अविनाश उषा वसंत
मुंबईतील जगण्याचे तीन पदर आहेत. पहिला टॉवरमध्ये जगणारा श्रीमंतांचा. दुसरा अगदीच झोपडपट्टीतील अधोविश्वात राहणारा. याच्या मधला वर्ग आहे, तो चाळीत राहणारा. हे आजवर मराठी समीक्षकांना सापडले नाही. त्यामुळे मुंबईतील लेखकांना ते एकाच ‘महानगरी संवेदनेचा’ असे घाऊक संबोधतात.
माझी वाढ गिरणगावात झाली. कुठल्याही समीक्षकाने गिरणगावाची नीटशी ओळखदेखील केली नाही. गेल्या दीडशे वर्षांतील महाराष्ट्रातील कुठल्याही राजकीय अथवा सांस्कृतिक घटनेचे मूळ कुठेना कुठेतरी गिरणगावामध्ये आहे. भारतीय अर्थकारणालाही दिशा ही मिलकामगारांनी आणि इथल्या वातावरणाने दिली. आज इथल्या मुलांचे प्रश्न काय आहेत? भवतालाच्या बदलात अनेक सुस्थित तरुणांची लग्न केवळ ‘कॉमन संडास’ या गोष्टीमुळे अडलेली आहेत.
गिरणगावाची देशातील विविध भागांतून आलेल्या लोकांमुळे स्वत:ची खास भाषा तयार झाली, त्याचे नवीन व्याकरण केले. ही गोष्ट नव्यांतील लेखकांनी देखील साहित्यातून मांडली नाही. गिरणगाव लालबाग-परळमध्ये वेगळा सापडतो. नायगाव-घोडपदेव-माजगावमध्ये वेगळा सापडतो. वरळीमध्ये आणखी भिन्न दिसतो. आता नवी शहरे तयार होतायत. त्यात पाचवी मुंबईदेखील तयार होऊ शकते. तर गिरणगावसारख्या वसविल्या जाणाऱ्या शहरांतून वेगवेगळ्या संवेदना तयार होतील आणि साहित्यातून व्यक्त होतील.
सध्या गिरणगावातील लोकांचे विखंडित जगणे मला माझ्या लिखाणातून मांडायचे होते. त्यामुळे ‘पटेली’ ही कादंबरी लिहून झाली. लेखकाने एखाद्या गोष्टीबाबत भूमिका घेणे म्हणजे फेसबुकवर चार शब्द खरडणे किंवा आपली ओळख असेल त्या पेपरात लेख लिहिणे इथपर्यंतच उरत नाही. पर्यावरण हे भविष्यात राहणार आहे का? तर त्याविषयी आज प्रत्यक्ष उतरून लढणे गरजेचे आहे.
पर्यावरण हा लेखकाच्या जाणीवेचा गाभा आहे. उद्या तोच नष्ट होणार असेल, तर त्याला काँक्रिटवरच लिहावे लागेल.
