article on writer nagnath kottapalle on occasion of 75th birthday zws 70 | Loksatta

मानवतावाद जपणारा कृतिशील लेखक

एकूणच त्यांची लेखनसपंदा आणि कृतिशीलतेमुळे त्यांच्या वाङ्मयीन व्यक्तिमत्त्वाचा बलदंडपणा अधिकच उठावदार झाला आहे.

मानवतावाद जपणारा कृतिशील लेखक
ज्येष्ठ लेखक नागनाथ कोत्तापल्ले

महेंद्र भवरे

लेखन प्रपंच आणि कृतिशीलतेमुळे ओळखले जाणारे बलदंड व्यक्तिमत्त्व, तसेच साहित्यिकांच्या कोणत्याही वर्तुळात किंवा एखाद्या पंथांच्या चौकटीत न रमणारे ज्येष्ठ लेखक नागनाथ कोत्तापल्ले यांच्या पंचाहत्तरीनिमित्त..

नागनाथ कोत्तापल्ले यांचा जन्म स्वातंत्र्याच्या सात महिन्यानंतर नांदेड जिल्ह्यातील मुखेड येथे झाला. या वर्षी त्यांनी पंचाहत्तरीत पदार्पण केले. या प्रवासातील चार दशके म्हणजे १९७१ ते २०१० हा त्यांचा प्रत्यक्ष शिक्षण क्षेत्रासाठी वाहून घेतलेला कालखंड. दलित, ग्रामीण विद्यार्थ्यांशी अतिशय आत्मियतेचे नाते असणारे हे गुरुजी!  विद्यार्थ्यांचे जीवलग शिक्षक!

कुलगुरू नसतानाही विद्यापीठातील सर्वाधिक विद्यार्थीप्रिय शिक्षक हा त्यांचा लौकिक. मराठवाडय़ासारख्या प्रदेशातून प्रत्येक जिल्ह्यात, तालुक्यात सरांविषयी आजही खूप आतून, प्रेमाने, आदराने बोलणारे, कृतज्ञता व्यक्त करणारे शेकडो लोक भेटतात. 

नागनाथ कोत्तापल्ले हे ‘कोतापल्ले सर’ या नावाने अधिक परिचित आहेत. सर स्वकर्तृत्वाने महत्पदाला पोहोचले. मराठीचे अध्यापक, विभागप्रमुख ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू आणि ८६व्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष हा त्यांचा प्रवास थक्क करून सोडणारा आहे.   आणीबाणीच्या काळात त्यांच्या ग्रंथाला राज्य शासनाचा जाहीर झालेला पुरस्कार त्यांनी नाकारला होता. शरद जोशी यांनी जागतिकीकरणाचे समर्थन केले तेव्हा त्याला कडाडून विरोध केला. संयमी असले तरी कोत्तापल्ले सरांचा बाणा मात्र करारीच आहे, हे अशा अनेक प्रसंगातून स्पष्ट होते. त्यांच्यातील शिक्षक अनेक अंगानी प्रकट झाला. अनेक विद्यार्थ्यांना आधार देण्यापासून ते त्यांना जीवनात उभे करण्यापर्यंत मोलाचे कार्य आणि नैतिक जबाबदारी पार पाडली हे त्यांचे माणूसपणाचे संचित वेगळा आदर्श निर्माण करणारे ठरले आहे. प्राध्यापक ते कुलगुरू या प्रवासात कोणताही अहंकार त्यांच्या मनाला स्पर्शला नाही, असा प्रचंड साधेपणा त्यांच्या व्यक्तिमत्त्वात ओतप्रोत भिनलेला आहे.       कोत्तापल्ले सरांचे वडील लालुजीराव हे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत शिक्षक होते. सातत्याने त्यांच्या बदल्या होत असत. त्यामुळे सरांना एका जागी स्थिरावता आले नाही. या भटकंतीमुळेच त्यांना जीवनाच्या विविधांगाचे दर्शन घडले. महाविद्यालयीन जीवनात  खऱ्या अर्थाने कोत्तापल्ले सरांच्या व्यक्तिमत्त्वाला आकार आला. लक्ष्मीकांत तांबोळी, हिंदीचे जाजू नावाचे शिक्षक, हेमचंद्र अधिकारी यांच्यासारखे अतिशय अभ्यासू, तत्त्वप्रिय, सामाजिक बांधिलकी असणारे आणि विद्यार्थ्यांचा विकास व्हावा यासाठी धडपडणारे प्राचार्य सरांना लाभले. हेच गुण त्यांच्या व्यक्तिमत्त्वातही उतरले. विद्यापीठीय जीवनात लाभलेले डॉ. सुधीर रसाळ, डॉ. गंगाधर पानतावणे या शिक्षकांचे संस्कार तसेच मराठवाडा साहित्य परिषद या सर्व संस्कारातून सरांचे  व्यक्तिमत्त्व साकार झाले. त्याचबरोबर मोईन शाकीर, अफझल खान, उर्दू कवी काझी सलिम, शायर बशर नवाज यांच्याशी त्यांचा दोस्ताना होता. अध्यापन आणि शिक्षण क्षेत्राशी असलेल्या अनुबंधातून अतिशय चिंतनशील आणि वैचारिकदृष्टय़ा परिपक्व झालेले सरांचे व्यक्तिमत्त्व चळवळीतील प्रत्यक्ष सहभागामुळे अधिकाधिक प्रगल्भ झाले.

कोत्तापल्ले सर ज्या काळात लेखन करीत होते, त्या काळातील सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक आणि वाङ्मयीन वातावरणाचा मोठा परिणाम त्यांच्या लेखनावर झाला. त्यांच्या साहित्याला फुले – शाहू – आंबेडकर – मार्क्‍स यांच्या विचारांचे तात्विक अधिष्ठान आहे. कविता, कथा, कादंबरी, ललित, वैचारिक, समीक्षा, अनुवाद, संपादन अशा सर्वच क्षेत्रात त्यांच्या लेखणीने संचार केला आहे. हाताळलेल्या सर्वच वाङ्मय प्रकारांत त्यांनी आपला स्वतंत्र ठसा उमटविला आहे. समाजजीवन समजावून घेऊन त्यांनी साहित्य निर्माण केले. लेखक म्हणून त्यांची भूमिका मानवतावादी आहे. मानव्याची प्रतिष्ठापना हा त्यांच्या साहित्य निर्मितीमागील हेतू आहे. सामाजिक बांधिलकीची भूमिका आणि सामाजिक भोवतालातील संघर्षांतच त्यांच्या लेखनाची बीजं दडलेली आहेत. चळवळीतील प्रत्यक्ष सहभाग त्यांच्या साहित्यनिर्मितीला कारणीभूत ठरला. एक लेखक म्हणून त्यांनी राजकीय भूमिका घेतली. एका विशिष्ट जगाची बाजू घेणे म्हणजे राजकीय भूमिका घेणे होय. शत्रू कोण याविषयीचे एक स्पष्ट भान या भूमिकेमागे असते. ‘मी समाजातल्या  शोषितांच्या बाजूचा आहे. समाजातील दलित, ग्रामीण, पीडित, शोषित जे कोणी असतील ते मला जवळचे आहेत. त्यांची तीच बाजू मला जवळची वाटते,’ असे स्पष्ट प्रतिपादन कोत्तापल्ले यांनी केले आहे. त्यांच्या साहित्याचा संदर्भ एकूण समाजव्यवस्थेशी, जीवन व्यवस्थेतील ताणतणावाशी आहे. त्याचे मूळ त्यांच्या राजकीय भूमिकेत आहे. या भूमिकेमुळेच त्यांच्या साहित्याला सघनता प्राप्त झाली आहे.

अस्तित्वाला अर्थ प्राप्त होण्यासाठी सामाजिक अवकाशाची गरज असते. काम्यूने असे म्हटले आहे की, ‘माझे राज्य लोकांतच आहे.  स्पर्श करता येतील तेवढेच सत्य ग्रा!’ कोत्तापल्ले यांची कविता सत्याला स्पर्श करणारी, आत्मशोधाची आहे. ‘इथे सर्व काही जणू भारतच, फक्त नाहीत माणसे’ हे त्यांच्या कवितेला दिसलेले वास्तव आहे. रात्रीचे पर्यावरण गळा घोटणारे तर दिवसाचे गळा कापणारे आहे. विनाशकारी व्हायला भाग पाडणारे आहे. पराकोटीचा हा विसंवादी अंतर्विरोध त्याच्या कवितेने स्पष्ट केला आहे.

ग्रामीण जीवनातील सामाजिक ताणतणाव, जातीय मानसिकता आणि वर्चस्ववादी राजकारण यातूनच कादंबरी लेखनाला चालना मिळाली. भारतीय समाजाची मानसिकता समजून घेऊन समस्येला हात घालणे हे कोत्तापल्ले यांच्या कादंबऱ्यांचे सूत्र आहे. सामाजिक परिवर्तनाला गतिमान करणाऱ्या प्रामाणिक प्रयत्नांना गतिरुद्ध करणारे घटक कसे सामर्थ्यांनिशी कटिबद्ध होतात, या घटकांनी परिवर्तनाचा प्रवाहच कसा उलटा फिरविला आहे, अशा बरबटलेल्या समाजव्यवस्थेचे परखड आणि प्रत्ययकारी चित्र त्यांच्या कादंबरीने रेखाटले आहे. भारतीय समाज हा बधिर, पौरुषहीन, संवेदना विरहीत होत गेलेला आहे. या समाजाला कशाचेच काही वाटत नाही. अशा वास्तवाच्या पार्श्वभूमीवर तृतीयपंथी व्यक्तीला महत्त्वाची भूमिका देऊन त्याला प्रतीकाच्या पातळीवर आणले आहे. कार्यकर्त्यांची शोकांतिका मांडली आहे. विचार प्रवणता आणि सामाजिकतेचे दाहक वास्तव भान हेच कोत्तापल्ले यांच्या कादंबरीविश्वाचे केंद्रस्थान आहे.

वर्तमानाच्या भोवतालातील सामाजिक समस्यांचा वेध घेऊन त्याला मूल्याची जोड देणे हे त्यांच्या ललित गद्य लेखनाचे सूत्र आहे. सामाजिक स्थितीच्या चिंतनाचा गहिरेपणा हे या लेखनाचे केंद्र आहे. काव्यात्मकता, उपरोध, उपहास आणि क्वचित विनोदाचा शिडकावा या सर्वच गुणविशेषामुळे हे लेखन अधिक धारधार झाले आहे. ‘उद्याच्या  सुंदर दिवसासाठी’ चांगला माणूस घडावा यासाठीच हा लेखन प्रपंच आहे.’

कोत्तापल्ले यांनी महात्मा फुल्यांचे विचार आणि कार्याचा वेध घेतला आहे. महात्मा फुले ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर अशी विचार आणि प्रबोधन परंपरा मांडली आहे. ‘फुले हे नवधर्म मीमांसा आणि ‘मिथकभंजन’ करतात म्हणून बुद्धीनिष्ठतेच्या बाबतीत फुले हे आगरकारांपेक्षा वरचढ ठरतात.’ हे कोत्तापल्ले यांचे मत ऐतिहासिकदृष्टय़ा फार मोलाचे आहे. फुले आणि आंबेडकर यांच्यामधील एक बळकट दुवा या अर्थाने ते विठ्ठल रामजी िशदे यांच्याकडे पाहतात. प्रबोधन परंपरेलाच पराभूत करणारी वस्तुस्थिती वाचकांच्या निदर्शनास आणून देण्याचे काम त्यांच्या वैचारिक लेखनाने केले आहे. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वाङ्मयेतिहासाच्या खंडांमध्ये महात्मा फुले यांच्याबद्दलची माहिती अगदीच जुजबी असावी, ही बाब काहीशी खटकणारी अशीच होती, असे कोतापल्ले यांनी नमूद केले आहे. दडपलेला इतिहास मुखरीत करण्याच्या भूमिकेतून आणि इतिहासाच्या पुनर्माडणीच्या गरजेतून त्यांचे वैचारिक गद्य साकार झाले आहे. त्यांचे बलस्थान दिसून येते ते त्यांच्या कथालेखनात. विषय, आशय आणि रचना या दृष्टीने वैविध्याचा अनुभव त्यांच्या कथेने दिला आहे. समकालीन सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय जीवनाचा आंतरिक संघर्ष आणि अंतर्विरोधाचे वास्तव कथेतून चित्रित केले आहे. या कथांवर पूर्वसूरींचा कोणताही प्रभाव नाही. कोत्तापल्ले यांची म्हणून असणारी एक खास शैली आणि घाट या कथांनी निर्माण केला. आपल्याकडे लोकशाही आली तरी सरंजामी मानसिकतेचा पीळ कायमच आहे. काळाप्रमाणे माणसे बदलायला तयार नाहीत. सरळमार्गी माणसाची मुस्काटदाबी सुरूच आहे. माणसाला विक्रेय रूप प्राप्त झाले आहे, अशा सामाजिक पर्यावरणावर या कथांनी भाष्य केले आहे. केवळ जाणवले ते लिहावे या धोरणानुसार प्रस्थापित व्यवस्था आणि वर्तमान वास्तव यासंबंधीचे मूलभूत प्रश्न उपस्थित करून या कथांनी मराठी कथेला वैविध्यपूर्ण परिमाण प्राप्त करून दिले आहेत.

कोत्तापल्ले कोणत्याही वर्तुळात किंवा एखाद्या पंथांच्या चौकटीत अडकले नाहीत. म्हणून कथाकार, कादंबरीकार, लेखक म्हणून स्वत:चे वेगळेपण अबाधित राखण्यात ते यशस्वी ठरले आहेत. परिवर्तनवादी चळवळीतून उदयाला आलेल्या वाङ्मयाचे ते खंदे समर्थक आहेत. दलित, आदिवासी, मुस्लीम, स्त्रीवादी अशा सर्वच साहित्य प्रवाहाचे पुरस्कर्ते आणि भाष्यकार आहेत. उपयोजित आणि सैद्धांतिक अशा दोन्ही स्वरूपाचे समीक्षा लेखन त्यांनी केले आहे. केवळ साहित्यांतर्गत कलामूल्यांचा आधार घेऊन समीक्षा लेखन करता येणार नाही. म्हणून आपली भूमिका अधिक ठळक करण्यासाठी सामाजिक जाणीव, सामाजिक परिवर्तन आणि साहित्याचा संबंध याविषयी मांडणी केली आहे. आक्षेप असूनही सदाशिव पेठी साहित्यावर त्यांनी भाष्य केले आहे. स्त्रीवादी साहित्याचे समर्थन करतानाच गौरी देशपांडे यांचा संवेदनशीलतेचा वेगळेपणा गृहीत धरून सुद्धा ‘‘त्या फडक्यांचा आधुनिक अवतार आहेत,’’ असे मत ते नोंदवतात. आजची समीक्षा नवकथा आणि नवकवितेच्या काळातच वावरते आहे असा निष्कर्ष मांडून ते मराठी समीक्षेचा थिटेपणा स्पष्ट करतात. ‘ज्या ज्या काळात जातीसंस्थेला आव्हान मिळते त्या त्या  काळातील वाङ्मय आपल्या वेगळय़ाच सौंदर्याने झळाळून निघते,’ असे मत त्यांनी ठामपणे मांडले आहे. ‘दलित, ग्रामीण, स्त्रीवादी चळवळी देशीवादी असल्याने भालचंद्र नेमाडय़ांनी नवनवे धोके निर्माण करणारी, पुनरुज्जीवनवादाला कवटाळणाऱ्या देशीवादाची संकल्पना मांडण्याची गरज नव्हती.’ हे त्यांचे मत पुनर्विचार करायला लावणारे आहे. त्यांनी मराठी लेखकांच्या जाणिवांतील उणेपणा, दुबळेपणाही स्पष्ट केला आहे. त्यांच्या समीक्षेतील कठोरपणा मराठी लेखकांना पुनर्विचार करायला भाग पाडणारा आहे. सामाजिक, सांस्कृतिक आणि भाषिक परिप्रेक्ष्यातील जीवननिष्ठ भूमिका त्यांच्या समीक्षेने अधोरेखित केली आहे. साहित्याचे क्षेत्र हे रणांगणाचे क्षेत्र आहे असे मानून चळवळ आणि साहित्य असा अनुबंध स्पष्ट केला. त्यातूनच ‘चळवळीचे साहित्यशास्त्र’ ही नवी संकल्पना जन्मास घातली. त्यांचे समीक्षा

लेखन हे चळवळीचे साहित्यशास्त्र मांडणारे असल्याने वेगळे आणि महत्त्वाचे ठरले आहे. मूलगामी स्वरूपाच्या चिंतन आणि वेगळय़ा विचारांच्या मांडणीतून जीवनलक्ष्यी समाज – वाङ्मयीन नवसमीक्षा नागनाथ कोत्तापल्ले यांनी सिद्ध केली आहे.

एकूणच त्यांची लेखनसपंदा आणि कृतिशीलतेमुळे त्यांच्या वाङ्मयीन व्यक्तिमत्त्वाचा बलदंडपणा अधिकच उठावदार झाला आहे. त्यांच्या वैविध्यपूर्ण साहित्यामुळे मराठी वाङ्मयाच्या इतिहासात एक लेखक म्हणून त्यांनी स्वत:चे स्थान निर्माण केले आहे. पंचाहत्तरीनिमित्त त्यांच्या कार्यकर्तृत्वाला सलाम!

mmbhaware@gmail.com

मराठीतील सर्व लोकरंग ( Lokrang ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 27-11-2022 at 01:05 IST
Next Story
कस्तुरीगंध : ‘कलावंतीण’ एक सोलीव सत्य!