scorecardresearch

सर्जनशील समीक्षक

ज्ञानेश्वरीच्या चिकित्सक विश्लेषणापासून मर्ढेकरांच्या कवितांच्या शोधापर्यंत आपल्या विचक्षण समीक्षेसाठी ख्यातकीर्त असलेले ज्येष्ठ समीक्षक म. वा. धोंड यांचे जन्मशताब्दी वर्ष ४ ऑक्टोबरपासून सुरू होत आहे. त्यानिमित्ताने त्यांच्या साहित्याचा मार्मिक आढावा घेणारा लेख..

ज्ञानेश्वरीच्या चिकित्सक विश्लेषणापासून मर्ढेकरांच्या कवितांच्या शोधापर्यंत आपल्या विचक्षण समीक्षेसाठी ख्यातकीर्त असलेले ज्येष्ठ समीक्षक म. वा. धोंड यांचे जन्मशताब्दी वर्ष ४ ऑक्टोबरपासून सुरू होत आहे. त्यानिमित्ताने त्यांच्या साहित्याचा मार्मिक आढावा घेणारा लेख..
प्रा. म. वा. धोंड यांनी आपल्या मर्मग्राही, धारदार लेखनाने गेल्या पन्नास-साठ वर्षांतील मराठी समीक्षा क्षेत्रावर स्वतंत्र ठसा उमटवला. ‘काव्याची भूषणे’, ‘मऱ्हाटी लावणी’, ‘ज्ञानेश्वरी : स्वरूप, तत्त्वज्ञान आणि काव्य’, ‘चंद्र चवथिचा’, ‘ज्ञानेश्वरीतील लौकिक सृष्टी’, ‘जाळ्यातील चंद्र’, ‘ऐसा विटेवर देव कोठें।’, ‘तरीहि येतो वास फुलांना’ अशी धोंड यांची निर्मिती आहे.
त्यांच्या समीक्षेला मूलगामी संशोधनाची जोड होती. अभ्यासविषयाचा परामर्श घेताना धोंड त्याच्या मुळाशी पोहोचत. साहित्यकृतीचे परिशीलन करताना त्यांच्या चौकस मनाला अनेक प्रश्न पडत. त्यांची उकल होईपर्यंत ते समग्र ज्ञात-अज्ञात संदर्भाचा धांडोळा घेत. म्हणूनच त्यांची समीक्षा, विविध विषयांच्या त्यांच्या सूक्ष्म व्यासंगाची प्रचीती आणून देणारी आहे. साहित्य, इतिहास, समाजशास्त्र अशा विविध क्षेत्रांतील संदर्भानी त्यांचे लेखन समृद्ध झाले आहे.
‘काव्याची भूषणे’ (१९४८) हे धोंड यांचे पहिले पुस्तक अलंकारशास्त्र व अलंकार यांची विस्तृत चर्चा करणारे आहे. जुन्या व नव्या मराठी काव्यातील अलंकारांची दिलेली उदाहरणे हे त्याचे वैशिष्टय़ आहे. ‘मऱ्हाटी लावणी’ (१९५६) हा लावणी वाङ्मयासंबंधी सांगोपांग व सखोल विवेचन करणारा महत्त्वाचा ग्रंथ. त्याच्या दुसऱ्या आवृत्तीत ‘कलगीतुरा’ हा शोधनिबंध समाविष्ट केलेला आहे. त्यामध्ये निशाणाच्या रंगांची प्रतीकात्मकता स्पष्ट करताना, हिरव्या रंगाच्या संदर्भात एक वेगळा विचार धोंड यांना सुचलेला आहे. हिरवा रंग मुस्लीम संस्कृतीतून तर आला नसेल?.. ‘आल्या पाच गौळणी/ पाच रंगांचा शृंगार करूनी।’ या एकनाथांच्या गौळणीतील हिरवा रंगही मुसलमानांचा म्हणून आला असेल का? एकनाथ हे उदार दृष्टीचे मानवतावादी होते आणि त्यांच्या गुरूंचे- जनार्दनस्वामींचे गुरू मुसलमान होते हे लक्षात घेतले की हा संभव निराधार वाटत नाही. धोंड यांच्या चिंतनातील निराळेपणा व स्वतंत्रता अशा ठिकाणी जाणवतो.
‘ज्ञानेश्वरी’ हा तर त्यांचा आयुष्यभराचा ध्यास होता. विश्वसाहित्यात मानाचे स्थान लाभावे असा ‘ज्ञानेश्वरी’ हा ग्रंथ मराठीत निर्माण व्हावा हे मराठी भाषेचे आणि साहित्याचे परमभाग्य आहे, अशी त्यांची धारणा होती. गीतेचे टीकाकार, भाष्यकार, विवेचक एवढेच काय गीतेचे श्लोकही बाजूस ठेवून आणि ज्ञानदेव व ज्ञानेश्वरी यासंबंधीची इतरांची मते व स्वत:चे पूर्वग्रह शक्य तेवढे विसरून, ज्ञानेश्वरीतील निखळ ओव्या अनुभवण्याचा प्रयत्न धोंड यांनी केला. त्यातून ज्ञानेश्वरीचे स्वरूप, तत्त्वज्ञान आणि विशेष या विषयीचे नवे आकलन, नवा अन्वयार्थ सिद्ध झाला. ज्ञानेश्वरी ही गीतेवरील टीका, भाष्य वा निरूपण नसून ती मराठी गीता आहे, तो ज्ञानदेवांनी घेतलेला गीतेचा अनुभव आहे, आत्मशोध आहे, त्याचा गाभा उपनिषदांच्या स्वरूपाचा आहे याचा त्यांना प्रत्यय आला. चिद्विलासवादी भूमिका आणि त्यावर आधारलेल्या ज्ञानकर्मयोगयुक्त भक्तीचा, मार्ग व निष्ठा म्हणून पुरस्कार हेच ज्ञानेश्वरीतील तत्त्वसूत्र आहे हे लक्षात आले. ज्ञानेश्वरी हा मूलत: काव्यग्रंथच आहे असे जाणवून त्यातील सौंदर्य न्याहाळण्याचा छंद जडला. ज्ञानदेव स्वत:चा अनुभव सर्वासाठी, सभोवतालच्या लौकिक सृष्टीतल्या प्रतिमांद्वारे व्यक्त करीत असल्यामुळे या प्रतिमांचा तरल वेध घेतला गेला. ज्ञानदेवांच्या तत्त्वविचारांनुसार त्यांची प्रतिमासृष्टीही चैतन्यनिर्भर, क्रियाशील, भावरूप व विश्वव्यापी आहे आणि ती तशी असल्यामुळेच प्रतिमांच्याद्वारे श्रोते ज्ञानेश्वरीतील अध्यात्म अनुभवू  शकतात हे वैशिष्टय़ जाणवले.
ज्ञानदेवकालीन समग्र लौकिक सृष्टी आणि तिच्याशी निगडित असलेली तत्कालीन भाषा जाणून घेतल्याशिवाय ज्ञानदेव भेटणार नाहीत या दृढ धारणेने, अगदी वेगळ्या आणि अनपेक्षित दिशांनी ‘ज्ञानेश्वरीतील लौकिक सृष्टी’चा धोंड यांनी अविरत शोध घेतलेला दिसतो. काळ, अवकाश, संस्कृती अशी कोणतीच बंधने त्यांच्या चिंतनाच्या आड येत नाहीत. उदाहरणार्थ, ज्ञानेश्वरीतील ‘विश्वरूप दर्शना’चा आजच्या काळात विचार करताना, विश्वरूप व अर्जुन यांची अणुस्फोट व रॉबर्ट ओपेनहायमर (अण्वस्त्राचा प्रमुख निर्माता) यांच्याशी तुलना करण्याचे खरोखर धोंड यांनाच सुचू शकते. (‘ज्ञानेश्वरीतील लौकिक सृष्टी’ या त्यांच्या पुस्तकाला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला.) ‘उखितें आधवें चि मी’ या लेखात त्यांनी शोधयात्रेतील अनुभव सांगितले आहेत. संशोधन किती सर्जनशील असू शकते याचा हा सुंदर वस्तुपाठ आहे.
धोंड यांच्या विवेचनाच्या ओघात अत्यंत वजनदार, मर्मस्पर्शी व विचारांना चालना देणारी विधाने येतात. उदाहरणार्थ,              ‘‘ग्रंथानुभव’ हा अनुवाद, टीका, भाष्य, निरूपण, प्रवचन यांसारखा एक स्वतंत्र वाङ्मयप्रकार मानला तर त्या स्वरूपाचा ‘ज्ञानेश्वरी’ हा जागतिक साहित्यातील एकमेव ग्रंथ ठरतो’, ‘हा प्राचीनतम आधुनिक ग्रंथ आहे’, ‘काव्य म्हणून हा ग्रंथ विश्वसाहित्यात केवळ अपूर्वच नव्हे तर अद्वितीयही आहे’, ‘विचारवंतांपेक्षा सामान्यांनी, सुशिक्षितांपेक्षा अशिक्षितांनी, नागरांपेक्षा जानपदांनी आणि पुरुषांपेक्षा स्त्रियांनी संतसाहित्य अधिक अंगी लावून घेतले आहे.’
विठ्ठल हे दैवत आणि त्याचे निर्माते व भक्त असणारे वारकरी संत यांच्याशी संबंधित लेखांचा संग्रह असणारे ‘ऐसा विटेवर देव कोठें।’ हे पुस्तक प्रत्येक मराठी माणसाने वाचलेच पाहिजे असे आहे. (आणि त्याचा जास्तीत जास्त भारतीय आणि जगातील भाषांमध्ये अनुवाद व्हायला पाहिजे इतके ते मौलिक आहे.) ‘मी नास्तिक आहे.. तरीही मी अश्रद्ध नाही. माझी विठ्ठलावर आणि वारकरी संतांवर अपार श्रद्धा आहे. मी त्यांचा आणि केवळ त्यांचाच अनन्य भक्त आहे.. यात काडीमात्र विसंगती नाही. तुकाराम महाराजही माझ्यासारखेच नास्तिक होते,’ अशा अनोख्या, आधुनिक दृष्टीने पाहताना जगातील सर्व धर्मात आणि हिंदू धर्मातील सर्व पंथांत संतांचा वारकरी संप्रदाय हा सर्वश्रेष्ठ धर्म आहे. हा अध्यात्म मार्गी असून संपूर्णपणे इहवादी आहे आणि भक्तीमार्गी असूनही निरीश्वरवादी आहे, बुद्धिवादी व अद्ययावत आहे, असे प्रतिपादन धोंड करतात.
विठ्ठल हे संतांनी व मराठी लोकांनी घडवलेले दैवत कसे आहे आणि त्याच्या कथांमध्ये  (विश्व विश्वंभर, हरिहरा नाही भेद, कर्मी ईशु भजावा, जाती अप्रमाण, दया तेथे धर्मु ही) भागवत धर्माची तत्त्वे कशी अनुस्यूत आहेत याचे मार्मिक विवेचन त्यांनी केले आहे. संतकवींच्या अभंगवाणीच्या संदर्भात धोंड म्हणतात, ‘सर्व संतांच्या सहकार्याने साडेतीन शतके, अठरा पिढय़ा, अखंड चाललेला आणि सांगसंपन्न झालेला हा वाग्यज्ञ जागतिक सृष्टीत केवळ अभूतपूर्वच नव्हे; आजवर एकमेवही!’
वारकरी परंपरा व वाङ्मय या संदर्भात धोंड यांनी सातत्याने केलेले विश्लेषण एकंदर सांस्कृतिक संचिताकडे पाहण्याची (पुनरुज्जीवनवाद वा तुच्छतावाद ही टोके टाळून) आधुनिक, चिकित्सक मर्मदृष्टी देणारे आहे यात शंका नाही.  
मध्ययुगीन वाङ्मयाबरोबर, आधुनिक साहित्याच्या संदर्भातील धोंड यांचे समीक्षालेखनही वैशिष्टय़पूर्ण आहे. राम गणेश गडकरी यांच्या नाटय़वाङ्मयाविषयी आपल्याला काही नवे, वेगळे सांगायचे आहे हे जाणवल्यावर त्यांच्या जन्मशताब्दीच्या सोहळ्यात आपणही सहभागी व्हावे या उद्देशाने कोणीही न सांगता-मागता, केवळ आंतरिक उमाळ्यानेच जे लेख लिहिले ते, ‘चंद्र चवथिचा’मध्ये एकत्रित केले आहेत. गडकऱ्यांच्या नाटय़प्रतिभेचा व नाटय़दृष्टीचा विकास कसा होत गेला याचा वेध मार्मिक रसिकवृत्तीने घेतला आहे. इतकेच नव्हे तर गडकऱ्यांना अधिक आयुष्य व पुरेसे स्वास्थ लाभते तर त्यांनी ब्रेख्टचे ‘एपिक थिएटर’ व आयनेस्कोचे ‘निर्थनाटय़’ यासारखे एखादे स्वतंत्र प्रवर्तन मराठी रंगभूमीवर घडवून आणले असते असा अंदाज वर्तवला आहे.
‘जाळ्यातील चंद्र’ (महाराष्ट्र फाउंडेशन पुरस्कारप्राप्त) या समीक्षालेखसंग्रहात, ‘स्वामी ’ (रणजीत देसाई), ‘पोत’ (द. ग. गोडसे), ‘नाच गं घुमा’ (माधवी देसाई), ‘आनंदी गोपाळ’ व ‘रघुनाथाची बखर’ (श्री. ज. जोशी) आणि ‘सखाराम बाइंडर’ (विजय तेंडुलकर) या पुस्तकांवरील लेखांत त्यांच्यातील गुणदोषांचे मार्मिक विवेचन आहे. एक शोकांतिका म्हणून ‘सखाराम बाइंडर’ या नाटकाचे केलेले विश्लेषण विचारप्रवर्तक आहे. कादंबरी-विवेचनात चरित्र, कादंबरी व चरित्रात्मक कादंबरी, कादंबरीची भाषा या संदर्भात प्रश्न उपस्थित केले आहेत.
मर्ढेकरांच्या कवितांचा विचार करण्यास धोंड प्रवृत्त झाले ते त्यातील दुबरेधतेमुळे. त्यातून ‘तरीहि येतो वास फुलांना’ हे पुस्तक सिद्ध झाले. मर्ढेकरांच्या काही महत्त्वाच्या व चर्चाविषय झालेल्या कविता, त्यातील प्रतिमा यांचे नवे आकलन मर्ढेकरांचा काळ व सार्वजनिक परिस्थिती आणि त्यांचे चरित्र, यांच्या संदर्भात मांडले आहे. धोंड यांची चिकित्सक वृत्ती, कुशाग्र बुद्धी, एकेका शब्दासाठी वा तपशिलाच्या उलगडय़ासाठी परिश्रम घेण्याचा स्वभाव यांचा प्रत्यय येथे येतो. या पुस्तकातील अर्थनिर्णयनाची दिशा वा आकलन याबाबत काही प्रश्न निर्माण होऊ शकतात. पण धोंड यांची तीक्ष्ण जिज्ञासा व चिरतरुण संवेदनशीलता मात्र विस्मित करणारी आहे. अरुण साधू यांनी एका लेखात म्हटले आहे ‘कवीची आणि समीक्षकाची सर्जनशीलता येथे तोडीस तोड आहे.’
रसिकता, मिस्किलपणा, धारदार उपरोध, परखडपणा, खंडनमंडनाची आवड, विद्वत्ता, बहुश्रुतता, व्यासंग, चिकित्सक व चिंतनशील प्रवृत्ती व छांदिष्टपणा हे धोंड यांच्या व्यक्तिमत्त्वाचे विशेष त्यांच्या लेखनात पारदर्शकपणे प्रतिबिंबित होतात. या साऱ्यांच्या रसायनातून सिद्ध होणाऱ्या एका प्रगल्भ व बहुरंगी व्यक्तिमत्त्वाच्या सहवासात असण्याचा आनंद रसिकाला मिळत राहतो. सुबोध, रसाळ भाषाशैली हे त्यांच्या लेखनाचे एक महत्त्वाचे वैशिष्टय़.
साहित्याबरोबर संगीतातही धोंडांना रुची होती, त्याची जाण होती. ‘प्रबंध, धृपद आणि ख्याल’ ही त्यांची पुस्तिका त्याची साक्ष आहे. ज्ञानेश्वरी संशोधनातून वृक्षप्रेमाचीही देणगी त्यांना मिळाली. संशोधन, संहिताचिकित्सा, ज्ञानेश्वरीचे मुद्रण, वाङ्मयकोश या संदर्भात नवी दिशा देण्याची त्यांची कामगिरीही महत्त्वाची आहे.
वयाच्या ९३ व्या वर्षांपर्यंत धोंड यांना सतत नवे काही सुचत होते ही गोष्ट विलक्षण म्हटली पाहिजे. शेवटच्या काळात तुकाराम आणि मर्ढेकर यांच्यावर दिवाळी अंकांसाठी ते सातत्याने लिहीत होते. (त्यांचे मौलिक असे अप्रकाशित लेखनही जन्मशताब्दीच्या निमित्ताने प्रकाशित व्हायला हवे.)
श्री. पु. भागवत यांनी लिहिले आहे, ‘एखादी चांगली कथा किंवा कविता वाचायला मिळाली म्हणजे जशी थरारी अनुभवायला मिळे, तशी (धोंड यांच्या योगदुर्ग आणि योगसंग्राम या ज्ञानेश्वरीतील रूपकांचा कसून शोध घेणाऱ्या) अशा समीक्षालेखांच्या वाचनाने लाभे.’ य. दि. फडके यांनी धोंड यांच्या समीक्षेचा गौरवपूर्ण उल्लेख असा केला आहे- ‘धोंड यांचे समीक्षालेखन वाचकाला नवी दिशा दाखवीत आहे आणि दुबरेध वाटणारी कविताही मार्मिकपणे उकलून दाखवीत आहे.. म. वा. धोंड यांच्यासारखा मर्मग्राही समीक्षक वाचकांचा वाटाडय़ा होतो..’
ज्ञानदेव-तुकारामांचे स्थान जसे अढळ आहे, तसेच त्यांच्याशी दृढ, उत्कट नाते जडलेल्या म. वा. धोंड या सर्जनशील वाटाडय़ाचेही!    

मराठीतील सर्व लेख ( Lekha ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Creative critic madhukar vasudev dhond

Next Story
गोंधळ