scorecardresearch

गणपती ते छत्रपती

रायगड जिल्ह्य़ातील सासवण्यासारख्या लहानशा गावात बालपणी घरात गणपतीच्या मूर्ती साकारत पुढे जागतिक कीर्तीचे शिल्पकार बनलेल्या विनायक करमरकर यांचा विलक्षण कलाप्रवास रेखाटणारा लेख..

गणपती ते छत्रपती

रायगड जिल्ह्य़ातील सासवण्यासारख्या लहानशा गावात बालपणी घरात गणपतीच्या मूर्ती साकारत पुढे जागतिक कीर्तीचे शिल्पकार बनलेल्या विनायक करमरकर यांचा विलक्षण कलाप्रवास रेखाटणारा लेख..

विनायक, सासवण्याच्या पांडुरंगपंत करमरकरांचा मुलगा. दहाव्या वर्षांत पदार्पण केलेला. करमरकर कुटुंबाची गुजराण शेतीवाडीवर जेमतेम होत असली तरी गणपतीच्या मूर्ती बनविण्याचा जोडधंदा त्यांना सुखवस्तू ठेवीत होता. दिवाळी संपली की गणेशमूर्ती घडवायच्या आणि सासवण्यातच नाही तर मुंबईतसुद्धा नेऊन विकायच्या हा करमरकरांचा पिढीजात उद्योग. आषाढ महिना सुरू झाला की घरात शाडूच्या मातीचे गठ्ठे येऊन पडायचे. मूर्ती आकार घेऊ लागल्या की, छोटय़ा विनूचे हातही शिवशिवायला लागायचे. मातीतून सर्वात सोप्पं काय होईल तर उंदीर. वडील झोपले की, विनू लगद्यातील माती गुपचूप उचलून, अंगणात जाऊन उंदीर बनवू लागत असे. त्याच्या काकांना एकदा हे बिनआकाराचे उंदीर दिसले आणि कोणीतरी मातीची नासाडी करीत आहे असे समजून, त्याचा लगदा करून ते बादलीत टाकून देत. आपले उंदीर गायब झाले म्हणून विनू हळहळत असे. पण ‘ती माती मी वापरली’ असे सांगितले तर चोप बसेल या भीतीपोटी तो गप्प राही. मग विनूने निश्चय केला, आकार नसलेले उंदीर न करता आणखी मोठे प्राणी आकारावेत. हातात वारसाहक्काने आलेली कला उपयोजित होऊ लागली. तो बाहुल्या, बैल, हत्ती असे प्राणी शाडूतून बनवू लागला. त्याच्या बाबांनी एकदा त्यांनी बनविलेली सुंदर बाहुली पाहिली. चेहऱ्यावर नाराजी दाखवून त्यांनी हाक मारली.
विन्या ही चित्रे कोणी बनविली? विनूने घाबरत घाबरतच कबूल केले की, ती त्यानेच बनविली आहेत. पण आता नाही माती नासडणार. वडील हसायला लागले. म्हणाले, ‘विन्या, अरे ही नासाडी नाही. छानच बनविली आहेस तू चित्रे मातीतून’ या बोलण्याने विनू सुखावला.
‘पण असली निरुपयोगी चित्रे बनविण्यास वेळ न घालवता मला गणपती करण्यास मदत कर ना विनू.’ वडिलांचे बोलणे ऐकून दैव मागते एक आणि देव देतो दोन अशी विनूची अवस्था झाली.
‘म्हणजे मी गणपतीच्या खोलीत जाऊ? करू सुरू गणपती करायला? छोटे गणपती तरी?’ चाचरतच विनूने विचारले.
‘होऽऽ कर की. हो त्या कलेत पारंगत. तुला यातच उपजीविका करायची आहे. गावातल्या गावातच कुटुंबपोषण छान करशील की’. वडिलांची अनुमती आणि आशीर्वाद हा विनायकाच्या पुढील मान्यवर शिल्पकाराच्या घडविण्यास फळाला आला.
विनूला मागूनही मिळणार नाही अशी सुवर्णसंधी आली. गणपतीचे मोठ्ठे पोट, त्याची सोंड, मोठ्ठे कान, झोकात घातलेली मांडी ही मूर्तीची सर्व अंगे त्याने वडिलांकडून शिकून घेतली. सुबक अशा गणपतीच्या छोटय़ा मूर्ती साकारल्यानंतर तो त्यावरील रंगकामही शिकला. आपल्या स्वत:च्या मूर्तीबरोबर तो वडिलांच्या मूर्तीही छान रंगवू लागला. गणेशमूर्तीचा मोसम संपला की, तो खडूने आणि कोळशाने चित्रे काढू लागला. त्याला देवादिकांच्या छोटय़ा मूर्ती बनविण्याचा नाद लागला. सासवण्यातील एका श्रीमंत वाण्याच्या घरी गौरीच्या दोन्ही बाजूला, आपल्या या मूर्ती वडिलांच्या सांगण्यावरून त्याने नेऊन ठेवल्या. वाण्याने त्या पाहताच तो अचंबित झाला. बाहेर येऊन अंगणात खेळत असलेल्या मुलांना त्याने विचारले, ‘कोणी केल्या रे या मूर्ती?’ विनूने भीतभीतच सांगितले की, त्या मीच केल्या आहेत.
‘छान घडविल्या आहेस की मूर्ती. गौरीला शोभा आली,’ अशी शाबासकी देऊन तिजोरीकडे जाऊन एका ताटातून पैशांची खूपशी नाणी भरून ते ताट त्याने विनूपुढे धरले.
‘विनू, बाळा हे काय आहे?’ ‘पैशांचा खुर्दा’ विनूचे उत्तर. ‘आता असे कर, तुझे दोन्ही हात यात बुडव आणि ओंजळीत भरतील इतकी नाणी उचल. ते मी तुला दिलेले बक्षीस असेल.’ खूश झालेल्या विनूने बचकाभर खुर्दा उचलला आणि तो धावत घरी वडिलांसमोर उभा ठाकला. ‘ही माझी मूर्तीतून झालेली पहिली कमाई’ असे सांगून तो वडिलांच्या प्रतिक्रियेची वाट पाहू लागला. वडिलांनी शाबासकी दिली आणि ‘आता मला तुझ्या मोठेपणीच्या उपजीविकेची काळजी मिटली,’ असे समाधानाचे उद्गार काढले.
उपजीविकाच काय, पुढील आयुष्यात या कलेतून त्याने कमाविलेल्या लाखो रुपयांची ही नांदी ठरली. तो वडिलांबरोबर छोटय़ा गणेशमूर्ती घेऊन मुंबईला जाऊ लागला. करमरकरांच्या वर्षांनुवर्षांची गिऱ्हाइके त्या आपल्या मुलांसाठी घेऊ लागले. प्रभू जातीचे गर्भश्रीमंत मुंबईकर, त्याला १०-१० रुपये देत असत. चड्डीच्या खिशात भरलेल्या शंभर रुपयांची नाणी खुळखुळत विनू सासवण्याला परतत असे, तेव्हा हा पराक्रम घरच्यांना आणि मित्रांना केव्हा एकदा सांगतो, असे त्याला व्हायचे.
सासवण्याचे गावकरी एकदा काही कामासाठी करमरकरांच्या घरी आले असता त्यांनी त्यांच्या घरातील एका भिंतीवर काढलेली देवादिकांची सुंदर चित्रे पाहिली. ‘तुमचा विनू आता उत्तम चित्रकार झाला,’ असे गौरवपूर्ण उद्गार त्यांनी करमरकरांकडे काढले आणि विनूकडे वळून ते म्हणाले, ‘अरे विनू, घरातल्या भिंतीवर काढलेली चित्रे कोण पाहणार? तू गावातील देऊळ आहे ना, त्याच्या भिंतीवर का नाही रेखाटत अशी चित्रे?’ विनू अगदी मोहरून गेला.
‘काढतो की, उद्यापासून लागू चित्रे काढायला?’ विनूला अनुमती मिळाल्यावर विनूची चित्रकला मंदिराच्या भिंतीवर बहरू लागली आणि त्यातूनच त्याच्या भविष्यात महान शिल्पकार होण्याची मुहूर्तमेढ रोवली गेली. कुलाबा जिल्ह्य़ाचे (आता रायगड) कलेक्टर तपासणीसाठी सासवण्याला आले असता त्यांनी विनूने काढलेले अश्वारूढ शिवाजी महाराजांचे चित्र पाहिले. कलेची कदर करणारा एक ब्रिटिश खूश झाला नसता तर नवल. त्यांनी चित्रकाराला बोलावले. विनू कापतच गोऱ्या साहेबासमोर आला. कलेक्टर साहेबाने कौतुकाची थाप त्याच्या पाठीवर मारली आणि त्याने विनूला चित्र-शिल्पकलेचे शास्त्रीय शिक्षण मुंबईला घेण्याचा सल्ला दिला. ‘तुझ्या चेहऱ्यावरून समजतंय. हे खर्चीक शिक्षण कसे जमणार? त्याची काळजी करू नकोस. तुझ्या शिक्षणाचा सर्व खर्च मी करीन,’ असे आश्वासन त्यांनी विनू आणि वडिलांना दिले. विनूला आकाश ठेंगणे झाले.
त्याने मुंबईच्या जे. जे. स्कूल ऑफ आर्ट या संस्थेत शिल्प आणि चित्रकला याचे पद्धतशीर शिक्षण पूर्ण केले. त्याला मूर्ती-पुतळे बनविण्याची छोटी-मोठी कामेही मिळू लागली. त्याची घोडदौड पाहत शासनाने त्याला परदेशी शिक्षणासाठीही पाठवले. तिथून परतल्यानंतर बाहुल्या आणि गणपतीच्या मूर्ती घडवून शिल्पकलेचा प्रारंभ केलेल्या विनायकाने, पुण्यात उभा करण्यासाठी शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा साकारला. महाराष्ट्रातील पहिला छत्रपती पुतळा प्रचंड नावाजला गेला आणि विनायकराव करमरकर भारतातील विख्यात शिल्पकार म्हणून गणले गेले. असा होता जिद्दी विनूचा कलाप्रवास; बाहुली, गणपती ते छत्रपती हा.
 

मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 08-09-2013 at 12:11 IST

संबंधित बातम्या