scorecardresearch

Premium

मोकळे आकाश.. : संभाषण आणि सुसंवाद

फातिमा आमच्याकडे आली तीच मुळी मोठे थोरले फुगलेले पोट घेऊन. आतील गाठ कॅन्सरची होती आणि शस्त्रक्रियेला पर्याय नव्हता.

मोकळे आकाश.. : संभाषण आणि सुसंवाद

डॉ. संजय ओक
फातिमा आमच्याकडे आली तीच मुळी मोठे थोरले फुगलेले पोट घेऊन. आतील गाठ कॅन्सरची होती आणि शस्त्रक्रियेला पर्याय नव्हता. तिची दादी त्यासाठी तयार होती, पण अम्माचा मात्र प्रखर विरोध होता. Discharge Against Medical Advice अर्थात् DAMA पर्यंत प्रकरण ताणले गेले होते आणि अम्माने घरी जाण्याची सर्व तयारी केली होती. मला हे कळल्यावर मी फातिमा, अम्मा आणि दादी या सर्वाना ऑपरेशन थिएटरमध्येच बोलावून घेतले. बाहेरच्या खोलीत बैठक मारली. दीड वर्षांची फातिमा भोकऱ्या डोळ्यांनी माझ्याकडे पाहत होती आणि तिच्या अम्मीजानच्या अश्रुधारांना थाराच नव्हता. मी पुढची तब्बल ४५ मिनिटे अम्मीशी माझ्या हिंदीमिश्रित मोडक्या उर्दूतून संवाद साधला. तिच्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर दिले, शंकांचे निरसन केले. अम्मीच्या मनातील धाकधूक संपली नव्हती. आपली लाडली बेटी आपल्याला सुखरूप परत मिळावी, इतकीच त्या आईची अपेक्षा होती. मालती, मरियम, मेहरुन्निसा, मेरी.. नावे बदलतात; पण ‘माय’ तीच राहते. प्रश्नांचा कल्लोळ, भीतीचे सावट, दुरावण्याची दुष्ट शंका. भाषा बदलते.. बदलत नाही ती भावना! ‘भय इथले संपत नाही.’ पण आठवण तरी कोणाकोणाची काढायची? कोण धावून येईल अशा क्षणी? कामाच्या ओझ्याखाली दबलेले वैद्यकविश्व आणि भय-भावनेने झाकोळलेले आप्तेष्ट यांच्यामधील हा सामना म्हणजे संभाषणातील दुरावा आणि सुसंवादाचा अभाव!

“Sir, the relative is uneducated. He does not understand…” हा माझ्या वैद्यकीय ज्युनिअरचा सल्ला मी आजवर कधीही मानलेला नाही. आणि मला हे विधान मान्यही नाही. आपल्या रुग्णाचे क्षेमकुशल कशात आहे हे जाणण्याची इच्छा प्रत्येक आप्ताला असते. त्यासाठी विद्यापीठीय पदवीची गरज नसते; तर रुग्णामधील भावनिक गुंतणुकीचे भांडवल लागते.

Womens Health why facial hair growth increase and What is the solution on it
स्त्री आरोग्य : तुमच्या चेहऱ्यावर आहेत त्रासदायक केस?
intelligence testing comprehensive test of nonverbal intelligence assessment of intelligence
कुतूहल : व्यापक बुद्धिमत्तेच्या चाचण्या
If I Sent Money To Wrong Phone Number Via UPI Google pay Paytm How Do I Get My Money Back Self Money Transfer mistakes to Avoid
मी चुकीच्या फोन नंबरला UPI ने पैसे पाठवल्यास परत कसे मिळतील? तज्ज्ञांचं सविस्तर व सोपं उत्तर वाचा
Have moles on your face what will you do
Health Special: अंगावर तीळ आहेत? काय कराल?

मग संवाद का अडतो? या प्रश्नाचे उत्तर शोधताना मला मी लहानपणी ऐकलेल्या ‘घोडा का अडला? भाकरी का करपली?’ या कोडय़ाची हटकून आठवण होते. ‘न फिरवल्यामुळे!’ हे त्या कोडय़ाचे उत्तर होते. याही प्रसंगात ‘प्रयत्न न केल्यामुळे!’ हेच उत्तर हाती उरते.

‘Barriers in Communicationl ’ अशा स्वरूपाच्या थिअरी प्रश्नाचे छापील उत्तर सर्व व्यवस्थापन स्नातकांना तोंडपाठ असते, पण त्याची प्रात्यक्षिक गुरुकिल्ली मात्र सापडत नसते. भाषेचा अडसर.. आपल्या देशात दर शंभर किलोमीटरला भाषा बदलते. तिचा लहेजा स्वतंत्र वळण घेतो. प्रादेशिक अस्मिता व भौगोलिक सीमा उच्चार आणि शब्दयोजनेवर परिणाम करत्या होतात. शिवाय रुग्ण, आप्तेष्ट आणि वैद्यकीय व्यावसायिक भिन्न सामाजिक स्तरांमधून आलेले असतात. ऋ णको आणि धनकोचे नाते असावे तसे काहीसे देणारा  (करणारा) आणि घेणारा (करवून घेणारा) हे वेगवेगळ्या पायऱ्यांवर उभे राहिलेले असे हे नातेसंबंध कचकडय़ाचे (Fragile) असतात. त्यांना बावन्नकशी झळाळी देण्यासाठी डॉक्टरला विशेष प्रयत्न करावेच लागतात. पुढाकार हा डॉक्टरनेच घ्यायचा असतो. शस्त्रक्रियेची आणि आजाराची माहिती द्यायची ती उभ्या उभ्या आणि वॉर्डच्या दरवाजातून बाहेर पडताना नव्हे. तर त्यासाठी डॉक्टर आणि आप्तेष्ट समसमान पातळीवर बसलेले आवश्यक आहे. बऱ्याचदा त्यांना एकदा सांगून पुरे पडत नाही, तर पुन:पुन्हा सांगावे लागते. त्याकरता संयम आणि सौम्यता हेच परवलीचे शब्द व्हावेत. कधी कधी सगळे सांगून झाल्यावर नातेवाईक शेजारच्या ‘मोठे अण्णां’ना बोलावतात. संमतिपत्रकावर सही करण्यापूर्वी धाकधुकीचा पूर्ण निचरा होऊन स्वेच्छेने स्वाक्षरी होईपर्यंत काम करणे यासाठीच संभाषण आणि सुसंवादाची गरज लागते. संभाषण हे शास्त्र असेल, पण सुसंवाद ही कला असते. आणि दुर्दैवाने या दोन्ही गोष्टींचा प्रात्यक्षिक अंतर्भाव वैद्यकीय शिक्षणक्रमात नाही. वादविवाद होतात. खटके उडतात. हमरीतुमरी होते. प्रसंगी खळ्ळ् खटय़ाकलाही सामोरे जावे लागते. नातेवाईकांचे चुकतेच; पण वैद्यकीय व्यावसायिकही कमी पडलेले असतात. कारण आणि प्रसंग वेगवेगळे असतात. देश-प्रदेशही भिन्न भिन्न ठरतात. समान असलेली एकच बाब असते.. संभाषण आणि सुसंवादाचा अभाव! ‘Relatives are not understanding’ या  वाक्याचा माझ्यापुरता अर्थ failed to make them understand…’ असाच निघतो. कोणीतरी म्हटल्याप्रमाणे, शब्द बोलताना शब्दांना धार नको, तर आधार असला पाहिजे. कारण धार असलेले शब्द मन कापतात. आणि आधार असलेले शब्द मन जिंकतात.

दोन व्यक्तींच्या संभाषणामध्ये आणखी एक भिंत उभी राहते.. ती म्हणजे errors of fixation.. रुग्णांच्या आप्तेष्टांच्या मनात कधी कधी एखादी समजूत दृढ झालेली असते. त्याचा झाकोळ मनाचा पूर्ण पगडा घेतो आणि मग डॉक्टर कितीही जीव तोडून सांगत असले तरी ती बाब आप्तेष्टांच्या कानातून मेंदूपर्यंत पोहोचत नाही. अशा वेळी त्यांना समजावण्यासाठी डॉक्टरांना अधिक प्रयत्न करावे लागतात.

.. काल फातिमाची अम्मी तिला कडेवर घेऊन ओपीडीमध्ये फॉलोअप्ला आली होती. शस्त्रक्रिया यशस्वी झालेली. टय़ुमरचा लवलेशही नव्हता. माझ्या विद्यार्थ्यांना थिएटरमधील ती बैठक आठवली. ते माझ्याबद्दल प्रशंसोद्गार काढणार तत्पूर्वीच मी त्यांना म्हणालो, ‘‘आता तिला केमो आणि रेडिएशन द्यायचे आहे. ते समजावून सांगून संमती घेण्याची जबाबदारी तुमची..’

sanjayoak1959@gmail.com

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व लोकरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Conversation and harmony tumor cancerous and surgery ssh

First published on: 18-07-2021 at 01:07 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×