अत्यंत हायप्रोफाइल अशा भाभा अणुऊर्जा केंद्राचं संचालकपद, त्याआधी भारतातील पहिली अणुभट्टी ‘ध्रुव’ची निर्मिती, पुढे भारताच्या अणुबॉम्ब निर्मिती आणि चाचणीत सहभाग, वाजपेयी सरकारच्या काळात १९९८ सालच्या ‘पोखरण दोन’ चाचण्यांचे सूत्रधार… अशा अनेक प्रभावळींत राहिल्यानंतरही काकोडकर आधी होते तसेच आहेत… ज्वालाग्राही क्षेत्रात आयुष्य घालवूनही अजिबात न तापणारे…

आज तीसेक वर्षं झाली असतील बघतोय; पण अनिल काकोडकर होते तसेच आहेत. म्हणजे शारीरिक अर्थानं नाही. स्वभाव, वागणं, बोलणं वगैरे अंगानं. मी विज्ञान/ तंत्रज्ञान विषयातली बातमीदारी करायला सुरुवात केली तेव्हा- म्हणजे १९९५-९६ नंतर भाभा अणुशक्ती केंद्रात नियमित जाणं व्हायचं. एक ग्रुप तयार झाला होता आमचा. श्रीनिवास लक्ष्मण (म्हणजे आर. के लक्ष्मण यांचा मुलगा) हा टाइम्स ऑफ इंडियाचा, ‘यूएनआय’चा मृत्युंजय बोस वगैरे आम्ही तिघे-चौघे ‘बीएआरसी’च्या गेस्ट हाऊसमध्ये दिवस-दिवस असायचो. आमच्या त्या ग्रुपला ‘न्युक्लिअर क्लब’ असं नाव मिळालं होतं. या ग्रुपसाठी दोन जण हक्काचे होते. एक डॉ. काकोडकर आणि दुसरे अब्दुल कलाम. कलामांचं राष्ट्रपती होणं वगैरे खूप दूर दूर होतं. काकोडकर आणि कलाम यांच्यातला समान गुण म्हणजे कमालीचा साधेपणा. त्यांच्या आधीचे श्रीनिवासन, पी. के. अय्यंगार किंवा आर. चिदम्बरम हे या दोघांइतके मोकळे नव्हते. अणुऊर्जेतलं तुम्हाला काय कळतंय… असा चिदम्बरम यांचा आविर्भाव. बाकीचे दोन तसे लांब राहायचे. पण या दोघांचं तसं नव्हतं. अगदी गुंतागुंतीचा विषयही समजावून सांगायचे. त्यामुळे संबंध इतके अनौपचारिक आणि छान होते की कलामांचं ‘विंग्ज ऑफ फायर’ आलं तेव्हा या दोघांच्या उपस्थितीत त्या गेस्ट हाऊसवर आम्ही ते साजरं केलं. त्या पुस्तकाची ताजी ताजी प्रत कलामांनी प्रेमानं सस्वाक्षरी आम्हा सगळ्यांना दिली. (नंतरच्या भेटीत आम्ही कलामांना पुस्तक खूपच ‘गुडीगुडी’ आहे, अमेरिका-भारत तणाव, इंदिरा गांधी यांचा निर्धार वगैरे तुम्ही जे काही लिहायला हवं होतं, ते काही लिहिलंच नाहीत अशी प्रतिक्रियाही मोकळेपणानं दिली. त्यावर केसांची झुलपं मागे सारत कलाम ‘‘मे बी सम अदर टाइम’’, असं हसत हसत म्हणाले). नंतर नंतर बातमीदारी संपली आणि भाभा केंद्रात जाणं तसं कमी झालं. कलामही राष्ट्रपती झाल्यानंतर या सगळ्याला दुरावले.

पण काकोडकरांशी संपर्क कायम आहे. एकतर ठाण्याला दोघांची घरं जवळ जवळ आणि काही ना काही कार्यक्रमाच्या निमित्तानं त्यांचा संपर्क अजूनही होतो. त्यामुळेच हे मत अधिकारानं मांडता येतंय… काकोडकर आहे तसेच आहेत. अत्यंत हायप्रोफाइल अशा भाभा अणुऊर्जा केंद्राचं संचालकपद, त्याआधी भारतातील पहिली अणुभट्टी ‘ध्रुव’ची निर्मिती, पुढे भारताच्या अणुबॉम्ब निर्मिती आणि चाचणीत सहभाग, वाजपेयी सरकारच्या काळात १९९८ सालच्या ‘पोखरण दोन’ चाचण्यांचे सूत्रधार… अशा अनेक प्रभावळींत राहिल्यानंतरही काकोडकर होते तसेच आहेत. म्हणजे ‘‘या रविवारी वेळ आहे का?’’ असं विचारल्यावर सहज ‘‘बहिणीकडे जेवायला जायचंय.’’ असं नि:संकोचपणे ते सांगतात. उगाच मीटिंग-बीटिंगची कारणं पुढे करत नाहीत. ‘‘दुपारी मी रिकामा आहे… या गप्पा मारायला.’’ असंही सांगायला त्यांना कमीपणा वाटत नाही. त्यांच्या पत्नी, आई सगळेच असे. साधे. मागे एकदा मोबाइल-काळ सुरू व्हायच्या आधी कोणत्या तरी बातमीसाठी काकोडकरांच्या घरी फोन करावा लागला. तो त्यांच्या आईंनी घेतला. कोण बोलतंय वगैरे चौकशीनंतर त्यांना काही लेख वगैरे वाचल्याचं आठवत होतं चक्क. असं दोन-तीनदा तरी झालं असावं.

काकोडकरांचा परिचय झाला तेव्हा मी नुकताच गोव्यातनं परत मुंबईत परतलो होतो. स्टेट बँकेचे माजी चेअरमन पी. जी. काकोडकर, झालंच तर खासदार पुरुषोत्तम काकोडकर वगैरे अन्य काकोडकर गोव्यात परिचयाचे झालेले. ते तिथले. त्यामुळे हे काकोडकरही गोव्याचेच असं मी मानून चाललो. पण काकोडकरांचं आजोळ मध्य प्रदेशातल्या बडवानीचं. वडील अर्थातच गोव्याचे.

काकोडकरांची आई वर्ध्याला महिलाश्रमात शिकवायच्या आणि वडील गांधी चळवळीत. आणि नंतर गोवा मुक्ती लढ्यात होते. पोर्तुगीजांनी त्यांना पकडून आपल्या मायदेशात पाठवून दिलं. मग काकोडकर आईबरोबर आजोळीच गेले. आईनं त्याकाळी बडवानी नामक गावात चक्क शाळा चालवली. गाव जेमतेम २५ हजार वस्तीचं. आई स्वत: सुरू केलेल्या शाळेत शिकवायची. काकोडकरांची पहिली शाळा तीच. त्यांच्या तोंडून पहिल्यांदा ही कथा ऐकली त्यावेळेपर्यंत… म्हणजे २००१ पर्यंत तरी… ही शाळा सुरू होती. वेळ असेल तर काकोडकरांना त्या काळाविषयी बोलताना ऐकायचं आणि पहायचंही. हलकंसं हसत हे इतिहासात जातात. गावातलं दोनएकशे कुटुंबांचं मराठी वातावरण. गणपतीत नाटकं, गाणं बजावणं. पण त्यातही त्यांना आठवायला आवडतो तो त्यावेळचा अभ्यासक्रम. व्याकरणात छंद वगैरे होते. शिकवणारे शिक्षक मोठ्या रसाळपणे शिकवायचे. भाषा, त्यातही काव्य वगैरे अभ्यासण्यात आनंद होता, पण ‘माझं मन रमायचं ते गणित, शास्त्रात.’ काकोडकर सांगतात. त्यावेळी महाराष्ट्रात एस.एस.सी.चे निकाल आधी लागत. काकोडकर मध्य प्रदेशातले. त्यामुळे मुंबईत आल्यावर अॅडमिशनचा प्रश्न आला. तो सुटला कसा ते सांगताना काकोडकरांना अजूनही त्यांच्या सरांच्या नावानं धन्य धन्य वाटतं. रुपारेलला व्हाइस प्रिन्सिपल होते कोणी नाना भिडे म्हणून. काकोडकर सरळ त्यांच्यासमोर जाऊन उभे राहिले. त्यांनी सगळं ऐकून घेतलं आणि म्हणाले, ‘‘अॅडमिशन देईन, पण एस.एस.सी.ला फर्स्ट क्लास मिळण्याची गॅरंटी हवी.’’ ती काकोडकरांनी अर्थातच दिली. ही १९५९ सालची गोष्ट. या भिडे सरांनीच पुढे ‘‘इंटरनंतर बीएस्सी काय करतोस, इंजिनीयरिंगला जा,’’ असं सांगून चक्क त्यांचा फॉर्मच भरून टाकला.

तेव्हा इंजिनीयरिंगला मान असे. कॉलेजातच मोठमोठ्या कंपन्या चांगल्या विद्यार्थ्यांना भरती करून टाकत. काकोडकरांचे अनेक मित्र अशा वेगवेगळ्या कंपन्यांत गेले. पण काकोडकरांना खुणावत होती ‘बीएआरसी’ची तरुण अभियंत्यांसाठीची जाहिरात. पण खाजगी की सरकारी या गोंधळात जरा उशीर झाला आणि ‘बीएआरसी’त जायचं राहूनच गेलं. शेवटी त्यांच्या मनाचा निर्णय झाला आणि गेले ते तिकडे. मुदत उलटून गेलेली. त्यामुळे संबंधित अधिकारी वैतागला त्यांच्यावर. काकोडकर परत निघणारच होते संधी गेली असं समजून. पण त्या अधिकाऱ्यानं काकोडकरांची गुणपत्रिका वगैरे पाहिली आणि लगेच त्यांच्या मुलाखतीचीही व्यवस्था केली. १९६४ साल. काकोडकर भाभा अणुसंशोधन केंद्रात उमेदवारीसाठी दाखल झाले. त्यानंतर जवळपास तीन दशकांनी त्याच संस्थेचं संचालकपद त्यांच्याकडे चालून आलं.

हे सगळं जणू काही दुसऱ्याच्या आयुष्यात घडलेलं असावं इतक्या तटस्थपणे काकोडकर सांगतात. एकदा एका दिवाळी अंकासाठी त्यांची मी सविस्तर मुलाखत घेतली. त्यावेळी त्यांची ही गोष्ट ऐकणं थरारक वाटलं. मुलाखत घेतली तो काळ १९९१ नंतरच्या आर्थिक सुधारणांचा. खाजगीकरणाचे वारे जोरात वाहू लागले होते. तेव्हा ‘सरकारी आस्थापना’त ‘सेवा’ करण्याचा निर्णय घेतलात; पण आता घ्याल का… असा माझा प्रश्न होता. काकोडकर हो म्हणतात. पण त्याचं कारण ‘राष्ट्रउभारणी’, ‘स्वदेशी’ छापाचं नाही. त्यांना मुळात जायचं होतं विज्ञान शाखेत. डिझायनिंगची आवड. पण गेले इंजिनीयरिंगला. तेव्हा एक गोष्ट मनाविरुद्ध घडल्यानंतर पुन्हा एकदा तसं करण्याचा धोका त्यांना पत्करायचा नव्हता. खाजगीत गेलो तर मनासारखं काम करायला मिळेल की नाही, अशी काळजी त्यांना होती. ते ठीक. पण पैशाचं काय? ‘‘पैसा हवाच. पण पैसे जास्त मिळतायत म्हणून मन मारून जगणं मला मान्य नाही.’’

आता जाणवतं असा विचार करणारे काकोडकर एकटे नव्हते तेव्हा. स्वातंत्र्यानंतर पहिल्या पिढीतल्या उच्चशिक्षितांना आपल्या देशात खूप काही होऊ शकतं अशी स्वप्नं दाखवणारे राज्यकर्ते होते. शासक होते. संस्था आकाराला येत होत्या. या तरुण बुद्धिवंतांच्या कर्तृत्वाला आव्हान देत होत्या. ती आव्हानं पेलण्याची त्या पिढीची इच्छा होती. आणि ती इच्छापूर्ती करू देणारी व्यवस्था तेव्हा होती. आमची पिढी त्यानंतरच्या काळातली. पण त्या काळातल्यांच्या कार्यकर्तृत्वाच्या कथा ऐकताना अमेरिकी तत्त्वज्ञ राल्फ इमर्सन याचं एक वाक्य आठवतं : ‘‘इट्स नॉट अबाऊट द डेस्टिनेशन, इट्स द जर्नी.’’ गंतव्य स्थळी पोहोचण्यापेक्षा… खरा आनंद प्रवासात असतो. काकोडकरांच्या पिढीला प्रवासाचा आनंद मनमुराद मिळाला. नंतरच्या आमच्या, त्या पुढच्या पिढीची पंचाईत अशी की प्रवासही बोंबलला आणि गंतव्य स्थान आणखी पुढे गेलं. तर असो. त्यामुळे काकोडकरांसारख्यांना परदेशी जायची गरज नाही वाटली कधी. त्यांना एकदा विचारलं होतं इंग्लंड-अमेरिकेत जावंसं नाही वाटलं का कधी ते.

त्यावेळी कोणत्या तरी परदेशी संस्थेशी, देशाशी असलेल्या कराराचा भाग म्हणून बीएआरसीतल्या शिकाऊ अभियंत्यांना परदेशवारीची संधी दिली जायची. तशी एकदा कधीतरी काकोडकरांनाही विचारणा झाली. पण त्यांचं म्हणणं होतं… काही शिकायला मिळणार असेल तर ठीक… उगीच चर्चा/ परिसंवादासाठी जायची काही माझी इच्छा नाही. तर त्यावेळचा जो कोणी अधिकारी होता तो काकोडकरांना म्हणाला, ‘‘शिकण्यासाठी आपल्या विद्यार्थ्यांना परदेशात पाठवण्याचं धोरण नाही.’’ त्यावर काकोडकरांचं उत्तर होतं, ‘‘मग धोरण बदला.’’

ते बदलायला चार-पाच वर्षं लागली असतील. त्यावेळी एका विषयावरच्या एम.एस्सीसाठी काकोडकरांना पाठवण्याचा निर्णय व्यवस्थापनानं घेतला. काकोडकर आजही त्यावेळच्या त्यांच्या शिक्षकाविषयी मोठ्या अभिमानानं बोलतात. डॉ. सुब्रमण्यम म्हणून कोणी ते शास्त्रज्ञ होते. त्यांनी काकोडकर सोडून सगळ्यांना काही ना काही विचारलं नाही. त्यामुळे नाराज काकोडकरांना ते म्हणाले, ‘‘तुझ्याकडे काय कामगिरी द्यायची याचा निर्णय मी आधीच घेतलाय.’’ त्याप्रमाणे एक विशिष्ट उपकरण आणि सामग्री त्यांनी काकोडकरांना बनवायला सांगितली. पण त्यासाठी आवश्यक कोणतीही मदत मात्र द्यायला साफ नकार दिला. काकोडकर आणखीनच रागावले. कारण ही कामगिरी काकोडकरांना एकहाती पूर्ण करावी लागणार होती. म्हणजे त्या वस्तूचं डिझाइन, नंतर ओतकाम वगैरे सर्व काही स्वत:च करायचं. ते त्यांनी केलं. काकोडकर ते दाखवायला डॉ. सुब्रमण्यम यांच्याकडे गेले. त्यांनी ते पाहिलं आणि काकोडकरांना विचारलं, ‘‘आता ते आपल्याला पुन्हा बनवायचंय. तुला मदतीला, हाताखाली किती माणसं हवीत?’’

‘‘आता त्याची गरज काय? मी एकटा बनवू शकलोय.’’ काकोडकर उत्तरले.

त्यावर डॉ. सुब्रमण्यम त्यांना म्हणाले, ‘‘आता हे जे तू तुझ्या हातानं बनवलं आहेस ते कसं बनतं, त्यातल्या अडचणी काय वगैरे सर्व आता तुला कळलं. ते तुला जमायच्या आधी इतरांना मदतीला दिलं असतं आणि त्यात जर काही अडचणी आल्या असत्या तर त्यांच्या शंकांचं निरसन तुला करता आलं नसतं. तसं होणं बरोबर नाही. जे तयार करायचं ते इंजिनीयरलाच माहीत नसेल तर तो ते इतरांकडून कसं काय करून घेईल?’’

हे त्यांचं शिकणं पुढे बीएआरसीत कामाला आलं. पहिली अणुभट्टी जन्माला येताना तिच्या डिझाइनपासनं सगळं काही काकोडकरांना करायला मिळालं. त्यावेळच्या अभियंत्यांना असं काही करता येईल यावर विश्वास नव्हता. साधारण पाचेक वर्षं लागली सगळं काम पूर्ण व्हायला. पण त्यामुळे देशातली पहिली संपूर्ण भारतीय बनावटीची ‘ध्रुव’ ही अणुभट्टी त्यातनं उभी राहिली. त्यावेळी काकोडकर जेमतेम तिशीत होते. पुढे अर्थातच १९७४ च्या इंदिरा गांधींच्या काळातल्या पहिल्या पोखरण चाचण्या आणि त्यानंतर १९९८ साली अटलबिहारी वाजपेयींनी घडवून आणलेलं ‘पोखरण दोन’ या दोन्हींत त्यांचा लक्षणीय वाटा होता. ‘पोखरण दोन’ जेव्हा घडलं तेव्हा मी लंडनमध्ये होतो. ‘गार्डियन’मध्ये. काकोडकरांना ओळखत होतो त्याचा आणि त्याहीपेक्षा मूळच्या ‘न्यूक्लिअर क्लब’चा सदस्य असल्यानं बरंच काही लिहिता आलं.

भारतात परतल्यानंतर बातमीदारी सुरू झाली. जैतापूर प्रकल्पाच्या निमित्तानं खूपदा चर्चा झाली काकोडकरांशी. ते समर्थक होते या प्रकल्पाचे. मी टीका करत होतो. माझा आक्षेप अणुऊर्जेविषयी नव्हता. तर फ्रान्सच्या ‘अरेव्हा’ या डब्यात गेलेल्या कंपनीस हा प्रकल्प द्यायला विरोध होता. या काळात काकोडकरांची अनेकदा भेट व्हायची. पण एकदाही कधी त्यांनी ‘‘तुझी भूमिका चुकीची आहे.’’ वगैरे असं म्हटलं नाही. ते फक्त प्रकल्पाचं महत्त्व सांगायचे. अगदी शांतपणे. ते सगळे विषय बातम्या, लेखांत वगैरे आले. पण एकदा एका मुलाखतीत त्यांना मी अणुऊर्जा, प्रदूषण याबाबत काही विचारलं. कारण सर्वसामान्यांच्या मनात याचीच तर भीती असते. त्यात चर्नोबिल, फुकुशिमा वगैरे उदाहरणं असतातच. तो मुद्दाही होता. पण त्यावर काकोडकरांचं उत्तर भारी होतं, ‘‘गिरीश… डोंट फर्गेट पॉवर्टी इज द बिगेस्ट पोल्युटंट. (दारिद्र्य हेच सर्वात मोठं प्रदूषक.)’’ अगदी सुवचनाचा दर्जा मिळेल असं विधान. ती मुलाखत त्यावेळी ‘टाइम्स ऑफ इंडिया’नं जशीच्या तशी छापली.

‘लोकसत्ता’त आल्यावर तर काकोडकर हक्काचे झाले. अनेक विषयांवरच्या कार्यक्रमात ते सहभागी होतात. एकदा म्हणाले… ‘‘सध्या सगळे त्या आयटीत वगैरे जातायत; पण देश म्हणून आपलं खूप नुकसान आहे त्यात.’’ ‘‘कसं?’’ विचारल्यावर काकोडकरांचं स्पष्टीकरण विचार करण्यासारखं होतं. ‘‘सगळे अॅप्लाईडकडे जातायत… शुद्ध विज्ञानात रमणारे, त्या क्षेत्रात संशोधन, अध्यापन करणारे कुठायत?’’ हे असे असले गंभीर प्रश्न आपल्या शिक्षण मंत्रालयाला विचारणं म्हणजे फारच झालं.

कधी कधी ते ‘लोकसत्ता’च्या ‘तरुण तेजांकित’सारख्या उपक्रमात जेव्हा ते परीक्षक असतात; तेव्हा त्याचं परीक्षकपण पाहणं मजेशीर असतं. म्हणजे विज्ञान संशोधनातल्या एखाद्याची/ एखादीची प्रवेशिका असेल तर काकोडकर प्रवेशिका भरणारा ज्या संस्थेत असतो तिच्या प्रमुखालाच थेट फोन करतात. म्हणजे कधी टाटा मूलभूत संस्था किंवा बंगलोरची विज्ञान संशोधन किंवा आणखी एखादी. तो प्रमुख काकोडकरांचा फोन म्हटल्यावर जरा गडबडतो. मग त्याला हे कारण सांगतात. वर बजावतात… ‘‘अमुकतमुकचं काम कसं आहे ते तपासून सांग. वाट बघतोय… पुरस्कारासाठी त्याचा विचार करायचाय.’’ मग ते त्याचं संशोधन कशात आहे, तो काय करतोय, त्याचा उपयोग काय… वगैरे सगळी सविस्तर चौकशी करतात. ती व्यक्ती पुरस्कार देण्यायोग्य आहे किंवा नाही त्याचा निर्णय या सगळ्या उपद्व्यापानंतर मग… विज्ञानात मुरलेल्या माणसाचं हे असं असतं.

पण अशा माणसावर जेव्हा केंद्रातल्या संबंधित खात्याच्या मंत्री भलताच आरोप करतात तेव्हा काकोडकरांसारख्यांची प्रतिक्रिया काय असते? त्यातही त्या मंत्रीणबाईंची शैक्षणिक पात्रता पदवीपर्यंतचीही नसते तेव्हा काकोडकर काय करतात?

ते मुंबईतल्या ‘आयआयटी’सारख्या संस्थेच्या संचालक मंडळाचा राजीनामा देतात. मंत्रीणबाई आणि त्यांच्या मर्जीतली मंडळी जेव्हा दोन-तीन तासांत तीन डझनांहून अधिक गुणवंतांच्या मुलाखती उरकून महत्त्वाच्या पदांवरच्या व्यक्तींच्या नियुक्त्या करतात; आणि काकोडकरांवर एखाद्या नावासाठी आग्रह धरल्याचा आरोप करतात तेव्हा अभ्यासू वगैरे काकोडकरांना पायउतार होण्याशिवाय पर्याय नसतो.

त्यानंतर किती वेळा काकोडकरांना ‘त्या’ वादाविषयी विचारलं. ते हसतात. विषय बदलतात. ‘अणु’क्षेत्राला वाहून घेतलेला हा उच्च कोटीचा अभियंता ज्वालाग्राही क्षेत्रात आयुष्य घालवूनही अजिबात तापत नाही. म्हणून म्हटलं- काकोडकर आहेत तसेच आहेत..

girish.kuber@expressindia.com