साधारण १९९०-९१ सालच्या आसपासची गोष्ट आहे. केरवाडीला माझा मित्र गरीब मुलांसाठी संस्था चालवत असे. केरवाडी हे गाव परभणी जिल्ह्यातल्या गंगाखेड तालुक्यातलं. त्याच्या कामात मदत करण्यासाठी पुण्याहून माझं नेहमी जाणं होई. जायचं म्हणजे एकच मार्ग होता- पुण्याच्या शिवाजीनगर बस स्थानकावरून रात्री आठ वाजता पुणे-परभणी ही रातराणी पकडणे आणि पहाटे पहाटे गंगाखेडला उतरून माझ्या मित्राची वाट पाहणे. आदल्या दिवशी किंवा त्याच्याही आधी कधीतरी गावात जो एकच फोन होता, त्यावर त्याला निरोप दिलेला असायचा. त्यामुळे तो आला की मग त्याच्या मोटरसायकलवर बसून १६ किलोमीटरवर असलेल्या केरवाडीला पोचायचं, हा आमचा नेहमीचा शिरस्ता होता. यात बदल होण्याची शक्यता नव्हती आणि दुसरा पर्याय नव्हता. कित्येक वर्ष हे असंच चालू होतं आणि कदाचित असंच चालू राहणार होतं.
१९९१ मध्ये आपण जागतिकीकरणाच्या प्रवाहाला जोडले गेलो. देशात नवं आíथक धोरण आलं. मात्र त्याचा परिणाम प्रत्यक्ष दिसायला दोन-पाच र्वष जावी लागली.
१९९४ च्या आसपास पुण्याहून नांदेडला जाणारी खासगी बस सुरू झाली आणि आम्हाला पर्याय मिळाला. त्यानंतर दुसरी, तिसरी अशा कित्येक खासगी बसेस धावू लागल्या. पेजर आले, गेले. मोबाइल आले आणि पुण्याहून केरवाडीला जाण्याची संकल्पनाच बदलली. बदल इतका प्रचंड होता की, केरवाडीला जाण्याची काय एकूण सगळ्या जगण्याचीच संकल्पना बदलू लागली.
हा परिणाम फक्त जागतिकीकरणाचा होता का, हे मात्र नक्की सांगता येत नाही. एकाच वेळी अनेक क्षेत्रात अनेक बदल होत होते. एखादा भोवरा फिरतो तसं समाजातली बरीच अंगं तेव्हाच फिरू लागली. देशाचं आíथक धोरण बदललं, जगाशी आपण जोडले गेलो, त्याच वेळी जगात तंत्रज्ञानामध्येही अफाट बदल होत गेले; मुख्यत: माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात. पॅकेजिंगच्या क्षेत्रात, संगणक क्षेत्रात, जैव तंत्रज्ञानात (इ्र ळीूँल्ल’ॠ८) याच सुमारास मोठे बदल होत गेले. दूरचित्रवाणी वाहिन्यांचा व्यापक प्रसार झाला. घरोघरी, हातोहाती फोन्ससारखं संपर्काचं माध्यम पोचलं. सामान्य माणूसही इंटरनेटचा वापर करू लागला. या सर्वाचाच परिणाम आपल्याला २००० सालाच्या आसपास प्रत्यक्ष दिसायला सुरुवात झाली. बदलाची गती वाढली, विस्तार वाढला. समाजात एकूणच जे साचलेपण आलं होतं ते फुटलं. वाहायला लागलं. देशात सत्तरच्या दशकाच्या सुरुवातीला बँकांचं राष्ट्रीयीकरण झालं, संस्थानं खालसा झाली आणि नंतर आणीबाणी आली. त्यानंतर आलेलं १५ ते २० वर्षांचं हे साचलेपण होतं. जागतिकीकरणाच्या, माहिती तंत्रज्ञानातील बदलांचा आणि घरोघरी जागतिक दूरचित्रवाणी वाहिन्यांनी पोचवलेल्या जगाचा आपल्यावर, आपल्या समाज मनावर चांगलाच परिणाम झाला.
हा भोवरा कसा फिरला आणि त्यानं काय बदल केले हे नेमकं समजायला आपल्याला काही र्वष जावी लागतील हे जरी खरं असलं तरी त्याचे काही परिणाम, काही खुणा आपल्याला आत्ताच दिसू लागल्या आहेत.
सर्वत्र एक प्रकारची स्पर्धा आली. जगातल्या सर्वोत्तमाशी तुलना व्हायला सुरुवात झाली. मला आठवतंय पूर्वी एका वृत्तवाहिनीवर ‘ह१’ िळँ्र२ ही‘’ नावाचा एकच कार्यक्रम लागत असे, जो खूप प्रसिद्ध होता. तसे आता शेकडय़ांनी कार्यक्रम परदेशी वाहिन्यांवर दिसू लागले. त्यातून आपल्या कार्यक्रमांची तिकडच्या कार्यक्रमांशी तुलना सुरू झाली. मापदंड बदलले. चौकट मोडली गेली, विस्तारू लागली. आपल्याला गुणवत्ता सुधारण्याची निकड वाटू लागली. कारण तसं केलं नाहीतर आपला टिकाव लागणार नाही, असं सर्वच क्षेत्रात होऊ लागलं. समाजात स्पर्धा येणं आणि गुणवत्ता लकाकू लागणं ही एक आपल्यात झालेली क्रांतीच होती.
अजून एक झालं. मला निवड करण्याची संधी मिळू लागली. पूर्वी ‘एकच दुकान, तीच बाकरवडी’ अशी परिस्थिती होती. आता तसं राहिलं नाही. बाकरवडीबरोबर मेक्सिकन टॅको किंवा इटालियन पिझ्झा होता. मला निवड करता येऊ लागली. जेव्हा निवड करण्याची संधी येते आणि ती आपण करू शकतो तेव्हा सारासार विचार करण्याची, मला काय आवडतं आणि काय नाही आणि तेही ‘का?’ असा विचार सुरू होतो. असा विचार सुरू होतो तेव्हा प्रगल्भता येऊ शकते. अर्थात येतेच असंही नाही. जेव्हा पर्याय नसतो तेव्हा आपण विचार करण्याची गरज नसते आणि म्हणून प्रगल्भता येत नाही. जागतिकीकरणामुळे हाही बदल माझ्या मनात आणि माझ्या समाजाच्या मनात व्हायला सुरुवात झालेली आहे.
ज्या घरात घुंघट आहे, जिथल्या स्त्रिया डोक्यावरून पदर घेतल्याशिवाय घराबाहेर पडत नाहीत, तिथल्या स्त्रियाही इं८६ं३ूँ पाहू लागल्या. त्यांच्या मनावर काहीच परिणाम होत नसेल? झाला नसेल? महिला संघटनांनी कित्येक र्वष झगडून समाजाला जो संदेश देण्याचा प्रयत्न केला, आणि तो स्तुत्यच होता आणि आहे; तो संदेश कदाचित एकाच मालिकेत वाहिन्यांवर दिला जात असेल. माझ्या समाजाच्या मनावर याचा निश्चितच खोल परिणाम झाला. स्त्री-पुरुष समानतेचा संदेश किंवा स्त्रियांचं आत्मभान यातही खूप मोठा बदल माझ्या समाजानं याच काळात पाहिला. माझ्या घरी घरकाम करणारी आता स्कूटरवरून येऊ लागली, मोबाइलवरून घरी संपर्क ठेवू लागली. घरोघरच्या लेकी-सुनांच्या विचारविश्वात आणि त्यांच्या भावांमध्ये, वडिलांमध्येही बदलाचे धक्के खाण्याची तयारी या काळानं दिली आहे.
अजून एक गोष्ट झाली. ती चांगली की वाईट असं आपण म्हणू नये. त्याला गुणात्मक शेरा आत्ताच देऊ नये, कारण विशुद्ध सामाजिक विश्लेषणामध्ये चांगलं काय, वाईट काय यापेक्षा आत्ताच्या संदर्भात काय योग्य, काय अयोग्य हे महत्त्वाचं. झालं असं की, समाजाची भूक वाढली, हाव वाढली. प्रत्येकाला ‘ये दिल मांगे मोअर’ वाटू लागलं. एक बेडरूमच्या फ्लॅटमध्ये त्याचं कुटुंब छोटं झालं, तरी त्याचं मन रमत नाही सध्या. त्यासाठी धडपडण्याची, कष्ट करण्याची त्याची तयारी आहे. त्याला आणखी, आणखी हवं आहे. एका पातळीवर ही हाव जर अमेरिकेत आहे तशी अनियंत्रित राहिली तर ती धोकादायक आहे, पण आपल्या देशात ती तेव्हढी अनियंत्रित राहूच शकणार नाही. कारण इतकी अनियंत्रितता आपल्याला परवडणार नाही. त्यामुळे ही भूक असणं हे लक्षण आशादायक आहे. समाजाचं भान शाबूत राहिलं आणि त्याचा सांस्कृतिक पाया चिरेबंदी राहिला तर याच भुकेतून, याच ईष्र्येतून माझा समाज नवी क्षितिजं धुंडाळू लागेल.
अजून एक बदल झाला. मला घाई झाली. घाई माझ्या मनात तयार झाली. दुपारी दोनची बस चुकली म्हणून पुढच्या पाचच्या बसपर्यंत थांबायला मी तयार नाही. माझी पावलं लगेच स्टॅन्डबाहेरच्या काळीपिवळीकडे जातात. मला थांबायचं नाही. पूर्वी मी पुढच्या बसपर्यंत थांबायचो. आता मला वाटतं, थांबलो तर संपलो. ही मनाची अवस्थाही चांगली आहे. वाईट काय त्यात? मला गती हवी, मला बदल हवा असं माझ्या समाजाचं, माझ्या मराठी समाजाचं मन बनत चाललं आहे, आणि ही अत्यंत चांगली खूण आहे.
पाहा ना, माझ्या मराठी समाजात स्पर्धा सुरू झाली जी निकोप होणं एव्हढीच माझी जबाबदारी आहे. आमचा ओढा गुणवत्तेकडे सुरू झाला, जे मी आता जोपासण्याची, वाढवण्याची गरज आहे. मला निवडीची संधी मिळू लागली ज्यातून काय चांगलं, काय मला हवं आणि काय आणि किती मला हवं, हे ठरवण्याची शक्यता निर्माण झाली. किती चांगली गोष्ट आहे ही! यातून माझा समाज नवे आदर्श शोधेल, ते प्रत्यक्षात आणण्यासाठी प्रयत्न करेल, त्यातून तो मोठा होईल. जगातल्या चांगल्या गोष्टी, माणसांची जगभर चाललेली धडपड माझ्यापर्यंत येऊ लागली. माझ्या समाजाची भूक वाढली. निदान भूक निर्माण झाली. ही भूक त्याच्या प्रगतीचं इंधन बनू शकेल, बनेलच असं नाही, पण निदान शक्यता तरी निर्माण झाली. माझ्या समाजाला घाई झाली, तो आता बदलाला तयार झाला, हेही याच वीस-बावीस वर्षांत घडलं.
समाज प्रवाही आहे. तसा तो असायला हवा. मधल्या काळात त्याला साचलेपण आलं होतं. अजून ते साचलेपण संपूर्णपणे गेलं असं नाही. सांस्कृतिक क्षेत्रात, कलेच्या क्षेत्रातले बदल अजून आपण तितके टिपले नाहीत, पण जागतिकीकरणामुळे निश्चितच एक संधी निर्माण झाली. इतिहासाच्या प्रत्येक टप्प्यावर ‘आपण पार बिघडलो, अगदी रसातळाला गेलो’ असं आपण म्हणत आलो. ते आपलं म्हणणं प्रामाणिकही होतं, पण तरीही समाज पुढे जायचा थांबला नाही, थांबणार नाही. गेल्या हजार-दोन हजार वर्षांचा प्रवास आपण पाहिला तर तीन पावलं पुढे- दोन मागे, पण नंतर चार पावलं पुढे असंच होत आलं आहे, तसंच होणार. ते स्वीकारण्याची आपली तयारी किती, एव्हढं फक्त महत्त्वाचं!