‘श्रीमंत’ राजकीय वारसा असूनही पृथ्वीराज चव्हाण यांच्या वडिलांचा ना एखादा साखर कारखाना होता ना प्रेमलाकाकींचा ना त्यांचा स्वत:चा तो आहे. खरं तर ‘साखरसम्राट’ होण्यासाठी सर्व आवश्यक घटक त्यांच्याकडे होते. पश्चिम महाराष्ट्रात मूळ, जन्माचं कूळ खानदानी की काय म्हणतात ते मराठा, आई-वडील दीर्घकाल राजकारणात, वडील तर केंद्रात बराच काळ मंत्री, रुबाबदार व्यक्तिमत्त्व. असं सगळं असूनही मागे ना साखर कारखाना ना एखादी बँक ना दूध संघ… अगदी राज्यात अगदी सर्वोच्च पदाची ऑफर असूनही ते स्थानभ्रष्ट झाले नाहीत…

पत्रकारितेच्या प्रवासात फारच थोडे राजकारणी असे भेटले/ भेटतात की ज्यांच्याकडे आपण काही शिकावं असा ऐवज असतो. दोस्ताना अनेकांशी होतो, मैत्र जुळतं, बातमी-उपयुक्तता या पलीकडे संबंध जातात, पण हे सगळे काही शिकवणारे असतातच असं नाही. असं ज्यांच्याकडून काही शिकावं अशातला एक राजकारणी म्हणजे पृथ्वीराज चव्हाण. जवळपास २५-३० वर्षं तरी- कदाचित जास्तच; पण कमी नाही- त्यांचा प्रवास, संघर्ष जवळनं बघतोय.

सुरुवात अगदी चर्चगेटच्या ‘सम्राट’मध्ये एक थाळी शेअर करण्यापासूनची आहे. ते खासदार होते. दिल्लीहून ‘राजधानी एक्स्प्रेस’नं मुंबईला यायचे. सकाळी ११-१२ च्या आसपास आम्ही चर्चगेटला साध्या रेस्तरॉमध्ये भेटायचो. ते तिथून मग कराडकडे रवाना व्हायचे. कधी उलट प्रवास. रात्री कराडहून ते ‘महालक्ष्मी’नं मुंबईत येणार, आम्ही सकाळी भेटणार नि मग ते दिल्लीकडे. लोकसभा अधिवेशन असलं तर जवळपास प्रत्येक आठवड्यात अशा भेटी घडायच्या. कारण दर आठवड्याच्या अखेरीस ते कराडला परतायचे. दिल्ली-कराड विमान सेवा नव्हती आणि नाहीही अजून. आणि साध्या आमदार-खासदारांच्या दिमतीला ‘चार्टर्ड’ विमानं, हेलिकॉप्टर्स असायचा काळ अजून यायचा होता. पण गंमत अशी की, तो काळ आल्यानंतरही पृथ्वीराज आनंदराव चव्हाण यांना अजूनही ‘महालक्ष्मी’चाच आधार आहे. त्यातल्या त्यात बदल झालाय तो दिल्ली-मुंबई प्रवासात. तो आता विमानानं होतो.

तर या गप्पांत राजकारण तर असायचंच. पण शिक्षण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, तंत्रज्ञान, संगणक इथपासनं ते अगदी कौटुंबिक चर्चाही असायची. वडील आनंदराव हे इंदौर संस्थानचे दिवाण. त्यामुळे पृथ्वीराज यांचा जन्म इंदौरातला. वडील नंतर राजकारणात आले. ते अगदी थेट पं. जवाहरलाल नेहरू, लाल बहादूर शास्त्री, इंदिरा गांधी अशांच्या मंत्रिमंडळात होते. त्यांच्या आठवणी… ते गेल्यानंतर आई प्रेमलाकाकींनी तो वारसा चालवला. साक्षात ‘बाईं’च्या जवळच्या असा त्यांचा लौकिक आणि जरब होती. त्या गेल्यानंतर कराड पृथ्वीराज चव्हाणांकडे आलं. पण इतका ‘श्रीमंत’ राजकीय वारसा असूनही चव्हाण यांच्या वडिलांचा ना एखादा साखर कारखाना होता ना प्रेमलाकाकींचा ना त्यांचा स्वत:चा तो आहे. खरं तर ‘साखरसम्राट’ होण्यासाठी सर्व आवश्यक घटक त्यांच्याकडे होते. पश्चिम महाराष्ट्रात मूळ, जन्माचं कूळ खानदानी की काय म्हणतात ते मराठा, आई-वडील दीर्घकाल राजकारणात, वडील तर केंद्रात बराच काळ मंत्री, रुबाबदार व्यक्तिमत्त्व (राज ठाकरे त्यांच्या कोंबडा हेअरस्टाइलची नक्कल करत पृथ्वीराजची तुलना अभिनेते चंद्रकांत-सूर्यकांत यांच्याशी करतात ती शंभर टक्के खरी.) असं सगळं असूनही मागे ना साखर कारखाना ना एखादी बँक ना दूध संघ. हातात ना दोनचार अंगठ्या ना गंडेदोरे. इतका तगडा राजकीय वारसा असूनही पृथ्वीराजनी शिक्षणात हयगय करू नये याबाबत आईवडील आग्रही होते; हे फार महत्त्वाचं. नाहीतर ‘‘आमच्या घराण्यात…’’ असं म्हणत मिशीवर फुका आव मानणारे भरपूर आहेतच आसपास. असो. आईवडिलांचा शिक्षणाचा आग्रह मोडणं पृथ्वीराजना फार काही जड गेलं नाही. कारण शिक्षण, अभ्यास वगैरेंची त्यांना मुळातच आवड. त्यांचा टापटिपीचा स्वभाव, वागणं पाहिलं तर खात्री पटते शाळेतही ते मॉनिटर असतील वर्गाचे. अक्षर इतकं सुंदर की कॅलिग्राफी वाटावी. सुलेखनाचा छंद आहेच तसा त्यांना. चांगले इंजिनीयर वगैरे झाल्यावर पृथ्वीराज जर्मनीच्या शिष्यवृत्तीवर अमेरिकेत एअरोनॉटिक्स, कॉम्प्युटर सायन्स वगैरे बरंच काय काय शिकले. संरक्षण दलाच्या पाणबुडी प्रकल्पावर ‘डिझाइन इंजिनीयर’ होते. ते अमेरिकेत असताना तिकडे ‘ब्लॅक पँथर’ची चळवळ जोमात होती. आपली ‘दलित पँथर’ त्याच आधारे उभी राहिली. या दोघांतला फरक, साम्यस्थळं पृथ्वीराज सहज उलगडून दाखवतात तेव्हा तो समाजशास्त्राचा वर्ग असतो. कॉम्प्युटर इंजिनीयरिंग, डिफेन्स इक्विपमेंट्स वगैरे अनेक विषयांचे ते असे धडे घेतात. ‘‘हे सगळं सोडून मग राजकारणात कसे काय आलात?’’ या प्रश्नावर त्यांचं उत्तर होतं- राजीव गांधी. इंदिरा गांधींच्या हत्येनंतर राजीव गांधींकडे पक्षाची आणि देशाची सूत्रं आली आणि अनेक तंत्रस्नेही तरुण त्यांच्याकडे आकृष्ट झाले. पृथ्वीराज तर त्यांच्यातलेच होते. घरची काँग्रेस परंपरा. राजीव गांधींनी मग हाक दिली आणि अमेरिका सोडून ते भारतात आले. मागे एकदा ते मुख्यमंत्री असताना पार्ल्यात मॅजेस्टिक गप्पांत मी त्यांची मुलाखत घेतली होती. त्यांनी हा अभ्यासू इतिहास तिथे मी विचारलं म्हणून सांगितला. पोरंबाळं अमेरिकेत स्थिरावल्यामुळे सुनेच्या किंवा लेकीच्या बाळंतपणासाठी (तरी) अमेरिकावारी करायला मिळालेले पार्लेप्रेक्षकांत अनेक होते. अमेरिकेतनं परत भारतात यायचं या विचारानंच अनेकांची पावलं कशी लटपटू लागतात याचा त्यांना घरचाच अनुभव. त्यामुळे पृथ्वीराज चव्हाणांचं चांगलंच अप्रूप वाटलं त्यांना. परत त्या मुलाखतीत इतक्या शुद्ध मराठीत पृथ्वीराजना ऐकताना सगळ्यांच्या चेहऱ्यांचे चंबू बराच काळ तसेच राहिले. शेवटी शेवटी तर तिथे अनेकांना पृथ्वीराज ‘आपल्यापैकीच’ आहेत की काय असं वाटू लागलं असा मला संशय आला त्यावेळी. असो.

नंतर ते मनमोहन सिंग मंत्रिमंडळात मंत्री झाल्यावरही भेटीत खंड पडला नाही. जागा बदलल्या. एव्हाना माझाही समावेश त्यांना ‘बाबा’ म्हणणाऱ्या जवळच्यांत झालेला. सुरुवातीला त्यांच्याकडे पंतप्रधानांचं कार्यालय आणि बरोबरीनं विज्ञान-तंत्रज्ञान खातं होतं. गंमत अशी की, त्यांच्या मतदारसंघातल्या अनेकांना पंतप्रधानपदाच्या कार्यालयाचा मंत्री… ही भानगड काही बराच काळ कळली नाही. हे काय खातं हाय व्हयं… असं त्यावेळी त्यांच्या मतदारसंघातल्या परिचितानं एकदा विचारलं होतं. तो मला सांगत होता, बाबांना सांगा हे खातं सोडायला. त्यावेळी त्यांच्या कानावर मी हे घातलं. तर म्हणाले, ‘‘हो… अनेकांना वाटतं मी बिनखात्याचा मंत्री आहे असं.’’ एखाद्या खात्याचा मंत्री ज्याप्रमाणे मिरवतो तसं पंतप्रधानांच्या खात्याचा मंत्री करू शकत नाही. त्यांच्या कार्यकर्त्यांचा त्यामुळे हिरमोड होत होता. पण त्यावर तेच म्हणाले, ‘‘माझ्याकडे दुसरं कोणतं खातं असतं तरी मी असाचा वागलो असतो आणि कार्यकर्ते आणखी निराश झाले असते.’’ पूर्णपणे खरं होतं त्यांचं. मिरवणं, अधिकार गाजवणं हा काही त्यांचा प्रांत नाही. मनमोहन सिंग यांनी अमेरिकेबरोबरचा अणुकरार हा मुद्दा प्रतिष्ठेचा केला होता. राजकीय सोडा; पण बऱ्याच आंतरराष्ट्रीय अडचणी होत्या त्या कराराला अंमलबजावणीपर्यंत नेण्यात. अमेरिकी नेत्यांशी चर्चा करणं वगैरे. चव्हाण त्यावेळी सिंग यांचे दूत होते. बराक ओबामा यांच्याशी त्यांच्या भारत दौऱ्याच्या आणि सिंग यांच्या अमेरिका भेटीच्या निमित्तानं आणि बुश यांच्याशी अणुकराराच्या निमित्तानं चर्चेत सहभागी असणं हे पृथ्वीराज चव्हाणांचे आनंदानुभव. बुद्धिवंतांचा सहवास आवडणारा हा राजकारणी. केंद्रीय मंत्रिमंडळात असताना मी एकदा मंत्रिमंडळाच्या बैठकांतल्या अनुभवाविषयी विचारलं होतं. त्यावर त्यांनी जे उत्तर दिलं त्यावरून या माणसाची जातकुळी कळते.

‘‘एका बाजूला पी. चिदम्बरम आणि दुसरीकडे प्रणबदा… त्यांची बौद्धिक जुगलबंदी अनुभवणं हे अर्थशास्त्र, प्रशासन, भाषाकौशल्य सहज शिकवणारं… चिदम्बरम यांचं युक्तिवाद मांडणी कौशल्य आणि प्रणबदांचं प्रशासकीय बारकावे दाखवून देण्याचं कौशल्य अतुलनीय… त्यात मनमोहन सिंग मग जागतिक संदर्भ देणार… मी हे सगळं अचंबित होऊन पाहायचो… या चर्चांतनं निर्णय झाला की त्या ठरावाचं ड्राफ्टिंग- इंग्रजी मसुदा करणार प्रणबदा… मग खातं कोणतंही असो. त्यांच्यासारखं ड्राफ्टिंग कौशल्य अन्य कोणा राजकारण्याकडे असेल असं वाटत नाही…’’ असा बौद्धिक चर्चांत आनंद घेणारा राजकारणी कोणत्या कार्यकर्त्यांना आवडेल, हा प्रश्नच. त्यामुळे त्यांच्या मागे ‘‘आगे बढो…’’ असे घोषणा देणारे रिकामटेकडे तरुण नाहीत की वाढदिवसाला वगैरे त्यांच्या फ्लेक्सबाजी दिसत नाही. ते केंद्रीय मंत्रिमंडळात असताना खरं तर त्यांनी एक अत्यंत महत्त्वाची ठरू शकेल अशा निर्णयाची प्रक्रिया सुरू केलेली. ती पूर्ण झाली असती तर आज इतिहास घडला असता…

विषय असा होता- आपली ईशान्येकडची राज्यं आणि अन्य प्रांत यातली वेळ. अरुणाचल, नागालँड वगैरे तिकडच्या राज्यांत पहाटे चार साडेचार वाजताच उजाडतं आणि दुपारी चार साडेचारच्या आसपासच अंधार पडून संध्याकाळ होते. पण तरीही त्यांनी वागायचं भारतातल्या इतर राज्यांसारखं. म्हणजे मुंबईत दहा ते पाच कार्यालयाच्या वेळा असतात तशाच वेळा ईशान्येकडच्या राज्यांतही असतात. पण मुंबईत सकाळी सहा वाजता उजाडतं आणि संध्याकाळी सहानंतर अंधार पडतो. पण ईशान्येत दिवस खूप लवकर उगवतो आणि सूर्य मावळतोही इथल्या मानानं लवकर. तेव्हा ईशान्य भारतासाठी वेगळा ‘टाइम झोन’ का नको? तसा तो असायला हवा, असा विचार पृथ्वीराजनी विज्ञान तंत्रज्ञानमंत्री असताना केला. ‘‘अमेरिकेत पाच टाइम झोन आहेत, आपल्याकडे दोन असायला काय हरकत आहे?’’ त्यांचं म्हणणं. दोन टाइमझोन केले तर वेळ, वीज वाचायला मदत होईल हा त्यामागचा रास्त विचार. उजाडतंय लवकर तर त्या प्रदेशात लवकर कामाचा दिवस सुरू होईल आणि इथल्याप्रमाणे अंधार पडल्यावरही दिवे लावून कार्यालयं, बँका चालवाव्या लागणार नाहीत. तसा प्रस्ताव वगैरे तयार होऊन फाइल हलायला लागली. निर्णय होणार होता, पण टळला. मी त्याची मोठी बातमी त्यावेळी दिली होती ‘इकॉनॉमिक टाइम्स’मध्ये. हेडलाइन होती ती. हा निर्णय झाला असता तर देशात दोन टाइम झोन एव्हाना झाले असते. अर्थात त्यामुळे देशाच्या एकात्मतेला धोका आहे असं समजून एक देश, एक धर्म, एक भाषा असा ‘एकांगी’ विचार करणाऱ्यांनी ‘एक देश, दोन टाइम झोन’ कशाला? असं विचारत विरोध केलाच नसता असं नाही. तो विषय राहिला तो राहिलाच.

मग पृथ्वीराज महाराष्ट्रात आले. ‘आदर्श’फेम अशोक चव्हाण यांना मुख्यमंत्रीपदावरनं पायउतार व्हावं लागल्यानं महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद त्यांच्या हाती सोपवलं गेलं. पृथ्वीराज चव्हाण यांना संगमरवरी मनोऱ्यातनं एकदम असं जमिनीवर यावं लागलं. बुद्धिवंतांची वगैरे संगत संपली आणि एकापेक्षा एक तगड्या राजकारण्यांशी मग दोन हात सुरू झाले. सुरुवातीला जड गेलं त्यांना. त्यावेळी मी ‘दमलेल्या बाबाची कहाणी’ असा एक अग्रलेख लिहिलेला. चिडणार नाहीत ते हे माहीत होतंच. पण त्यापुढे जात काय काय करावं लागेल महाराष्ट्रासाठी याची चर्चा त्यांनी सुरू केली अनेकांशी. काही गोष्टी ठामपणे केल्या त्यांनी. पुढे ‘जलयुक्त शिवार’ म्हणून गाजलेली योजना त्यांची. सध्या कौतुकाचा विषय झालेल्या कोस्टल रोडची कल्पना त्यांची. हा प्रकल्प आणि ईस्टर्न हायवे नावानं ओळखला जाणारा महामार्ग हे ‘टोलमुक्त’ असावेत असा कटाक्ष त्यांचा. आणखी एक गोष्ट. सरकार कोणाचंही असो. मुख्यमंत्र्यांभोवती घोंघावणारी माणसं तीच असतात. बाबा-बापूही येतात सत्तेला लोंबकळायला आणि आपापलं भलं करून घ्यायला. महाराष्ट्रात शरद पवार आणि पृथ्वीराज चव्हाण हे दोनच नेते असे आहेत की ज्यांच्या आसपास कधी एकही बाबा-बापू घुटमळताना दिसला नाही. मुख्यमंत्रीपदावर असताना एकाही फालतू म्हणता येईल अशा व्यक्तीच्या कार्यक्रमाला पृथ्वीराज यांनी हजेरी लावल्याचं उदाहरण शोधू म्हणता सापडणार नाही. त्यांच्या काळात एकही अपात्र अधिकाऱ्याला ‘आयएएस’ची बढती मिळाली नसेल. एकदा ‘लोकसत्ता’च्या कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस अर्थसंकल्पावर बोलणार होते आणि नंतर दुसऱ्या कोणत्या विषयावर मुख्यमंत्री पृथ्वीराज. तर कार्यक्रमाच्या आधी त्यांचा फोन आला, ‘‘मी जरा लवकर येऊ का?’’ मी विचारलं, ‘‘काय झालं?’’ तर म्हणाले, ‘‘नाही देवेंद्र फार अभ्यासपूर्ण बोलतो… मला ऐकायची इच्छा आहे!’’ पृथ्वीराज मुख्यमंत्री असतानाच ‘लोकसत्ता वर्षवेध’चा उपक्रम सुरू झाला. नंतर मुख्यमंत्र्यांच्या हस्ते त्याचं प्रकाशन ही प्रथा पडली. एकदा या कार्यक्रमात दोघेही होते. मावळलेले मुख्यमंत्री पृथ्वीराज आणि नव्यानं उगवलेले देवेंद्र. कार्यक्रमाआधीच्या अनौपचारिक चहापानात गप्पा मारताना आमच्यातला एक म्हणाला देवेंद्रना, ‘‘तुम्ही पृथ्वीराज यांनी सुरू केलेल्या बऱ्याच योजना पुढे रेटताय.’’ त्यावर पृथ्वीराज यांच्याकडे पाहत देवेंद्र हसत म्हणाले, ‘‘हो… पण फरक असा की, माझा पक्ष त्या राबवल्याचं श्रेय मला घेऊ देतो आणि पृथ्वीराज यांचा पक्ष ते करू देत नाही.’’ त्यानंतरच्या हशात खुद्द पृथ्वीराजही सामील झाले.

मुद्दा हसण्यावर गेला तरी फडणवीस म्हणाले ते खरं होतं. भाजपच्या वाढत्या यशामागे त्या पक्ष नेतृत्वाचं कर्तृत्व असलं तरी आपल्याही चुका आहेत हे अमान्य करता येणार नाही… असं मानणारे जे कोणी मूठभर नेते काँग्रेसमध्ये होते/ आहेत त्यातले एक पृथ्वीराज. आपल्याच पक्षाच्या नेतृत्वाला आपण काय सुधारायला हवं हे जाहीर सांगण्याची हिंमत दाखवणाऱ्यातलेही ते एक. पक्ष कोणताही असो. लांगूलचालक, लाळघोटे यांची नेहमीच चलती असते. जमत नसेल ते तर मग बरंच काही सहन करावं लागतं. पृथ्वीराज यांच्यावर ती वेळ आली. पक्षश्रेष्ठींची मर्जी खप्पा झाली त्यांच्यावर. त्यांना दूर ठेवलं जायला लागलं. हीच वेळ असते अशा नेत्यांना आपल्याकडे ओढण्याची. भाजपनं आपलं मोहमायाजाल फेकलं. एका बड्या नेत्यानं तर आमच्याकडे आलात तर मुख्यमंत्री होऊ शकता… अशी ऑफर दिली. ‘‘योग्य माणूस, पण अयोग्य पक्ष’’ असं त्यांना थेट म्हटलं जाऊ लागलं. राज्यात अगदी सर्वोच्च पदाची ऑफर असूनही पृथ्वीराज स्थानभ्रष्ट झाले नाहीत. ‘‘दे दान… सुटे… गिऱ्हान…’’ करत हातातले वाडगे घेऊन दारोदार हिंडणाऱ्या राजकारण्यांची मुबलक पैदास आसपास असताना पृथ्वीराज यांचं हे वेगळेपण फारच कौतुकास्पद. हे कौतुक आणखी एका घटनेसाठी.

विधानसभेच्या २०१९च्या निवडणुकांनंतर भाजप आणि शिवसेनेचं फाटलं. मग शिवसेना- राष्ट्रवादी काँग्रेस- काँग्रेस असा एक आघाडी प्रयोग झाला. खरं तर काँग्रेसनं आता शिवसेनेशी हातमिळवणी करायला हवी, असं जाहीर म्हणणारे ते पहिले. ते प्रत्यक्षात आलं. पण त्याचं काय झालं ते आपण बघतोच आहोत. पण त्यावेळी काँग्रेसच्या कोट्यातनं महत्त्वाची खाती देऊ करूनही पृथ्वीराजनी मंत्रीपद नाकारलं. ‘‘एकदा मुख्यमंत्रीपदी राहिल्यानंतर असं करणं बरं नाही…’’ इतकीच त्यांची त्यावर प्रतिक्रिया. खरं तर उद्धव ठाकरे यांच्या हाताखाली त्यावेळी काम करायला दुसरे काँग्रेसी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना काही तसा कमीपणा वाटला नाही. पण हाच तर फरक आहे…

आता त्यावेळच्या डोळ्यादेखत घडणाऱ्या राजकीय घटना आठवल्या तरी वाटतं पृथ्वीराजनी एका पदाला नाही म्हणायला नको होतं. विधानसभेच्या सभापतीपदासाठी त्यांना विचारणा झाली होती. ते त्यालाही नाही म्हणाले. मग नाना पटोले यांच्याकडे ते पद गेलं. त्यांनी अचानक सभापतीपदाचा राजीनामा दिला… आणि बिनबोभाट दिवसाढवळ्या राजकीय पक्ष फोडले जाऊ लागले. फोडाफोडीच्या उद्याोगांत सभापती फार म्हणजे फारच महत्त्वाचे. ते पद पृथ्वीराजनी स्वीकारलं असतं तर राजकारणाची गटारगंगा उगमापाशीच थांबली असती.

आणि पुढे नंतरच्या निवडणुकीत तर पृथ्वीराज यांचाच पराभव झाला. आततायी, आग्रही, आवेशी, आत्मप्रौढ अशांचा सुळसुळाट असण्याच्या काळात अभ्यासू, अनाग्रहींचं असं फेकलं जाणं अपरिहार्यच असं म्हणायचं!
girish.kuber@expressindia.com