माझ्या आठवणीतले हे तीन रिक्षाप्रवास (हे अजिबात काल्पनिक नाहीत. देवाशपथ खरं सांगतोय, खोटं सांगत नाही.) :

१) शहर पुणे. काळ अलीकडचाच. मी प्रभात रोडहून कोथरूडच्या यशवंतराव नाटय़संकुलाला जाण्यासाठी रिक्षा पकडतो. त्यात मध्ये एक फोन येतो. ज्यावरून रिक्षावाल्या काकांना कळतं की माझ्या नाटकाचा प्रयोग आहे. मी फोन ठेवतो. थोडा पॉज गेल्यानंतर काकांची बॉलिंग सुरू होते.

रिक्षावाला १ : केवढे मिळतात?

मी : काय?

रिक्षावाला १ : नाटक करणारं नव्हं तुमी? एका बारीचे केवढे मिळतात?

मी : ते काय.. नाटकानाटकावर अवलंबून आहे.

रिक्षावाला १ : पाचशेचा गांधी तरी दिसतो का?

मी : पाचशे काय.. हजारांचे काही गांधी दिसतात.

रिक्षावाला १ : आस्सं!!!

(ही एवढी उद्गारवाचक चिन्हं, काकांच्या पुढच्या पानाच्या पिंकेतून जस्टीफाय होतात.)

रिक्षावाला १ : हेच करता का नोकरीबी है?

मी : हेच.

रिक्षावाला १ : शिनेमात पन का?

मी : तुम्ही झेंडा पाहिला नाहीये का?.. मोरया?

रिक्षावाला १ : त्ये काय आसतं?

मी : सिनेमे आहेत.. गाजलेले.

रिक्षावाला १ : शोलेनंतर आपुण शिनेमाच पायला नाय!

मी : काय? अहो कसं शक्य आहे?

रिक्षावाला १ : रिक्षाच्यान! शेवटला शिनेमा शोले. त्यानंतर बंद.

मी : पण का? म्हणजे तुम्हाला वाटत नाही आपण..

रिक्षावाला १ : टाइम फुकट जातो. तेवढय़ाच वेळात रिक्षा चालवली तर दोन-तीनशेचा गल्ला जमतो.

मी : पण तुम्हाला सिनेमा बघावासाच वाटत नाही?

रिक्षावाला १ : न बघून काय बी अडलं न्हाई.

(एव्हाना माझा पुरता पराभव झालेला. मी रुमालाच्या बहाण्यानं पांढरं निशाण फडकवतो.)

२) शहर मुंबई. काळ २००६-०७ चा. मनसेचं खळखट्टय़ाक जोरावर असतानाचा काळ. मी अंधेरी पूर्व ते अंधेरी पश्चिम हा जगातला सगळ्यात खडतर प्रवास करतो आहे. अर्थातच रिक्षातून. रिक्षावाल्याला माझी र्अजसी आधीच सांगितलेली असल्यामुळे तोही मिळेल त्या सांदीकपारीतून वाहन हाकतो आहे. अशातच तो एका ‘बघतोस काय.. मुजरा कर!’ लिहिलेल्या एका बाइकवाल्याचा रोष ओढवून घेतो. बाइकवाला शिवी हासडतो, ‘ए भैय्या, ७७७७’ भैय्याही तितक्याच अस्खलित मराठीत शिव्या घालतो, ‘तुझ्या ७७७ ७७’. ते ऐकून मला जरा आश्चर्य! तो भैय्या आहे, यात शंकाच नाही. त्याच्या डोक्यावर थापलेल्या चमेलीच्या तेलाचा वास आसमंतात घुमलेला. भैय्या महाशय थोडे शांत झाल्यावर मी विचारतो.

मी : आपको मराठी गाली आती है?

रिक्षावाला २ : बंबई में रहना है तो वो तो आनीही चाहिये.

मी : बंबई नहीं मुंबई. बंबई बोलोगे तो हमारे राजसाहब नाराज हो जाएंगे.

रिक्षावाला २ : कौन राजसाहब?

मी : राजसाहब! राज ठाकरे!

रिक्षावाला २ : ऊ कौन है?

(आश्चर्याच्या धक्क्यानं मी फक्त रिक्षातून खाली पडायचो बाकी राहतो.)

मी : आपको राज ठाकरे नहीं पता?

रिक्षावाला २ : ठाऽऽकरे, तो वो हैं नॅ.. अपने.. बालासाहब!

मी : आप अखबार नहीं पढते क्या?

रिक्षावाला २ : नहीं भैय्या! टाइम कहां मिलता है?

मी : लेकिन आजूबाजू में जो चलता है.. वो मालूम तो पडता होगा ना आपको?

रिक्षावाला २ : हमको अंधेरी से लेकर मानखुर्द तक हर रस्ता, हर गली मालूम है साहब, बाकी कुछ नहीं मालूम. और जानकरभी का करेंगे?

मी : आप कुछ पढतेवढते हो ही नहीं?

रिक्षावाला २ : रिक्षा का कार्ड पढतें हैं. और गाँव से भाई का चिठ्ठी आता है.. ऊ पढतें हैं!

(मी जगातलं आठवं आश्चर्य गवसल्याच्या आनंदात.)

३) शहर पुणे. साल २००७. आपण पहिलावहिला टी-ट्वेंटी विश्वचषक जिंकलो तो दिवस.

‘सनई चौघडे’ सिनेमाचं शूटिंग. सुदैवानं

भारत-पाकिस्तान फायनलच्या दिवशी माझं लवकर पॅकअप. प्रॉडक्शनच्या गाडीची वाट न

पाहता मी लोकेशनहून हॉटेलवर जायला रिक्षा पकडतो. हेतू इतकाच की शेवटच्या पाच ओव्हर तरी बघता याव्यात. पण.. रिक्षावाले काका रिक्षाचा स्पीड तीसच्या वर वाढवायला तयार नाहीत. पुण्यातली पेंगुळलेली दुपार ज्या संथ गतीनं सरकते त्याच संथ गतीनं आमची रिक्षा निघते. शेवटी मी अस्वस्थ..

मी : मामा जरा भराभर चला की.

रिक्षावाला ३ : गाडी गाठायचीय का?

मी : अहो नाही. पण प्लीज जरा.. लवकर..

रिक्षावाला ३ : मला जमणार नाही. हवं तर तुम्ही रिक्षा बदला.

(कोंढव्याच्या त्या ओसाड रस्त्यावरून भयभीत नजर फिरवत.)

मी : अहो, इथे कुठे मिळणार दुसरी रिक्षा?

(काहीही न बोलता ज्ञानोबाच्या भिंतीसारखी रिक्षा चालवत राहतात.)

मी : अहो, टी-ट्वेंटीची फायनल सुरू आहे. निदान शेवटच्या दोन ओव्हर तरी बघायला मिळतील.

रिक्षावाला ३ : माझ्याशी बोलताय?

मी : मग आता आणखी कोणाशी? टी-ट्वेंटीची फायनल..

रिक्षावाला ३ : (घाबरून) टिकट्वेंटी कशाला हवाय तुम्हाला?

मी : अहो, टी-ट्वेंटी.. ट्वेंटी-ट्वेंटी वर्ल्ड कप! सुरू आहे ना सध्या..

रिक्षावाला ३ : वर्ल्ड कप! म्हणजे क्रिकेट?

मी : बघत नाही का तुम्ही?

रिक्षावाला ३ : कळत नाही.

मी : कळायचंय काय त्यात? सोपं तर असतं..

रिक्षावाला ३ : इतकं सोपं असतं तर ती टायवाली माणसं गंभीरपणे चर्चा कसली करतात?

मी : म्हणजे तुम्ही क्रिकेट बघतच नाही? तुम्हाला सचिन तेंडुलकर माहीत नाही?

रिक्षावाला : नाव ऐकलंय.. आपल्या पुण्याचा आहे का?

(इथे मी मानसिकरित्या झीट येऊन पडतो. भारत कप जिंकल्यानंतर अख्खा देश विजय साजरा करत असतानाही मी या शॉकमधून बाहेर येत नाही.)

ज्याला सगळ्यात जास्त माहिती तो सगळ्यात जास्त श्रीमंत असं म्हणतात हल्ली. त्यात क्रिकेट, राजकारण आणि सिनेमा हे आपले खास जिव्हाळ्याचे विषय. पण या तीन विषयांतलं काहीच माहीत नसूनही अत्यंत समृद्ध, सुखी आणि शांत जीवन जगणाऱ्या या तिघांचा मला प्रचंड हेवा वाटतो!

चिन्मय मांडलेकर naquarian2279@gmail.com