डॉ. राजेंद्र सलालकर

रवींद्र शोभणे यांची ‘होळी’ ही अलीकडेच प्रकाशित झालेली कादंबरी. ‘पडघम’, ‘अश्वमेध’ या त्रिखंडात्मक कादंबरी मालिकेतील ही तिसरी कादंबरी. १९७५  ते २००० या कालखंडाचा वेध घेणाऱ्या महाकादंबरी लेखनाचा त्यांनी संकल्प सोडला होता. ‘होळी’च्या लेखनाने त्यांनी तो पूर्ण केला. १९७५  ते २०००  हा भारतीय जीवनातील संघर्षपूर्ण कालखंड आहे. अशा काळाला केंद्रस्थानी ठेवून त्याचा सर्वागीण शोध घेणे हे अवघड काम होते.  राजीव गांधींच्या  हत्येनंतरचा काळ या कादंबरीत आलेला आहे. राजीवजींच्या हत्येनंतर सहानुभूतीच्या लाटेवर काँग्रेस काही प्रमाणात तग धरते. त्यानंतर नरसिंहराव पंतप्रधान होतात आणि  मनमोहन सिंग अर्थमंत्री. यावेळी देशाची आर्थिक स्थिती अत्यंत हलाखीची होती. अशावेळी देशाच्या आर्थिक स्थितीला ऊर्जितावस्था  देण्यासाठी मनमोहनसिंग यांनी नव्या अर्थनीतीची घोषणा केली. अर्थात त्याला नरसिंहराव यांचा भक्कम पाठिंबा होता. जागतिक बँक, गॅट करार, सीटीबीटी करार, अमेरिकेसारख्या भांडवलशाहीप्रणीत देशाचा वाढता प्रभाव आणि कुंठित  झालेली भारतीय आर्थिक स्थिती  अशा परस्पर विरुद्ध परिस्थितीतून वाट काढण्यासाठी खाजगीकरण, उदारीकरण आणि जागतिकीकरणाच्या प्रक्रियेला सुरुवात झाली. उदारीकरणाची वाट धरल्याशिवाय कोणताही मार्ग तत्कालीन सरकारसमोर नव्हता. पण त्याचे दृश्य परिणाम दिसण्यासाठी २१व्या शतकाची वाट पाहावी लागणार होती. त्याची पायाभरणी याच काळात होत होती. याचे सर्व संदर्भ ‘होळी’ या कादंबरीत कथेच्या प्रवाहात एकजीव होऊन कलात्मकरीत्या आलेले आहेत.        

loksatta readers reactions loksatta readers opinions loksatta readers response
लोकमानस : निवडणुकीत मुख्य मुद्दयांचा विसर
The conservation role of women
स्त्रियांची जतनसंवर्धक भूमिका
Neelam Gorhe criticize Uddhav Thackeray said he has lost his base politically
“उद्धव ठाकरे यांचा राजकीयदृष्ट्या जनाधार संपला,” निलम गोऱ्हे यांची टीका; म्हणाल्या…
chirag paswan interview
काका-पुतण्यांमधील राजकीय लढाईचा अंत? काय म्हणाले चिराग पासवान?

 बिनदिक्कतपणे ओरबाडणे हे काळाचे जे प्राणतत्त्व तयार झाले आहे, ते एकविसाव्या शतकातील खाऊजा धोरणाला अनुलक्षूनच असे म्हणावे लागेल. अरुण जाधव, नागनाथ देशमुख, उमेश जाधव, अर्जुन वाघ, पंडित जगताप, अनुपमा माळी, विजयसिंह शिर्के, भावना गवळी, गजानन गद्रे, गुणाकार देशमुख, अनिरुद्ध देशमुख ही या संदर्भातली उत्तम उदाहरणे सांगता येतील. त्यांना आपल्या पारंपरिक मूल्यांचे, संस्कारांचे कोणतेही देणे-घेणे नाही. त्यांना हवाय फक्त उपभोग. त्यात कोणाचा बळी जातो हे त्यांच्या गावी नाही. त्यामुळे जे लांछित आहे तेच प्रतिष्ठित होण्याचा हा काळ म्हणावा लागेल. पर्यायाने या तत्त्वाला अधिक बळकटी मिळते. या साऱ्या धारणांना या शतकाच्या अखेरीस जे सर्वोच्च स्थान मिळाले, त्यामुळे अनेक शतकांपासून  जी मूल्ये समाजाने परोपरीने सांभाळली होती त्यांची अक्षरश: ‘होळी’च अनुभवायला मिळते.

शोभणेंनी ‘होळी’मध्ये सामाजिक घटनांचा जो वेध घेतला आहे तो अधिक महत्त्वाचा आहे. ही या नव्या युगाची सुरुवात होती. ‘हत्या’ या काळाचे एक आणखी वैशिष्टय़. सार्वभौम, धर्मनिरपेक्ष, कल्याणकारी देशाची सर्वोच्च नेता इंदिरा गांधींची या काळाने हत्या केली. त्यांचा अपराध काय तर मोठय़ा कष्टाने मिळविलेले स्वातंत्र्य अबाधित राहावे, इथली धर्मनिरपेक्षता सुरक्षित राहावी, वंचितांचे कल्याण व्हावे आणि देशातल्या शेवटच्या माणसालाही सुरक्षितता मिळावी यासाठी केलेले प्रयत्न. ते निष्ठुरपणे आणि निरपेक्ष भावनेने केले म्हणून तिची हत्या केली. राजीव गांधींचेही तेच झाले. श्रीलंकेत शांती सेना पाठवली तो त्यांना स्वत:च्या वंशावर हल्ला वाटला. म्हणून काही धर्माध शक्तींनी या तरुण उमद्या नेत्याची हत्या केली. अशी साऱ्याच विशेषत: तत्त्वांची हत्या करीत निघालेला हा काळ पारंपरिक, पण समाजाला कल्याणकारी असणाऱ्या मूल्यांचीही हत्या करतो. हत्या करूनच त्याला नव्या जीवनाचे, नव्या धरणांचे बीजारोपण करायचे आहे. त्याशिवाय त्याला नव्या जीवनाची सुरुवात करणे शक्य नाही. हे योग्य की अयोग्य हे समाजाने ठरवावे. अशी भावना शोभणे या लेखनातून वाचकांच्या मनात निर्माण करतात, ते अधिक महत्त्वाचे आहे. रवींद्र शोभणे यांनी या कादंबरीची रचना ज्या पद्धतीने केली ती विशेष अशी आहे. नागपूर या शहराभोवती या कादंबरीचे कथानक  घडते. परंतु त्याचा परीघ महाराष्ट्रभर पसरलेला आहे. मुंबई, पुणे, कोल्हापूर, अहमदनगर, अमरावती अशा शहरांचे बारकाव्यानिशी  येणारे संदर्भ विशेष वाटणारे आहे. विशेषत: मुंबई आणि पुण्यातील गल्लीबोळाचे, रस्त्यांचे, घरांचे, दुकानांचे, विविध आस्थापनांचे संदर्भ आले आहेत, ते  विशेष आहे.

एखाद्या प्रसंगाची सुरुवात करताना ते त्या प्रसंगांच्या वर्तमान िबदूवर येतात. तिथून त्या प्रसंगाची ते अचानक सुरुवात करतात. प्रथम वाचकाला काही समजेनासे  होते. मग  हळूहळू तो पुढे वाचू लागला, की त्या प्रसंगाला  भूतकाळातील संदर्भाची जोडणी आहे हे त्याला समजते. मग ‘असे आहे होय हे?’ असा वाचकांच्या चेहऱ्यावर भाव उमटतो. त्यानंतर  तो मूळ कथानकाशी जोडला जातो. या कादंबरीत्रयीमध्ये सर्वत्र हीच पद्धती दिसून येते.  ‘होळी’मध्ये  सगळय़ा व्यक्तींची आयुष्ये एका निश्चित स्थितीकडे  प्रवाहित झाल्याची प्रतिमा वाचकांच्या मनात निर्माण होते. यातील अण्णासाहेब, अनंतराव, आबा यांचा मृत्यू म्हणजे तत्त्वनिष्ठांचा लोप. खा. नारायण यावलकर वेगळे आहेत; परंतु त्यांचे प्रमुख क्षेत्र राजकीय असल्याचे जाणवते. श्रीनिवास या काळात निराश, हतबल झालेला दिसतो. अरुण जाधव, अर्जुन वाघ, गुणाकार, अनिरुद्ध यांचे राजकीय वर्चस्व  वाढलेले दिसते. त्याचवेळी विजयसिंह शिर्के यांसारख्या उद्योगपतींची पत- प्रतिष्ठा लक्षात येते. वृद्धाश्रम पाडून नवे शॉिपग कॉम्प्लेक्स बांधण्याची भूमिका, त्याला बळी पडणारी मृणाल आणि अलगद दूर सारला जाणारा श्रीनिवास, त्याच वेळी फसवली जाणारी मृणाल हे वर्तमान वास्तव. मृणालला  भेसूर आणि बेभरवशाच्या स्थितीची  काजळी या काळावर पडत असल्याचे दिसते.

सबंध कादंबरी त्रयीच्या वाचनातून १९७५ चे सामाजिक जीवन सन २००० साली कोणत्या वळणावर येऊन पोहोचले, कसे गडगडत गेले, याची स्पष्ट जाणीव करून देणारी ही त्रयी आहे.  या कादंबरीचा शेवट विचार करायला लावणारा  आहे. यातील घटनांचे कथन करताना निवेदक तृतीय पुरुषी भूमिकेत असतो. त्यामुळे तो सर्वसाक्षी असतो. हे निवेदकाला मिळालेले स्वातंत्र्य कादंबरीला भरीवपणा देण्यास उपयुक्त ठरते. या कादंबरीचा निवेदक हे स्वातंत्र्य घेतो. त्यानुसार व्यक्तीच्या मनातील विचार व्यक्तही करतो. या कादंबरीतील अंतिम विधानाशी दोन व्यक्तिरेखा जोडलेल्या आहेत. मृणाल  आणि श्रीनिवास बनकर. मृणाल  जीवनभर बेभानपणे वर्तन करीत शेवटी कॅन्सरग्रस्त होते. उच्च ब्राह्मण कुळात जन्मलेली, शिक्षक- प्राचार्याच्या मार्गदर्शनाखाली मोकळय़ा वातावरणात वाढलेली मृणाल, विविध वळणावरून चालत चालत वडिलांच्या वृद्धाश्रमात येते. त्या वृद्धाश्रमालाही उद्ध्वस्त करून, शेवटी श्रीनिवासच्या आश्रयाला जाते.  श्रीनिवासच्या  पहिल्या भेटीत प्रभावीत झालेल्या  मृणालला (पडघम), आयुष्याच्या शेवटी पुन्हा श्रीनिवासचीच आठवण येते. ते दोघे एकत्र येतात. या कादंबरी त्रयीमधून लेखकाला विसाव्या शतकाच्या  उत्तरार्धात भारतीय समाज कसा मूल्यहीन होत गेला, याचे सूचन करायचे आहे. ‘होळी’ त व्यक्तीसापेक्ष काही उणिवा नक्कीच आहेतच; परंतु अशा उणिवा  स्वीकारूनही या कादंबरीचे मोल अजिबात कमी होत नाही. विसाव्या शतकाच्या अंती आपल्या समाजात आलेली भीषणता, अस्थिरता, फुटीरता, विसंगतता, अनिश्चितता, धर्माधता, जातीयता आणि सत् विचारांची होळी या कादंबरीतून प्रभावीपणे व्यक्त करण्यात लेखकाला निर्विवाद यश मिळाले आहे.

‘होळी’, रवींद्र शोभणे, मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊस, पाने-  ६३९,  किंमत- ७०० रुपये.