ प्रेमकहाणी. रेसिंगच्या पाश्र्वभूमीवरचा चित्रपट असल्यानं संपूर्ण चित्रपटाला एक विलक्षण वेग होता.. एक गती होती. खरं तर वेग हा त्या चित्रपटाचा प्राण होता. तुम्ही ते परीक्षण वाचा. तुमच्या लक्षात येईल, की छोटय़ा छोटय़ा वाक्यांतून तेंडुलकरांनी त्यांच्या शैलीलाच एक अशी गती दिलीय आणि चित्रपटाचा नेमका प्राण पकडलाय. इथे लेखक तेंडुलकर दिसतात. हे त्यांचं वेगळंपण.
‘ते’ मराठी नाटक पाहिलं आणि कुणीतरी तोंडात मारल्यानं खुर्चीखाली पडल्यासारखं वाटलं : जावेद अख्तर
त्यांच्या लेखनशैलीचे अजून एक उदाहरण सांगतो. ‘कोवळी उन्हे’ पुस्तकाची प्रस्तावना तुम्ही वाचा. एका वृत्तपत्रीय सदराच्या जन्म-मृत्यूची कथा तेंडुलकर इथे सांगतात. नाइलाज म्हणून गळ्यात पडलेल्या या सदरात ते हळूहळू कसे रमत-रंगत गेले आणि पुढे सदरमय होत गेले याचं अतिशय चित्रमय वर्णन ते करतात. वाचकांची आणि त्यांची ही आनंदयात्रा अशीच चालू राहणार या समजुतीत असताना अचानक एक दिवस- ‘मॅनेजमेंटचे म्हणणे- हे सदर आता थांबवा..’ या संपादकांच्या कोरडय़ा निरोपाने खाडकन् ते कसे भानावर आले, हे सांगून ‘सदराचा शेवटचा लेख देऊन कचेरीतून बाहेर पडताना मला आपले मूल स्मशानात पोहोचवून निघालेल्या बापासारखे वाटले. हलके हलके. चला, एक जबाबदारी कमी झाली..’ असा विलक्षण चटका लावून जाणारा शेवट ते करतात.
त्यांचा ‘रातराणी’चा काळ हा व्यक्तिश: माझ्या आयुष्यातला सुरुवातीचा शिकण्या-धडपडण्याचा काळ होता. मला मुंबई नवी होती. हे सांस्कृतिक जग नवं होतं. माणसं नवी होती. माझं भाग्य असं की, या सुरुवातीच्या काळात तेंडुलकरांचं बोट धरून मला हे सारं बघता आलं, समजावून घेता आलं. आम्ही दर आठवडय़ाला नियमित भेटत असू. त्यांच्याबरोबर मी नाटक-चित्रपट बघितले. अनेक विषयांवर ते माझ्याशी बोलत. मी ऐकण्याचं काम करी. प्रत्येक वेळी त्यांची मतं पटत नसत. पण त्यांची विचार करण्याची वेगळी पद्धत लक्षात येई. मी त्यांच्याकडून खूप काही शिकत होतो, घडत होतो, ‘एन्रिच’ होत होतो. तेंडुलकरांचं माझ्या आयुष्यात हे स्थान आहे.
पुढचा तपशील गौण आहे. मी प्रकाशनाचं काम बघू लागलो. त्यांनी वेळोवेळी केलेल्या ललित लेखनाचा माझ्यावर प्रभाव होता. मग त्यातूनच त्यांचं सर्व लेखन एकत्रितपणे आपण प्रकाशित करावं असा विचार मनात आला. त्यांनाही ती कल्पना आवडली. आधीची काही आणि ‘कोवळी उन्हे’, ‘रामप्रहर’ ही दोन पुस्तकं विचारात घेतली तर बहुतेक त्यांचं सर्व ललित लेखन आता प्रकाशित झालं आहे. यादरम्यान काही वर्षांपूर्वी त्यांच्या कादंबरीलेखनाचा टप्पा आला. तोपर्यंत इतर सर्व फॉम्र्समध्ये विपुल लेखन करणाऱ्या तेंडुलकरांनी कधी कादंबरी लिहिलेली नव्हती. ती लिहायचं त्यांच्या मनात होतं. काही महिन्यांनी त्यांचं लेखन पूर्ण झालं. ते वाचल्यावर मी आणि वसंतराव सरवटे त्यातल्या अनेक कच्च्या दुव्यांविषयी त्यांच्याशी बोललो. पुढे कादंबरी प्रकाशित झाली. त्या कादंबरीचं संमिश्र स्वागत झालं. अनेकांना ती आवडली नाही. तिची साहित्यिक गुणवत्ता हा मुद्दा बाजूला ठेवू, पण कादंबरी प्रकाशनामागची माझी भूमिका काय होती, यासंदर्भात मी तेंडुलकरांना एक पत्र पाठवलं होतं. त्यात लिहिलं होतं-
‘तेंडुलकर,
नाटककार म्हणून तुम्ही मोठे आहात हे आता सिद्ध झालेलं आहे. हे मोठेपण तुम्हाला सहजासहजी मिळालेलं नाही. आयुष्याची जबर किंमत तुम्ही त्यासाठी मोजलेली आहे. एका अर्थी अपयशातूनच तुम्ही मोठे झाला आहात. आणि जेव्हा यश मिळालं तेव्हाही पुढे तुम्ही ते गिरवत राहिला नाहीत. तुम्ही प्रयोगशील राहिलात म्हणूनच मोठे होत गेलात. या वयात आजवर न हाताळलेला कादंबरी फॉर्म तुम्हाला हाताळावा असं वाटणं हेच आश्चर्य. एरवी तुम्ही या विषयावर एखादं बरं नाटक लिहू शकला असता. पण कादंबरीचा प्रयत्न करून पाहावा असं तुमच्या मनाने घेतलं. लेखक म्हणून तुमच्या या नव्या वळणावर प्रकाशक म्हणून तुमच्याबरोबर असावं, या उद्देशानं मी ही कादंबरी प्रकाशित केली. एक उदाहरण देतो.. एका मुलाखतीत सत्यजित रे यांना असं विचारण्यात आलं की, ‘नवा चित्रपट करत असताना तुम्हाला समकालीनांची भीती वाटत असते का?’ रे यांचं उत्तर आहे- ‘मला माझीच भीती वाटते. मला भीती वाटते की, मी पूर्वी घेतलेला, सगळ्या प्रेक्षकांना आवडलेला एखादा शॉट त्याच तंत्राने, त्याच अँगलने मला परत घ्यावासा वाटेल का? माझा मीच रिपीट होईन का?’ तेंडुलकर, दिग्दर्शक म्हणून स्वतला गिरवण्याचं नाकारणारे सत्यजित आणि लेखक म्हणून स्वतला गिरवण्याचं नाकारणारे तुम्ही- याबाबतीत मला सारखेच मोठे वाटता. अखेर आपण कुमार आणि किशोरीताईंना मोठे गायक का मानतो, तर पकड आलेली हुकमी मफल कदाचित हातातून सुटून जाण्याचा धोका पत्करूनही ते एखाद्या रागाची नव्या रूपात मांडणी करण्याचं धाडस करतात. तो धोका पत्करतात. मला यापकी कोणाशी तुलना अभिप्रेत नाहीये, पण आपल्या बाबतीत विचार करताना काही साम्यस्थळं मात्र जाणवत राहतात. असो!
अखेर मी इतकंच म्हणेन-
निर्मितीच्या नव्या नव्या रूपांचा सतत शोध घेणं आणि असं करीत असताना लौकिकदृष्टय़ा जे अपयश मानलं जाईल ते स्वीकारण्याची हिंमत दाखवणं, ही प्रतिभाशाली कलावंताची खरी साधना असते. एक मित्र म्हणून, एक वाचक म्हणून आणि एक प्रकाशक म्हणून तुमच्या या साधनावृत्तीचा खोल संस्कार माझ्या मनावर आहे. म्हणून तेंडुलकर, तुमची पुस्तकं प्रकाशित करतो तेव्हा मी केवळ प्रकाशक उरत नाही. तुमच्या प्रत्येक नव्या पुस्तकाबरोबर आत्मशोधाच्या नव्या वाटेनं मी प्रवासाला निघतो.
तुमचं हे माझ्यावरचं ऋण मला सतत बाळगायचं आहे!’
(अमोल पालेकर यांनी काही वर्षांमागे आयोजित केलेल्या ‘तेंडुलकर महोत्सवा’त विजय तेंडुलकरांच्या ‘कोवळी उन्हे’ या ललित लेखनाची नवी आवृत्ती प्रकाशित झाली होती. त्यावेळी केलेले भाषण.)
rajhansprakashansales@gmail.com