‘लोकरंग’मधील (२० जुलै) ‘अन्यथा… स्नेहचित्रे’ सदरातील गिरीश कुबेर यांच्या ‘लिप्तअलिप्त’ या लेखावरील निवडक प्रतिक्रिया…
या लेखात गोविंदराव तळवलकर यांचे रेखाटलेले व्यक्तिचित्र फारच विलोभनीय आहे. लेखकाने गोविंदरावांसारख्या सव्यसाची विद्वान संपादकाच्या आठवणींना उजाळा देत त्यांच्या व्यक्तिमत्त्वाच्या विविध पैलूंचे वर्णन केले आहे.
साधारण १९७० च्या आसपास यशवंतराव चव्हाण यांना भेटण्यासाठी मी व शरदराव पवार ‘रेव्हिएरा’ (नरिमन पॉइंट) या त्यांच्या निवासस्थानी गेलो होतो. त्यावेळी ते कोणाशी तरी चर्चा करत असल्यामुळे त्यांच्या खोलीचे दार बंद होते. आम्ही दोघेही हॉलमध्ये त्यांची वाट पाहत थांबलो. थोड्या वेळाने यशवंतराव एका व्यक्तीबरोबर बाहेर आले. क्षणभर थांबून यशवंतराव म्हणाले, ‘‘गोविंदराव थांबा, तुम्हाला एका उमद्या तरुणाची ओळख करून देतो- हे शरद पवार नुकतेच आमदार झाले आहेत. आणि माझ्याकडे वळून म्हणाले, हा आमचा उल्हास पवार युवक कार्यकर्ता. आणि आमच्याकडे पाहून म्हणाले, हे गोविंदराव तळवलकर मोठे पत्रकार, विद्वान संपादक.’’ ही आम्हा दोघांची पहिली भेट.
पुढे हळूहळू लक्षात आले की, यशवंतराव व तळवलकर हे दोघेही मूळचे रॉयवादी. दोन्हीही महान व्यक्तमत्त्वं. पुढे शरदरावांशी त्यांचे खूपच जिव्हाळ्याचे संबंध निर्माण झाले. माझ्याही अनेकदा भेटीगाठी होत राहिल्या. विशेषत: नाशिकचे विनायकराव पाटील यांच्यामुळे आमच्यातील संबंध दृढ झाले. गोविंदरावांचे अन्य लेखन, संपादकीय आमच्यासाठी वैचारिक मेजवानीच असे. कधी कधी आम्ही सभागृहात मुद्द्याच्या संदर्भासाठी (विधान परिषद) त्यांचा उल्लेखही करीत असू. पत्रकारिता, राजकारण, समाजकारण, साहित्य संस्कृती अशा विविध क्षेत्रांमध्ये त्यांचा दबदबा होता. महाराष्ट्रातील अनेक राजकीय घटनाक्रमांमध्ये त्यांचे प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष अस्तित्व जाणवायचे.
मी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचा अध्यक्ष होतो त्यावेळची गोष्ट. १९७७ साली पुण्यामध्ये एका कार्यक्रमासाठी भारताचे तत्कालीन पंतप्रधान मोरारजी देसाई (त्यावेळी नुकतंच जनता पक्षाचं सरकार सत्तवेर आलं होतं आणि काँग्रेसचा पराभव झाला होता.) आले होते. ते टिळक रोडवर ज्या दिशेने कार्यक्रमस्थळी जात होते, त्या ठिकाणी माझ्या नेतृत्वाखाली निदर्शने करण्यासाठी युवक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. त्यावेळी तिथे अन्य दोन संघटनांचीही निदर्शने होती. त्यात नामदेव ढसाळांच्या दलित पँथरचाही समावेश होता. प्रचंड गोंधळ झाला. पंतप्रधानांची गाडी अडवली गेली. लाठीचार्ज करण्याचा प्रयत्न झाला. त्यावेळी गाडीत मुख्यमंत्री वसंतदादा पाटील (काँग्रेस आघाडी) होते. त्यांनी कदाचित आम्हाला पाहिले असावे, त्या वेळी फार थोडा काळ शरद पवार गृहमंत्री (कॅबिनेट) होते.
आम्हा आंदोलकांवर केसेस दाखल झाल्या. त्यानंतर एकदा मुंबईला एका इमारतीत शिरताना लिफ्टमध्ये गोविंदराव भेटले. मला पाहताच माझ्यावर रागावले. म्हणाले, ‘‘तुम्ही स्वत:ला काय समजता? पंतप्रधानांची गाडी अडवता.’’ माझ्या परीने मी माझी भूमिका व तीन संघटनांची निदर्शने याबद्दल त्यांना सांगण्याचा प्रयत्न केला. आमचा हेतू फक्त निदर्शनाचाच होता वगैरे वगैरे… त्यानंतर विनायकराव पाटील यांच्या समवेत दोघांची पुन्हा भेटी झाली. त्यावेळी त्यांच्यातला हास्यविनोद करणारा एक निखळ माणूसही दिसला. माझ्या निदर्शनामुळे संतापलेले आणि हास्यविनोद करणारे गोविंदराव असे त्यांच्यातील दोन वेगवेगळ्या स्वभावाचे दर्शन झाले. पुढे विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना त्यांच्याबरोबर भोजन गप्पा करण्याचा योग आला. विनायकरावांचे आणि आमचे एक मित्र डॉक्टर सारडा यांनी आयोजित केलेल्या एका कार्यक्रमातही आम्ही भेटलो. त्यांच्याबरोबर त्यांचे सहकारी प्रकाश अकोलकरही होते. आमच्या गप्पा इतक्या रंगल्या की रात्री किती वेळ झाला हे समजलेच नाही.
मी विधान परिषदेमध्ये आमदार असताना विरोधी पक्षनेतेपदी ग. प्र. प्रधान होते आणि सभापतीपदी रा. सु. गवई होते. मी सरकारची बाजू मांडत असताना सभागृहामध्ये कुठल्या तरी प्रश्नावर गदारोळ उडाला. माझ्या एकदम लक्षात आलं की, दोन दिवसांपूर्वी ‘महाराष्ट्र टाइम्स’च्या संपादकीयमध्ये ‘विरोधी पक्षाचे नेतृत्व नालायक ठरलं’ असा उल्लेख होता. याचा संदर्भ मी सभागृहात दिला आणि एकच गोंधळ उडाला. सत्ताधाऱ्यांनी यावर टाळ्या वाजविल्या, मात्र विरोधकांनी मात्र तुम्ही ग. प्र. प्रधानांना नालायक म्हणालात असा आरोप केला. मी विरोधकांना नम्रपणे सांगण्याचा प्रयत्न केला की, प्रधान सरांबद्दल माझ्या मनातच काय, सर्वांना नितांत आदर आहे. गोविंदरावांच्या संपादकीयमधला आशय लक्षात घ्या. हे एका व्यक्तीवर नाही तर विरोधी पक्षाविषयीचे मत आहे. आणि विरोधी पक्षाचं जनमानसातलं किंवा जनआंदोलनातलं नेतृत्व हे नालायक ठरलेलं असं मी नाही तर गोविंदराव तळवलकर म्हणत आहेत. सभागृहात मी गोविंदरावांच्या संपादकीयचा दाखला दिला तो माझ्या म्हणण्याला पुष्टी मिळावी म्हणून. हे ऐकल्यावर सभागृह शांत झालं. यातूनच त्यांचं मोठेपण दिसून येतं. – उल्हास पवार.
गोविंदरावांची वैचारिक उंची मोठीच
गोविंदराव तळवलकरांवरील लेख केवळ वाचलाच नाही, तर अनुभवला आणि त्यातील विचारांनी काही काळ स्तब्ध झालो. लेखासाठी निवडलेले शीर्षकच तळवलकरांच्या संपूर्ण व्यक्तिमत्त्वाचे आणि बौद्धिक उंचीचे सार आहे. एकीकडे ज्ञानाच्या, विचारांच्या, इतिहासाच्या आणि जागतिक घडामोडींच्या अथांग महासागरात ते पूर्णपणे ‘लिप्त’ होते. त्यांचं जगणं हेच त्या वैचारिक विश्वाशी एकरूप झालेलं होतं. पण त्याच वेळी, दुसरीकडे लौकिक जगातील निरर्थक सोपस्कार, पोकळ कौतुक आणि दिखाव्याच्या सामाजिकतेपासून ते पूर्णपणे ‘अलिप्त’ होते. हा ‘अलिप्तपणा’ त्यांचा अहंकार नव्हता, तर त्यांच्या ‘लिप्त’ नसण्याचा तो स्वाभाविक परिणाम होता. विचारांच्या आणि मूल्यांच्या जगात ते पूर्णपणे लिप्त होते, पण भौतिक जगात ते केवळ अलिप्त होते; पण इतके अलिप्त की त्या उंचीवर पोहोचण्याची धडपड करण्याची इच्छाही आजच्या जगात उरलेली नाही. त्यांचा तो तुसडेपणा नव्हता, तर ते त्यांच्या बौद्धिक एकांताचे संरक्षक कवच होतं, हे या लेखामुळे अधिकच गडद झाले. ज्ञानाच्या सागरात इतके खोल बुडालेल्या माणसाला काठावरच्या उथळ गप्पांचे अप्रूप वाटणार तरी कसे? लेख वाचताना मनात एक अस्वस्थ करणारा विचार येतो.
गोविंदरावांचा अलिप्तपणा हा त्यांचा स्वभावदोष होता की, तो समजून घेण्यात आजच्या समाजाची ग्रहणशक्ती कमी पडते आहे? आजच्या ‘सोशल’ असण्याच्या काळात, त्यांचा तो बौद्धिक एकांत ‘अँटी-सोशल’ ठरवला गेला असता. जिथे विचारांपेक्षा प्रतिमेला आणि ज्ञानापेक्षा ‘नेटवर्क’ला अधिक महत्त्व आहे. गोविंदरावांचा तो स्वभाव हा त्यांचा दोष होता की आजच्या समाजाची ती वैचारिक मर्यादा आहे? आजच्या ‘नेटवर्किंग’च्या, सतत ‘कनेक्टेड’ राहण्याच्या आणि विचारांपेक्षा प्रतिमेला अधिक महत्त्व देण्याच्या काळात, गोविंदरावांसारखा निर्लेप, नि:स्पृह आणि ज्ञानासाठी वेडा झालेला माणूस आपल्याला ‘तुटक’च वाटणार. कारण त्यांचा संवाद हा ज्ञानाच्या पातळीवर होता, लौकिक रिवाजांच्या नाही. तिथे गोविंदरावांसारखा नि:स्पृह आणि परखड माणूस गैरसोयीचाच ठरणार.
आपली सामाजिक शोकांतिकाच आहे की, आपण विचारांची धार असलेल्या मनाला तुसडेपणाचे लेबल लावतो आणि पोकळ शब्दांच्या गर्दीला आपुलकी समजतो. गोविंदराव हे एक असे बेट होते, ज्याच्याभोवती ज्ञानाचा अथांग सागर होता, पण त्या बेटावर पोहोचायला लागणारी वैचारिक जहाजेच आज आपल्याकडे नाहीत. सदर लेख केवळ गोविंदरावांना दिलेली आदरांजली नाही, तर तो आपण काय गमावले आहे, याची करून दिलेली एक भेदक जाणीव आहे. एका अशा पर्वाची आठवण आहे, जिथे संपादक आणि विचारवंत हे समाजाचे दीपस्तंभ होते, केवळ माहितीचे वितरक नव्हते. एका विझून गेलेल्या ताऱ्याची ओळख त्याच्या तेजस्वी प्रकाशासह पुन्हा एकदा करून दिल्याबद्दल ऋणी आहे. – बिपीन बाकळे
परखड लिखाणाचा चाहता
या लेखात गोव्यातील ज्या प्रमुख व्यक्तींचा उल्लेख आहे त्यापैकी जवळ जवळ सर्वांचाच माझा जवळून परिचय होता. त्यांच्या बोलण्यातूनही लेखकाने लिहिलेल्या घटनांसारख्या अन्य काही घटनांचा संदर्भ येत असे. गोविंदरावांचे परखडपणे लिहिलेले अग्रलेख मी आवर्जून वाचत असे. त्यांना समक्ष भेटण्याचा योग मात्र आला नाही. हा लेख म्हणजे सार्वजनिक क्षेत्रातील नामवंत व्यक्तींबद्दल लिहिताना किती संयम राखून व समतोलपणे लिहिता याचे आणखी एक उदाहरणच आहे. मुकुंद तळवलकरांचा लेखही उत्तम आहे. – विनायक शिरगुरकर
साक्षेपी संपादक
‘लोकरंग’मधील (२० जुलै) ‘अन्यथा… स्नेहचित्रे’ या सदरात गिरीश कुबेर यांनी लिहिलेला गोविंदराव तळवलकरांवरील ‘लिप्त-अलिप्त’ हा लेख वाचला. या लेखाची मीच नव्हे तर अनेक वाचक नक्कीच वाट पाहत असणार. गोविंदरावांनी आपल्या अभ्यासू आणि परखड लिखाणाने पत्रकारितेस नवा आयाम दिला. कुणाचीही बाजू न घेता, योग्य असेल त्याचाच पाठपुरावा करणे सहजहसाध्य नाही, पण गोविंदरावांना ते जमले. त्यांचे परखड अग्रलेख, प्रासंगिक लिखाण आणि पुस्तक परिचय वाचकांमध्ये विलक्षण लोकप्रिय होते. आमच्या महाविद्यालयीन जीवनात ‘मराठा’चे आचार्य अत्रे, ‘मटा’चे गोविंदराव, ‘माणूस’चे भाऊ माजगावकर, आणि ‘सोबत’चे ग. वा. बेहेरे यांच्या लिखाणाची वाचक वाट पाहत असत.
‘टाइम्स ऑफ इंडिया’चे तत्कालीन संपादक शाम लाल यांना ते गुरुस्थानी मानत. जीवनाच्या सांध्यपर्वात शाम लाल यांना दिसत नसे, गोविंदराव त्यांच्या घरी जाऊन त्यांना वृत्तपत्र वाचून दाखवीत असत. पुस्तक/ग्रंथ परिचय हे त्यांचे बलस्थान होते. पाल्हाळ न लावता नेमके मुद्देसूद लिखाण ही तर त्यांची ओळख होती. त्यांचे अनेक अग्रलेख संग्राह्य असेच आहेत. ते आजच्या पत्रकारांनी आवर्जून अभ्यासावेत. न पटणाऱ्या गोष्टींवरील त्यांची बोचरी, पण संयत टीकाही वाचनीय असे. लेखकाने त्यांच्यासारख्या बहुआयामी व्यक्तिमत्त्वाचा वस्तुनिष्ठ परामर्श घेतला आहे. – अशोक आफळे, कोल्हापूर.
प्रेमळ शेजारी
‘लिप्त-अलिप्त’ व मुकुंद तळवलकर यांचा ‘आमचा अण्णा’ हे दोन्ही लेख वाचले. या लेखांमधून तळवलकरांचे शब्दचित्र छान रेखाटले आहे. शेजारी या नात्याने आम्हाला त्यांचा २० वर्षं सहवास लाभला. १९६० साली माझे वडील मधुसूदन चंद्रचूड हे मुंबईला महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंकेत नोकरीला लागले. तेव्हा आम्ही डोंबिवली येथे नारायणराव गोरे यांच्या बंगल्यात भाड्याने राहत होतो. गोविंदराव त्यांचे जावई. ते तेथेच राहत होते. निरुपमा ही माझ्या बरोबरीची व सुषमा धाकटी. गोविंदरावांनी बंगल्याच्या अवतीभोवती सुंदर बाग केली होती व रात्री कामावरून आल्यावर ते बागेला पाणी देत. त्यांची बागेची आवड निरुपमाने जोपासली आहे. पु. भा. भावे हे डोंबिवलीला राहत होते व दर रविवारी नियमितपणे गोविंदरावांना भेटायला येत.
गोविंदरावांकडे पुलं, गदिमा, भालचंद्र पेंढारकर, विद्याधर गोखले, ह. रा. महाजनी येत असत व त्यांच्यामुळे या दिग्गजांना आम्हालाही भेटता आले. सगळ्यांशी जरी ते तुटकपणाने वागत असले तरी त्यांचे व आमचे खूप घरोब्याचे संबंध होते. माझ्या कायम लक्षात राहणारी आठवण म्हणजे मी व निरुपमा जेव्हा ११ वी मॅट्रिक परीक्षा उतीर्ण झालो तेव्हा वेळात वेळ काढून गोविंदराव आमच्या बरोबर रुईया कॅालेजला प्रवेशासाठी आले होते व तेथूनच आम्ही चित्रकार द. ग. गोडसे यांच्या माटुंगा येथे घरी गेलो होतो. ते जेव्हा पहिल्यांदा लंडनला प्रशिक्षणासाठी गेले होते तेव्हा त्यांनी माझ्या बहिणीसाठी उत्तम प्रकारचा फ्रॉक आणला होता. ते डोंबिवली सोडून मुंबईला राम महाल येथे राहण्यास गेले तेव्हा आम्ही बऱ्याच वेळेला तेथे जात असू. त्यांच्या घरांच्या भिंती पुस्तकांच्या कपाटांनी भरलेल्या असत. शकुंतलाताईंना खूप अगत्य होते. आजही निरुपमा व सुषमा यांचा ईमेलद्वारे कायम संपर्क असतो. या लेखांच्या निमित्ताने डोंबिवलीतल्या त्यांच्या आठवणींना उजाळा मिळाला. – प्रदीप चंद्रचूड, पुणे.