वाढदिवसाचा आनंद इतरांशी वाटून घेण्यासोबतच त्या दिवशी काहीतरी विधायक काम हातून घडावे अशी प्रत्येकाची इच्छा असते. त्यासाठी वाढदिवस साजरा करण्याच्या निरनिराळ्या कल्पक पद्धती आजवर शोधल्या गेल्या आहेत. एकनाथ कुंभार यांचे ‘वाढदिवसाचे झाड’ हे पुस्तकही एक निराळी आणि पर्यावरणस्नेही कल्पना सुचवणारे आहे. ती म्हणजे, वाढदिवशी झाड लावून तो साजरा करणे. परंतु कुंभार यांनी त्याला जन्मनक्षत्रांचा आधार दिला आहे. आपल्या वाढदिवशी जन्मनक्षत्रांशी संबंधित आराध्यवृक्ष लावण्याची ही कल्पना आहे. आपला जन्म ज्या क्षणी झाला त्या क्षणी आकाशात चंद्र ज्या नक्षत्राबरोबर असेल ते आपले जन्मनक्षत्र. अशी एकूण २७ नक्षत्रे आहेत. ते नक्षत्र रात्री आकाशात दिसते कसे, ते ओळखायचे कसे, त्याबद्दल ग्रीक व हिंदू पुराणांत काय सांगितले आहे, त्या नक्षत्राची देवता कोणती, आदी प्रश्नांची उत्तरे या पुस्तकात मिळतातच; सोबत त्या- त्या नक्षत्रावर जन्मलेल्या व्यक्तीचा स्वभाव व संभाव्य व्याधींविषयीची माहितीही दिली आहे. या व्यांधींवर उपयुक्त ठरू शकतील अशा वृक्षाचे रोपण वाढदिवशी करण्याविषयी पुस्तकात सुचवण्यात आले आहे. उदा. मृगशीर्ष नक्षत्रावर जन्मलेल्या व्यक्तींना घशाचा त्रास होऊ शकतो. या नक्षत्राचे झाड आहे- खैर. खैरापासून मिळणाऱ्या काताचा उपयोग घशाशी निगडित व्याधींवर होऊ शकतो. तारकासमूह व खगोलशास्त्राविषयीची माहितीही पुस्तकात वाचायला मिळते.

वाढदिवसाचे झाड’- एकनाथ कुंभार, मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊस,

पृष्ठे- १०४, मूल्य- ४८० रुपये.