– मेधा अलकरी
ज्येष्ठ लेखिका, पत्रकार आणि लघुपटकार संजीवनी खेर यांचं ‘ग्लोकल लेखिका- सशक्त लेखणीच्या वारसदार’ हे पुस्तक संवेदनशील आणि जिज्ञासू वाचकांसाठी एक पर्वणी आहे असं म्हटलं तर वावगं ठरू नये. या पुस्तकाला ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांची अतिशय नेमकी आणि मार्मिक प्रस्तावना आहे. या लिखाणामागची प्रेरणा लेखिकेनं आपल्या मनोगतात लिहिली आहे ती आपल्याला विचार करायला भाग पाडते.
या पुस्तकात संजीवनी खेर देशविदेशींच्या लेखिकांचा समग्र परिचय वाचकांना करून देतात. पंचवीस विविध भाषिक भारतीय आणि पंचवीस आंतरराष्ट्रीय लेखिकांची माहिती, त्यांचा जीवनपट, त्यांचं साहित्य, त्यांच्या गाजलेल्या कथा-कादंबऱ्या यांचं थोडक्यात, पण रोचक वर्णन संजीवनी खेर यांनी करून दिलेलं आहे. पन्नास प्रभावी, लक्षवेधक लेखिकांच्या लेखनातील सार काढून ते वाचकांपर्यंत पोहोचवण्याचं काम संजीवनी खेर यांनी अतिशय सुरेखरीत्या पार पाडलं आहे. भाषेचे अडथळे पार करत हे पुस्तक त्यातील प्रत्येक लेखिकेच्या लेखनातील सार आपल्यापर्यंत पोहोचवते. यातील जागतिक कीर्तीच्या लेखिकांनी त्यांच्या आयुष्यात भोगलेला एकांतवास, दडपशाही, अन्याय आणि त्याविरुद्धचा लढा यांचे दाहक अनुभव आपल्या लेखनात चित्रित केले आहेत. परंपरेनं जखडून ठेवलेल्या शृंखला तोडून प्रस्थापित सत्तांधांविरुद्ध त्या उभ्या ठाकतात. कारण त्यांना स्वत:चा शोध घ्यायचा असतो. या लेखिका भूतकाळातील खोटे आणि खुळचट समज मोडून, नव्या सामाजिक आणि राजकीय वास्तवाची पुनर्रचना करत आहेत. समाजाच्या वेगवेगळ्या थरातून आलेल्या या धाडसी लेखिकांनी आपापल्या चिंता वेगवेगळ्या पद्धतीने मांडल्या आहेत. हा मार्ग निश्चितच कष्टसाध्य आहे.
भारतातील विविध भाषिक लेखिकांचं साहित्य वाचताना जाणवलं की ‘बंगालची वाघीण’ महाश्वेतादेवींसारख्या सामाजिक बदलाबद्दल सचेत असलेल्या झुंजार लेखिकेबरोबरच आपल्या कक्षेत राहूनही समाजभान असलेल्या कितीतरी लेखिका आहेत. अमृता प्रीतम यांच्या लेखणीतून उतरलेला फाळणीचा भीषण हाहाकार मला अपरिचित असल्याने सुन्न करून गेला. तेलगू लेखिका पोपरी, महाकाव्यातील नायिका मांडताना वेगळा दृष्टिकोन ठेवते. इंदिरा गोस्वामी, अजित कौर यांचं जीवन दु:खाने भरलेलं असताना त्यांच्या लेखणीतून पाझरणारा आशावाद जसा थक्क करून जातो, तसाच जीवनदर्शन घडवणारा धीरूबेन पटेल यांचा मार्मिक वास्तववाद. या वर्षीच्या साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद भूषविलेल्या तारा भवाळकर यांच्या लेखात घडलेलं लोकसंस्कृतीचं मनोहारी दर्शन वाचकांना नक्कीच आवडेल.
विदेशी लेखिकांमधील टोनी मॉरिसन या निग्रो स्त्रीवरील’ सुंदर संपन्न काळे जग’ हा लेख खूप भावतो. कृष्णवर्णी समाजाला अमानुष वागणूक देणाऱ्यांविरुद्ध तिने अगदी परखडपणे लिहिलं आहे. रशियातील युद्ध, हुकूमशाही राजवट या दडपणाखाली जगलेल्या, प्रत्यक्ष युद्धात भाग घेतलेल्या महिलांचा लढा आणि कर्तृत्व मांडणारा स्वेतलाना अलेक्सिविच हिच्यावरील लेखही नितांतसुंदर आहे. स्थलांतरितांचे अस्वस्थ जगणे, भिन्न संस्कृतीशी जुळवून घेणे, घरातीलच नव्या जुन्या पिढीचा संघर्ष मांडणारा झुम्पा लाहिरी यांच्यावरील लेख आपल्या डोळ्यावरील झडपा उघडणारा वाटला. या पुस्तकात लेखिकांच्या साहित्यातून आपल्याला त्या त्या देशातील इतिहास, संस्कृती, धार्मिक आणि पारंपरिक मिथकं यांचं ज्ञान होतं. कक्षा रुंदावल्याने आपल्या जाणिवा समृद्ध होतात आणि त्यांच्याशी नकळत एक नातं निर्माण होतं.
‘ग्लोकल लेखिका’, संजीवनी खेर, ग्रंथाली प्रकाशन, पाने- ४५५, किंमत- ७५० रुपये.
medhaalkari@gmail.com