डॉ. चैतन्य कुंटे keshavchaitanya@gmail.com
‘उडत बंधन’ (पंचम), ‘सावरो मंगल’ (भैरव), ‘वेद रटत’ (तोडी), ‘बनठन कहां’ (केदार), ‘मान न करो री’ (गौडमल्हार), ‘मेरो पिया रसिया’ (नायकी कानडा), ‘तुम घनसे घनश्याम’ (मीरा मल्हार) अशा अनेक बंदिशी गायकप्रिय, रसिकप्रिय आहेत. या सर्वात एक समानता आहे. ती कोणती? तर- या सर्व रचना मुळात पुष्टिसंगीतातील आहेत! भारतीय धर्मसंगीत परंपरांपैकी कलासंगीत म्हणून विकसित झालेल्या एक महत्त्वपूर्ण विधा म्हणजे पुष्टिमार्गीय देवालय संगीत.

पुष्टिमार्गी मंदिरांस ‘हवेली’ म्हणतात. त्यामुळे हे संगीत ‘हवेली संगीत’ म्हणूनही ओळखले जाते. ‘हवेली संगीत’ या नावामागे एक रोचक कथा आहे. १९५५ साली नभोवाणी मंत्री बाळकृष्ण केसकर यांनी पुष्टिसंगीताचा एक विशेष राष्ट्रीय कार्यक्रम आकाशवाणीवर आयोजित केला. तेव्हाच्या तथाकथित सेक्युलर धोरणानुसार ‘पुष्टिमार्गी संगीत’ असे संप्रदायसूचक नाव वापरायचे नाही म्हणून ‘हवेली संगीत’ हा शब्द वापरला गेला. पुढे अनेक वर्षे विविध आकाशवाणी केंद्रांवरून हेच नाव वापरात राहिल्याने तेच रूढ झाले.

anil kakodkar pune, indian nuclear physicist anil kakodkar
भारतातील संशोधन ‘नावापुरते’ असे ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर का म्हणाले?
eid al fitr 2024 chand raat ramadan eid 2024 know the date and timings of eid al fitr moon sighting
१० की ११ एप्रिल, भारतात कधी दिसणार ‘ईद’चा चंद्र? भारतासह परदेशात कशाप्रकारे ठरवली जाते ‘ईद’ साजरी करण्याची तारीख?
Martand Sun Temple
काश्मीरमधल्या मार्तंड सूर्य मंदिराचा होणार जिर्णोद्धार, अयोध्येतील राम मंदिराशी आहे थेट कनेक्शन
Tata Altroz Racer to launch in coming weeks
मारुती, महिंद्रा, ह्युंदाईची उडाली झोप, टाटा ‘या’ हॅचबॅक कारला देशात आणतेय स्पोर्टी अवतारात; कधी होणार विक्री?

१०व्या शतकानंतर श्री, सनक वा निम्बार्क, ब्रह्म वा माध्व, रुद्र वा विष्णुस्वामी या प्रमुख चार वैष्णव संप्रदायांचा फैलाव भारतभर झाला तरी ब्रजभूमीच्या आसपास हे चारही पंथ नांदले. श्रीवल्लभाचार्य (इसवी सन १४७८ ते १५३०) हे विष्णुस्वामी संप्रदायाचे एक आचार्य. शुद्धाद्वैत मानणाऱ्या पुष्टिमार्गाची स्थापना वल्लभाचार्यानी केली. ‘पोषणं तदनुग्रह’ या वचनानुसार परमेश्वराचा अनुग्रह हेच पोषण, पुष्टि.. म्हणून हा पुष्टिमार्ग. गुरू, मंत्र, कण्ठीमाला, तिलक, सेव्य स्वरूप, सेवा, सेव्यस्थान, व्रतोपवास अशा उपासनेतील अष्टांगांपैकी सेवेत रागसेवा आणि नवविधा भक्तीपैकी कीर्तनभक्तीला, संगीताद्वारे अष्टयाम सेवेला इथे फार महत्त्व आहे.

वल्लभाचार्याच्या पश्चात पुत्र श्रीविठ्ठलनाथ आणि त्यांचे आठ शिष्य यांनी हा संप्रदाय प्रसृत केला. गोविन्दस्वामी, छीतस्वामी, नंददास, चतुर्भुजदास, सूरदास, परमानंद, कुंभनदास आणि कृष्णदास असे हे आठ शिष्य ‘अष्टसखा’ म्हणजे ‘अष्टछाप’ कवी, कीर्तनकार होते. हे केवळ संतकवीच नव्हे, तर महान वाग्गेयकारही होते.

विष्णुस्वामी संप्रदायातील मूळ जटिल अशी उपासना वल्लभाचार्यानी लोकाभिमुख, सरल केली. पूजाविधीत मंत्रोपचारांच्या जागी ब्रज भाषेतील पदगायन ठेवले. मथुरेजवळच्या गोवर्धन पर्वतावरील आदिस्थानात १४८९ साली झालेल्या कुंभनदासजींच्या प्रथम कीर्तनाने पुष्टिसंगीताचा उद्भव झाला. कुंभनदास हे या संप्रदायातील पहिले कीर्तनकार. पुढे १६३५ मध्ये गोस्वामी श्रीविठ्ठलनाथ यांनी अष्टसखांच्या सहयोगाने कीर्तनसेवेचा विस्तार केला. पूर्ण वर्षांतील नित्यसेवा (दैनंदिन अष्टयाम सेवा) व उत्सवसेवा (नैमित्तिक सेवा) यांतील पदांचा क्रम आखून दिला, त्याला शिस्तबद्ध रूप दिले. तेव्हापासून या अष्टयाम सेवेतील पदगायनात परिवर्तन झालेले नाही. अहोरात्र कीर्तनसेवा चालावी अन् उपासक भगवद्भक्तीत सतत लीन राहावेत अशी ही संगीतयोजना आहे.

अष्टयाम नित्यसेवा व तेव्हा ज्या अष्टछाप कवींची पदे मुख्यत्वे नियुक्त आहेत त्यांचे तपशील असे..

मंगला- पहाटे बालकृष्णास शंखनादाने जागे करतात. तेव्हा जागविणे, अभ्यंग, अनुराग, खंडिता, दधिमथन या आशयाची परमानंददासांची पदे गातात.

शृ्ंगार- बालकृष्णास विविध प्रकारे सजविणे. येथे शृ्ंगार, बालक्रीडा, सख्यभावाची नंददासजींची पदे येतात.

ग्वाल- बालकृष्ण गाईंना चारण्यासाठी नेतात असे मानून गौचारन, माखनचोरी, क्रीडापदे इ. गातात. मुख्य कवी गोविंदस्वामी.

राजभोग- गाई चारून थकलेल्या भगवंतास जेवू घालण्याची पदे. मुख्य कवी कुंभनदास.

उत्थापन- दुपारी वामकुक्षीनंतर भगवंतास पुन्हा जागे करणे. यात जागरण, गौटेरन, वनलीला ही पदे येतात. मुख्य कवी सूरदास.

संध्याभोग- सायंकाळची न्याहारी. यात कृष्णरूप, गोपीदशा, मुरली महिमा, इ. पदे येतात. मुख्य कवी चतुर्भुजदास.

संध्यारती- संध्याकाळी घरी परतल्यावर आरती. इथे यशोदावात्सल्य, गोदोहन पदे असतात. मुख्य कवी छीतस्वामी.

शयन- ब्यारू (रात्रीचे जेवण) करून निद्राधीन होण्याचा समय. येथे भोजनभोग, तांबुल, अनुराग, संयोगशृ्ंगार इ. पदे येतात. निद्रेनंतर एक कलाक मंदध्वनित वीणावादन करावे असा संकेत. मुख्य कवी कृष्णदास.

या संगीतप्रणालीत मास, तिथीनुसार वर्षभरात रागांची योजना केली आहे. उदा. आषाढ शुद्ध द्वितीयेपासून राग मल्हार आणि अन्य ‘शीत राग’ वा ठंडे राग यांचा आरंभ होतो. प्रबोधिनी एकादशीपासून ‘उष्ण रागां’चा प्रारंभ होतो. रागांचे वर्गीकरण गर्म (उष्ण) राग व ठंडे (शीत) राग असे केले आहे.

प्रात:कालीन शीत राग- भैरव, देवगांधार, रामकली, विभास, बिलावल, सारंग, धनाश्री, मारू, सूहा, इ.

सायंकालीन शीत राग- पूर्वी, गौरी, नट, कल्याण, ईमन, सोरठ, कानडा, अडाना, जयजयवंती, मल्हार, इ.

प्रात:कालीन उष्ण राग- ललित, पंचम, खट, तोडी, आसावरी, मालकोश, मालव, बसंत, इ.

सायंकालीन उष्ण राग- केदार, बिहाग, बिहागडा, जैतश्री, नायकी, वसंत, काफी, रायसौ, इ.

भैरव, पूर्वी व काही ठिकाणी सारंग हे राग पूर्ण वर्षांत गायले जातात. श्री, परज, पंचम, खट, शंकराभरण, कर्नाट, खमाज, जंगला, झिंझोटी, इ. अनेक रागही प्रचलित आहेत. बिलावल, सारंग, गौरी, नट, वसंत अशा रागांचे विविध रूपभेद आहेत. हिंदुस्थानी संगीतातील रागांशी नामसाधर्म्य असले तरी यातील बरेचसे राग स्वरूपाने भिन्न आहेत. काही राग तर केवळ खास पुष्टिमार्गीयच आहेत. ते अन्य संगीतांत आढळत नाहीत.

पुष्टिसंगीतात केवळ परंपरागत रागच गायले जातात. एवढेच नाही तर या रागरूपांत किंचितही परिवर्तन करणे धार्मिक अपराध मानतात. पदांच्या बाबतीतही केवळ अष्टछाप कवींसह निवडक ब्रजभक्तांची पदे, जयदेवाच्या अष्टपदी गाणे मान्य आहे. अन्य संत कितीही लोकप्रिय असोत (जसे मीराबाई, इ.), त्यांच्या पदांचे गायन निषिद्ध आहे.

चौताल, आडाचौताल, धमार, झूमरा, आदिताल वा त्रिताल, झपताल हे पुष्टिसंगीतातील प्रमुख ताल असून, क्वचित रूपक, दीपचंदी, चाचर, कहरवा, दादरा यांचाही वापर होतो. परंतु या तालांचे पखवाजी स्वरूप वेगळे आहे. ‘चलती’ हा लग्गीला समांतर असा खास प्रकार आहे- पदांतील विशिष्ट चरणांच्या वेळी दुगुन वा चौगुनमध्ये झांज व पखवाज वाजतात आणि पुन्हा मूळ लयीत येतात. हवेली परंपरेत स्वतंत्र पखवाज वादनही अत्यंत विकसित असून ‘नाथद्वारा परंपरा’ ही पखवाज वादनातील एक अग्रगण्य शाखा आहे.

हवेली संगीतात तंबोरा, पखवाज व झांज ही मुख्य वाद्ये आहेत. मंगलासेवेचा आरंभ शंखध्वनीने होतो व तेव्हाचे गायन केवळ तंबोऱ्याच्या साथीने, विनाताल व आलापनात्मक होते. ठाकुरजींना निद्रेतून जागवताना अलवारपणे उठवायचे, म्हणून तेव्हा तालवाद्य वापरायचे नाही असा विचार त्यामागे आहे! आराध्य दैवत बालरूपातील असल्याने जोराने घंटानाद करू नये असाही मनोज्ञ संकेत आहे. शृंगारसेवा ते शयनसेवेत पखवाज व झांजेच्या साथीने सताल गायन होते. उत्सवकालात, विशेषत: होळीच्या पर्वात अनेकविध वाद्ये असतात.

पुष्टिसंगीतात हल्ली हार्मोनिअम आणि तबल्याचाही शिरकाव झाला आहे. मात्र, पारंपरिक विशुद्धता जपणाऱ्या कीर्तनियांस ते पसंत नसते. हल्ली ‘हवेली संगीत’ या नावाने बाजारात आलेल्या अनेक अल्बम्समध्ये तर फिल्मी संगीतासारखा वाद्यमेळ वापरल्याने त्याचे स्वरूप पारच बदलून गेलेय, हा भाग अलाहिदा!

हवेलीत निजमंदिर, तिवारी, चौक, जगमोहन असे भाग असतात. पैकी जगमोहनमध्ये श्रीनाथजींच्या मूर्तीसमोर कीर्तनिया गातात. कीर्तनिया हे दीक्षितच असतात व त्यांनी वेश, तिलक, आचार इ. नियमांचे पालन करणेही अनिवार्य असते. पुष्टिसंगीतातील पदे ही सांगीतिकदृष्टय़ा ध्रुपद, धमार, सादरा प्रकारच्या पदरचना असून त्यांची गायकीही त्यानुसार असते. उत्सवपर्वात काही पदे लोकसंगीताच्या बाजाची, ठुमरी, टप्पा अंगाचीही असतात. नित्यकीर्तनात कीर्तनिया एकल गायन करतो, तर उत्सवप्रसंगी कीर्तनमंडळीतल्या ‘झेलनियां’सह समूहगान होते. कधी प्रतिसादी पद्धतीने श्रोतेही सहभागी होतात. नित्यसेवाला समयबंधन असल्याने त्यात केवळ पदांचे गायन होते, सांगीतिक विस्तार करत नाहीत. मात्र उत्सवपर्वात, विशेष कीर्तनविधींत आणि गोस्वामींच्या समक्ष ‘समाजगायना’त विस्तारपूर्वक गायन होते.

सांगीतिकदृष्टय़ा ब्रज आणि नाथद्वारा ही पुष्टिसंगीताची दोन केंद्रे आहेत. याव्यतिरिक्त तिसराही प्रवाह आहे- मिश्र प्रणालीचा. जामनगर, भावनगर, जुनागढ, राजकोट, ध्रांगध्रा, वेरावल, द्वारका, किशनगढ, मुंबई येथील हवेलींत ही मिश्र प्रणाली आहे. पूर्वी कीर्तनिया असलेल्या, परंतु तीन-चार पिढय़ांनंतर पोटापाण्यासाठी मंदिराखेरीज अन्यत्र गायन करणाऱ्या कलाकारांचा अजून एक चौथा, अशिष्ट मानलेला प्रवाहही आहे.

एकेकाळी राजस्थान, सौराष्ट्र, कच्छ, पंजाब, मध्य व उत्तर प्रांतातील अनेक राजेरजवाडे वल्लभ संप्रदायी होते. त्यांच्या आज्ञेनुसार दरबारी गायकही पुष्टिमार्गी पदे कीर्तनियांकडून शिकून गात. परंतु त्यांच्या पेशकशीत फरक पडत गेला. त्यामुळे पुष्टिमार्गी पद तेच असले तरी ध्रुपद वा ख्यालगायकांच्या गाण्यात फरक झाले. शिवाय पुष्टिमार्गातील पदांचे मूळ चार वा आठ चरण न गाता केवळ दोनच चरण स्थायी-अंतरा म्हणून त्यांच्या गाण्यात राहिले. त्यामुळे ख्यालगायकांकडे या रचना त्रुटित स्वरूपात मिळतात. यासंदर्भात काही संस्थाने व गायन परंपरांचा उल्लेख करता येईल, जसे जयपूर (अल्लादिया खां), मेवाड (ध्रुपद गायक डागर), मथुरा, भरतपूर, किशनगढ (आग्रा, अत्रौली परंपरेचे गायक). पलुसकर आणि भातखंडे यांचाही पुष्टिसंगीताशी संबंध आला व त्यांनी या परंपरेतील अनेक रचना प्रकाशित केल्या. भेंडीबझार घराण्याच्या अमान अली खांसाहेबांवरही पुष्टिसंगीताचा मोठा प्रभाव होता. हवेली संगीताशी पूर्वपरंपरेने संबंध असल्याने पं. जसराज ही पदे मैफलीत गात. प्रसिद्ध ख्यालगायक गोस्वामी गोकुलोत्सव महाराज हे तर पुष्टिमार्गी पीठाधीश आहेत. जयपूर घराण्याच्या श्रुती सडोलीकर यांनीही पुष्टिसंगीताचा दीक्षापूर्वक अभ्यास केला आहे.

मध्ययुगात ध्रुपदाच्या दोन परंपरा बनल्या- पहिली मंदिर परंपरा, विशेषत: वैष्णव देवालयांतील. येथे ध्रुपदांस ‘विष्णुपद’ म्हणत. तर दुसरी परंपरा दरबारी ध्रुपदाची. विष्णुपद हे मार्गीसंगीत, म्हणजे उपासनाहेतूने मंदिराच्या नियमांत बांधलेले, रंजनापेक्षा भजनास मानणारे, म्हणूनच अपरिवर्तनशील. तर राजगृहातील ध्रुपद हे देशी संगीत- म्हणजे रंजनाच्या हेतूने देशकालानुसार परिवर्तनशील. मंदिर परंपरेतील ध्रुपदाचा जिवंत आविष्कार आजही पुष्टिसंगीतात दिसतो.

पुष्टिसंगीताचे हिंदुस्थानी संगीताला मोठे योगदान आहे. हे संगीत मध्ययुगीन संगीताचा, त्यातील रागरूपे, ताल व रचना यांचा एक महत्त्वाचा ठेवा म्हणून अभ्यसनीय ठरते. प्रचलित रागसमयचक्राच्या मागे अष्टयाम सेवेत नेमून दिलेल्या रागांचा क्रम असावा असे तज्ज्ञांचे मत आहे. हिंदुस्थानी संगीतातल्या प्रचलित रागांपेक्षा हवेली संगीतातील अनेक रागरूपे भिन्न आहेत. याचे मूळ कारण म्हणजे हिंदुस्थानी संगीतात इतर प्रवाह मिसळत गेले. राजाश्रय व पुढे लोकाश्रयामुळे कालौघात ते बदलले. असे पुष्टिसंगीताबाबत घडले नाहीत. पुष्टिसंगीतात बदल करणे अग्रा मानल्याने मध्ययुगात या रचना जशा बनल्या तशाच- बव्हंशी मूलस्वरूपातच जपल्या गेल्या. तेव्हा आजच्या रागांची मूळ रूपे काय होती याचा शोध घेण्यासाठी बऱ्याचदा हवेली पदांचा आधार घेणे सयुक्तिक ठरते.

पुष्टिमार्गात राग भैरवी गात नाहीत. त्यामागची वेधक आख्यायिका अशी..

बादशहा अकबराने गोविंदस्वामींची (काहींच्या मते, कुंभनदासांची) गायनकीर्ती ऐकून त्यांना फतेहपूर सिक्री येथे बोलावले. त्यांचे गायन आयोजित केले. गोविंदस्वामी हे परमभक्त. ते बादशहासमोर असले तरी गात होते श्रीनाथजींसाठीच! भावविभोर होऊन तल्लीनतेने ते गात असताना भैरवीतील पदाच्या वेळी बादशहाच्या तोंडून नकळत वाहवा आली. गोविंदस्वामी नेत्र मिटून गात होते तेव्हा त्यांच्यासमोर बालरूपातील श्रीनाथजी नर्तन करत होते. मात्र, वाहवा ऐकू येताच ती नर्तनमूर्ती विलोपली. गोविंदस्वामींनी तत्क्षणी ठरवले- बादशहाचे रंजन करणारी, पण श्रीनाथजींचे हरण करणारी ही रागिणी कधीही गायची नाही. या घटनेनंतर त्यांनीच काय, पूर्ण पुष्टिमार्गानेच भैरवी त्यागली!

आख्यायिकाच ती.. तिच्या सत्यासत्यतेचा शोध घेण्यापेक्षा बोध घेतलेला बरा. धर्म, धारणा, निष्ठा, कलावंत आणि आश्रयदाता या सर्वावरच ही आख्यायिका मार्मिक भाष्य करते!

(लेखक सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ललित कला केंद्र गुरुकुल येथे सहायक प्राध्यापक आहेत.)