डॉ. चैतन्य कुंटे

पुण्यातील रास्ता पेठेत भर गजबजाटाच्या भागात एक शांत गल्ली आहे. एकेकाळी त्या  गल्लीत यहुदी- म्हणजेच ज्यू लोकांची वस्ती होती, म्हणून हिचे नाव ‘ज्यू आळी.’ इथेच सुक्कोथ शालोमो सिनेगॉग आहे. प्रार्थनास्थळांतील संगीताच्या संस्कृतीशास्त्रीय अभ्यासासाठी एका सकाळी मी तिथे पोहोचलो.

सिनेगॉगमध्ये बिगर-ज्यूंना प्रवेश नसतो. पण माझ्या सुदैवाने तो दिवस ज्यू नववर्षांचा असल्याने माझे तेथे स्वागत झाले आणि ‘रोश हशाना’ची प्रार्थना ऐकण्याची अत्यंत दुर्मीळ अशी संधी मला मिळाली! सिनेगॉगची ती भव्य वास्तू, हज्झानचे प्रभावी स्वर आणि शिस्तबद्ध, शांत ज्यू बांधवांची प्रार्थना.. खरोखरच एक संस्मरणीय अनुभव!

आज हा अनुभव आठवण्याचे कारण म्हणजे नुकतेच योम किप्पूर आणि सुक्कोथ हे ज्यू सण झाले आणि परवा सिम्हथ तोरा हा सण आहे. त्यानिमित्ताने ज्यू धर्मसंगीताचा आढावा आज घेत आहे.

ज्यू धर्म हा मध्यपूर्व आशिया, युरोपमधील एक प्राचीन धर्म. ज्यू धर्मात ख्रिश्चन आणि इस्लाम धर्माची पाळेमुळे असल्याने तीनही धर्मातील अनेक संकल्पना, व्यक्तिनामे, उपासना पद्धती यांत पुष्कळच साम्य आहे. इस्रायलमधील जेरुसलेम हे तिन्ही धर्मासाठी तीर्थक्षेत्र आहे. ज्यू म्हटले की दुसऱ्या महायुद्धाच्या काळात ज्यूधर्मीयांवर झालेले अत्याचार, त्यांचे हत्याकांड (हॉलोकास्ट), १९४८ साली स्वतंत्र इस्रायल राष्ट्राची निर्मिती, शेजारी देशांशी टक्कर देऊन त्याचे भक्कमपणे उभे राहणे, जगभरातील ज्यूंचे इस्रायलमध्ये पुन्हा स्थलांतर अशा घडामोडी आपल्याला आठवतात. 

भारतात प्राचीन काळी वसलेले बेने इस्रायली व कोचीन यहुदी हे दोन मुख्य ज्यू समूह आहेत. ‘बेने इस्रायल’चा शब्दश: अर्थ आहे- ‘इस्रायलची मुले’! एक मत असे की, इसवी सनपूर्व १७५ मध्ये ग्रीक राजा पाचवा अँटिओकस याच्या आक्रमणामुळे इस्रायलमधून दहा ज्यू टोळ्या बाहेर पडल्या. त्यापैकी सात जोडपी कोकण किनारपट्टीत स्थायिक झाली. हेच भारतातील आद्य ज्यू. मराठी बेने इस्रायलींखेरीज मलबारमधील कोचीन ज्यू किंवा काळे ज्यू, शेफर्डीक ज्यू, बगदादी ज्यू, इराकी ज्यू म्हणजे गोरे ज्यू, आंध्रातील बेने इफरेम, मिझोराममधील बेने मेनाशे असे विविध यहुदी समूह भारतातील विविध प्रांतांत वसले. स्वतंत्र इस्रायलची निर्मिती झाल्यावर बरेच लोक तिकडे गेल्याने फारच थोडे ज्यू लोक आता भारतात शिल्लक आहेत.

ज्यू हा एक प्राचीनतम एकेश्वरी धर्म आहे. ज्यू बायबलच्या ‘जुन्या करारा’नुसार अब्राहम हा पहिला प्रेषित ज्यू धर्माचा आद्य प्रवर्तक आहे. अब्राहमचा पणतू यहुदा याच्या नावावरून या धर्माचे लोक ‘यहुदी’ म्हणूनही ओळखले जातात. अब्राहमचा नातू याकूब याने काही जमातींची एकजूट करून राष्ट्रस्थापना केली व त्याच्या ‘इजराएल’ या नावावरून या राष्ट्रास आज ‘इस्रायल’ असे संबोधतात. इस्रायलची राजधानी जेरुसलेम येथे प्राचीन काळी भव्य यहुदी मंदिर होते, ज्याचा अनेकदा विध्वंस व पुनर्बाधणी झाली. आज तेथे केवळ एक मोठी भिंत (कोटेल वा कोशेल, पश्चिमी भिंत) शिल्लक असून, ज्यूंचे ते महत्त्वाचे तीर्थक्षेत्र आहे.

सिनेगॉग या ज्यू प्रार्थनागृहात चांदीच्या नक्षीदार गोलाकार पेटय़ांत ‘तानख’ हा पवित्र ग्रंथ असतो. ‘हिब्रू बायबल’ असेही नाव असलेल्या तानखमध्ये तोरा (तालमुद- म्हणजे धार्मिक नियम), नबीइम (प्रेषितांविषयी), केटुविम (नैतिक व धार्मिक मजकूर) असे तीन विभाग असतात. सिनेगॉगमध्ये मोठय़ा सभागाराच्या मध्यभागी असलेल्या ‘बीमा’ या उंच चौथऱ्यात ज्यू उपदेशक (राबाय) किंवा प्रार्थनागायक (हज्झान) उभा राहून प्रार्थना गातो. येशिवा या अधिकृत धार्मिक शाळेत ज्यूंच्या प्रार्थना वा उपासनाविधी यांची विधिवत दीक्षा दिली जाते. येथेच प्रार्थनांचे विशिष्ट पद्धतीने होणारे गायनही राबाय व हज्झान यांना शिकवले जाते.

जेरुसलेम येथील पहिल्या मूलमंदिरात (इसवी सन पूर्व ९०० ते ५८६) सकाळ व दुपारच्या दैनंदिन उपासनेत हज्झानसह गायकवृंद, १२० सुषिरवाद्ये, १२० घनवाद्ये यांच्या घोषात प्रार्थना गात. अर्थातच हे गायन उच्चरवाचे, जोरकस असे. रोमनांनी मूलमंदिराचा विध्वंस केल्यानंतर मंदिरातील वाद्यवृंद, गायकवृंद लुप्त झाले. हज्झान व समूहाचे प्रतिसादी पद्धतीचे गायन तेवढे उरले. तेव्हापासून सिनेगॉगमध्ये शोफारखेरीज कोणतेही वाद्य वाजवत नाहीत. शोफार म्हणजे बोकडाच्या शिंगाचे नैसर्गिक सुषिरवाद्य. ज्यू धर्मात या शिंगास विशेष महत्त्व असून रोश हशाना, योम किप्पूर अशा विशेष दिवशी शोफारचे वादन होते. शोफारवादन ही ज्यू धर्मसंबद्ध कला असून, त्यात फुंककाम, जिभेचे तुत्कार, विविध स्वरांतरांची निर्मिती आणि दमसासाच्या वापरातून सातत्य या साऱ्याचे विकसित तंत्र आहे. सातव्या शतकानंतर ‘पिय्युत’ या छंदोबद्ध प्रार्थना निर्माण झाल्या. त्यामुळे गायनातील धुना, अलंकरणे यांत पुष्कळच भर पडली. धर्मग्रंथातील ठरावीक भागांना विशिष्ट चिन्हांतून वृत्तछंदांच्या चाली, लयबंध नोंदवले गेल्याने त्यांच्या गायनाची निश्चित पद्धत बनली.

शुक्रवार सायंकाळ ते शनिवार सायंकाळ हा ‘शब्बात’चा काळ शांतता व प्रार्थनेत व्यतीत करायचा असतो. तेव्हा सिद्दूर या प्रार्थना ग्रंथातील वचने गायली जातात. शिर-हशिरिम वा साँग ऑफ सोलोमन हा तानखच्या केतुविम या विभागातील अंश असून युगुलाचे शरीरमीलन व त्यातील आनंद व्यक्त केला आहे. याचे गायन समूहस्वरात होते. नववर्षांरंभाच्या ‘रोश हशाना’ या उत्सवात सिनेगॉगमध्ये प्रार्थनांखेरीज उत्सवगीते गायली जातात. शिवाय हनुका, पेसाख, पुरीम, तु बिस्वात या सणांच्या दिवशी विविध प्रार्थना, विधीगीते गायली जातात.

योम किप्पूर हा सर्वात पवित्र असा पापक्षालनाचा दिवस. या दिवशी उपवास करून पूर्ण दिवस शक्यतो सिनेगॉग उपासनेत व्यतीत करतात. रोजच्या उपासनेत शखारित (प्रात:प्रार्थना), मिन्खा (माध्यान्ह प्रार्थना), मारीव वा अरबिथ (सायंप्रार्थना) या तीन प्रार्थना असतात आणि त्यांच्या जोडीला सब्बाथ, योमतोवच्या दिवशी मुस्सफ ही चौथी प्रार्थना असते. मात्र योम किप्पूरला नेइला नामक पाचवी प्रार्थना असते. योम किप्पूरपुढे पाचव्या दिवसापासून एक आठवडा सुक्कोथ साजरा करतात. सिक्कोथच्या शेवटच्या दिवशी सिम्हथ तोरा हा महत्त्वाचा विधी असतो. तोरा पठणाच्या एका वार्षिक क्रमाचा अंत व नव्या क्रमाचा आरंभ याने सूचित होतो. सिनेगॉगमध्ये या दिवशी सायंकाळपासून दुसऱ्या दिवसाच्या सकाळपर्यंत विशेष तोरा पठण असते. कर्मठ व परंपरावादी ज्यूंत केवळ याच दिवशी पवित्र कमानीतील करंडकातून तोरा काढून त्याचे पूर्ण रात्रभर पठण करतात. तोरा कमानीतून काढण्याच्या वेळी उत्साहपूर्ण गायन व पदन्यास करतात. 

या प्रार्थनांच्या ठरावीक चाली असून त्यांचा पल्ला सुमारे पाच स्वरांचा असतो. या धुनांत मुख्यत्वे भैरव, भैरवी आणि बिलावलच्या सुरावटी आढळतात. सुरावटींत अरबी संगीताशी साधम्र्य असूनही स्वरोच्चारामुळे त्या वेगळ्या कळतात. बेने इस्रायली हज्झानांनी रचलेल्या मराठी प्रार्थनांच्या धुना बगदादी ज्यू व कोचीन ज्यूंच्या धुनांपेक्षा वेगळ्या आहेत. त्यावर मराठी लोकसंगीताची झाक दिसते. नबीइममधील ‘हाफ्तारा’ या भागाचे गायन सिनेगॉगमध्ये सब्बाथला वा इतरही धार्मिक उत्सवांच्या दिवशी तोराच्या पठणानंतर करतात. हाफ्तारातील प्रत्येक आशीर्वचनास विशिष्ट चाल असून त्या बव्हंशी भैरवी थाटातील चाली विनाताल, संथ लयीत गायल्या जातात. नबीइममधील प्रेषितविषयक भागांतील निवडक वेच्यांचेही गायन होते. त्याच्या चाली मुख्यत्वे शुद्ध स्वरांतील असून अधिक सोप्या व उत्साहपूर्ण आहेत. तोराच्या चाली अधिकतर अल्पस्वरी, साध्या पठणात्मक आहेत, तर नबीइमच्या चाली सांगीतिकदृष्टय़ा अधिक अलंकृत व गायनानुकूल आहेत. प्रार्थनांस कोणत्याही प्रकारे स्वरसाथ वा तालसाथ नसते व  त्या विनाताल गातात. 

ज्यू धर्मसंगीतात गायनाची कँटिलेशन, सामोडी आणि मोडल चांटिंग अशी तीन अंगे आहेत. कँटिलेशनमध्ये तीनच स्वर असतात. पण प्रत्येक शब्दास ठरावीक कंप, मुरकी इत्यादीने सजवून गातात. याचे वैदिक पठणाशी साम्य असून वैदिक संहितेत जसे उदात्त-अनुदात्त, स्वरिताची चिन्हे असतात, तशीच हिब्रू संहितेत विशिष्ट चिन्हे आहेत. हिब्रू भाषेत या चिन्हांस ‘ताम’ म्हणतात. या चिन्हांतून तारतादोल, विराम इ. सूचित होतात. याच चिन्हांतून पुढे पाश्चात्त्य स्वरलिपीतील न्यूम्स चिन्हे बनली असे काहींचे मत आहे.  देशकालानुसार कँटिलेशनमध्ये फरकही आहेत. उदा. तुर्की ज्यू हे मुरकी, कंप इ.चा सढळ वापर करून अधिक अलंकृत गायन करतात, तर जर्मन ज्यू हे अधिक दीर्घ व स्थिर स्वर घेऊन हार्मनीला अनुकूल असे गायन करतात. सामोडी या साध्या-सरळ चाली असतात, पण प्रत्येक चरणाच्या अंती ‘मेलिस्मा’ हे तान वा जमजमासदृश खास गायनतंत्र वापरलेले असते. मोडल चांटिंग म्हणजे निश्चित स्वरग्रामावर आधारित चालींचे गायन. यात स्तुतिपर, आनंददर्शक रचनांसाठी शुद्ध स्वरग्राम, सायंप्रार्थना व उपदेशपर प्रार्थनांत कोमल स्वरग्राम आणि राबाय, हज्झानच्या पठणांतील भैरवसदृश अंतर्मुख स्वरग्राम असे तीन मुख्य स्वरग्राम असतात.

ज्यूंच्या विविध संप्रदायानुसार या चालींतही बरेच फरक आहेत. शिवाय भारतातील मराठी, मलबारी, तेलगु ज्यू समाजाने एतद्देशीय संगीताचा रंगही त्याला चढवला. मराठी बेने इस्रायली प्रार्थनांत महाराष्ट्रातील खास अशा कालिंगडा, पिलू, गारातील धुनांचे, तसेच कीर्तनी संगीताच्या वळणाचे साचेही दिसतात. तर कोचीन ज्यूंच्या प्रार्थनांत दाक्षिणात्य गमक आढळते. अलीकडे मात्र हज्झानांची शिक्षणपद्धती बरीचशी केंद्रवर्ती झाल्याने हे प्रांतिक रंग हळूहळू विरत चालले आहेत.    

ज्यू धर्मसंगीतातील एक लक्षवेधक प्रकार म्हणजे ‘निग्गुन’- म्हणजे हासिडीक पंथातील धुना, गाणी. कट्टर यमनियमांपेक्षा जीवनातील आनंदोपभोगांतून अध्यात्म साधणे उचित मानणारा ‘हासिडीझम’ हा काहीसा तंत्रमार्गी पंथ आहे. या पंथाने धुंदी निर्माण करणारे संगीत आपलेसे केले. दुसऱ्या महायुद्धानंतर अमेरिकन ज्यूंमध्ये हासिडीक संगीताचा खूपच प्रसार झाला आणि मूळच्या पोलिश, स्कँडिनेव्हियन धुनांसह अमेरिकन पॉप, ब्ल्यूज, स्पिरिच्युअल्स इ. प्रकारच्या धुनांतून हासिडीक संगीत आविष्कृत होत गेले. यात सार्थ शब्दांखेरीज ‘ए-डी-डी-डाय्’ असे निर्थक शब्द वापरून गायन (निग्गुनिम) करतात. यात एखादी आकर्षक धून संथ लयीत सुरू करून क्रमाने त्याची लय, पट्टी आणि गरिमादेखील वाढवत नेतात आणि त्यातून तंद्रेच्या चरमसीमेपर्यंत पोहोचतात. बरेचदा मध्य सप्तकातील षड्जापासून सुरू करून तारसप्तकापर्यंत लय वाढवत पोहचायचे व कल्लोळ करायचा असे गायनतंत्र असते. इथे संकल्पनेच्या पातळीवर हासिडीक संगीताचे भारतीय धर्मसंगीताशी खूपच साम्य जाणवते. अर्थातच प्रस्तुतीच्या, श्राव्य अनुभवाच्या पातळीवर ते निश्चितच वेगळे आहे.

महाराष्ट्रातील ज्यू समाजाने इथल्या अनेक चालीरीती जशा अंगीकारल्या तसेच इथली भजन-कीर्तनाची पद्धतीही  स्वीकारली. बेने इस्रायली समाजाने हिब्रू प्रार्थनांपेक्षा मराठीतून उपासना करणे स्वीकारले आणि मग नारदीय कीर्तनाच्या साच्यातले ‘ज्युईश कीर्तन’ बनले.  १८८०च्या दशकात ख्रिस्ती मिशनऱ्यांच्या वाढत्या प्रभावाला आळा घालण्यासाठी बेने इस्रायली समाजाने इथला कीर्तनाचा लोकप्रिय मार्ग आपलासा केला. मुंबईत ‘बेने इस्रायली कीर्तनोत्तेजक मंडळी’, ‘सुबोध प्रकाशक बेने इस्रायली कीर्तनसमाज’ स्थापन झाले. ८ ऑगस्ट १८८० रोजी बेंजामिन अष्टमकर यांनी पहिले मराठी ज्यू कीर्तन सादर केले. १८८२ पासून १९३५ या काळात काव्यमय योसेफाख्यान, डेविड राजाचे चरित्र, कविताबद्ध मोशेचरित्र, एलिसा आख्यान अशी ३५-४० मराठी ज्यू आख्याने पदावलीसह प्रकाशित झाली. मुंबईत २५-३० ज्यू कीर्तनकार तयार झाले.

महाराष्ट्रातील ही ज्यू कीर्तनाची परंपरा १९४५ नंतर फारशी उरली नव्हती. पण मूळच्या मुंबईच्या व नंतर इस्रायलला स्थायिक झालेल्या फ्लोरा सॅम्युएल, रेशेल गडकर, लेडी दिगोडकर या ज्यू विदुषींनी १९८०-९०च्या दशकांत मराठी ज्यू कीर्तनांचे पुनरुज्जीवन केले. मुंबईपासून न्यूयॉर्कपर्यंत अनेक ठिकाणी कीर्तने केली. या कीर्तनांतील पदांची संगीतरचना त्यांनी मुंबईतील नाथन आणि डेविड सातमकर यांच्याकडून करून घेतली होती. उपलब्ध ज्यू कीर्तनांतील चाली अस्सल मराठी स्त्रीगीतांच्या वळणाच्या, बऱ्याचशा मराठी छंदवृत्तांच्या आणि मराठी नाटय़संगीत बाजाच्या असल्याचे जाणवते. काही चाली तर १९४०-५०च्या दशकातील लोकप्रिय हिंदी चित्रपटगीतांवरून थेट बेतल्या आहेत. आजही नेरळच्या हान्ना व शोसान्ना कोलेट या भगिनी ज्यू कीर्तन करतात. डायना पिंगळे, डायना कोर्लेकर, रिबेका रामराजकर, रुबी कुरुलकर, रिफ्का मोझेस, मर्सी तेझरीकर अशा बेने इस्रायली भगिनींनी गायलेली मराठी स्त्रीगीते, भक्तिगीते आणि कीर्तनी पदे यू-टय़ूबवर सुदैवाने उपलब्ध आहेत. ती ऐकल्यावर मराठी संस्कृती आणि ज्यू समाजातील संगीत, भाषा आणि धर्म यांच्या सुरेख अनुबंधाची कल्पना येते!

keshavchaitanya@gmail.com

(लेखक सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ललित कला केंद्र गुरुकुल येथे संगीताचे अध्यापक आहेत.)