|| डॉ. मृदुला दाढे – जोशी
‘अनुराधा’ (१९६०) या हृषीकेश मुखर्जीच्या चित्रपटाला पंडित रविशंकर यांचं संगीत लाभलं होतं. आज इतक्या वर्षांनीसुद्धा हा चित्रपट आणि त्यातली गाणी मनाला भिडतात. यात हृषीदांची अत्यंत तरल हाताळणी आणि पंडितजींचं संगीत यांची विलक्षण केमिस्ट्री जुळून आली. त्याचाच वेध घेण्याचा हा प्रयत्न. ७ एप्रिलला पंडित रविशंकर यांचे जन्मशताब्दी वर्ष सुरू होत आहे, त्यानिमित्ताने..
‘अनुराधा’ हा एक अनुभव आहे. याला संगीतमय चित्रपट म्हणावा की चित्रपट माध्यमातून व्यक्त झालेलं संगीत? यात प्रमुख भूमिकेत संगीत आहे की नायिकेची तगमग? हृषीदांना स्त्रीमनाचा वेगळा साक्षात्कार संगीताच्या साथीतून घडवायचा होता. एका कलाकार स्त्रीच्या मनाचा ठाव घेता घेता किती तरी नाजूक धागे त्यांच्या हाती लागले.. पंडितजींनी हृषीदांच्या कल्पनेला विशाल स्वरांगण बहाल केलं आणि ‘अनुराधा’ हे एक विरहकाव्य निर्माण झालं! शास्त्रोक्त संगीतातल्या काही मोजक्या कलाकारांनी चित्रपटसंगीताला परकं मानलं नाही. ते कलाकार खरोखर हिमालयाच्या उंचीचे होते. पण त्यामुळेच कदाचित, चित्रपट संगीताबद्दल त्यांना कौतुक, प्रेम होतं. स्वत:च्या अफाट विस्तृत कार्यक्षेत्रामुळे त्यांना संख्येनं जास्त चित्रपट करता आले नाहीत, पण जे केले त्यातून निश्चित एका वेगळ्या दर्जाची गाणी तयार झाली. पं. रविशंकर हे आपल्या शास्त्रीय संगीतातलं अत्युच्च शिखरावर असलेलं नाव. पंडित रविशंकरांनी जेव्हा हिंदी चित्रपटांना संगीत दिलं, तेव्हा ते नक्कीच वेगळं ठरलं. कशामुळे? तर शास्त्र कोळून प्यायल्यावर त्याच्यावर येणारं प्रभुत्व आणि एक कलाकार म्हणून जपलेली स्वत:ची संवेदनशीलता यांचा तो मिलाफ ठरला. पंडितजींनी काही मोजक्या हिंदी चित्रपटांना संगीत दिलं. नीचा नगर (१९४६), धरती के लाल (१९४६), अनुराधा (१९६०), गोदान (१९६३), मीरा (१९७९) हे ते चित्रपट. पण या सगळ्यात ‘अनुराधा’ या हृषीकेश मुखर्जीच्या चित्रपटाचं स्थान वेगळं आहे. कारण इथे कलाकार स्त्रीच्या मनाचा ठाव घ्यायचा होता. पं. रविशंकर ज्ञानाने, सतारवादनातील त्यांच्या कौशल्याने कितीही थोर असते, तरी जर ती संवेदनशीलता त्यांच्याकडे नसती तर ‘अनुराधा’सारख्या अत्यंत तरल चित्रपटाला ते कधीच संगीत देऊ शकले नसते. राग, ताल, सम, काल, व्याकरण यांच्या पलीकडे पोचते ती खरी प्रतिभा. कारण ही सगळी साधनं आहेत. साध्य वेगळंच आहे. तिथे त्या भूमिकेच्या मनात शिरावं लागतं. खूप खूप मानसिक कल्लोळ आधी स्वत: पचवावा लागतो. काही काळ ती भूमिकाच जगावी लागते, तेव्हा कुठे तरी, ‘कैसे दिन बीते’सारखी रचना जन्माला येऊ शकते. पं. रविशंकरांचं संगीत हा ‘अनुराधा’च्या जडण घडणीचा, व्यक्तिरेखा स्थापित होण्याच्या प्रक्रियेचा फार महत्त्वाचा घटक ठरला. त्या गाण्यांशिवाय ‘अनुराधा’ची आपण कल्पनाच करू शकत नाही. अनुराधा म्हणजे मूíतमंत विरहिणी.. श्रेयस आणि प्रेयस या दोन्हींपासून ताटातूट झालेली! ‘दिग्दर्शकाचं माध्यम’ असं जेव्हा आपण म्हणतो, तेव्हा आपल्याला नेमकं काय अभिप्रेत असतं? हृषीदांच्या प्रत्येक चित्रपटाचं संगीत वैशिष्टय़पूर्ण का? तर संगीतकाराची निवड ही सध्या त्याची ‘हवा’ आहे म्हणून नव्हे, तर कथा डोळ्यापुढे ठेवून होत होती. बलराज सहानी, लीला नायडू आणि अभी भट्टाचार्य या तीन व्यक्तिरेखांभोवती फिरणाऱ्या या चित्रपटात हृषीदांना नेमकं काय अपेक्षित होतं? एक गायिका- विवाहानंतर तिच्या कलेकडे झालेलं दुर्लक्ष.. अतिशय व्यस्त पती स्वखुशीनं खेडय़ात प्रॅक्टिस करणारा बुद्धिमान सेवाभावी डॉक्टर आणि सगळं वरकरणी छान चाललंय असं वाटत असताना ‘अपघातानं’च झालेलं दीपकचं आगमन.. जो तिच्या गानसाधनेचा साक्षीदार. तिचा चाहता.. मुग्ध, अबोल, एकतर्फी प्रेम करणारा.. यात निर्मलला कुठेही दुष्ट किंवा अहंकारी नवरा ठरवायचं नाहीये. अनुराधाला कुठेही अति महत्त्वाकांक्षी गायिका म्हणून रंगवायची नाहीये आणि दीपकला कुठेही तिच्यावर डोळा असणारा मित्र म्हणून दाखवायचा नाहीये! जरा जरी ढोबळ हाताळणी झाली असती तर किती बटबटीत झालं असतं हे सगळं! अशा वेगळ्याच चित्रपटाला अपेक्षित असलेलं संगीत पं. रविशंकर देऊ शकले, कारण त्या तरल अवस्थेला ते पोचू शकले. या कथेत संगीत बाहेरून आलेलं नाही. त्या कथेतून एक व्यक्तिमत्त्व घेऊनच ते उमटतं. ‘अनुराधा’ची नायिका एक सर्वसाधारण स्त्री नाही. एक पूर्वाश्रमीची प्रथितयश गायिका आहे. ती व्यक्त होताना एका विशिष्ट दर्जाचं सांगीतिक मूल्य घेऊनच व्यक्त होईल आणि ती इतक्या सुसंस्कारित घरातली आहे, की कुठलाही आक्रस्ताळेपणा तिच्या वागण्या बोलण्यात नाही. मग तो गाण्यात कसा असेल? अनुराधाचं दु:ख खूप नाजूक, हळवं आहे. तिच्यातली स्त्री दुखावलीय, तिच्यातला कलाकारही दुखावलाय. दैनंदिन गृहकृत्य करायला तिची ना नाही, पण आतून येणाऱ्या सांगीतिक उर्मीचं काय? कुठे गेले ते दिवस? स्वरांच्या सान्निध्यातले, प्रेमाने मंतरलेले? ज्याच्यावरून आपलं स्वरविश्व ओवाळून टाकलं, त्यालाच कुठे वेळ आहे क्षणभर थबकायला, स्वरांची साद ऐकायला? खरं तर इतकासुद्धा हा मामला सरळसोट नाही. एकमेकांवर अतिशय उत्कट प्रेम करणारं हे जोडपं एका विलक्षण आवर्तात सापडलंय. केवळ अनुराधाच्या दु:खाची ही कहाणी नाही, तर ‘अशा’ अनुराधाला गमावणाऱ्या त्या डॉक्टरची- निर्मलचीसुद्धा ही कहाणी आहे. जिच्या प्रेमामुळे आपल्याला रुग्णांची सेवा करण्याची ऊर्जा मिळते, तो प्रेमाचा स्रोत आपल्या कोरडेपणामुळे आटत चाललाय हे त्याचंही दु:ख नाही का? त्याचं अनुराधावर प्रेम नाही असं कसं म्हणावं? खरोखर प्रेमात पडला होता तो तिच्या! खूप उत्कट होता एके काळी! अनुराधाच्या दुखऱ्या पायावर उपचार करता करता, ‘म रात को सो भी सकुंगी?’ या तिच्या प्रश्नावर, ‘आप जरूर सो सकती है,’ असं ‘आप’ वर जोर देऊन किती सूचक बोलून गेला होता! प्रत्येक शब्दात अनुराग दरवळत होता त्याच्या. पण आता स्वत:मधल्या प्रियकरावर अन्याय करण्याची सवय लावून घेतलीय त्यानं! अगदी तिच्या गाण्यावर मनापासून प्रेम करणारा दीपकसुद्धा या आवर्तात सापडलाय. कारण आपली अनुराधा हरवली, आपल्याला ती कधी मिळणार नाहीच, हे जाणून असणारा, अनुराधाला तिच्या पुसत चाललेल्या अस्तित्वाची, विझत चाललेल्या त्या ठिणगीची दाहक जाणीव करून देणारा दीपक. नाही तर चाललंच होतं की सगळं मागच्या पानावरून पुढे.. एक गाणारा सुंदर हळवा पक्षी.. स्वत:चेच पंख छाटायला लागलाच होता की! पण ही आत्ताची तू, खरी अनुराधा नव्हेस.. आठव तू काय होतीस ते.. परमेश्वरानं दिलेल्या प्रतिभेचा अपमान करतेयस तू.. हे सांगणारा दीपक भेटतो आणि कसा तरी धरून ठेवलेला बांध फुटतो.. अनुराधाच्या मनात कल्लोळ सुरू होतो. एकीकडे संसार, तर दुसरीकडे गायिका म्हणून पुसत चाललेली स्वत:ची ओळख परत मिळवण्याची आस.. दिवस-रात्र रुग्णसेवा करणाऱ्या नवऱ्यात, मुलीतही जीव गुंतलेला, तर आपला प्राण असलेलं संगीत दुरावतंय ही खंत काळीज कुरतडतेय. अशी ‘अनुराधा’ कशा प्रकारे व्यक्त होईल? संगीताशिवाय शक्य आहे? फक्त चार गाण्यांमधून हे भावविश्व आपल्यासमोर उलगडतं. चित्रपटात ही चार गाणी अत्यंत महत्त्वाची. या चार गाण्यांना विशिष्ट भूमिका आहे त्यात. हृषीदा हाच चित्रपट अधिक सांगीतिक करू शकले असते.. पण कथेत सांगीतिक पाश्र्वभूमी असूनही ‘अनुराधा’ संगीतबंबाळ नाही. जी गाणी आहेत ती इतकी मनस्वी की अनुराधाचं भावविश्व याहून वेगळं उरंतच नाही!
‘सावरे सावरे’ हे अनुराधा रॉयचं रेडियोवर लागलेल गाणं. त्या गाण्यात तालाचे किती विभ्रम असावेत.. झपाटल्यासारखी लय.. भरवीचे सूर.. महालवचीक गळा.. त्या ताना.. एकदा त्या गाण्यानं तुम्हाला ताब्यात घेतलं की संपेपर्यंत तुमची सुटका नाही. गायिकेच्या गळ्याची जबरदस्त तयारी दाखवणारं हे गाणं चित्रपटाच्या सुरुवातीलाच आहे. तिथेच तिचा ‘गायिका’ म्हणून दर्जा लक्षात येतो. त्रितालाशी खेळतं हे गाणं अक्षरश:.. रचनाच अशी की चौदाव्या मात्रेपासून निघणारा मुखडा आणि त्याची अति द्रुत लय. त्या कुण्या गोपिकेची कृष्णाशी चाललेली झटापट.. इथे तालाशी केलेल्या मस्तीत डोळ्यापुढे येते आणि तालाला सोडून म्हटलेला तो ‘जाओ’ त्याचं नेमकं स्थान कळणं अवघड आणि त्या शेवटच्या ताना.. प्रत्येक तान वेगळी.. बारीक फरक असलेली. श्वास घेण्याची गरज बाईंना का वाटत नसावी? ‘काहे मोसे करो जोराजोरी’ पासून ते ‘सावरे सावरे’ पर्यंत एकच श्वास? अनेक संवादातून होणार नाही ते काम एक छोटंसं गाणं करून जातं. इथून पुढे तिची संसारात होणारी घुसमट दाखवायची आहे त्यामुळे तिच्या ‘गायिका’ असण्यात फार वेळ दिग्दर्शक घालवत नाही. एकच गाणं असं काही जबरदस्त आहे, की ती काय तयारीची गायिका आहे हे दोन मिनिटांत लक्षात येतं.
दुसरं गाणं नाचरं. त्या प्रणयरम्य दिवसातलं. अगदी खेळकर गाणं!
जाने कैसे सपनोमें खो गयी अखियां,
म तो हू जागी, मोरी सो गयी अखिया
अजब दिवानी भई मोसे अनजानी भई
पल मे परायी देखो हो गयी अखियां.
किती हसरं गाणं! त्या गाण्याचा इंट्रोपीस हा पंडितजीचं नृत्याशी असलेलं नातं दाखवणारा. ते तिलकश्याम रागात आहे ही फार पुढची गोष्ट, पण मुळात गाण्याचा टोन, बाईंची गायकी केवळ अप्रतिम! स्वत: सितारवादक असूनही या गाण्यात मेंडोलीनला जास्त महत्त्व दिलंय पंडितजींनी! ‘म तो हू जागी मेरी सो गयी अखिया’मधल्या ‘सो’वरची, रिषभावरून थेट मध्यम धवतावर झेप घेणारी जागा अत्यंत सुंदर! हेच शब्द एकदा ‘नीधपम’ अशी वेगळीच जागा घेऊनही उमटतात, तर एकदा त्या ‘सो’ला नुसतं डोलवलंय.. फार अतक्र्य गोडवा आहे त्या उच्चारात! तिलकश्याम हा स्वत: पंडितजींनी निर्माण केलेला राग. त्याचे भावविभ्रमच वेगळे! दोन अंतऱ्यांमध्ये पंचमापर्यंत घुटमळणारी चाल पुढच्या अंतऱ्यात खाड्कन वरच्या षड्जावर जाते तेव्हा एकदम लख्ख प्रकाश पडतो. त्या स्वराचा, त्या आवाजाचा!
कोई मन भा गया, जादू वो चला गया
मन के दो मोतिया पिरो गयी अखिया..
ही शेवटची ओळ खरोखर स्वरतंतूंची एक अनोखी वीण घेऊन येते. एका गाण्यात किती चमत्कृती असाव्यात! हे असे चढ-उतार. मनाचे, बुद्धीचे उभे-आडवे विचार प्रवाह हे एखाद्या बुद्धिमती कलावतीच्याच व्यक्त होण्यात दिसू शकतात. एखाद्या स्वर-साधिकेच मनोगत असंच असेल. ती ढोबळपणे गाणार नाही, व्यक्तही होणार नाही. व्यक्तिरेखेचं प्रतििबब गाण्यात पडतं म्हणजे आणखी वेगळं काय?
मनातला कल्लोळ अनुराधानं कसा सांगावा? तर-
हाये.. कैसे दिन बीते, कैसे बीती रतियां
पिया जाने ना!
काय सांगायचंय तिला नेमकं?
नेहा लगाके म पछ्ताई
सारी सारी रैना निंदिया न आयी
जान के देखो मेरे जी की बतिया!
रुत मतवाली आके चाली जाये
मनही में मेरे मन की रही जाये
खिलनेको तरसे नन्ही नन्ही कलिया
कजरा न सोहे गजरा न सोहे
बरखा न भाये बदरा न सोहे
क्या कहू जो पूछे मोसे मोरी सखिया?
वरकरणी एखाद्या विरहिणीचं वाटणारं, लोकगीताच्या अंगानं जाणारं शैलेंद्रचं काव्य, पण किती तरी सूक्ष्म तरंग टिपणारं. कलाकाराची घुसमट किती तऱ्हांनी होते! वातावरणातला प्रत्येक बदल टिपणारं तिचं मन कसं कातर होत असेल! बदलणाऱ्या ऋतूबरोबर हसणारं, शिशिरातल्या पानगळीत हिरमुसणारं, वसंतात बहरणारं, तर वर्षांऋतूत सृजनानं पालवणारं तिचं मन उमलू पाहतं, काही तरी सांगू पाहतं, पण ‘त्याच्या’कडून उपेक्षा झाली तर ऋतू हे केवळ भिंतीवरच्या कॅलेंडरमधून बदलत राहतील. मनाच्या अस्वस्थ तरंगांचं काय? त्या कळ्या केव्हा उमलणार? इथे तर प्रत्येक स्वर त्या सृष्टीशी जोडलेला असतो. भर दुपारचं सौंदर्य अनुभवायला शिकवतो शुद्धसारंग. कलती दुपार, एक हुरहुर लावते ती मुलतानीच्या स्वरांतून. तीव्र मध्यम, उन्हाची तिरीप घेऊनच येतो आयुष्यात! गाणाऱ्या जिवासाठी, मारव्यातल्या षड्जाची लागलेली तहान. ही जिवलगाच्या भेटीच्या लागलेल्या तहानेपेक्षा कमी नसते. ही अशांतता तो जन्मजात घेऊन आलेला असतो. अशा परिस्थितीत जर हा जीव काही न व्यक्त करता मिटून गेला तर तो मृत्यू, देहाच्या मृत्यू पेक्षा कितीतरी दुर्दैवी असतो. हा अनुभव ज्याला आला, त्यालाच अनुराधाचं दु:ख समजू शकतं. पंडितजींना ती नस सापडली. या गाण्याचा सीन इतका बोलका आहे. गाण्यातून व्यक्त होणाऱ्या अनुराधाच्या गळ्यातली जागा अन् जागा टिपणारा, तिच्यावर, तिच्या गाण्यावर मनापासून प्रेम करणारा, तिच्या मनाच्या हळव्या कोपऱ्यावर, त्या जखमेवर हळुवार फुंकर घालणारा, समोर बसलेला ‘तो’. आणि ‘गातेय काही तरी बायको’ म्हणून स्वत:च्या कामात गर्क असलेला नवरा. तिचं गाणं त्यानं गृहीत धरलंय. तो जाणूनबुजून दुर्लक्ष करत नाही किंवा कसलाही इगो त्याला नाही. फक्त ते दोघे वेगळ्या प्रतलांवर आहेत एवढंच.
अनुराधाच्या व्यथेला खूप कंगोरे आहेत. ती फक्त दुखावलेली गायिका नाही, जखमी प्रेयसीसुद्धा आहे. कारण तिचं श्रेयस, प्रेयस आणि गाणं या वेगळ्या गोष्टी नाहीतच मुळी. ‘जान के देखो मेरे जी की बतिया’. एकदा जाणून तर बघ काय जळतंय इथे. आणि ते तूच जाणायला हवंस!
दोन मध्यम जीवघेणे लागोपाठ येणारे. ‘पिया’ म्हणताना धवतावरून मध्यमाची नेमकी कुठली श्रुती लागते हे सांगणं अवघड. ‘कैसे बीती रतिया’मधल्या ‘रतिया’वर खास रिषभाची मींड. अतिशय गोड- समजावणारी, थोपटणारी, पण नंतर येणाऱ्या दोन मध्यमांची फ्रेज मात्र दाहक. मांझ खमाज सारखा राग निवडणं हे पांडित्य झालं, विद्वत्ता झाली, पण त्या रागात नसलेला तीव्र मध्यम वेगळ्याच श्रुतींनी त्या चालीत आणण्यात. त्या ‘पिया जाने ना’ची कळ जास्त वेदनामय करून जाणारा एक अति हळवा कलावंत दिसला. मला म्हणायचा आहे तो हा मिलाफ!
आणि ‘अनुराधा’चं फार आर्त. हळवं गाणं ‘..हाये रे वो दिन क्यू न आये?’
‘वो दिन!’ जेव्हा ताऱ्यांनी चमचमणारं आकाश आपलं दोघांचं होतं आणि आता? कुठे गेले ते तारे? ‘सूनी मेरी बीना संगीत बिना’. काय करू ही बेसुरी गात्रवीणा घेऊन? तिला सुरात लावूच शकत नाही मी. कसे सूर निघतील त्यातून? खरं तर आणाभाका झाल्या तेव्हाच ‘तो’ म्हणाला होता, की अनुराधा, आपल्या विवाहानंतर तुझ्या गाण्याचं काय होईल? पण आपण सांगितलं.. तुझ्यासाठी असेल माझं गाणं यापुढे! पण आता तोच कुठे तरी हरवलाय. त्याचं संवेदनशील मन फक्त रुग्णांसाठी द्रवतंय.. आपल्या मनाची जखम बरी करण्याचं औषध त्याला सापडू नये ना!
जनसंमोहिनीची जादू संपूर्ण गाण्यावर भरून राहिलीय. सितार, व्हायोलिन्सच्या त्या सुरुवातीच्या पीस नंतर अक्षरश: काळजात कळ उठते ती सारंगीची. ती सारंगी सांगते, जखम किती खोल आहे. ‘हाये’ हा शब्द लताबाईंनी विविध गाण्यांत हजारो वेळा म्हटला असेल, पण प्रत्येक वेळी वेगळा! हा ‘हाये’ खंतावलेला.. विद्ध मनातून आलेला..
‘झिलमील वो तारे, कहा गये सारे?’ हे आक्रंदन आहे एका कलासक्त मनाचं. मन बाती जले, बुझ जाये! हा जो ‘जले’ नंतरचा पॉझ आहे तो फार फार महत्त्वाचा. तिथे गाणं थबकतं.. एक प्रश्न, कैफियत मांडतं. कारण तो ठहराव प्रश्नार्थक आहे. किंचित वर उचललेली अक्षरं आहेत ती.. इथं गाणं. एक निश्वास सोडतं.. आणि नाइलाजानं पुढे जातं.. ‘सपनोंकी माला मुरझाये’मध्ये ‘माला’ हा असाच जीवघेणा शब्द. गदगदून येतं हे गाणं ऐकताना. ‘क्यू न आये’ म्हणताना प्रत्येक वेळा खालच्या षड्जावर आल्यावर, व्हायोलिन्स तेच स्वरवाक्य कोमल गंधारावरून शुद्ध गंधारावर नेतात. कुणी तरी सोबत आहे तुझ्या, तू एकटी नाहीस.. ही व्यथा तुझी एकटीची नाही. तुझ्यावर प्रेम करणाऱ्या ‘त्याची’पण आहे ना! ‘जा, जा, के रितु..’ किती अर्थपूर्ण ठहराव या शब्दांचा! शब्दांचं स्कॅनिंग किती अर्थपूर्ण करता येतं, याचं उत्तम उदाहरण आहे हे गाणं. भावनांचे लाखो पदर उलगडू शकले असते पंडितजी.. अजून गाणी का आली नाहीत त्यांची, असं वाटून जातं. ‘हाये रे’ हा शब्द ज्या उमाळ्यात भिजून येतो, ते समजण्याची आपली कुवत कमी पडते. तितकेच आपणही त्या संवेदनेत भिजलो तरच समजेल ते. कोरडय़ा मनाचं हे कामच नाही. त्या स्वरांनी, भेटायला आलेल्या कर्नल साहेबांच्या जखमेवरची खपली निघते. अनुराधानं केलेल्या त्यागाचं कर्नल साहेब कौतुक करतात. रात्री अनुराधा घर सोडायचा निर्णय व्यक्त करते. निर्मल आतून हलतो. तिला गमावण्याच्या कल्पनेनंही कोसळून गेलेला निर्मल डोळ्यांतून, थरथरत्या आवाजातून बलराजनी जिवंत केलाय. त्याच्या एका हळव्या स्पर्शाने अनुराधाला तिचं हरवलेलं प्रेम गवसतं. याच प्रियकराची ती वाट पाहत होती. सकाळी गाडीच्या हॉर्नमुळे निर्मलला जाग येते. अनुराधा खरंच गेली की काय या आशंकेनं खडबडून जागा झालेला निर्मल खाली येतो तेव्हा ती सगळी अस्वस्थता, भीती तिला शोधत धावत खाली येण्याचा वेग- व्हायोलिन आणि सारंगी.. सितार- यांच्या परस्पर छेदक फ्रेझेसमधून व्यक्त होतो आणि एका क्षणी हा कल्लोळ थांबतो. अगदी घरगुती आवाज त्यांची जागा घेतात.. शांतपणे अनुराधा घरातली कामं करत असते. निर्मलच्या आणि तिच्या नात्याला, दोघांच्या डोळ्यातल्या अश्रूंनी वेगळं परिमाण दिलेलं असतं. दीपक समजूतदारपणे निघून जातो, एकटाच..
आज जर ‘अनुराधा’सारखा चित्रपट बनवायचा झाला तर तेवढय़ाच संवेदनक्षमतेचा संगीतकार शोधावा लागेल. कारण हा चित्रपट म्हणजे एक काव्य आहे. प्रणय, उत्कंठा, आशा, निराशा, आनंद, वैफल्य या सगळ्याच तरंगांचं अनोखं विश्व आहे ‘अनुराधा’! पुन्हा पुन्हा अनुभवावं, हरवावं स्वत:ला आणि शोधावी आपल्यातली अनुराधा.. आपल्यातला डॉक्टर आणि आपल्यातला दीपकसुद्धा!
mrudulasjoshi@gmail.com