– भूषण कोरगांवकर
गेल्या पाचेक वर्षांत नाटक, सिनेमा आणि एकंदर कला सादरीकरणाची केंद्रं बदलत चालली आहेत. समाजात जे बदल होतायत त्याचाच थेट परिणाम कलाविश्वावरही होतो. कॉर्पोरेट्स मनोरंजनाच्या क्षेत्रात उतरल्यावर शिस्त, नियमित पैसे, उत्तम पब्लिसिटी, चकचकीत मार्केटिंग असे अनेक चांगले बदल झालेत. कॉर्पोरेट केंद्रात लावणी नृत्य गाजविणाऱ्या दिग्दर्शकाचा या नव्या कलाकेंद्रांविषयीचा दृष्टिकोन. याशिवाय नाटकसिनेमा आणि इतर कलांचा प्रेक्षक जगवू पाहणाऱ्या ‘ब्लॅक बॉक्स’ संस्कृतीची तरुण रंगकर्मीने करून दिलेली ओळख…
गेल्या काही वर्षांपासून ‘संगीत बारी’ या माझ्या पुस्तकावर आधारित लावणीचे अनेक प्रयोग आम्ही करीत आहोत. पारंपरिक कलाकारांच्या कहाण्या हिंदी-इंग्रजीतून सांगून, त्यांची खानदानी कला लोकांसमोर आणणं असं त्यांचं स्वरूप असतं. मुंबईतलं एनसीपीए, पृथ्वी थिएटर आणि विशेषत: अडीच वर्षांपूर्वी सुरू झालेलं नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर इथे जेव्हा जेव्हा आमचे हे कार्यक्रम होतात; तेव्हा कलाकारांना आणि प्रेक्षकांना फारच आनंद होतो. तीच गोष्ट देशात, परदेशात भरणाऱ्या मोठमोठ्या नाट्य आणि नृत्य महोत्सवांची- ज्यांना अनेकदा कॉर्पोरेट स्पॉन्सरशिप असते. या सर्वच जागा अतिशय प्रतिष्ठित आणि उच्चभ्रू समजल्या जातात. तिथे येणाऱ्या लोकांना या सगळ्या कलाप्रकारांबाबत अज्ञात म्हणून कौतुक आणि तिथल्या कलाकारांना तिथे मिळणाऱ्या मानाचं आणि फाइव्ह स्टार सुखसोयींचं… म्हणजे दोन्ही पार्ट्या खूश.
बिदागी आधी…
यांचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे कलावंतांच्या ताफ्याला ते ठरलेली बिदागी आधीच देऊन निमंत्रित करतात. म्हणजे कलाकारांवर तिकीटविक्रीचा कोणताही ताण राहत नाही आणि ते आपापल्या सादरीकरणावर पूर्ण लक्ष एकवटू शकतात. ‘‘शिवाय, इथल्या कर्मचाऱ्यांची आमच्याशी वागणूक किती मस्त असते.’’ नृत्यांगना गौरी जाधव खूश होऊन सांगते, ‘‘मला तर विमानात बसल्यासारखंच वाटतं.’’
उदाहरणंच घ्यायची तर ‘फॅण्टम ऑफ द ऑपेरा’ या ब्रिटनमधील बहुकलाकारांच्या सांगीतिकेने मुंबईत वर्षाच्या सुरुवातीला नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरमध्ये चार आठवड्यांत ५५ हजार इतक्या प्रेक्षकांना आकर्षित केलं. ‘द साऊण्ड ऑफ म्युझिक’, ‘लाइफ ऑफ पाय’, मामा मिया, मटिल्डा द म्युझिकल आदी सांगीतिकांना आश्चर्यकारकरित्या गर्दी उसळली. येथे रशियन, आयरिश, अमेरिकी कलाकारांचे शनिवार-रविवार चालणारे जलसे, मैफली यांना कलासक्त कायम हजेरी लावतात. कारण समाजमाध्यमांपासून पारंपरिक माध्यमांमधून प्रेक्षकांना आकर्षित करण्याची शक्ती या नव्याने अवतरलेल्या कलाकेंद्रामध्ये आहे. करोनानंतर नाट्यगृह, चित्रगृहाकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवली. नेटफ्लिक्स आणि ओटीटी फलाटांच्या आहारी प्रेक्षकवर्ग गेला, या साऱ्या गृहीतकांना हे कलाकेंद्र मोडीत काढतंय.
मनोरंजनाच्या क्षेत्राला समाजातल्या सशक्त वर्गाचा अनेकदा पाठिंबा असतो. हा एक प्रकारचा राजाश्रयच. लोकाश्रयाची आर्थिक गणितं गडबडतात तेव्हा जर विवेकी राजाश्रय नसेल तर कलाप्रकारांमधला धंदेवाईकपणा काही काळ तग धरतो, पण कलेला उतरती कळा लागते. ‘‘त्यामुळेच भारतीय नाट्यसृष्टीसाठी एनएसडी, नया थिएटर, कोरस, एनसीपीए, रंगायन, थिएटर अकादमी, आविष्कार, आदिशक्ती, नीनासम यासारख्या संस्था फार महत्त्वाच्या ठरल्या,’’ अभिनेत्री गीतांजली कुलकर्णी सांगते, ‘‘यातल्या काही सरकारी मदतीने सुरू झाल्या, काही बड्या उद्योगसमूहांनी केल्या तर काही रंगकर्मीनी स्वत:च. पण या प्रत्येक संस्थेचा स्वत:चा एक ठोस विचार होता, दूरदृष्टीने केलेलं नियोजन होतं. इथे चांगल्या कलाकारांना बोलावलं गेलं, अधिकार दिले गेले. त्यामुळेच नवनवीन प्रयोग झाले, नवीन कलाकार, लेखक, दिग्दर्शक घडले आणि प्रेक्षकही घडत गेला.’’
आता बड्या कॉर्पोरेट समूहांनी प्रायोजित केलेले महोत्सव आणि त्यांची नाट्यगृहं यांमुळे पारंपरिक कलाप्रकारांसह जगभरातील कलाप्रकार त्यांच्या मंचावर उपलब्ध झाले. सतीश आळेकरांचं ‘ठकीशी संवाद’ आणि आमच्या ‘लव्ह अॅण्ड लावणी’चे प्रयोग तिथे होतात; तेव्हा त्यांचा प्रेक्षकवर्ग हा वैविध्यपूर्ण स्तरातला आणि आस्वादगटातला असतो.
थोडा इतिहास आणि वर्तमान…
तमाशाची दवंडी ऐकली की पूर्वापार लोकांच्या मनात उत्साहाचं वारं संचारायचं. गण, मुजरा, गवळणी, बतावणी, रंगबाजी म्हणजे लावण्या व नाचगाणी आणि प्रमुख आकर्षण म्हणजे वग… यात लोक रात्रभर रंगून जायचे. यातला रांगडा शाृंगार, चावटपणा लोकांना सतत हसवत ठेवायचा. प्रसंगी डोळ्यात सामाजिक सुधारणांचं अंजनही घालायचा. पुढचे अनेक दिवस मनात आणि बोलण्यात एकच विषय घुमत राहायचा. बहुतेक कलाकार ठरावीक जातीत जन्म झाल्याने, उपजीविकेचं साधन म्हणून किंवा कलेच्या कैफात हे काम करायचे. प्रेक्षकवर्ग मित्रपरिवारासोबत या मनोरंजनात दीर्घकाळ दंग व्हायचा. दोन्ही ठिकाणी पुरुषांचं वर्चस्व! पण हे तमाशे लोकप्रिय व्हायच्या खूप आधीपासून, गेल्या कित्येक शतकांपासून दुसरी एक स्त्रीप्रधान जागाही होती. ती म्हणजे संगीत बारी. म्हणजे पारावरची, दिवाणखाण्यातली किंवा कलाकेंद्रांतली नाचगाणी. इथे खिशात पैसा खुळखुळणारे पुरुषच जायचे. लावणी या दोन्ही ठिकाणी बहरत होती.
पुढे सिनेमा आला, रुळला, रेडिओ, टीव्ही, व्हीसीआर करता करता आज २०२५ साली अनेक लोकांच्या हातात मोबाइल आहेत आणि प्रत्येकजण त्यावर एकेकट्याने स्वाइप करत अर्ध्या-अर्ध्या मिनिटांचे रील्स पाहत आहे. पण म्हणून लावणी, तमाशा, नाटकासारख्या समूहाने पाहायच्या कला संपल्या आहेत का? अर्थातच नाही, पण त्यांचं स्वरूप निश्चितच बदललंय, बदलतंय आणि बदलणार आहे.
कलाकारांचं सामाजिक स्थान
‘तुमची हागनदारी ती आमची वतनदारी’ अशी म्हणच होती पूर्वी. मिराबाई पुणेकर या तमाशातल्या अनुभवी कलाकार आपले जुने दिवस आठवतात, ‘‘आम्ही अक्षरश: खोऱ्यानं घाण साफ करून तिथे राहिलोय, दुसरा पर्यायच नव्हता.’’ संगीत बारीच्या कलाकारांची स्थिती एवढी वाईट नव्हती, पण समाजाची छी-थू त्यांनाही झेलावीच लागली. ‘‘आजही लागते,’’ संगीत नाटक अकादमी पुरस्कार विजेत्या शकुंतलाबाई नगरकर सांगतात, ‘‘आमचे स्त्रीप्रधान समाज. आम्ही आमच्या घरी, कलाकेंद्रात महाराण्या असतो, पण बाहेर समाजात आम्हाला कुठं स्थान आहे? त्यामुळेच आपले हे प्रयोग एवढ्या मोठ्या ठिकाणी होतात. लोक एक कलाकार म्हणून आपल्याकडे बघतात, पाया पडतात तेव्हा भरून येतं.’’ ही जाणीव कलाकारांना सध्या तरी केवळ कॉर्पोरेट कलाकेंद्रे देऊ शकतात.
२०१० नंतरची स्थिती…
नवीन नृत्यदिग्दर्शकांनी लावणीच्या उत्फुल्ल रूपाला बंदिस्त स्टेप्समध्ये जखडून टाकलं. सिनेतारका सेक्सी दिसण्याच्या अट्टहासातून अतिरंजित हालचाली करू लागल्या. लावणीचे दमदार घुंगरू गुंडाळून ठेवले गेले आणि दोरीचे किंवा पट्टीचे लहानखुरे घुंगरू बांधून मुली-मुलं सिनेमातून, रिअॅलिटी शोजमधून लावणीच्या नावाखाली प्रेक्षणीय कवायती करू लागली. दहीहंडी, गणपती, नवरात्र आदी ठिकाणी लावणीची मागणी वाढली. इथे राजकीय पक्ष आणि कॉर्पोरेटस आहेतच. आणि इथे लावणीच्या आयटम डान्ससदृश्य रूपाने आज लोकांवर गारूड केलंय.
दुसरीकडे तमाशा आणि संगीत बारीच्या कलाकेंद्रांतही गंभीर परिस्थिती आहे. तिथे फक्त आणि फक्त सुपरफास्ट हिंदी, मराठी गाणीच सुरू आहेत. तमाशातून आधुनिक साज कधीचाच गायब झालाय. संगीत बारीत आजवर पायपेटी, तबला, ढोलकी हा जुना बाज टिकून राहिलाय. पण आता तिथेही काही कलाकेंद्रामधून डीजे लावून नाचण्याचे प्रकार सुरू झालेत. सगळीकडूनच खानदानी बाज हरवत चाललाय. त्याचा आस्वाद घेण्यासाठी लागणारा निवांतपणा आज पारंपरिक कलागृहांत नावालाही सापडत नाही.
कॉर्पोरेट कल्चर आणि…
लावणीतला मोकळाढाकळा श्रृंगार तिची जान आहे. तो हरवू नये, पण त्याने बाजारू कुरघोड्याही करू नयेत आणि लावणीला आणि ती खेळणाऱ्या अस्सल कलाकारांना प्रतिष्ठा मिळाली पाहिजे, असं एक गुंतागुंतीचं गणित आपल्यापुढे आहे. त्यासाठीच आमचे वेगवेगळे उपक्रम सुरू आहेत. या आमच्या कलात्मक प्रयत्नांना साथ देण्यात बड्या कॉर्पोरेट समूहांनी प्रायोजित केलेले महोत्सव आणि त्यांची नाट्यगृहे यांचा मोठा हात आहे. पण त्यांची संख्या फार कमी आहे. ‘‘शिवाय या सगळ्यातून आपल्याकडे ठरावीक, उच्चभ्रू लोकंच येत राहिली तर आपणच आपला प्रेक्षक कमी करतोय असं नाही का होणार?’’ हा अभिनेत्री अनिता दातेचा प्रश्नही महत्त्वाचा आहे.
कॉर्पोरेट कल्चर अत्यंत नफेखोर आहे. जास्तीत जास्त फायदा होईल अशा गोष्टींची लोकांना सवय लावणं हाच त्यांचा धर्म आहे. ते स्वत:चाच अजेंडा पुढे रेटणार यात काही शंका नाही. अनेकदा ते सत्ताधारी पक्षाच्या तालावर चालत असतात. त्यामुळे कलाकारांच्या मनातले, पोतडीतले, लोकांच्या भल्याचे विषय, स्वत:च्या फायद्याचे नसतील तर ते उचलून धरतील का?
आमच्यासारख्या एखाद्या संस्थेला कधीतरी बोलावून, एक ‘टोकन’ म्हणून प्रयोग लावण्यानं लावणीतली कलात्मकता दीर्घकाळ टिकणार नाही, तिला प्रतिष्ठा मिळणार नाही. त्यामध्ये सातत्य हवं. नियमित प्रयोग, नियमित कार्यशाळा, नवीन निर्मिती हे सगळं व्हायला हवं. आधुनिक नाटकाला निश्चित दिशा देण्यात आधी उल्लेख केलेल्या असंख्य संस्थांनी जे मोठं काम केलं तसं आता लावणीसाठी काम करणाऱ्या संस्था निर्माण झाल्या पाहिजेत. सरकारी संस्था कात टाकून, भ्रष्टाचार थांबवून हे करतील का? की कॉर्पोरेटसच्या ‘कला-संशोधन आणि संवर्धन’ फंडातून हे होऊ शकेल?
लावणीचे कलाकार, अभ्यासक तयार आहेत. कलाश्रय आहे, पण आता राजाश्रयाची प्रतीक्षा आहे. पण खरं तर त्याहूनही अधिक लोकाश्रयाची गरज आहे. आपल्याला जर आयटम नंबरसारखीच लावणी बघायची असेल तर राजाश्रय मिळवून तरी काय फायदा? कारण अशी लावणी सिनेमात, टीव्हीवर, गल्लीबोळात, आणि आपल्या फोनवर सुरूच आहे.
कुठल्याही माणसासारखीच लावणी कलाकारांनाही प्रेम, पैसा आणि प्रतिष्ठा यांची आस आहे. (नाटक, टीव्ही मालिका आणि इतर कलांमधील कलावंतांबाबतदेखील वेगळे म्हणता येणार नाही.) त्यासाठी परिश्रम घ्यायची या साऱ्यांची तयारी आहे. पण मुळात आपल्याला या कलाकारांना पुढे आणायचंय का? त्यांचा हा पारंपरिक बाज आणि त्यातले नवीन प्रयोग हवे आहेत का? असल्यास ते होतील यात काही शंका नाही. कारण ‘मागणी तसा पुरवठा’ या बाजारन्यायाने कॉर्पोरेट्स कलागृहांना लोक जी मागतील त्या प्रकारची कला पुढे आणावीच लागेल.