अतार्किक मांडणी आणि पूर्वग्रहदूषित दृष्टिकोन

‘लोकरंग’मधील ‘पर्यावरणाचा बागुलबुवा?’ हा डॉ. सचिन वझलवार यांचा दीर्घ लेख वाचनात आला. सुरुवातीला अशा प्रकारच्या लिखाणाचे आश्चर्य वाटले खरे, पण जसा लिखाणाचा रोख लक्षात येत गेला तशी या लेखाची कीव वाटली.

‘लोकरंग’मधील ‘पर्यावरणाचा बागुलबुवा?’ हा डॉ. सचिन वझलवार यांचा दीर्घ लेख वाचनात आला. सुरुवातीला अशा प्रकारच्या लिखाणाचे आश्चर्य वाटले खरे, पण जसा लिखाणाचा रोख लक्षात येत गेला तशी या लेखाची कीव वाटली.
लेखातील एखाद दुसरा मुद्दा वगळता संपूर्ण लेख अतार्किक मांडणीवर आधारलेला आहे. एकंदर पर्यावरण चळवळीबाबतच असलेला लेखकाचा आकस यात व्यक्त झालेला आहे. या लेखाच्या मांडणीतील असमतोल आणि एकंदर उद्देश लेखाच्या शेवटच्या वाक्यात उलगडतो. ‘उद्योगांना होणारा विरोध शमवणे’ हा हेतू आणि ‘पर्यावरणवाद्यांचा विरोध अकारण’ हा विचारच पूर्वग्रहदूषित आहे. कोणत्याही क्षेत्रातील चळवळीमध्ये चांगले आणि वाईट असे दोन्ही प्रवाह असतात. त्यामुळे एखाद्या उदाहरणावरून तशा चळवळी सर्रास वाईट असतात असं मानणं मूलत: चुकीचं आहे. ‘भावनिक जवळीक आणि संवेदना निर्माण करण्यात पर्यावरणशास्त्र यशस्वी ठरले,’ हा लेखकाचा दावाही साफ चुकीचा आहे. तशी संवेदना असती तर आज पर्यावरणाची अशी दयनीय स्थिती उद्भवली नसती. लेखकाच्या मते, ‘पर्यावरण आंदोलने नेहमी आक्रमक भूमिका घेतात,’ काही तुरळक अपवाद वगळता अशा भूमिका या नेमक्या गरजेतूनच आलेल्या असतात. कोणताही तार्किक पर्यावरणप्रेमी विनाकारण आक्रमक भूमिका घेत नाही. तशी परिस्थिती निर्माण केली जाते. देशाच्या पर्यावरण चळवळीतील अग्रगण्य असलेले ‘चिपको आंदोलन’ अशाच धाडशी भूमिकेतून उभारले होते, हे विसरता येणार नाही. हे आंदोलन पुढील पर्यावरण रक्षणाचे दिशादर्शक ठरले. लेखकाला उद्योग जगतातील टोकाच्या भूमिका आणि भोंगळ कारभार दिसत नाही, पण पर्यावरण वाचवण्यासाठी धडपडणारी जनतेची भूमिका मात्र गैर वाटते, याला काय म्हणावे?
पाश्चिमात्य विकसित देश विनाकारण विकसनशील देशांवर बंधने घालू पाहतात, हा मुद्दा बरोबर, पण त्याला प्रत्युत्तर म्हणून काय आपण पर्यावरणाचा आणखी ऱ्हास करावा? राजकीय मुत्सद्देगिरी आणि शास्त्रशुद्ध चर्चेतून अशा स्वैर राष्ट्रांशी नक्कीच वाटाघाटी करता येतील. ‘तापमानवाढीच्या ३० वर्षांच्या चक्राचा’ उल्लेख लेखक करतात आणि नमूद करतात की, ‘यामुळे आजची तापमानवाढ ही काही चिंतेची बाब नाही,’ ही जनतेची शुद्ध दिशाभूल आहे. तापमानातील चढउतार ही पृथ्वीच्या इतिहासातील सामान्य बाब जरी असली तरी या तापमानवाढीचा गेल्या दोन दशकांतील वेग नजरेआड करता येणार नाही. यावर कैक संशोधने झालेली आहेत. अनेक प्रबंध उपलब्ध आहेत. लेखकाने शास्त्रीय अभ्यासांवरही काही आक्षेप घेतलेले आहेत. वायूंचे उत्सर्जन किती झाले, तापमानात किती भर पडली, औद्योगिकीकरणाचा तापमानवाढीमध्ये वाटा किती, यावर अद्याप संशोधन सुरू आहे आणि त्यात बदलही करून सुधारित उत्तरेही देण्यात येतात, असाही एक मुद्दा या लेखात मांडला गेला आहे. कृपया लेखकाने हे लक्षात घ्यावे की, कोणताही खरा शास्त्रीय अभ्यास अशाच टप्प्याने जात असतो. कोणत्याही एका संशोधनाचे निष्कर्ष सर्वकाळ ब्रह्मसत्य म्हणून ग्राह्य धरता येत नाहीत. त्यात कालानुरूप नवीन संशोधन आणि बदल करत जाणे हे शास्त्राच्या नियमांना धरूनच आहे. यामुळेच शास्त्रामध्ये अ‍ॅरिस्टॉटल, न्यूटन, आइनस्टाइन असे टप्पे निर्माण होतात.     
या लेखात आणखीही काही आक्षेपार्ह विधाने आहेत. जसे ‘१५ हजार वर्षांतील वैश्विक तापमान बदलाची दहा चक्रे बघता गेल्या दशकातील ०.८ डिग्री वाढ ही नगण्य आहे’, ‘तापमान वाढण्याचे कारण हे ५०० वर्षांमध्ये हवामानातील बदलाचे चक्र आहे’ इत्यादी. तापमानवाढाची प्रक्रिया फक्त नैसर्गिक घडामोडींचा परिपाक आहे असे म्हणणे म्हणजे डोळेझाक करून वास्तवाला नाकारण्यासारखे आहे. मानवी विकासाच्या प्रक्रियेमध्ये जो काही गोंधळ आजवर घातला गेला आहे, त्याचा एक परिणाम म्हणजे तापमानवाढ आहे. ‘सायन्स’ नियतकालिकामध्ये नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या प्रबंधानुसार, औद्योगिक क्रांतीनंतर वन्यजीव नामशेष होण्याचा वेग एक हजार पटीने वाढला आहे! असे कितीतरी दुष्परिणाम अजूनही भोगावे लागणार आहेत. त्यामुळे आपण काहीच चुकीचे करत नसून सर्वकाही आलबेल आहे, असे म्हणणे शुद्ध मूर्खपणाचे ठरेल. विविध प्रथितयश शास्त्रज्ञांनी, नियतकालिकांनी, संस्थांनी तापमानवाढ आणि इतर पर्यावरणीय घडामोडींवर वेळोवेळी प्रकाश टाकलेला आहे, त्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही.
आपला मुद्दा पटवून देताना लेखकाने भूगर्भशास्त्रज्ञ आणि गणितज्ज्ञांचे दाखले दिलेले आहेत. असे दाखले हवामान शास्त्रज्ञांचे असते तर त्यावर विचार करता आला असता. हव्या त्या शास्त्रज्ञांचे दाखले मुद्दा पटविण्यासाठी वापरणे सर्वथा चुकीचे ठरते. जेव्हा लेखक ‘शास्त्रीय दृष्टिकोनाची गरज’ असल्याचे नमूद करतात, तेव्हा त्यांनीही शास्त्रीय दृष्टिकोनातूनच जनतेपर्यंत मुद्दे न्यावेत.  
‘पर्यावरणशास्त्रीय नियमांचे तंतोतंत पालन केल्यास पर्यावरणाची हानी कमी होते, हे वास्तव शासन लोकांसमोर प्रकर्षांने मांडत नाही,’ असेही त्यांचे म्हणणे आहे. लेखकाने कृपया वास्तवाचा अभ्यास करावा. असे तंतोतंत पालन करणारे उद्योग किती आहेत हे जरा त्यांनी तपासावे आणि नंतर शासनाला उपदेश द्यावा. लेखाच्या शेवटी आणखी एक कारणमीमांसा लेखकाने केलेली आहे की, विजेची उपकरणे व प्लास्टिकशिवाय दिनचय्रेची कल्पनाच करू शकत नाही. निव्वळ विरोधी मानसिकतेने काहीच साध्य होणार नाही. जनतेने दिनचर्या विजेविना अथवा प्लास्टिकविना चालवावी असे कुणाचेही म्हणणे नाही. सर्व उद्योगधंदे बंद करावेत, असेही कुणा पर्यावरणप्रेमीने म्हटलेले नाही. आधुनिकतेच्या आणि विकासाच्या नावाखाली जो काही स्वैराचार चाललेला आहे त्याला लगाम घालण्याची गरज आहे, इतकीच माफक अपेक्षा असते. पर्यावरण जपण्यासाठी झगडा देणारे अतिरेकी, आणि विकासाचे इमले बांधणारे लोक त्राते अशी एकांगी आणि एका विशिष्ट गटाचे लांगुलचालन करणारी भूमिका सर्वथा चुकीची आहे. कुणाही बुद्धिवाद्याच्या विचारांनी प्रभावित न होता जनतेनेच स्वत:ची सद्सदविवेकबुद्धी वापरण्याची वेळ आज आलेली आहे, हे नक्की.   
– धर्मराज पाटील, जैवविविधता विशेषज्ज्ञ

आकलनापलीकडची तुलना
रविवार, २५ मे २०१४ च्या ‘लोकरंग’मधील ‘चाणक्याशी गाठ व गाठ चाणक्याशी’ हा लेख वाचला. दोन भिन्न गोष्टींची तिसऱ्याच पाश्र्वभूमीवर लेखकाने केलेली तुलना आकलनापलीकडील वाटली. चाणक्याने राष्ट्ररक्षणाचे ध्येय हे केवळ वैयक्तिक अपमानाचा सूड म्हणून केला असेल असे वाटत नाही. कारण, पुढे चंद्रगुप्ताकरवी परकीय आक्रमकांची हाडे मोडण्यात चाणक्याचा मोठा वाटा आहे. लेखकाने यवन-म्लेंच्छ यांचा समानार्थी उल्लेख केला आहे. वास्तविक, यवन हे ग्रीक आक्रमकांना दिलेले नाव असून, म्लेंच्छ व यवन हे एकच समजू नये. यवन हे केवळ साम्राज्यविस्तारासाठी लढणारे, पण म्लेंच्छ साम्राज्यविस्तार व धर्मविस्तार अशा दोहोंवर लढणारे आणि हे दोन्ही परकीय आक्रमक! यांत सरसकट मुसलमानांचा उल्लेख करणे चुकीचे नाही काय?
जातिनिर्मूलनाला संघाचा व त्यांच्या पाठीराख्यांचा विरोध कसा? स्वत: महात्मा गांधी व डॉ. आंबेडकरांनी स्वयंसेवकांना एकत्रित काम करताना पाहून कौतुकोद्गार काढले होते.
शेवटी लेखक बजावतात की, भारतीय जनतेची गाठ ‘या’ चाणक्यांशी आहे. थोडय़ा वेळासाठी लेखकाच्या कल्पनेतील तुलना विचारात घेतली, तर ही भीती अनाठायी वाटते. आर्य चाणक्याने तर जनतेचे परकीय आक्रमकांपासून रक्षणच केले. आपल्या सर्वाचा लोकशाही व्यवस्थेवर विश्वास असायला हवा. थोडी सकारात्मक विचारसरणी अवलंबवावी. सरकारवर अंकुश केवळ जनतेच्या ऐक्याचाच असतो. तेवढी एकजूट आपल्यात असावी. त्यासाठी शेंडी-भेद व इतर भेद विसरावे लागतील व केवळ ‘एक राष्ट्र’, ‘एक लोकशाही राष्ट्र’ म्हणून विचार करावा लागेल.
– कल्पेश कोठाळे, पुणे.

मोदींना निवडून दिले ते
सर्वपक्षीय हिंदूनीच!
‘रायगडाला जेव्हा (उशिरा) जाग येते’ ही संजय पवारांची ‘तिरकी रेघ’ (लोकरंग, ८ जून) वाचली. मराठा आणि मराठी समाजाला सर्वसमावेशक धोरण हवे आहे, याची नोंद राज ठाकरे घेत नाहीत. राज ठाकरे यांची उत्तर भारतीयांविषयीचा शत्रुभाव, इसाई- इस्लाम धर्माबद्दलची अस्पष्ट भूमिका आणि महाराष्ट्राच्या विकासाविषयी सर्व पातळ्यांवर आवश्यक ठरणारे ज्ञान नसणे हे आज स्पष्ट झालेले आहे. तसेच इसाई आणि इस्लामच्या अनुनयासाठी केवळ काँग्रेसच नव्हे, तर भाजपही बदनाम आहे. मोदींमुळे भाजप-संघाला जीवदान मिळाले आहे. भाजपवाले इराणींचे पारशी असणे लगेच स्वीकारतात.
विनय सहस्रबुद्धे यांना संघ-भाजपाच्या बिनबुडाच्या तत्त्वज्ञानाचे समर्थन करण्यावाचून गत्यंतर नाही. मोदींना निवडून दिले ते सर्वपक्षीय हिंदूनीच! हिंदूंचे प्रतिनिधित्व करत असताना मुस्लिमांचा अनुनय करणे, उदात्तीकरण करणे मोदींनी टाळले. हिंदुत्ववादी जनतेला आणखी काय अभिप्रेत होते? मोदींचा वास्तववाद विरुद्ध संघ-भाजपचे बिनबुडाचे तत्त्वज्ञान असा अपरिहार्य संघर्ष नजीकच्या भविष्यकाळात देशाला पाहायला मिळणार आहे.
– सूर्यकांत शानभाग, बेळगाव.

मर्मबंधातली ठेव
डॉ. मृदुला दाढे-जोशी यांचे ‘रहे ना रहे हम’ हे सदर हिंदी चित्रपटगीतांच्या शौकिन व दर्दी मंडळींच्या मर्मबंधातली ठेव बनले आहे. त्यांचा प्रत्येक लेख अभ्यासपूर्ण असतोच, पण त्यातले लालित्य वाचकांना चोखंदळ आनंद देते. ८ जूनच्या अंकातील लेखात ‘रहे ना रहे हम’ व ‘छुपा लो यूँ दिल में प्यार मेरा’ या दोन गीतांचे रमणीय रसग्रहण त्यांनी केले आहे. या दोन गाण्यांतील भावुकता, तल्लीनता, पवित्रता, शब्द व अर्थाची एकतानता याबद्दल मी नेहमीच विचार करतो आणि मित्रमंडळींना ते सांगण्याचा प्रयत्न करीत असतो. माझ्या भावनांचे नेमके प्रतिबिंब लेखात उमटलेले दिसले. स्मरणरंजनाचा आनंद, नवीन गाण्यांविषयी माहिती, माहितीतल्या गाण्यांविषयी नवीन माहिती, गाण्यातल्या वाद्यमेळाविषयी सजगता असे अनेक लाभ या लेखमालेमुळे वाचकांना मिळत आहेत.
– नरेंद्र गंभिरे, सोलापूर.

बुऱ्हाणपूरच्या आठवणी जाग्या झाल्या..
लोकरंग (२५ मे) पुरवणीत बुऱ्हाणपूर या ऐतिहासिक शहरावर प्रसिद्ध झालेला लेख वाचला आणि बालपणीच्या आठवणी जाग्या झाल्या. लिफ्ट बंद असल्यामुळे ‘खुनी भंडारा’ पाहू शकलो नाही, असा उल्लेख लेखात आहे. त्याविषयी अधिक माहिती देण्यासाठी हा पत्रप्रपंच.
माझे शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण आणि नोकरीची सुरुवात बुऱ्हाणपूरमध्ये झाली. शहराभोवती उंच व रुंद तटबंदी आहे आणि सुमारे ४०-५० फूट उंचीचे भव्य दरवाजे आहेत. यातील तीन-चार दरवाजे अजूनही सुस्थितीत असून या शहराच्या इतिहासकालीन वैभवाची साक्ष देतात. बादशाही किल्ला तापीच्या किनारी (जो प्रवाहापासून उंचावर आहे!) बांधलेला आहे. आज त्याचे भग्नावशेष पाहून कळते की, शहरातून दिसतो तो किल्ल्याचा वरचा मजला आणि खाली (जमिनीखाली) तीन मजले होते. सर्वात खालचा मजला तापीच्या किनाऱ्याशी आहे. मुमताज बेगमचा हमामखाना अजूनही बऱ्या अवस्थेत आहे. सरदार भुस्कुटय़ांच्या मुली (वंशज) माझ्या वर्गात शिकत असल्यामुळे त्या वाडय़ावर आम्ही नेहमीच जात असू. असे इतर वाडे व हवेल्या (बाईसाहेबांची खोली) अजूनही पाहायला मिळतात.
आम्ही लहान असताना ‘खुनी भंडारा’ येथे लिफ्टची सुविधा नव्हती. पुरातत्त्व विभागाने आता या प्रकल्पावर काम केलेले दिसते. खुनी भंडारा म्हणजे ८० ते १०० फूट खोल असा भुयारी मार्ग- ज्यातून शहरापर्यंत पाणीपुरवठा होत असे. या मार्गावर मधूनमधून विहिरीसारखे झरोके होते. त्यापैकी एका विहिरीत लोखंडी शिडय़ांनी आत जाता येत असे. विहिरीचा व्यास कमी, आत अंधार म्हणून पेट्रोमॅक्स, कंदील किंवा बॅटरी घेऊन आत उतरायचे. शिडी अरुंद. एका वेळी एकाने दुसऱ्याचा हात धरून जीव मुठीत घेऊन खाली उतरायचे. आत भुयारातील संगमरवरी भिंतीतून स्वच्छ पाण्याचे झरे पाझरायचे. अंगावर पाऊस पडल्यासारखे तुषार उडायचे. खाली पोटरीपर्यंत, तर कुठे गुडघ्यापर्यंत वाहते पाणी. एकमेकांचा हात धरून पुढे सरकायचे. थोडे अंतर चालल्यानंतर वर स्वच्छ प्रकाश आणि आकाशाचा चांदवा दिसायचा. ही विहीर क्रमांक दोन. आणखी पुढे गेलं की विहीर क्रमांक तीन. फार पुढे जायची सोय नव्हती. पण असा हा भुयारी जलपुरवठा. तिथे कायम वास्तव्य करणाऱ्या एका साधूचा खून झाला होता, म्हणून त्याला खुनी भंडारा म्हणतात अशी वदंता आहे.
बुऱ्हाणपूरचा दराबा आणि मुगाची डाळ हे दोन पदार्थ खूप प्रसिद्ध आहेत. ‘मीलन मिठाई’च्या जाहिराती रेल्वेच्या वेटिंग रूम्समध्ये आणि वेळापत्रकामध्ये बघायला मिळतात. आज तिथे खूप यंत्रमाग दिसतात, पण एकेकाळी बुऱ्हाणपूर येथील हातमागाच्या साडय़ा प्रसिद्ध होत्या. १९५१ साली पं. जवाहरलाल नेहरूंसोबत विजयालक्ष्मी पंडित तेथे आल्या होत्या, तेव्हा त्यांनी तिथल्या खास साडीची ऑर्डर दिली होती. ‘लोकरंग’मधील लेख वाचून या सर्व आठवणी जाग्या झाल्या.
– आसावरी फडणीस, ठाणे

मर्मभेदक ‘तिरकी रेघ’
‘लोकरंग’ (रविवार, २५ मे २०१४) मधील संजय पवार यांचा ‘चाणक्याची गाठ आणि गाठ चाणक्यांशी’ हा लेख आवडला. तिरक्या रेघेवरील त्यांचे सरळ व स्पष्ट शब्द मर्मभेदक आहेत. त्यांचं अभिनंदन.
डॉ. सिसिलिया काव्‍‌र्हालो, वसई.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Illogical presentation and prejudice outlook

ताज्या बातम्या